सप्तरंग

नात्यांना सामावणारं अवकाश...

“एखाद्या मुलीबरोबरची साधी मैत्री आणि खास मैत्री ह्यातला फरक कसा ओळखायचा आपण मनातल्या मनात...?” चर्चेच्या ओघात मी त्यांना विचारले. आजपासून पंचेचाळीस-पन्नास वर्षे आधीसुद्धा आमच्यातले नाते खूपच मोकळे होते.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. आनंद नाडकर्णी

माझ्या तरुण मनावर प्रौढत्वाचा नेमका संस्कार कसा झाला ते मला आजही स्पष्ट आठवते आहे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधून आठवडाअखेरीचे घरी येणे ह्यामध्ये अनेक लाभ असायचे. आईच्या हातचे जेवण, सात दिवसांमध्ये वापरलेल्या कपड्यांचे धुणे-इस्त्री आणि आई-वडिलांबरोबरच्या गप्पा. तर एका शनिवारी रात्री जेवणानंतर मी आणि वडील बोलत होतो.

ते चौकशी करत होते माझ्या मैत्रिणींबद्दल. वैद्यकीय शिक्षणादरम्यान नव्याने कळत होते की मुलामुलींचे एकत्र मित्रमंडळ असते. माझ्याही अशा ओळखी होत होत्या. जी.एस.मेडिकलच्या परिसरामध्ये माझ्याहून तीनचार वर्षांनी सीनियर असणाऱ्यांपासून ते कॉलेजात नुकत्याच प्रवेश घेतलेल्या अनेक मुलींसोबत माझी मैत्री जुळली होती. माझे वडील महाविद्यालयाचे प्राचार्य असल्याने मुला-मुलींची मैत्री आणि त्यातून घडणारी, जुळणारी, विस्कटणारी गुलाबी नाती हा विषय त्यांच्यासाठीही रोजच्या अनुभवाचा.

“एखाद्या मुलीबरोबरची साधी मैत्री आणि खास मैत्री ह्यातला फरक कसा ओळखायचा आपण मनातल्या मनात...?” चर्चेच्या ओघात मी त्यांना विचारले. आजपासून पंचेचाळीस-पन्नास वर्षे आधीसुद्धा आमच्यातले नाते खूपच मोकळे होते.

“माझा अनुभव सांगतो म्हणून दांनी सुरुवात केली. मी त्यांना ‘दा’ म्हणायचो. माझे मोठे बहीण-भाऊ दादा म्हणायचे. माझे वडील कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिकायचे तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा. आमचे कुटुंब मुंबईतून कोल्हापूरला गेले त्यामागे आजोबांची निवृत्ती तसेच त्या काळात प्रचलित अशी मुंबईवरच्या हवाई हल्ल्यांची भीती हा सुद्धा एक मुद्दा होता म्हणे.

माझी आई मॅट्रिक पार करून तळकोकणातल्या आरवली-शिरोड्यातून पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापूरला आलेली. वि. स. खांडेकर राहायचे त्या परिसरातून ती अशा महाविद्यालयात आली होती जिथे ना. सी. फडके नावाचे तरुण प्राध्यापक होते. (हे दोघेही त्यांच्या काळातले काहीसे विरोधी शैलीतले लेखक. खास करून प्रेमसंबंधांच्या विषयावरचे.)

माझ्या आई आणि दा ह्यांची कुटुंबे एकमेकांना ओळखायची. त्यामुळे आई नाडकर्ण्यांच्या घरी येऊ लागली. वडील शास्त्र शाखेत वरच्या वर्गात होते. आई सुद्धा हुशार विद्यार्थिनी असल्याने त्या काळात शास्त्र शाखेला म्हणजे सायन्सला आली होती. कल्पना अशी निघाली की केशरला मदनने शिकवावे. मधुसूदन ह्या नावाचे लघुरूप मदन आणि आईचे नावच मोठे मस्त होते केशर! व्यवहारात आपण ‘ते’ केशर म्हणतो पण ‘केसरबाई’ हे नावही रूढ होतेच.

तर अशा प्रकारे तो मदन आणि ती केशर ह्यांची ओळख झाली. त्यांना एकमेकांसोबत अधिकृत आणि तरीही खासगी असा वेळ मिळू लागला. “दोन गोष्टी असतात... एक तर आपल्याला त्या व्यक्तीच्या असण्यामुळेच खूप छान, रिलॅक्स वाटायला लागते आणि दुसरे म्हणजे कितीही बिनमहत्त्वाचे काही घडले तरी तिला सांगावेसे वाटायला लागते,” दा मला आकर्षणाचे रसायनशास्त्र समजावून सांगत होते. तसाही ऑर्गेनिक केमिस्ट्री हाच विषय त्यांचा. मीही मन लावून ऐकत होतो.

“आमच्या काळामध्ये प्रेम म्हणजे लग्न आणि लग्न म्हणजे जबाबदाऱ्यांची जंत्री असा प्रकार होता... आणि कितीही नाजूक भावना व्यक्त करायच्या तरी स्पर्शावर मात्र अनेक बंधने... तर आम्ही हळूहळू शिकवणीच्या वेळात इतर विषयांवर बोलू लागलो आणि रंगून जायला लागलो.” दा म्हणाले. “इतके की मी त्या वर्षी ह्यांच्या विषयातच फेल झाले,” आईने आवश्यक माहिती पुरवून ‘रोमान्स’चा फुगा फोडला.

“प्रेमात पडताना परिणामांची किंमत द्यावीच लागते बरं का...” मिश्कीलपणे दा म्हणाले. आमच्या गप्पा वळल्या त्यांच्या नात्यातल्या त्या टप्प्यावर जिथे मदनने केशरला चक्क ‘प्रपोज’ केले. तिने थोडा वेळ मागून घेतला विचार करायला. “घराला तळमजला होता आणि माझी खोली माडीवर होती. मी रायटिंग टेबलवर बसून काहीतरी लिहीत-वाचत होतो... मांजरीच्या पावलांनी ही कधी पाठून आली आणि माझ्याकडे पाहत राहिली मला कळलेच नाही,” दा सांगत होते. शरदबाबूंच्या तत्कालीन बंगाली कादंबरीचे मराठी प्रारूप असणार हे. हा माझ्या मनातला विचार.

मदनला केशरच्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्याने वळून पाहिले. ती दोन पावले पुढे आले. तिने तिचा उजवा हात, मदनच्या हातावर ठेवला. दोघेही एकमेकांकडे पाहत होते. बोटांवर बोटे होती. पुढच्या वाटचालीचे आश्वासन होते. विश्वास होता आणि आशावादसुद्धा!

अहाहा! दा सांगत होते आणि माझे मन अनुभवत होते प्रौढ आणि समजूतदारपणाचे आपोआप उमलणे. आपले वडील आणि आई त्यांच्या अंतरातले मार्दव आपल्या सोबत शेयर करताहेत... ॲडल्टहूड यापेक्षा वेगळे काय असतं? आई आणि दांच्या संयमी समजूतदारपणाचे सत्त्व आतमध्ये झिरपले आणि प्रौढ झालो.

पुढच्या प्रवासामध्ये अनेक नाती आली. काही फुलली, काही बहरली आणि नंतर करपली. काही पक्वतेच्या पायऱ्या सहजपणे ओलांडत स्थिरावली. स्त्री-पुरुषांच्या मैत्रीचे वैचारिक-भावनिक पदर उलगडण्याच्या प्रवासाचे टप्पे येत गेले. कधीकधी अशा पद्धतीच्या मधुरमैत्रीला, पारंपरिक संकेतांची चौकट असतेच असे नाही. अशावेळी स्वतःची समजूत कशी व्यापक बनवायची हे आव्हान असते.

नाती जपायची मूलभूत जाण असणारे माझे दा ह्या टप्प्यावर नव्हते. पण ती भूमिका घेणारी अजून एक व्यक्ती माझ्या आयुष्यात होती. माझा अनिलबाबा. अनिल (अवचट) आणि सुनंदा म्हणजे त्याची पत्नी ह्यांचे नाते मी खूपच जवळून अनुभवले. सुनंदाला कॅन्सर झाला तेव्हा त्यांच्या नात्याला नव्याने आलेला मायेचा बहर आमच्यापर्यंतही पोहोचायचा. सुनंदा पुढे गेल्यावर बाबाने तिला मनात कसे झिरपत ठेवले हे मी अनुभवायचो. पण बाबा नात्यांच्या संदर्भात कधीच, तटस्थ कोशामध्ये गेला नाही. तो स्वतःला सर्व वयोगटातल्या स्त्रीपुरुषांबरोबर जोडत राहिला. स्त्रीपुरुष मैत्रीमधली एक वेगळी निर्मळता मी त्याच्या असण्यातून अनुभवत होतो.

मनस्वी स्वभावाची कलाकार अशी माझी एक मैत्रीण होती. साहित्याची, संगीताची, अभिनयाची तिची जाण डौलदार असायची. एका टप्प्यावर आमच्यातले आकर्षण अधिकाधिक गहिरे होत आहे ह्याची जाणीव मला झाली. मन गोंधळले. आता दांची जागा बाबाने घेतली होती. त्याच्यासमोर हा गोंधळ मांडला. “नाती ठरावीक चौकटीत बसवायलाच हवीत हा हेका काही शहाणपणाचा म्हणता येणार नाही. पण आपापल्या चौकटीतल्या शक्यता आणि मर्यादा डोळसपणे तपासायला हव्यात,” तो मला म्हणाला.

“म्हणजे काय? नेमके काय?”

“हे बघ... दोघांच्या डेव्हलपमेंटला, क्रिएटिव्हिटीला शक्ती मिळत राहायला हवी... आणि ही शक्ती शरीराच्या ओढीपेक्षा जास्त तीव्र हवी. शरीराची साद नाकारायची नाही पण ती कधी, कशी, कुठे व्यक्त करायची किंवा नाही करायची ह्याबद्दल स्पष्टपणा हवा... मैत्री नेहमीच विकासासाठी असते विकाराकडे नेण्यासाठी नसते. चव आणि हाव ह्यामध्ये फरक करता यायला हवा.” बाबा खासगीमध्ये कधी कधी असा तंद्री लागल्यासारखा बोलायचा. ‘चव आणि हाव’ हा संघर्ष त्यानंतरही माझ्या जगण्यात आला आणि त्या वेळी ह्याच समीकरणाच्या आधारे मी तो सोडवला. अशा असांकेतिक नात्यामध्ये ‘प्राप्ती’साठी म्हणून काहीच करायचे नसते. त्या त्या क्षणाची भूमिका समरसून जगताना त्या नात्याला खतपाणी घालायची ऊर्मी अशी व्यक्त करायची की त्यातून दोघांनाही समाधान मिळावे. “एकाच नात्याला प्राधान्य मिळताना इतर नात्यांवर अन्याय नाही ना करत आपण हे पाहा...” तो म्हणाला.

“असं किती काळ पाहायचं?” मी विचारले.

“सतत...”

“आणि उलटे झाले तर..., अनकन्व्हेन्शनल मैत्रीवर अन्याय होत असेल तर...” मी म्हणालो.

तो थांबला.

“न्याय आणि अन्यायाच्या व्याख्या कोण करणार? शेवटी आपले मनच. आपला खोटेपणा आणि सच्चेपणा कळत असतो आपल्याला.”

“खोटेपणा म्हणजे... ? ”

“लपवणे, शरम, लाज... जर तुझे मन जागरूक असेल, तर अशा गोष्टी जमा व्हायला लागल्या आहेत हे कळायला लागते... त्यांना तपासायचं.”

“म्हणजे बेशरम व्हायचं का... ? ”

“अशी नाती लपवायची नसतात तशी मिरवायचीही नसतात.” असे म्हणत त्याने हातातल्या बासरीवर फुंकर मारत काही सूर लावले. मग बासरी खाली ठेवली. आणि कबीराचे भजन गावू लागला.

जतन बिन मिरगन खेत उजाडे

टारे टरत नहीं, निस बासर,

बिरडत नाही बिडा रे

राखण केली नाही तर हरणे शेत उजाड करून टाकतील. कबीर सांगतोय, माणसा मनाचं नीट जतन कर, नाहीतर तुझ्यातले दोष तुझ्या मनाचा कब्जा घेतील आणि मनाला उजाड, भकास, प्रदूषित करून टाकतील.

काय योगायोग आहे पाहा. आता लिहिताना त्या भजनाचे नेमके शब्द आठवत नव्हते म्हणून मी कालच (२६ ऑगस्ट २०२४) प्रसिद्ध झालेलं बाबाचं पुस्तक हातात घेतलं. तर त्यात हे शब्द मिळाले. ‘निस बासर’ म्हणजे रात्रंदिवस. त्याहूनही गमतीची गोष्ट म्हणजे हा मजकूर ज्या पानावर आहे तिथेच बाबाची नोंद आहे... ‘आनंदला मी कबीराचे अनेक दोहे ऐकवले होते.’

त्या नोंदणीपाठचा हा एक प्रसंग आठवताना कळते आहे की त्या दिवशी प्रौढत्वाची अजून एक पायरी पुढे गेलो होतो. नाजूक नात्यांना सांभाळायचा संस्कार किती महत्त्वाचा. मैत्रीच्या प्रवाहात पडताना प्राप्तीची आस कमी करत न्यायची. नेहमी विचार करायचा ‘शेयर’ करण्याचा. ‘माझे’ म्हणून जे काही आहे ते ‘आपले’ कसे होईल ते पाहायचे. असे करतानाचे समाधान हीच काय ती नकळत, सहजपणे झालेली ‘प्राप्ती.’ हे सारे जमलंच पाहिजे हा हट्टसुद्धा नको. स्वतःच्या धसमुसळ्या वागण्याची जबाबदारी घेण्याची वेळ आली तर कचरायचे नाही. रोमँटिक आकर्षणाला टाळायचे नाही तसे कवटाळायचेसुद्धा नाही... असे सारे शिकत आलो आहे आजवर दा आणि अनिलबाबाच्या नितळ आरस्पानी अनुभवांमधून.

‘आप्त’ ह्या पुस्तकामध्ये बाबाने माझ्या आणि त्याच्या असांकेतिक नात्यावर लेख लिहिला आहे. त्याचे शीर्षक आहे ‘माझा आनंदा.’ तो मला प्रेमाने हाक मारायचा तोही आनंदाsss अशीच. माझ्या व्यक्तित्वामध्ये ‘दा’ आहेत म्हणून आनंदा असे बाबानंच त्या लेखात लिहिले आहे. माझ्या व्यक्तिगत अस्तित्वाच्या एका टोकाला ‘दा’ आहेत तसेच अग्रटोकाला असलेला ‘अ’ असणार अनिलबाबाचा... आणि ह्या दोघांच्या मध्ये आहे एक विशाल अवकाश... समृद्ध करणाऱ्या समजूतदार नात्यांना सहज सामावून घेणारं !

(लेखक हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT