Food Music sakal
सप्तरंग

फोडणीचं संगीत!

‘काहीही बनव’ नावाचा पदार्थ अजून कुठल्याच स्त्रीला बनवता आलेला नाही. नेमकं काय बनवायचं, असं सांगणारे नवरे खूप कमी आहेत.

अरविंद जगताप saptrang@esakal.com

‘काहीही बनव’ नावाचा पदार्थ अजून कुठल्याच स्त्रीला बनवता आलेला नाही. नेमकं काय बनवायचं, असं सांगणारे नवरे खूप कमी आहेत. एखाद्याचं मन जिंकायचं असेल, तर त्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो, असं म्हटलं जातं; पण पोटाचा रस्ता मनातून जातो. कारण, रस्ता जाणारा असतो, तसा येणारा असतो. स्वयंपाक कला आहे. त्यालाही रियाझ असतो, बंदिश असते, ताल असतो, सूर असतो... मग दाद का असू नये? एकदा किचनमध्ये बायकोसोबत उभं तर राहून बघा...

आजकाल कुठल्याही हॉटेलमध्ये जा. तरुण पिढी आपली डिश आली की सगळ्यात आधी काय करते? फोटो काढते. आपण काय जेवतोय, हे सगळ्या जगाला सांगायची हौस. हे काही वाईट नाही; पण यात काय कौतुक आहे? कौतुक आपण काय बनवलंय? कोणती रेसिपी केलीय? त्याचे व्हिडिओ पाहताना वाटतं.

सोशल मीडियावर चांगलं जेवण कुठे मिळेल, हे खूप जण शोधत असतात; पण चांगल्या पाककृती बनवायचे व्हिडिओ सगळ्यात जास्त बघत असतात त्या बायका. बाकी लोक रील बघत बसतात किंवा बनवत बसतात. रील्सच्या या जमान्यात स्किल्सचा तुटवडा होतोय. त्यामुळे तोच तो व्हिडिओ किंवा पोस्ट फक्त फॉरवर्ड होत राहते. शेकडो प्रकारे बनणारा भात फार तर एखाद-दुसऱ्या पद्धतीने खाल्ला जातो.

एकतर डाळ पन्नास प्रकारची. त्यात तिच्या पाचशे रेसिपी; पण त्यातल्या दहासुद्धा आपण बनवलेल्या किंवा खाल्लेल्या नसतात. कारण, स्वयंपाक ही फक्त गृहिणीची जबाबदारी आहे, हे आपण गृहीत धरून चाललोय. तुम्हाला विश्वास बसणार नाही; पण आजही कित्येक घरांत बायकांचा सगळ्यात जास्त वेळ ‘आज जेवायला काय बनवायचं?’ यावर विचार करण्यात जातो.

कित्येक नवरे असे असतात ज्यांना आज बनवलेली भाजी पुन्हा त्या आठवड्यात नको असते. बायका विचार करत राहतात, रोज रोज काय नवीन बनवायचं? त्यात स्त्री नोकरी करणारी असेल, तर अजूनच टेन्शन. तिच्याकडे आधीच स्वयंपाक करायला वेळ कमी. त्यात काय बनवायचं, हा विचार कधी करणार? लोकलमध्ये गर्दीत भाजी निवडणाऱ्या बायका बघितल्या की डोळे भरून येतात.

आजही खूप बायकांना स्वयंपाकात पुरुषांची मदत अपेक्षित नसते; पण कधी चुकून विचारलंच की, आज काय बनवू? तर पुरुष बिनधास्त सांगतात, काहीही बनव. हा काहीही नावाचा पदार्थ अजून कुठल्याच स्त्रीला बनवता आलेला नाही. नेमकं काय बनवायचं हे सांगणारे पण नवरे खूप कमी आहेत; पण कुठलीही भाजी बनवली तरी त्यात काही ना काही दोष काढणारे नवरे खूप आहेत.

आजही स्वयंपाक न येणारी मुलगी भेटली की लोक तिला भूत बघावं तसं बघतात. खरं तर खूप लोक म्हणतात, की पुरुष पण स्वयंपाक करतात. मोठमोठ्या हॉटेलमध्ये पुरुषच शेफ असतात. कूक असतात; पण जिथे स्वयंपाक करायचे पैसे मिळतात, तिथे पुरुषांनी स्वयंपाक करायचा आणि जिथे स्वयंपाक केल्यावर साधं कौतुकसुद्धा वाट्याला येत नाही, तिथे बायकांनी स्वयंपाक करायचा, ही काय पद्धत आहे?

एखाद्याचं मन जिंकायचं असेल, तर त्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो, हे अतिशय भंपक वाक्य आपण खूप वेळा ऐकत असतो; पण ज्याच्या मनाचा रस्ता पोटातून सुरू होतो तो सरळ सरळ स्वार्थी माणूस आहे. मनाचा रस्ता पोटातून नाही ओठातून जातो. चार शब्द चांगलं बोलणारा माणूस मन जिंकू शकतो. भाकरीचे दोन प्रकार असतात. ज्वारी आणि बाजरी नाही... काही भाकरी घडवल्या जातात. काही बडवल्या जातात.

ज्याला स्वयंपाकाचं कौतुक असतं त्याच्या घरात भाकरी घडवल्या जातात. ज्याला स्वयंपाक हे बायकोचं कर्तव्यच आहे, असं वाटतं त्या घरात भाकरी बडवल्या जातात. ज्या घरात वरणाचं कौतुक होत नाही, त्या घरात फोडणीचा ठसका जरा जास्तच होतो. ज्या घरात फुगलेल्या पोळीची दखल घेतली जात नाही, त्या घरात पोळपाटाचा आवाज अंमळ जास्तच होतो. ताटातल्या कोशिंबिरीला दाद मिळाली नाही की कांदा कापताना चाकू तलवारीसारखा चालू लागतो.

काकडीवर वार होऊ लागतात. मेथीची पानं काडीमोड घेतल्यासारखी वेगळी होऊ लागतात. मिरच्या ठेचल्या जाऊ लागतात. पातेल्यात पळीचे प्रहार होऊ लागतात. चहात साखर कमी आणि खिचडीत मीठ हमखास जास्त होतं. हे सगळं होतं. कारण, मन ठिकाणावर नसतं. ज्यांना वाटतं, मनाचा रस्ता पोटातून जातो त्यांनी हे लक्षात घ्यावं. पोटाचा रस्ता मनातून जातो... कारण रस्ता जाणारा असतो तसा येणारा असतो. मनात नसेल, तर गोष्ट प्रत्यक्षात चांगली होणार नाही. जर खाणाऱ्याला कौतुक नसेल, तर बनवणाऱ्याला कुठून उत्साह येणार?

चाळीस वर्षे स्वयंपाक करणाऱ्या एक काकू पाहिल्यात मी. म्हणायला माणूस आहेत; पण प्रत्यक्षात यंत्र झाल्यात. नवरा उठायच्या आधी चहा बनवून ठेवतात. अर्धा कप दूध. अर्धा चमचा साखर. ब्लडप्रेशरची गोळी. पुन्हा नवऱ्याने आवरायला उशीर केला, तर चहावर आलेली साय चालणार नाही. म्हणून पुन्हा चहा गरम. मग नाश्ता. पोह्यात मोहरी नको. उपम्यात कांदा नको. ऑम्लेटमध्ये कोथिंबीर नको.

मग दुपारच्या जेवणात भाजीसोबत लोणचं आणि कोशिंबीर कम्पल्सरी. रात्रीच्या जेवणात गोड काहीतरी पाहिजे... काकूंना हे सगळं मुकपाठ आहे. यंत्रासारख्या त्या या सगळ्या गोष्टी करत असतात. काका यंत्रासारखे या सगळ्या गोष्टी खात असतात. जेवायच्या आधी आणि नंतर काका देवाचं नाव घेतात; पण चाळीस वर्षांत काकांनी काकूचं नाव घेतलं नाही आणि म्हणाले नाहीत, की आज आमटी काय भारी झालीय!

काकूंसारखी अशी कितीतरी चालती-बोलती यंत्रं आपल्या आसपासच्या अनेक स्वयंपाकघरात राबत असतात. मिक्सर, फ्रीज आणि ओव्हनच्या रांगेत काकू पण एक यंत्रच वाटतात. अजिबात आवाज न करणारं यंत्र. अशा कितीतरी काकूंना विचारलं, की मनाचा रस्ता पोटातून जातो का? तर त्या नक्की नाही म्हणतील. मग खरं काय आहे? खरं एवढंच आहे, की मनाचा रस्ता पोटातून नाही; तर ओठातून जातो.

एकदा कानात का होईना सांगून बघा, भात तुझ्यासारखाच मनमोकळा झालाय किंवा शिरा तुझ्याएवढाच गोड झालाय. मग बघा तुमच्या घरात भाकरी कधीच करपणार नाही. नेहमी नेहमी दूध उतू जाणार नाही. स्वयंपाक कला आहे. त्यालाही रियाझ असतो. स्वयंपाकालाही बंदिश असते. ताल असतो. सूर असतो. मग दाद का असू नये?

स्वयंपाक करणारा पुरुष असो किंवा स्त्री, कौतुक महत्त्वाचं असतं. ज्या घरात पुरुषाचे हात भांड्याला लागतच नसतील त्या घरात मग फक्त भांड्याला भांडच लागणार. नवरा किचनमध्ये नुसता उभा राहिला तरी कांदा लाजून लाल होतो, तेलाला गुदगुल्या होतात, मोहरी नाचू लागते, जिरे उड्या मारू लागतात... फोडणी संगीत वाटू लागते. एकदा किचनमध्ये बायकोसोबत उभं तर राहून बघा.

(लेखक चित्रपट लेखक, गीतकार, दिग्दर्शक आणि ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे पत्रलेखक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT