lhotse peak sakal
सप्तरंग

एव्हरेस्टची भावंडं

जगातील सर्वोच्च शिखर म्हणजे आठ हजार ८४८ मीटर उंच असलेल्या एव्हरेस्टचं रूपच निराळं आहे. तुम्ही जेव्हा एव्हरेस्टला पहिल्यांदा बघता तेव्हा हरखून जाता.

उमेश झिरपे

जगातील सर्वोच्च शिखर म्हणजे आठ हजार ८४८ मीटर उंच असलेल्या एव्हरेस्टचं रूपच निराळं आहे. तुम्ही जेव्हा एव्हरेस्टला पहिल्यांदा बघता तेव्हा हरखून जाता. दूरवरून एव्हरेस्टच्या आजूबाजूला त्याची भावंडं डौलाने उभी दिसतात. हो, भावंडंच. एव्हरेस्टला लागूनच ८५१६ मीटर उंच ल्होत्से शिखर आहे. जगातीलच चौथे उंच शिखर म्हणून ल्होत्सेची ओळख आहे.

ल्होत्सेच्या उत्तरेला एव्हरेस्ट आहे तर पश्चिमेला नुप्त्से. या शिखराची उंची आहे, सात हजार ८६१ मीटर. या तिन्ही शिखरांचं मिळून अवाढव्य व विस्तीर्ण असं मॅसिफ तयार होतं, उंच विमानातून जेव्हा हे मॅसिफ बघतो, तेव्हा या मॅसिफचा आकार घोड्याच्या पायातील नालेप्रमाणे भासतो, आणि खाली उभं राहिल्यावर तिन्ही बाजूंना उंचच उंच भिंत उभी असल्यासारखं वाटतं.

याचसोबत एव्हरेस्ट बेस कॅम्पला लागूनच ७ हजार १६१ मीटर उंच शिखर आहे, त्याचं नाव माउंट पुमोरी. पुमोरीचा अर्थ शेर्पा भाषेत मुलगी असा होतो. एव्हरेस्टच्या कुशीत वसलेल्या या शिखराला ‘एव्हरेस्टची मुलगी’ असं देखील म्हणतात. त्यामुळंच अनेक गिर्यारोहकांनी आपल्या मुलींची नाव देखील पुमोरी अशी आवर्जून ठेवली आहेत.

पुमोरी शिखरावर चढाई करण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न १९६२ मध्ये जर्मन आणि स्विस गिर्यारोहकांच्या संघानं केला. पुमोरीच्या चढाईत तांत्रिक आव्हानं आहेत, विशेषतः याच्या उत्तर-पश्चिमेच्या काठावर, जिथे खडकाळ भाग आणि टणक हिम आढळते. पुमोरीची खासियत म्हणजे इथं होणारे हिमप्रपात.

एव्हरेस्ट बेस कॅम्पला एका बाजूनं खुम्बू आइसफॉलच्या हिमप्रपातांचा धोका असतो तर दुसरीकडे पुमोरीहून येणाऱ्या हिमप्रपातांचा. बेस कॅम्पच्या अगदी जवळ असल्यानं पुमोरीहून होणाऱ्या हिमप्रपातांचा आवाज धडकी भरवणारा असतो. कधीकधी बेस कॅम्पवरील सकाळ या आवाजांनीच होते.

२०१५ मध्ये एप्रिल महिन्यात नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर झालेल्या हिमप्रपाताने बेस कॅम्पवरील २० हून अधिक गिर्यारोहक व त्यांच्या सहायकांचा मृत्यू झाला होता. चढाईसाठी तांत्रिकदृष्ट्या तेवढेच कठीण शिखर म्हणजे नुप्त्से. हे शिखर एव्हरेस्टच्या दक्षिण-पश्चिमेच्या काठावर स्थित आहे आणि याची उंची ७,८६१ मीटर आहे. नुप्त्सेचा शाब्दिक अर्थ "पश्चिमेचे शिखर" असा होतो. एव्हरेस्टचे पश्चिम शिखर म्हणजे नुप्त्से.

हे एक शिखर नसून अनेक शिखरांचा समूह असून सर्वांत उंच व एव्हरेस्टला लागून असलेले शिखर म्हणजे नुप्त्से-१, ज्याला रूढ भाषेत नुप्त्से असेच म्हणतात. नुप्त्सेची ओळख फसवे एव्हरेस्ट अशी देखील आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्प मार्गावर असलेल्या गोरक्षेप गावातून जेव्हा एव्हरेस्ट शिखराकडे बघतो, तेव्हा उंच व जवळ भासणारे शिखर म्हणजे नुप्त्से. अनेक जण यालाच एव्हरेस्ट समजतात व फसतात. म्हणून हे फसवे एव्हरेस्ट आहे, असे म्हटले जाते.

