mother tongue reading sakal
सप्तरंग

मातृभाषेतून समृद्धी

भारतात भाषांची जितकी विविधता आहे, तितकी ती क्वचितच कुठल्या दुसऱ्या देशात असेल. इतक्या सर्व भाषांना बरोबर घेऊन साक्षरतेची लढाई आपला देश गेली कित्येक वर्षं लढतो आहे.

अवतरण टीम

- मृदुला अडावदकर

भारतातील सुमारे ५२ प्रादेशिक भाषांमध्ये प्राथमिक वाचनासाठीची पाठ्यपुस्तकं केंद्र सरकारने प्रकाशित केली. त्यातून नेमका कोणता संदेश द्यायचा आहे याचा ऊहापोह...

भारतात भाषांची जितकी विविधता आहे, तितकी ती क्वचितच कुठल्या दुसऱ्या देशात असेल. इतक्या सर्व भाषांना बरोबर घेऊन साक्षरतेची लढाई आपला देश गेली कित्येक वर्षं लढतो आहे. ‘सर्व शिक्षा अभियान’ तर एक दशकभर सुरू आहे आणि तरीही अजूनही भारतातील कितीतरी भागांमध्ये साक्षरता पोहोचू शकलेली नाहीय. या समस्येचं मूळ नेमकं कुठे आहे?

महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला, तरीही सर्व थरापर्यंत साक्षरता पोहोचली आहे, असं म्हणता येणार नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे स्थानिक भाषांमध्ये असलेली विविधता! बालकांना आपल्या घरात आणि परिसरात बोलली जाणारी भाषा मात्र चटकन कळते. उदाहरणार्थ, ठाणे-पालघर भागात पावरी भाषा बोलली जाते. अकोला भागात डांगाणी वा कातकरी अशा स्थानिक भाषा बोलल्या जातात.

त्या-त्या भाषांशी बालकांचा जवळून परिचय असतो. त्यामुळे त्या भाषेत बालकांशी संवाद साधला, तर त्यांचे प्रतिसाद अतिशय चांगले मिळतात आणि शिक्षणाच्या प्रक्रियेत ती सहज सहभागी होतात. त्याउलट जबरदस्तीने त्यांना मराठीतून किंवा कोणत्याही राज्यभाषेतून शिकवायचा प्रयत्न केला, तर ती एकंदर शिक्षण प्रक्रियेपासूनच दूर निघून जातात. म्हणजे भाषा हे साक्षरतेमधलं माध्यम नसून अडथळा म्हणून उभी राहिली आहे.

मातृभाषेचा पूल

मग देशातील प्रत्येक बालकापर्यंत पायाभूत साक्षरता न्यायची असेल, तर त्यासाठी त्यांच्या मातृभाषेत त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि असं नवीन शैक्षणिक धोरणातसुद्धा नमूद केलेलं आहे. मातृभाषा म्हणजे कोणती भाषा? तर जन्मल्यानंतर जी भाषा मुलाच्या कानांवर सहज पडते ती भाषा... मग ती कुटुंबातली असेल किंवा परिसरातली स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण भाषा असेल.

ती भाषा मूल चटकन आत्मसात करतं आणि त्यातून व्यक्त होणं हेसुद्धा मुलाला सोपं जातं. तसं वातावरण असेल, तर मूल एका वेळी सरमिसळ न करता दोन-तीन भाषा सहज शिकू शकतं. त्यातून त्यांचा भाषिक विकास तर साधला जातो; शिवाय भावनिक विकासही होतो.

मातृभाषेत बोलताना मुलाला सुरक्षित वाटतं, व्यक्त झाल्याचं समाधान मिळतं आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. मुलाची ज्ञानभाषा आणि मातृभाषा यांच्यामध्ये सुंदर दुवा साधला गेला, तर संपूर्ण साक्षरतेचं ध्येय गाठणं सहज शक्य होईल. मातृभाषेतून शिक्षण घेण्याला महत्त्व आहे ते यामुळे.

अडीच-तीन वर्षांच्या मुलाला, जर अजून त्याची मातृभाषाच नीट येत नसेल, तर त्याला इंग्रजी ही माध्यम भाषा आणि ज्ञानभाषा म्हणून एकदम स्वीकारायला लावणं, हा किती अघोरीपणा होईल? शाळेव्यतिरिक्त त्याच्या भावविश्वात कुठेही इंग्रजी भाषा नसेल, तर इंग्रजी न आल्यामुळे त्याच्या आत्मविश्वासाला तडा जाण्याची फार मोठी शक्यता असते. स्वतःला नीट व्यक्त होता येण्याचं माध्यमच उपलब्ध नसेल, तर त्या निराशेतून उद्‍विग्न होऊन असं मूल नकळत हात उचलू लागतं, असंही निरीक्षण आहे. असं मूल मारून मुटकून पास होईल; पण शिक्षणप्रक्रियेमधला आनंद घेऊ शकणार नाही.

भाषेकडून गणिताकडे

२०२३ मध्ये ‘एनएएस’चा अहवाल आणि नुकताच प्रसिद्ध झालेला ‘असर’चा अहवाल यामध्ये मुलांच्या भाषा आणि गणित या विषयांमध्ये पुरेशी अध्ययन पातळी गाठली गेली नसल्याचं दिसून आलं आहे. शिक्षक शिकवत आहेत, मुलं शिकत आहेत; तरीही मग नेमकी फट कुठे राहते?

काही ठिकाणी अगदी आठवीतल्या मुलाला चौथीचं वाचता येत नाही, साधी साधी गणिती कौशल्ये येत नाहीत, याचं मूळ कशात आहे? याचं उत्तरसुद्धा भाषा शिक्षणाचं माध्यम निवडण्यामध्येच आहे. जर मुलाने पुरेसं भाषा कौशल्य शिकलं असेल, तर त्याची एकंदर बौद्धिक वाढ आणि विकास यावर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होतो.

भाषा शिक्षणाचा दुसरा फायदा असा असतो, की त्यामुळे मुलांची अर्थ समजून घेण्याची क्षमता वाढते. त्याचा फायदा गणितासारखा विषय समजून घेण्यामध्ये नक्कीच होऊ शकतो. असंही लक्षात आलंय, की गणितामध्ये मागे पडणारी मुलं ही मूलतः भाषेच्या आकलनात मागे आहेत. त्यामुळे गणिती संकल्पना समजून घेणं त्यांना अवघड जातं. गणिताची स्वतःची अशी एक भाषा आहे. चिन्हे, संख्या, अक्षरे यांचा उपयोग वेगवेगळ्या गणिती क्रिया दर्शविण्यासाठी केला जातो.

पायऱ्या पायऱ्यांनी गणित सोडविणे हे म्हणजे एकामागोमाग एक घडणाऱ्या विशिष्ट क्रियांची मालिका. एखाद्या गोष्टीत कसे एकामागोमाग एक प्रसंग घडत जातात, अगदी तसंच आहे हे! त्यात अमूर्त विचार करण्याची क्षमता महत्त्वाची आहे. जी मुलं शालापूर्व तयारीच्या वयामध्ये कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या गोष्टी ऐकतात, वाचतात त्यांना शालेय वयात अमूर्त गणिती संकल्पना समजावून घेणं सोपं जातं. कारण त्यांच्या मेंदूचा भाषिक विकास योग्य त्या दिशेने झालेला असतो.

पायाभूत साक्षरता

आता आतापर्यंत साक्षरतेची व्याप्ती फक्त लेखन-वाचन इथपर्यंतच मर्यादित होती; परंतु नवीन शैक्षणिक धोरणामध्ये साक्षरतेचा अधिक व्यापक अर्थ स्पष्ट केलेला आहे. त्यामध्ये सहज शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे. मूल जन्माला आल्यापासूनच अनौपचारिक वाचन करत असतं.

म्हणजे आजूबाजूच्या व्यक्ती आणि वस्तू लक्षात ठेवून ओळखणं किंवा एखादं चित्र पाहून त्यातल्या वस्तू, व्यक्ती, प्राणी-पक्षी ओळखणं, त्याबद्दल सांगणं किंवा त्यावर आधारित गोष्ट सांगणं हा औपचारिक वाचनपूर्व तयारीचाच भाग आहे. आलेल्या अनुभवाचं किंवा एखादं दृश्य पाहून त्याचं वर्णन करणं हीसुद्धा एक प्रकारची वाचन साक्षरता मानली आहे.

या साक्षरतेवर आणि सहज शिक्षणावर भर देणारी अध्यापन पद्धती आता बालशिक्षणामध्ये रूढ होत आहे. त्यामध्ये बालकांची आपल्याला निरर्थक वाटणारी बडबड, त्यांनी मारलेल्या रेघोट्या आणि त्यात फक्त त्यांनाच दिसणारी त्यांच्या मनातली काल्पनिक पात्रं या सर्व गोष्टींना आता अनौपचारिक वाचन, अनौपचारिक लेखन अशा संज्ञा देऊन त्या माध्यमातून त्यांना हळूहळू साक्षरतेकडे न्यायचं आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अंगणवाडी ताई, प्राथमिक शिक्षक या सर्वांचं म्हणजे पायाभूत स्तरावर बालकांना शिक्षण देणाऱ्या सगळ्या व्यक्तींचं या अनुषंगानं प्रशिक्षण करण्याचंदेखील उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे आणि तसे ‘स्टार्स’सारखे प्रकल्प आखून त्याप्रमाणे कार्यवाहीसुद्धा आज महाराष्ट्रात सुरू आहे.

बालकांना औपचारिक लेखन शिकवण्याची घाई करू नये. प्रथम तीन ते सहा वर्षे वयोगटात सहज शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचं वाचन कौशल्य विकसित करावं आणि त्यानंतर म्हणजे सहाव्या वर्षांनंतर त्यांना हळूहळू आधी अनौपचारिक लेखन अन् त्यानंतरच्या टप्प्यावर औपचारिक लेखन या प्रक्रियेकडे वळवावं. यावर या पद्धतीनुसार आता पायाभूत स्तरावर वाचन-लेखन शिकण्याच्या प्रक्रियेकडे पाहिलं जाणार आहे.

त्यामधला मुख्य अडथळा असा आहे, की या स्थानिक भाषांमध्ये खूप विविधता आहे. त्याशिवाय त्या भाषांमध्ये मुलांसाठी योग्य ठरतील, अशी प्राथमिक वाचनासाठी पुस्तके उपलब्ध नाहीत. ही कमतरता भरून काढण्यासाठी आता नुकतीच प्रादेशिक भाषांमध्ये ५२ पुस्तके प्रकाशित झाली आणि सर्व माध्यमांनी त्याला यथोचित प्रसिद्धीही दिली; पण एवढ्याने हा उद्देश संपूर्णपणे साध्य झाला, असं म्हणता येणार नाही; पण त्यामुळे एक झालंय, की अशा प्रादेशिक भाषांमध्ये पुस्तकं प्रकाशित करण्याची निकड लक्षात येईल. तशी प्रेरणा नक्कीच मिळेल.

आपल्याकडच्या कितीतरी प्रादेशिक भाषा अशा आहेत की त्यामध्ये अशी पुस्तकं मुलांसाठी प्रकाशितच झालेली नाहीत. मग आता हे काम करण्याची सर्वात योग्य व्यक्ती म्हणजे त्या मुलांचे शिक्षक. पायाभूत स्तरावर काम करणाऱ्या शिक्षकांनी त्या त्या स्थानिक, प्रादेशिक भाषेत पुस्तके तयार करून मुलांना वाचन शिकवलं तर शिक्षणाकडे मुलांचा ओढा निर्माण होईल.

मुलांना त्यांच्या भाषेत बोलायला, वाचायला मिळाल्यामुळे शाळा जवळची वाटेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्वातून पायाभूत स्तरावरची साक्षरता उंचावण्याला नक्कीच मदत होईल. यानंतर इतर कोणतीही भाषा शिकण्याचा मुलांचा प्रवास नक्कीच सुखकर असेल.

भाषासमृद्धीची चळवळ

इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडच्या विविध प्रादेशिक आणि स्थानिक भारतीय भाषांमध्ये पुस्तकं निघाली, तर जागतिक स्तरावर ती एक विशेष नोंद घेण्याजोगी घटना असेल. आपल्या भारत देशाचे स्थानिक, प्रादेशिक भाषा-बोली यांचे विस्तृत वैभव या निमित्ताने जगासमोर येईल. या विविध भाषांमध्ये देवाणघेवाण सुरू होईल. त्या त्या प्रादेशिक भाषांचाही विकास सुरू होण्याला चालना मिळेल.

beyondclassroom.aura@gmail.com

(लेखिका कलात्मक अध्यापनाच्या क्षेत्रात संशोधन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT