- प्रा. विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com
या सृष्टीवरील प्रत्येक सजीव निसर्गाचं लेकरू आहे. माणूससुद्धा त्याचंच अपत्य, हाच माणूस जेव्हा त्याच्या उदरनिर्वाहासाठी निसर्गातल्या काही गोष्टीचा उपभोग घेत होता, तोपर्यंत निसर्ग शक्तीला काही देणं घेणं नव्हतं. पण जसं जसं विज्ञान प्रगत होत गेलं, माणसाच्या हातात मशिन नावाचं शस्त्र आलं तेव्हापासून मात्र निसर्ग माणसावर राग धरू लागला.
निसर्गाचा नियम तोडून माणूस वागू लागला. या ब्रह्मांडातला सर्वांत स्वार्थी जीव म्हणून नावारूपाला येऊ लागला. जंगलचा राजा सिंह असतो हे फक्त गोष्टीतच उरलं कारण आता मात्र त्याच जंगलावर अतिक्रमण करत सिंहाला पिंजऱ्यात कैद करून माणूसच राजा झालाय.
माणूस पोटापेक्षा जास्त खाऊ लागला, कामापेक्षा जास्त जागा घेऊ लागला, बंगले आणि टॉवर बांधून आभाळाशी स्पर्धा करू लागला. तो सृष्टीच्या उदरात घुसून इंधन शोषू लागला. झाडे तोडू लागला, जंगलं जाळू लागला, झाडेच ऑक्सिजन देतात हे माहीत होऊनही तो ऑक्सिजनचे सिलिंडर तयार करू लागला. सगळ्या मानवजातीला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा त्याचा प्रयत्न अविरत सुरू आहे.
माणसानं प्रचंड हुशारीनं बलाढ्य अस्त्र तयार केली पण शेवटी त्याच्या डोळ्याला न दिसू शकेल एवढ्या एका व्हायरसनं त्याच्या नाकी नऊ आणलं. अर्थात त्याला माणसाचा अहंकार कमी करायचा होता म्हणूनच. आपण खूप खूप वाटोळं करून ठेवलय या निसर्गाचं. सेल्फीच्या युगात आत्मकेंद्रीपणाची परिसीमा गाठली आहे. जे काही पाहिजे ते आम्हालाच.
या भुईवर निसर्गातल्या कोणत्याच प्राणी, पक्षी, किटकांचा अधिकार नाही का ? अरे माणसा, जी जमीन तू तयार केली नाहीस, ती तुझी होऊच कशी शकते, जे पाणी तू निर्माण केले नाहीस ते तुझं होऊच कसं शकतं ? फक्त तुझा मेंदू इतर जिवांपेक्षा विकसित आहे म्हणून त्या सर्वांवर तू अधिकार गाजवतोस. ठीक आहे मग निसर्गाशी वाकडं घेण्याआधी तशी तयारी तरी करून ठेव.
माणसा, तुला छान लिहिता येतं पण ज्यावर लिहितोस तो कागद निसर्गाचा आहे, तू महागड्या गाड्या निर्माण करतोस पण त्याचं इंधन निसर्गाचं आहे, तू गगनचुंबी इमारती बांधतोस पण त्याचं साहित्य निसर्गाचं आहे, तुला पोट भरण्यासाठी लागणारा अन्नाचा प्रत्येक कण निसर्गाचंच देणं आहे.
अंगावरच्या कपड्यांचा धागा त्याचीच निर्मिती, तरीही तू त्याची म्हणावी तेवढी जाणीव ठेवली नाही. घरातल्या नोकरासारखं फक्त त्याला राबवून घेतलंस. त्यांच्याप्रती सन्मान तर दूरच पण साधी जाणीवही तू ठेवेना झाला आहेस.
अरे माणसा, तू समुद्राशी छेडछाड केलीस की तो त्सुनामी होऊन उसळतो, तू जमिनीखाली छेडछाड केलीस की तो भूकंप होऊन हादरवतो, तू आभाळाशी छेडछाड केलीस की तो पाऊस होऊन गर्जतो. आजवर विविध माध्यमांतून निसर्ग मानवजातीवर रागावत तर कधी डोळे वटारीत आलाय पण मानवानं त्याचं कधी ऐकलंच नाही.
या सगळ्यांपासून फक्त स्वतःचं संरक्षण करण्यातच तो आजपर्यंत धन्यता मानत आलाय. निसर्ग ही एक शक्ती आहे ती आपल्याशी विविध माध्यमातून संवाद साधत असते. तिचं म्हणणं आपल्याला ऐकावंच लागेल. निसर्गानं बांधलेल्या गतिरोधकाजवळ आपल्याला थांबावंच लागेल.
बैलाकडे शक्ती आहे म्हणून तो कोंबडी, कुत्री, मांजराला मारत नाही, डास रक्त शोषतो म्हणून ते फुलांची नासाडी करत नाहीत. मधमाशी फुलांचा रस शोषते म्हणून ती कधी माणसाचे रक्त शोषित नाही. नागात विष आहे म्हणून तो पाण्यात मिसळत नाही, मोराकडं सौंदर्य आहे म्हणून तो इतर पक्ष्यांना कमी लेखत नाही. या सर्वांनी निसर्गाचे नियम तंतोतंत पाळले आहेत मग माणसाजवळ असलेल्या सर्व कौशल्याचा, शक्तीचा वापर त्यानं करून पाहायलाच हवा का? निसर्गानं माणसालाही काही मर्यादा घातल्या असतीलच की. त्या कशा समजणार?
अरे माणसा, एक लक्षात ठेव, निसर्ग नेहमीच प्रयोग करत आला आहे. त्याच्या प्रयोगशाळेपुढं आपण काहीच नाहीत. त्यानं करोडो सजीव निर्माण केलेत तसंच निसर्गाला उपयोगी न ठरणारे नामशेष सुद्धा केलेत. कोणती प्रजाती कुठपर्यंत निसर्गात ठेवायची हे तोच ठरवतो. असे नसते तर डायनासोर, सॅबर टूथ्ड टायगर, नियंडरथल्स आजही जिवंत दिसले असते. माणसाचं अस्तित्वही कायमस्वरूपी नक्कीच नाही. काही लाख वर्ष जगल्यानंतर निसर्ग आपल्यालाही नामशेष करेल.
जगातील सर्व धर्माच्या शास्त्रात निसर्ग संवर्धनाचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. पण हल्ली माणूस मात्र त्याच्या सोयीप्रमाणं धर्मज्ञान वापरत आणि पसरवत आलाय. अरे माणसा, लक्षात घे, तुझा चौदाशे ग्रॅम मेंदू घेऊन उगाच निसर्गासमोर तुझा बडेजाव मिरवू नको. ज्यानं तुमची निर्मिती केली, तोच तुमचा ऱ्हास करणंही जाणतोच.
तेव्हा वेळीच सावध होऊन मानव जातीनं निसर्गाचं संरक्षण केलंच पाहिजे अन्यथा तुमच्या आयुष्याची वेळ संपायच्या आधीच तुमचं जीवन संपून जाईल. निसर्गाचा नाश करून पुन्हा त्याच कुशीत निर्माण होण्याचं स्वप्न पाहता येत नाही तेव्हा निसर्ग हीच आपली आई समजून अखंड मानवजातीनं तिचे रक्षण करणं ही काळाची गरज आहे.
(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.