ईगल नेस्ट : हिटलरचं समरहाऊस
- देवदत्त गोडबोले
माझ्या युरोप भटकंतीमधला सुंदरसा देश म्हणजे ऑस्ट्रीया. जर्मनीच्या पूर्वेला असलेल्या देशांपैकी एक. अतिशय सुंदर व नयनरम्य सृष्टीसौंदर्य असलेला देश. जणू जर्मनीचा सख्खा भाऊ. पूर्वीच्या काळातला ॲस्ट्रो - हंगेरियन देश. आम्हाला जायचे होते ओबरसाल्झबर्ग आणि बर्कटेसगाडेन पाहायला, त्यासाठी जवळचे ठिकाण म्हणजेच साल्झबर्ग होते. म्युनिकवरून बर्कटेसगाडेन हे अडीच ते तीन तासांच्या अंतरावर आहे, पण हेच ठिकाण साल्झबर्गवरून केवळ ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे. या देशाची भाषा अर्थातच जर्मन, पण याच्या पूर्वेला हंगेरियन, स्लोवाकियन आणि क्रोएशिअन भाषा देखील बोलल्या जातात. साल्झबर्गमध्ये राहण्याचे मुख्य कारण म्हणजे ते शहर बघणं तर होतच पण बर्कटेसगाडेनला जाण्यासाठी हे शहर सोयीचं होतं.
बर्कटेसगाडेन उच्चार केला की इतिहासप्रेमींच्या भुवया उंचावल्या शिवाय राहणार नाहीत. जर्मनीचा हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर आपल्या उमेदवारीच्या काळात इथेच राहायला होता.ऑस्ट्रीया आणि जर्मनीच्या सीमांवर वसलेलं हे छोटेसे गाव. त्यात भरीसभर म्हणजे चहू बाजूंनी बव्हेरियन आल्प्सच्या पर्वत रांगा. हिटलरच्या वास्तव्याने या गावाला इतिहासात खूप महत्व प्राप्त झाले.
याच गावाजवळच्या एका डोंगरावर केहलस्टाइनहाऊस अथवा इगलनेस्ट ही प्रसिद्ध व इतिहासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची जागा आहे. ही जागा खास हिटलरच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त मार्टिन बोरमन यांने बांधली होती व हिटलरला भेट म्हणून दिली होती. तेरा महिन्यात ही वास्तू बांधून पूर्ण झाली. इगलनेस्ट म्हणजे थोडक्यात हिटलरचे ते समर हाउस होते. जरी ही जागा हिटलरसाठी बांधण्यात आली असली तरी अस म्हणतात की हिटलरला अक्रोफोबिया होता. उंच ठिकाणी जायची त्याला भीती होती आणि त्या कारणास्तव तो या जागेमध्ये फार कमी वेळ राहिला. पण जे काही दिवस, महिने त्याने इव्हा ब्राऊनबरोबर घालवले ते आजही चित्रफीतीतून मधून पाहायला मिळतात. गोबेल्स, गोअरिंग, बोरमन, हिमलर, स्पिअर आणि इतर अनेक नाझी नेते इथे येऊन गेले आहेत, अगदी इटलीचा नेता मुसोलिनीसुद्धा.
हिटलरचं वास्तव्य हे सर्वात जास्त काळ या पर्वताच्या पायथ्याशी जे बर्कटेसगाडेन नावाचं गाव होत, तिथे एक छोटेखानी घर आहे, तिथे होत. या ऐतिहासिक वास्तूला भेट द्यायला आम्ही साल्झबर्गमधून निघालो. साल्झबर्गला ८४० नंबर ची बस पकडली. तिकीट काढून साधारण ४५ ते ६० मिनिटांचा प्रवास करून आम्ही जर्मनी मध्ये प्रवेश ही केला. बर्कटेसगाडेन या बस स्थानकाच्या शेजारीच रेल्वे स्थानकही आहे. बर्कटेसगाडेन वरून आम्ही डॉक्युमेटेंशनसेंटरला जाणारी दुसरी बस पकडली. हा रस्ता घाट रस्ता आहे. पण जस तुम्ही वरच्या दिशेने प्रवास करता, तस बव्हेरियन आल्प्सच्या पर्वत रांगाचे सौंदर्य अजून नजरेत भरत. आम्ही डॉक्युमेंटेशन सेंटरला पोहोचलो. दोन महत्वाच्या गोष्टी इथे लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे इथे एक छान संग्रहालय आहे ज्यामधे दुसऱ्या महायुद्धाच्या बद्दल आणि हिटलरच्या आणि त्याच्या बऱ्याच सहकाऱ्याबद्दलची माहिती आहे.
वेगवेगळ्या घटनांच्या नोंदी, छायाचित्रे इत्यादी... ज्यांना दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासाबद्दल मनापासून आवड आहे, त्यांनी ह्या डॉक्युमेंटेशन सेंटरला आवर्जून भेट द्यायला हवी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ईगल नेस्टकडे जाणारा तिसरा टप्पा इथून सुरु होतो. खाजगी वाहनांना या पुढच्या रस्त्याने जाण्यास बंदी आहे. ह्याचे कारण म्हणजे एक तर रस्ता फारच अरुंद आहे., वळणा वळणाचा आहे आणि खुप चढ आहे. इथे फक्त इगल्स नेस्टच्या गाड्यानाच परवानगी आहे. त्यासाठी त्या बसचे तिकीट आगाऊ काढावे लागते. काढलेल्या तिकिटावर बस चा क्रमांक आणि वेळ लिहून देण्यात येते. परतीच्या बसचे भाडे ही याच तिकिटात असते.
आम्ही लिफ्ट च्या प्रवेशद्वारापाशी आलो तेव्हा ती रांग बघून असे वाटले कि बहुदा वेळ कमी पडेल. जवळ जवळ १०० मीटर ची रांग लागलेली होती. दर पाच मिनिटांनी ती ऐतिहासिक लिफ्ट वरून माणसं खाली आणत होती आणि खालच्या माणसांना वर नेत होती. ही ऐतिहासिक या कारणासाठी की १९३९ पासून ही संपूर्णपणे पितळेची लिफ्ट जशी आहे तशीच ती वापरात राहून जतन केली आहे. बराच वेळ थांबून, म्हणजे २० ते २५ मिनिटांनी त्या लिफ्ट मध्ये जायची संधी आम्हाला मिळाली. लिफ्ट आम्हाला ३ ते ४ मिनिटांमध्ये त्या डोंगराच्या शिखरावर घेऊन गेली. आणि लिफ्ट मधून बाहेर आल्यावर समोरचा ते नयनरम्य दृश्य बघून इतका वेळ घेतलेल्या कष्टांचं चीज झाला असच वाटल.
तिथलं सौंदर्यच काही वेगळ. एका बाजूला ऑस्ट्रिया आणि दुसऱ्या बाजूला जर्मनी. उंच, हिरवेगार, कधी रुक्ष आणि काही ठिकाणी हलकेसे बर्फाच्छादित डोंगर. हे सर्व सौंदर्य डोळ्यांमध्ये आणि कॅमेरामध्ये कैद करून ती वास्तू न्याहाळू लागलो. आता इथे एक रेस्टॉरंन्ट बनवण्यात आलेले आहे. या ठिकाणी इव्हा ब्राऊन म्हणजेच औट घटकेची मिसेस हिटलर हिचे प्रदीर्घ वास्तव्य होते. १९३९ नंतर तिच्या बहुतांश वाढदिवसाच्या पार्ट्या इथेच साजऱ्या करण्यात आल्या.
आमची परतीची वेळ जवळ येत चालली होती. पुन्हा त्याच लिफ्टने आम्ही खाली उतरलो. डॉक्युमेंटेशन सेंटरहून आम्ही बस ने बर्कटेसगाडेनला परतलो. तिथून साल्झबर्गची बस पकडून संध्याकाळी आम्ही घरी परतलो. दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासातले एक महत्वाचे ठिकाण आज बघितल्याचे समाधान झाले. आता या ठिकाणाची अधिक माहिती अशी की साधारण १९३८-३९ साली या जागेचे बांधकाम सुरु झाले. १३ महिन्यांमध्ये ही वास्तू बांधून पूर्ण झाली. सुमारे सहा हजार फुटांवर ने-आण करायला येणारी लिफ्ट त्या काळी बांधणे म्हणजे ते एक अभियांत्रिकी चमत्कार होता. १९३९ मध्ये हिटलरच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त मार्टीन बोरमनने हिटलरला ही जागा भेट दिली. नाझी लोक त्याला डिप्लोमॅटिक हाऊस असे संबोधायचे.
१९४३ नंतर जर्मनीची पीछेहाट होऊ लागली, दोस्त राष्ट्रांच्या फौज जर्मनीला चहूबाजूंनी घेरू लागल्या. १९४५ मध्ये दोस्त राष्ट्रांनी ह्या जागेवर बॉम्ब हल्ला करायचे ठरवले. या जागेचा इतका महिमा होता कि अमेरिकन, ब्रिटिश आणि रशियन फौजांमध्ये ही जागा काबीज करायला चढाओढ सुरु झाली. सर्वात आधी इथे कोणी पाऊल ठेवले हे सांगणे कठीण आहे पण हा मान अमेरिकन फौजांनी पटकाविला असे म्हणतात. त्यावेळी ही जागाच उध्वस्त करायची असे ठरले, परंतु बावेरियाचे तत्कालीन ज्येष्ठ अधिकारी जेकब यांनी हस्तक्षेप करून ही जागा वाचवली. हिटलरची एकही खूण ह्या जागेत ठेवणार नाही पण ही वास्तू उध्वस्त करू नका अशी विनंती त्याने अमेरिकन फौजांना केली आणि ती मान्य करण्यात अली. म्हणूनच आज इथे एक रेस्टॉरन्टt करण्यात आले आहे. तर असे हे इगल नेस्ट. दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासातला एक अमूल्य ठेवा, साल्झबर्गला गेलात तर जरूर पहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.