दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेलं अमेरिका-रशियामधील शीत युद्ध, रशियाच्या नाट्यपूर्ण पतनानंतर जवळपास संपुष्टात आलं. ‘आता, इतिहासाचा अंत’ झाल्याचं सांगण्यात येऊ लागलं. पश्चिम आशियातील एक-दोन युद्धं, ११ सप्टेंबरच्या घटनेचा अपवाद केला, तर खरेच जागतिक आर्थिक-राजनैतिक घडी बसल्याची भावना घेऊन गेली तीस वर्षे आपण सगळे जगत होतो.
कोणीही उचकावले नसताना, अचानक पृथ्वीच्या पोटातील भूस्तर एकमेकांवर कुरघोडी करू लागतात. तशा एकामागून एक, आपल्या वरकरणी स्थिर वाटणाऱ्या धरतलाला अस्थिर करू पाहणाऱ्या, घडामोडी आज जागतिक पटलावर घडू लागल्या आहेत. कारणं अनेक आहेत. पण डॉ. अभय वळसंगकरांच्या मते सर्वांत मूलभूत कारण असतं ‘प्रभुत्वाची प्रेरणा’!
या भिंगातून डॉ. वळसंगकर वेगानं बदलणाऱ्या सद्यकालीन गुंतागुंतीच्या जागतिक परिस्थितीकडे बघतात. समजून घेतात. आपल्याशी त्याबद्दल संवाद करू इच्छितात, काही प्रबोधन करण्याचा ‘अभिनिवेश'' न बाळगता. सर्वसाधारणपणे जागतिक गुंतागुंतीची उकल करू पाहणारं कोणतेही साहित्य गंभीर-वैचारिक किंवा अभ्यासात्मक स्वरूपाचं असतं.
पण त्यांची समज आपल्याशी शेयर करताना, डॉ. वळसंगकरांचा सजग ''अभिनिवेशन-रहित'' दृष्टिकोन त्यांना चक्क कादंबरीच्या प्रारूपापर्यंत घेऊन गेला. त्यातून साकारली वाचकाला खिळवून ठेवणारी कादंबरी ''कंपनी सरकार''! जगात घडणाऱ्या घटनांना स्वतःच्या मनाच्या कॅनव्हासवर ओरखडे उमटवू द्यायचे. त्या पडसादांचं शब्दांकन करण्यासाठी ललित साहित्याचा फॉर्म निवडायचा. यासाठी प्रचंड कल्पकता आणि धारिष्ट्य लागते. डॉ. वळसंगकराकडे ते आहे.
ललित साहित्य, अनेक काल्पनिक व्यक्ती-घटनांचा गोफ विणत, कोणताही उपदेश न करता वाचकाचं मन ढवळून टाकू शकतं. मग वाचकच अनेक शक्याशक्यतांचा अंदाज घेऊ लागतो. त्याच्या नकळत त्याच्या आजूबाजूच्या ‘प्रत्यक्ष’ घडणाऱ्या घटनांचे अन्वयार्थ लावू लागतो. ‘कंपनी सरकार'' वाचून आपण देखील असेच काहीसे करू लागतो.
१३ मार्च २०१४ रोजी सुरू झालेली कादंबरीतील घटनांची मालिका पुढचे जवळपास एक हजार दिवस म्हणजे १५ फेब्रुवारी २०१७ पर्यंत आपल्यावर, उसंत न देता, आदळत राहते. एकामागून एक रंजक आणि रहस्यपूर्ण घटना घडत राहतात, जगातील अनेक शहरांतील - लंडन, पॅरिस, हाँगकाँग, कोलंबो, अँटवर्प, कॅलिफोर्निया आणि मुंबईच्या लॅमिंग्टन रोडवर या ठिकठिकाणचे रस्ते, इमारती, कार्यालये यांचे अंतर्बाह्य दर्शन, त्यातील बारकाव्यांसह, लेखक घडवत राहतो; जणू आपला हात धरून तो आपल्याला घेऊन फिरवत आहे असे वाटू लागते.
त्याचवेळी हिरे व्यापार, चहामळे, वायनरी, वॉल स्ट्रीट, ऑटोमोबाइलच्या स्पेअर पार्टसच्या धंद्यातील खाचाखोचा देखील तो पात्रांकरवी सांगत असतो.
कादंबरीतील श्वेत, कृष्ण, पीत, सावळ्या कातडीची पात्रे स्त्री-पुरुष दोन्ही आहेत आणि समलिंगी संबंध ठेवणारी देखील आहेत. ती सतत आपसामध्ये बोलत असतात. एकेक वीट चढवत आपल्या मनात कादंबरी उभी राहू लागते. ''कंपनी सरकार'' शब्द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता तत्कालीन भारतात स्थापन झाल्यानंतर वापरात आला होता.
कंपनी धंदा / व्यवसाय करत आर्थिक सत्ता आणि सरकार राजकीय सत्ता गाजवते असा सार्वत्रिक समज जनमानसात रूढ आहे. अगदी अलीकडेपर्यंत या कंपन्या देखील एखाद्या राष्ट्राच्या नावाने ओळखल्या जायच्या. त्या राष्ट्रीय सरकारांवर अंशतः अवलंबून देखील असायच्या. वित्त भांडवलाच्या युगात खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय कंपन्या तयार होत आहेत. एवढ्या आंतरराष्ट्रीय की कच्चा माल, पक्का माल, भांडवल, काम करणारी माणसं कोणत्याही राष्ट्रातून येऊन कोणत्याही राष्ट्रात जाऊ लागली आहेत. ‘कंपनी सरकार’ मधील घटना आपण आपल्या नकळत या घटितांशी जोडू लागतो.
‘सरकारां’च्या सत्ता फक्त त्या देशाच्या सीमेपुरत्या मर्यादित असतात. पण वैश्विक ‘फूटप्रिंट’ असणाऱ्या महाबलाढ्य कंपन्यांच्या सत्ता सीमा-रहित असणार आहेत. त्या भविष्याच्या गर्भात वाढत आहेत. अशीच एखादी महाबलाढ्य कंपनी जगावर सत्ता गाजवू लागली तर तिला काय म्हणणार? अर्थातच ‘कंपनी सरकार’!
पुस्तकाचं नाव : कंपनी सरकार
लेखक : डॉ. अभय वळसंगकर
प्रकाशक : मेनका प्रकाशन, पुणे
(०२०- २९५२७९६०, २४३३६९६०)
पृष्ठं : १५२ मूल्य : २५० रुपये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.