१९६१ मध्ये ब्रिटिश गिर्यारोहकांनी या शिखरावर पहिली चढाई केली होती. नुप्त्सेचे मुख्य शिखर अनेकदा एव्हरेस्टच्या छायेत राहते, परंतु त्याच्या पूर्वेकडील चढाईत असलेली अत्यंत तांत्रिक आव्हानं पर्वतारोहकांना खूपच आवडतात. नुप्त्सेच्या खालच्या भागात मोठ्या प्रमाणात बर्फाचे कठीण कडे आहेत, जे चढाईला खूपच कठीण गणले जातात. अनेक गिर्यारोहक नुप्त्से शिखरावर एव्हरेस्ट चढाईची तयारी करतात.

२०१७ मध्ये मी जेव्हा एव्हरेस्ट बेस कॅम्पवर होतो, तेव्हा जगप्रसिद्ध गिर्यारोहक उली स्टेक अल्पाईन पद्धतीनं शिखर चढाई करणार होता, त्याचा सराव करण्यासाठी नुप्त्से शिखरावर एकट्यानं चढाई करत होता, मात्र एका ठिकाणी अंदाज चुकल्यानं त्याचा पाय घसरला आणि थेट काही हजार फूट दरीत जाऊन कोसळला. त्याच्या या चढाईचा मी जवळून अनुभव घेत होतो, त्यामुळे त्याचा अपघात व मृत्यू मनाला चटका लावून गेला.

नुप्त्सेची आणखी एक आठवण म्हणजे २०१२ मध्ये आमचा संघ जेव्हा कॅम्प- ३ कडे चढाई करत होता, तेव्हा नुप्त्से फेसवरून कडा कोसळून एक मोठा हिमप्रपात क्षणार्धात खाली आला. संपूर्ण संघ त्यात सापडला, सुदैवाने कोणताही दगड वा हिम आम्हाला खाली घेऊन गेला नाही, फक्त भुसभुशीत हिमाने आम्ही अक्षरशः माखून गेलो. दैव बलवत्तर म्हणून वाचलो, नाहीतर होत्याच नव्हतं झालं असतं.

जसं नुप्त्से हे पश्चिम शिखर आहे, तसं ल्होत्से हे एव्हरेस्टचं ‘दक्षिण शिखर’ म्हणून ओळखलं जातं. ८ हजार ५१६ मीटर उंच असलेलं ल्होत्से हे जगातील चौथं सर्वांत उंच शिखर आहे. १९५६ मध्ये स्विस गिर्यारोहक संघाने यावर पहिली यशस्वी चढाई केली होती. ल्होत्से शिखराची चढाई ही एव्हरेस्टच्या चढाईप्रमाणेच तांत्रिक आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक गणली जाते. कॅम्प ३ पर्यंत तर एव्हरेस्ट व ल्होत्से शिखराचा मार्ग देखील एकच आहे.

ल्होत्सेचे आव्हान म्हणजे शिखराची दक्षिण बाजू. एव्हरेस्ट व ल्होत्से शिखरावर चढाई करण्याचे विविध मार्ग आहे, ज्यातील अनेक खडतर मार्गांवरून निष्णात गिर्यारोहकांनी चढाई यशस्वी केली आहे, अपवाद फक्त ‘ल्होत्से साउथ’चा!

खडी चढण, खडकाळ अन् टणक हिमाचा भाग यांमुळे चढाईसाठी मार्ग तयार करणे अवघड जाते. आजपर्यंत या बाजूने ल्होत्से शिखरावर चढाई होऊ शकली नाही. जगप्रसिद्ध गिर्यारोहक जरझी कुकुजका यांचा मृत्यू देखील याच फेस वरून चढाई करताना झाला होता.

या तिन्ही शिखरांवर चढाई करण्यासाठी गिर्यारोहकांना अत्यंत तांत्रिक कौशल्य आणि शारीरिक क्षमतेची गरज भासते. पुमोरी, नुप्त्से आणि ल्होत्से यांची वैशिष्ट्ये आणि त्यांच्यावरील आव्हानं पाहता, या शिखरांनी एव्हरेस्टच्या छायेत असून देखील गिर्यारोहण विश्वात आपले महत्त्व कायम राखले आहे.

पुमोरीच्या निसर्गरम्य दृश्यांपासून नुप्त्सेच्या तांत्रिक आव्हानांपर्यंत आणि ल्होत्सेच्या अत्युच्च उंचीच्या अनुभवांपर्यंत, प्रत्येक शिखरानं गिर्यारोहकांना अनंत आव्हानं आणि साहसी अनुभव दिले आहेत. त्यांच्या उंचीवरून आणि स्थानावरून त्यांनी पर्वतारोहण विश्वात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे आणि त्यांची महत्ता एव्हरेस्टच्या शिखराच्या बरोबरीनेच आहे.

ही शिखरं गिर्यारोहकांना नवनवीन आव्हानं देत असतात, या शिखरांवर यशस्वी चढाई करणं हे देखील गिर्यारोहकांसाठी एक प्रतिष्ठेचं आणि साहसाचं लक्षण मानलं जातं. एव्हरेस्टच्या छायेत असून देखील ही शिखरं त्यांच्या अद्वितीयतेमुळं आणि आव्हानांनी सर्वांच्याच मनात त्यांचं एक विशेष स्थान टिकवून आहेत.

(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक असून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT