कल्पना करा की, मान्सून स्थिरावला आहे आणि आठवड्यापासून संततधार सुरू आहे. या पावसात प्रवासाला तर निघायचं आहे... मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचं तर आहे... मात्र, तिथल्या पावसाची परिस्थिती, नदीचा पूर यांबद्दल काहीच माहिती नाही... बातम्यांमधून नेमकं समजलेलं नाही... अशा वेळी ‘गुगल’वर शोध सुरू केला तर समजायला सुरुवात होते की, त्या शहरातल्या नदीच्या पाण्याची पातळी झपाट्यानं वाढते आहे आणि पूर येऊ शकतो.
पूर आला तर कुठले रस्ते बंद पडू शकतात हे ‘गुगल’चा नकाशा दाखवतो आहे. ‘साऱ्या परिस्थितीची आगाऊ माहिती मिळायला हवी,’ अशी सूचना देऊन ठेवली तर मोबाईलवर मेसेज, ई-मेल, व्हॉट्सअॅप अशा वेगवेगळ्या ठिकाणी संभाव्य पूरस्थितीचे इशारे येत आहेत. प्रवासाचं नियोजन करण्यासाठी हा मामला अत्यंत उपयोगी ठरेल. आता, त्या शहरवासीयांच्या दृष्टिकोनातून पाहू.
आपल्या नदीला नेमका कधी पूर येऊ शकतो याचे ठोकताळे वर्षानुवर्षांच्या रहिवाशांना आहेत. या ठोकताळ्यांना हवामानबदल धुडकावूनही लावतो आहे. त्यामुळं, नदीला पूर नेमका कधी येईल याचा काही अंदाज येत नाही. मग, ‘गुगल’वर पुराची नेमकी माहिती सांगणारे इशारे मिळाले तर जीवितहानी, वित्तहानी पूर्णपणे टाळता येईल.
‘नदीकाठच्याच लोकांना पुराचा धोका’ हा प्रकार गेल्या दशकभरात नामशेष झाला आहे. बुजवलेल्या नाल्या-ओढ्यांवर बांधलेल्या दूरवरच्या अपार्टमेंटलाही पुराचं पाणी कधी विळखा घालेल हे सांगता येत नाही. शहरवासीयांना या धोक्याचा अंदाज आधीच आला तर बचावाचं नियोजन करणं अत्यंत सोपं होईल. हानी टळेलच; शिवाय, भीतीपोटी व्यवहार बंद पडण्याचे प्रकारही थांबतील...
पूरस्थितीचा अंदाज शक्य
हे चित्र अवास्तव वाटतं का? ‘पूर गावात आणि इशारा ‘गूगल’वर’ हे घडणं अवघड आहे असं वाटतं का? आजच्या पावसाळ्यात हे चित्र जरूर अवास्तव वाटेल. अवघडही दिसेल. मात्र, तंत्रज्ञान ज्या गतीनं प्रवास करतं आहे, त्या गतीनं येत्या तीन ते पाच पावसाळ्यांत असं तंत्रज्ञान प्रत्येकाच्या मोबाईलवर असू शकतं. त्यात अशक्य वाटावं असं काही उरलेलं नाही. केवळ त्या दिवसाचाच नव्हे तर, एकूण पावसाळ्यातल्या पूरस्थितीचा अंदाजही आधी घेता येईल.
संभाव्य धोक्यांवर मात करण्याची तयारी आधीच करता येईल. इंटरनेट, मोबाईल, भौगोलिक सर्वंकष माहिती (डेटा), पावसाची उपलब्ध सर्व आकडेवारी, उपग्रहांद्वारे मिळणारी माहिती अशा सर्व घटकांचा एकत्रित विचार करून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे (एआय) शक्यता मांडता येतील इतकी तंत्रज्ञानाची प्रगती झाली आहे. तंत्रज्ञानाचा विकास रोज होत आहे. आकडेवारीवर प्रक्रियेची गतीही वाढत आहे. त्यामुळं, येत्या काळात पावसाळ्यातल्या पूरस्थितीचा अंदाज बांधणं सुलभ होत जाणार आहे.
‘गुगल’शी करार
‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’च्या माहितीनुसार, दरवर्षी भारतात पुरामुळं सोळाशे नागरिकांचा जीव जातो. साधारणपणे ७५ लाख हेक्टर इतकी जमीन बाधित होते. पीक, घर आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान सुमारे १८०५ कोटी रुपयांचं असतं. दर पाच वर्षांतून एकदा महापूर येतो. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरानं यापैकी बरंचसं नुकसान वाचवता येऊ शकतं. गेली सहा वर्षं भारताचे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये ‘गुगल’चा थेट सहभाग आहे.
भारत सरकारचा ‘केंद्रीय जल आयोग’ आणि ‘गुगल’ कंपनी यांच्यात जून २०१८ पासून परस्परसहकार्याचा करार अस्तित्वात आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग आणि भौगोलिक नकाशे यासाठी ‘गुगल’चं तंत्रज्ञान वापरायचं आणि आयोगानं प्रामुख्यानं पाऊस-पाण्याशी संबंधित सर्व प्रकारची माहिती पुरवायची असं या कराराचं ढोबळ स्वरूप. या करारातून तीन गोष्टी साध्य करायचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे :
1) पुराचा अंदाज अधिक अचूकपणे करणं. त्यातून विशिष्ट भागासाठी वेळेत इशारा मिळेल आणि हानी टळेल.
2) पूरव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी ‘गुगल अर्थ’ वापरून संशोधन करणं.
3) भारतीय नद्यांभोवतीच्या संस्कृतीचं ऑनलाईन प्रदर्शन कायमस्वरूपी उभं करणं.
यातले पहिले दोन्ही घटक थेट पुराशी संबंधित आहेत. त्यांवर तत्कालीन केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारानं काम सुरू झालं. पुराची पूर्वसूचना मिळणं हा अग्रक्रम ठेवून काम करण्यात आलं. सन २०१६ पर्यंत आयोग पूरस्थितीची पूर्वसूचना एक दिवस जारी करत असे. सन २०१७ मध्ये तीन दिवस आधी सूचना मिळण्यापर्यंत प्रगती झाली. सन २०१८ मधल्या करारानंतर हा कालावधी कमी होतो आहे.
सुरुवातीला निवडक नद्यांपुरती मर्यादित असलेली व्यवस्था २०२० मध्ये देशभरासाठी विस्तारली. सन २०२० मधल्या आकडेवारीनुसार, अडीच लाख चौरस किलोमीटरवरील वीस कोटी लोकांना पूरस्थितीचा इशारा देण्याची क्षमता निर्माण झाली. आजघडीला चार कोटी लोकांना डिजिटल माध्यमाद्वारे थेट संपर्क साधून पूरस्थितीतून वाचवण्याची व्यवस्था आयोग आणि ‘गुगल’ यांच्यातल्या करारातून उपलब्ध झाली आहे.
भारतासह बांगलादेशात हा प्रकल्प सुरू आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये जसजशी प्रगती होत जाईल, तसतसा इशाऱ्यांमध्ये नेमकेपणा येत जाणार आहे आणि पूरस्थितीची पूर्वकल्पना पुरेशी आधी मिळू शकणार आहे.
शहरी पूर...नवाच प्रकार
हवामानबदलाचा मोठा परिणाम पूरस्थितीवर होत असल्याचं जागतिक संशोधन सातत्यानं सांगतं आहे. भारताचा विचार केला तर अतिपाऊस, आणि सातत्यानं होणारा पाऊस या दोन्ही प्रकारे भारतीय हवामान बदलत जाईल असं संशोधक मांडतात. दोन्ही प्रकारच्या पावसानं अधिक दिवस टिकणारा पूर भारतीयांना भविष्यकाळात सतावत राहील असं दिसतं आहे. पाऊसमान बदलत जाण्याची ही सारी चिन्हं आहेत.
अशा परिस्थितीत व्यापक भौगोलिक क्षेत्रावर परिणाम घडवणाऱ्या पूरस्थितीला सामोरं जाण्यासाठी विकसित होत जाणारं तंत्रज्ञान येत्या काळात अधिक विकसित होत जाईल. त्यातून हवामानबदलाच्या संकटांत कमीत कमी हानी होईल अशी अपेक्षा आहे. अनियोजित आणि अनियंत्रित नागरीकरणानं ‘शहरी पूर’ हा नवाच प्रकार गेलं दीड दशक निर्माण झाला आहे. कमी कालावधीत बदाबदा कोसळणारा पाऊस शहरं चोंदून टाकतो आणि बांधकामांखाली गडप केलेले नाले-ओढे आपलं अस्तित्व दाखवून देतात असा अनुभव मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर अशा साऱ्या शहरांना येतो आहे.
पाऊस अंदाजे कोणत्या वेळेत कोसळेल, यापलीकडं शहरी पुराबद्दलची माहिती सध्याचं कोणतंच तंत्रज्ञान देऊ शकत नाहीय. अंदाज व्यक्त करण्यासाठी ज्या प्रकारची माहिती लागते तिची वानवा आजच्या व्यवस्थेत आहे. त्यामुळं, शहरांमध्ये अचानक उद्भवणाऱ्या पूरस्थितीत तंत्रज्ञान वापरण्याला मर्यादाच आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.