मी पुण्यात असताना परभणीमधला माझा मित्र अजय जाधवचा फोन आला. अजय म्हणाला, ‘चार महिने ठेकेदारांकडं माझ्या आई-वडिलांनी काम केलं. तो ठेकेदार आता पैसे देत नाही. काल माझ्याकडे येऊन आई-बाबांनी रोजच्या उदरनिर्वाहासाठी एक हजार रुपये नेले. तुम्ही काही तरी मदत करा.’ मी म्हणालो, ‘हा ठेकेदार कोण आहे?’ तो म्हणाला, ‘बिहारचा एक यादव नावाचा भय्या आहे.
मी भेटलो तर म्हणाला, अजून मला मालकानं पैसे दिले नाहीत, मी कुठून देऊ पैसे? ही केवळ माझ्या आई-बाबांची तक्रार नाही तर, गावाकडून कामासाठी आलेल्या अनेक नातेवाइकांचीही तक्रार आहे. तसे अनेक भय्ये पुण्यात आहेत.’ फोन ठेवताना अजयचे एक वाक्य मला चांगलंच झोंबलं.
अजय म्हणाला, ‘‘संदीप, मी एका झोपडपट्टीत राहतो. माझे आई-वडील दुसऱ्या झोपडपट्टीत राहतात. अशी दोन कुटुंबे मोठ्या त्रासातून झोपडपट्टीत राहून दिवस काढत आहोत. त्यात असं संकट आल्यावर जगणं नकोसं होतं.’’ माझ्या मित्रांत सर्वांत श्रीमंत असणारा अजय आज झोपडपट्टीमध्ये का राहतो, मी विचारात होतो? मी हो म्हणत फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी कुठं भेटणार हे ठरलं.
सकाळी सिंहगड रोड येथील झोपडपट्टीमधून मी अजयला माझ्या गाडीत घेतले. येरवडा परिसरात संगमवाडीचा शेवटचा भाग, या भागात असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये अजयचे वडील राहत होते. तिकडे आम्ही निघालो. अजयला मी ‘गावाकडून पुण्यात राहण्याचा निर्णय कसा?’ असा प्रश्न मी अजयला विचारला. अजय म्हणाला, ‘माझं लग्न झाल्यावर माझ्या सहाही काकांच्या वाटण्या झाल्या. एकत्रित असलेली जमीन वाटली गेली.
मला कळतं तसं शेतीमध्ये कधी भरभरून पिकलं, असं कधीही झालं नाही. अगोदर आजोबांनी आत्याचं लग्न, कोर्टातले भांडण, मग काकांच्या मुलींची लग्नं यासाठी काही एकर जमीन विकली. नापिकीतून झालेल्या कर्जामुळं आणखी काही एकर जमीन गहाण ठेवली होती, ती परत आलीच नाही. वाटणीनंतर माझ्या तीन बहिणींच्या लग्नाला बाबांनी आणखी काही एकर जमीन विकली. आहे त्या जमिनीमध्ये फार काय पिकायचे नाही.
अलीकडं शेतात काम करायला मजूर मिळतच नाहीत. होती तेवढी जमीन आई-बाबांनी इतरांना कसण्यासाठी देऊन टाकली. जशी माझी अवस्था माझ्या कुटुंबाची होती, तशी गावातल्या इतर कुटुंबांची, पंचक्रोशी, जिल्ह्यातल्या सधन शेतकऱ्यांची सारखीच अवस्था आहे.
कधी काळी शंभर एकर जमीन असणारे आज शहरात येऊन कुठे काम मिळते का, हे पाहू लागले आहेत. अजय सांगत होता, ‘शाळेत माझा प्रथम क्रमांक कधीच चुकला नाही. चार पदव्या असूनही मला नोकरी मिळाली नाही. माझ्या शेतात पिढ्यानपिढ्या राबणारी माझ्या गावातल्या सालदरांची मुलं माझी पुस्तकं घेऊन शिकली. त्या मुलांना माझ्यापेक्षा खूप कमी मार्क असताना आरक्षण, सवलतीमुळे ते मोठ्या ठिकाणी सरकारी नोकरीला लागले.’
अजय पुढं म्हणाला, ‘मी पुण्यात एका बारमध्ये कॅप्टन म्हणून काम पाहतो. माझा पगार फार कमी असल्यामुळे मी भाड्याचं घर घेऊ शकलो, ना मी कधी मूल होऊ दिलं. गावातल्या काही माणसांच्या मदतीनं, आई-बाबाही पुण्यात आले. आता ते या झोपडपट्टीमध्ये राहतात.’’ अजयनं मला एका दमात सारी कहाणी सांगितली.
ती केवळ एका अजयची कहाणी नव्हती तर, राज्यातल्या त्या प्रत्येक गावाची ती कहाणी होती, ज्या गावातल्या शेतकऱ्याला कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करावा लागला. त्यात आरक्षण नाही, हा मोठा शाप होताच. त्या झोपडपट्टीत आम्ही जाऊन पोहोचलो. खूप वर्षांनी मी जाधव काका-काकूंना भेटलो. आम्ही एकमेकांची खुशाली विचारात होतो. तेवढ्यात एक व्यक्ती तिथे आली.
जाधव काका म्हणाले, ‘‘हे अमरावतीचे सोपान पाटील मामा. ‘मामा’ या टोपण नावाने सर्व जण त्यांना ओळखतात. मामांनी हजारो जणांना इथं आसरा दिला.’ मी मामांशी जेव्हा विस्तारानं बोललो, तेव्हा त्यांनी मला अनेक धक्कादायक विषय सांगितले.
मामा म्हणाले, ‘मी चाळीस वर्षांपूर्वी गाव सोडून जेव्हा कामासाठी पुण्यात आलो, तेव्हा मराठा समाजाची बोटावर मोजता येतील एवढी माणसे झोपडपट्टीत राहायची. आता जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत, त्यात सगळीकडं मराठा समाज आहे. सिंहगड रोड, पर्वती पायथा या पुण्यातील परिसरातल्या झोपडपट्टीतले हे चित्र नाही तर, मुंबईत धारावीमधील झोपडपट्टीमध्येही खूप मोठ्या प्रमाणात मराठा समाज तुम्हाला दिसेल.
पुण्यातल्या झोपडपट्टीपर्यंत ठीक होते; पण मला धारावीत मराठा समाज म्हटल्यावर आश्चर्य वाटले. मामांनी लगेच फोन काढला आणि धारावीच्या झोपडपट्टीमध्ये त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांना फोन लावला. धारावीत मराठा समाज कसा भरतोय, हे तो माणूस सांगत होता. यूपी, बिहारमधील भय्यांप्रमाणे आता मराठा समाजाची संख्या येथे दिवसेंदिवस वाढत आहे.
मी म्हणालो, ‘चार पैसे मिळतील या उद्देशानं हे शहरात आले, तो त्यांचा उद्देश सफल होतो का?’ मामा म्हणाले, ‘काही नाही हो. जेमतेम गुजराण होते. येथे फाटक्या कपड्यावर काम करायचे आणि गावाकडे गेल्यावर स्टार्च केलेले कपडे घालून फिरायचे. अजून काय?’ मुंबईतले काका आणि पुण्यातले मामा यांचा अनुभवी संवाद ऐकून अजय चांगलाच संतापला. तो संतापून बरंच काही बोलायला लागला. अजयचे वडील संतापाने लाल झालेल्या अजयला शांत करत म्हणाले, ‘सारेच असे आहेत असे नाही.
काहींनी खूप जमिनी घेतल्या, अनेक जण मोठ्या हुद्द्यावर आहेत; पण हे फार कमी जणांना जमले. मी अनेकांना रोज कामावर असताना बोलतो, त्या प्रत्येकाला वाटते पुढच्या पिढीला चांगले दिवस येतील; पण तसं कधी होईल माहिती नाही. रोज नाक्यावर जाऊन थांबायचे. दिवसभर काम करायचे. रात्री त्याच पैशावर चूल पेटवायची. रोज पोटाला चिमटा देऊन चार पैसे बाजूला ठेवायचे. ज्या दिवशी काम मिळाले नाही त्या दिवशी त्याच पैशांच्या माध्यमातून गुजराण करायची.
पोटाची खळगी, मुलांचे भविष्य हा विषय शहरात येऊन झोपडपट्टीमध्ये राहण्यामागचा आहेच आहे; पण तरीही मी शहरात जाऊन काहीतरी वेगळे करतो, याच्या बढाया मारणारे गावागावात कमी नाहीत.’ मी काका, काकू, अजय यांना घेऊन मी त्या ठेकेदाराकडे गेलो.
आम्हाला पाहिल्यावर ठेकेदार म्हणाला, ‘मी आज तुम्हाला पैसे घेऊन जा, म्हणून फोन करणारच होतो. कालच मला पैसे मिळाले.’ काका त्या ठेकेदारांकडे रागाने पाहत होते. काकांनी पैसे घेतले आणि आम्ही निघालो. जाताना तो ठेकेदार म्हणाला, ‘आता पैसे नियमित मिळतील तुम्ही उद्यापासून कामावर या.’
कोणी काही बोलेल त्याच्या अगोदर रागाने लालबुंद झालेल्या काकू त्या ठेकेदाराला म्हणाल्या, ‘अरे जा, थू तुझ्या कामावर...’ आम्ही सारे एकदम शांत. आम्ही तिथून बाहेर पडलो. मी काका-काकूंना सोडून माझ्या परतीच्या प्रवासाला निघालो. माझ्या डोक्यात फिरणारे विचारचक्र खूप गतीने फिरत होते. ज्या मराठा समाजामुळे पुणे आणि मुंबई येथे झोपडपट्टीमध्ये असणारी संख्या दिवसेंदिवस वाढते, त्याची कारणे आजची नाहीत, त्याचा काळानुरूप मोठा इतिहास आहे.
आता कोणी तरी येऊन या समाजाला आर्थिक संकटातून वाचवेल, अशीही परिस्थिती नाही. मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी सर्वांचा प्रश्न सुटेल, असं नाही. नव्या पद्धतीची शेती, व्यवसाय, उद्योगाला चालना देणारं शिक्षण, सारथीसारख्या मदत करणाऱ्या उपक्रमात सहभागी होणं, यांसारखी कामं मराठा समाजासाठी तरणोपाय होऊ शकतो, पण हे सांगणार कोण आणि ऐकणार कोण अशी स्थिती आहे, बरोबर ना..!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.