भारताच्या भूमीवरून ‘गगनयान’ लवकरच अंतराळवीरांना घेऊन अंतराळात जाणार आहे. गगनयान मोहिमेमुळे भारत जगातील मानवाला अंतराळात पाठविणारा चौथा देश ठरणार आहे. चार अंतराळवीरांना घेऊन गगनयान अंतराळात ४०० किलोमीटर उंचीवर जाणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण भारतीय बनावटीचे रॉकेट आणि मॉड्युल्स मोहिमेत वापरण्यात येत आहेत. कमीत कमी खर्चात होणारी मोहीम भारताच्या संरक्षण खात्यालाही उपयुक्त ठरणार आहे.
भारताची ‘इस्रो’ संस्था लवकरच गगनयानातून भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवून अंतराळ संशोधनातील नवे दालन खुले करणार आहे. आतापर्यंत सोव्हिएत युनियनचे युरी गागारिन (एप्रिल १९६१), अमेरिकेचे ॲलन शेपर्ड (मे १९६१) आणि चीनचे यॅान्ग लिवेई (ॲाक्टोबर २००३) त्या त्या राष्ट्राच्या भूमीवरून अंतराळात जाऊन त्या देशाचे पहिले अंतराळवीर ठरले होते.
भारताचे राकेश शर्मा हे सोव्हिएत युनियनमधून त्या देशाच्या अंतराळवीरांबरोबर अंतराळात गेले होते. आता भारताच्या भूमीवरून ‘गगनयान’ लवकरच अंतराळवीरांना घेऊन अंतराळात जाणार आहे. गगनयान मोहिमेमुळे भारत जगातील मानवाला अंतराळात पाठविणारा चौथा देश ठरणार आहे.
गगनयान मोहिमेसाठी कॅप्टन प्रशांत नायर, कॅप्टन अजित कृष्णन, कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या वर्षअखेरीस किंवा पुढील वर्षाच्या प्रारंभी हे गगनयान अंतराळवीरांना घेऊन अंतराळात ४०० किलोमीटर उंचीवर जाणार आहे. तीन दिवस अंतराळात राहून हे अंतराळवीर हिंदी महासागरात सुखरूप उतरणार आहेत.
भारतात ज्या काही वैज्ञानिक संस्था वेगाने प्रगती करीत आहेत त्यात ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’चे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ४ ॲाक्टोबर १९५७ रोजी सोव्हिएत युनियनने पहिला कृत्रिम उपग्रह ‘स्पुटनिक’ हा यशस्वीरीत्या अंतराळात सोडला. या घटनेमुळे संपूर्ण जगाचे लक्ष अंतराळ संशोधनाकडे गेले.
डॉ. होमी भाभा आणि डॅा. विक्रम साराभाई यांना वाटत होते, की भारताच्या प्रगतीसाठी आणि भविष्यकाळात देशाच्या संरक्षणासाठी अंतराळ संशोधन करणारी एखादी मोठी संस्था भारतात असणे आवश्यक आहे. १५ ॲागस्ट १९६९ रोजी इस्रोची स्थापना झाली.
‘मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान!’ हे इस्रोचे ब्रीदवाक्य आहे. डॅा. विक्रम साराभाई यांना ‘भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक’ असे म्हटले जाते. त्या काळी डॉ. विक्रम साराभाई आणि डॉ. होमी भाभा यांची दूरदृष्टी किती मौल्यवान होती हे इस्रोच्या प्रगतीवरून दिसून येते.
१२ एप्रिल १९७५ रोजी भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह ‘आर्यभट्ट’ सोव्हिएत युनियनच्या मदतीने यशस्वीपणे अंतराळात पाठविण्यात आला. ३ एप्रिल १९८४ रोजी सोव्हिएत युनियनच्या अवकाशवीरांसह भारताच्या राकेश शर्मा यांनी प्रथमच अवकाशात यशस्वी उड्डाण केले. रॅाकेटमध्ये भारताने छान प्रगती केली. ‘चांद्रयान-१’चे प्रक्षेपण सतीश धवन केंद्रातून २२ ॲाक्टोबर २००८ रोजी झाले. ८ नोव्हेंबर २००८ रोजी ते चंद्रकक्षेत पोहोचले.
या मोहिमेत भारताचा तिरंगा ध्वज चांद्रभूमीवर रोवला गेला. ‘चांद्रयान-१’चे दुसरे महत्त्वाचे यश म्हणजे चंद्रावर गोठलेल्या स्थितीत पाणी असल्याचे पुरावे या मोहिमेद्वारे जगाला दिले. ‘मंगळयान-१’चे यश तर खूप मोठे होते. ‘मंगळयान-१’चे प्रक्षेपण ५ नोव्हेंबर २०१३ रोजी सतीश धवन केंद्रावरून झाले. एकाच रॅाकेटद्वारे १०४ उपग्रह अंतराळात पाठविण्याचा जागतिक विक्रम १५ फेब्रुवारी २०१७ रोजी इस्रोने केला.
त्यापूर्वी २०१४ मध्ये ३७ उपग्रह अंतराळात पाठविण्याचा रशियाचा विक्रम होता. तो त्यामुळे मोडीत निघाला. २२ जुलै २०१९ रोजी सतीश धवन केंद्रावरून ‘चांद्रयान-२’ने यशस्वी उड्डाण केले. ते चंद्रकक्षेत पोहोचले; परंतु चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरू शकले नाही. २०२३ मध्ये इस्रोने ‘चांद्रयान-३’ यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात उतरविले.
असे करणारा भारत जगातील पहिला देश ठरला. २०२३ मध्येच सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल १’ पृथ्वीपासून १५ लक्ष किलोमीटर अंतरावर ‘लग्राज १’ बिंदूपाशी ठेवण्यात इस्रोला यश मिळाले आणि आता संपूर्ण जगाचे लक्ष गगनयानाने वेधून घेतले आहे.
इस्रोच्या सर्व मोहिमांचे विशेष म्हणजे त्या कमीत कमी खर्चात यशस्वी करण्यात आल्या. दुसरी महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे, रॅाकेटस् आणि इतर सर्व उपकरणे भारतीय बनावटीची होती. देश अंतराळ संशोधन क्षेत्रात स्वयंपूर्ण होत आहे. एल ॲण्ड टी, गोदरेज इत्यादींसारखे इतर अनेक उद्योग आज इस्रोला मदत करीत आहेत. एक उदाहरण सांगायचे म्हटले तर क्रायोजेनिक इंजिन देण्याचे अमेरिका आणि रशियासारख्या प्रगत देशांनी नाकारले. भारताने क्रायोजेनिक इंजिन तयार केले. भारताच्या संरक्षण खात्याला इस्रोची वेळोवेळी मदत होत असते.
गगनयान मोहीम भारतीय अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. कारण या मोहिमेत प्रथमच भारतीय अंतराळवीर भारतभूमीवरून अंतराळात जाऊन, तेथे प्रयोग करून पुन्हा भारतीय सागरात सुखरूप उतरणार आहेत. संपूर्ण भारतीय बनावटीचे रॉकेट आणि मॉड्युल्स या मोहिमेत वापरण्यात येत आहेत. कमीत कमी खर्चात ही मोहीम कार्य करणार आहे. भारताची ही क्षमता भारताच्या संरक्षण खात्यालाही उपयुक्त ठरणार आहे.
गगनयान मोहिमेसाठी अनेक चाचण्या घेण्यात येत आहेत. सुरक्षितता हा महत्त्वाचा भाग असतो. गगनयानात ॲार्बिटल मॉड्युल आणि क्रू मॉड्युल असणार आहेत. लो अर्थ आॅर्बिटमध्ये म्हणजे ४०० किलोमीटर उंचीवर तीन दिवस हे यान अंतराळात भ्रमण करणार आहे. ५३०० टनांची कॅप्सुल घेऊन एलव्हीएम-३ रॉकेट अंतराळात उड्डाण करेल. बेंगळूरमध्ये ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर (एचएसएफसी) नावाचे नवीन केंद्र सुरू केले गेले आहे. तेथेही अंतराळवीरांचे प्रशिक्षण सुरू झालेले आहे. या प्रशिक्षणात ग्लासकॅासमॅास ही रशियन संस्था तांत्रिक साह्य करीत आहे.
आतापर्यंतच्या सर्व मोहिमांमधील इस्रोची ही सर्वात महागडी आणि जोखमीची अशी मोहीम असेल. इथे अंतराळवीरांच्या सुरक्षिततेला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे गगनयान मोहिमेतील प्रत्येक गोष्ट तपासून पाहिली जात आहे आणि एलएमव्ही-३ रॅाकेटच्याही चाचण्या घेतल्या जात आहेत.
पृथ्वीवर परत येणारी की-एंट्री स्पेस कॅप्सुल, पॅड अबॅार्ट चाचणी, रॉकेट प्रक्षेपण अयशस्वी झाल्यास किंवा त्यामध्ये काही बिघाड झाल्यास अंतराळवीरांनी सुरक्षित बाहेर पडणे, डिफेन्स बायोइंजिनियरिंग ॲण्ड इलेक्ट्रोमेडिकल लॅबोरेटरीने तयार केलेला अंतराळवीरांचा पोशाख या सर्वांची चाचणी झालेली आहे.
गगनयानातील क्रू मॉड्युल आणि सर्व्हिस मॉड्युल यांचे एकत्रित वजन जवळजवळ आठ टन असेल. हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड या कंपनीने क्रू मॉड्युल तयार केले आहे. गगनयानाला त्याच्या ठरविलेल्या निर्धारित कक्षेत पोहोचविण्याची जबाबदारी ही सर्व्हिस मॉड्युलमध्ये असलेल्या प्रपल्शन सिस्टीमकडे असेल.
मोहीम पूर्ण झाल्यानंतरच सर्व्हिस मॉड्युल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करील. त्यामध्ये पाच लिक्विड अपोजी मोटर्स आहेत. मोहिमेसाठी अंतराळवीरांना अंतराळात खाता येतील असे खाद्यपदार्थ, किरणोत्सार मोजणारी उपकरणे, पॅराशूटस् आणि औषधे डीआरडीओ पुरवीत आहे.
गगनयान मोहिमेच्या नियंत्रणासाठी ॲास्ट्रेलियातील कोकोज या बेटावर एक तात्पुरता तळ उभारण्यात आला आहे. अंतराळवीरांच्या तीन दिवसांच्या अंतराळातील मुक्कामानंतर परतीचा प्रवास हा महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे कुठेही काहीही बिघाड झाला, तरी अंतराळवीर सुखरूप राहतील, याची काळजी घेण्यात आली आहे. गगनयान मोहिमेत एकूण पाच प्रयोग केले जाणार आहेत. त्यातील दोन प्रयोग जीवशास्त्राशी संबंधित आहेत. इतर प्रयोगही खूप महत्त्वाचे असणार आहेत.
‘व्योममित्रा’चा सहभाग
गगनयान मोहिमेत अंतराळवीरांसोबत ‘व्योममित्रा’ नावाची ह्यूमोनाइड रोबो - रोबो कन्याही असणार आहे. व्योम म्हणजे आकाश! मित्रा म्हणजे मित्र! ‘व्योममित्रा’ अंतराळ प्रवासात अंतराळवीरांची तपासणी करणार आहे. ती शून्य गुरुत्वाचा आणि किरणोत्साराचा मानवी शरीरावर होणारा परिणाम अभ्यासणार आहे. ‘व्योममित्रा’मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला आहे.
‘व्योममित्रा’ प्रत्येक अंतराळवीरांना नावानिशी ओळखेल, त्यांच्याशी संवाद साधेल, प्रश्न निर्माण झाल्यास तो सोडविण्यासाठी त्यांना मदत करील... विशेष म्हणजे हे सर्व काम करीत असताना ‘व्योममित्रा’ अजिबात थकणार नाही. ती सतत हसतमुख राहील. अंतराळवीरांना इस्रो ‘व्योमनॉटस्’ म्हणून संबोधते.
गगनयान मोहिमेमुळे भारतीय अंतराळवीरांबरोबरच ‘व्योममित्रा’ प्रसिद्धीस येणार आहे. इस्रो ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही सर्व भारतीयांबरोबरच संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणार आहे.
इस्रोचे प्रयोग
इस्रोच्या मागील मोहिमांचा अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते. ती म्हणजे मोहिमांचे उद्दिष्ट साध्य झाल्यावरही इस्रो थांबत नाही. सातत्याने नवनवीन प्रयोग करीत असते. ‘चांद्रयान-३’चे उद्दिष्ट साध्य झाल्यावरही इस्रोचे प्रयोग चालूच राहिले. चांद्रभूमीवर लॅन्डरने उडी मारून पाहिली. चंद्रकक्षेत भ्रमण करणाऱ्या ॲार्बिटरला पुन्हा पृथ्वीकक्षेत आणले.
२०३५ पर्यंत इस्रो अवकाशात ‘भारतीय स्पेस स्टेशन’ तयार करणार आहे. २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीर प्रत्यक्ष चांद्रभूमीवर उतरणार आहे. लवकरच जपानबरोबर चंद्रासंबंधी एक संयुक्त मोहीम कार्य करणार आहे. चंद्रावरची माती पृथ्वीवर आणली जाणार आहे. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
आजपर्यंतच्या इस्रोच्या सर्व मोहिमा कमीत कमी खर्चात यशस्वी झाल्या आहेत. अंतराळ संशोधनासाठी लागणारे सर्व साहित्य भारतात तयार होत आहे. भारत हा या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनला आहे. आज इतर देशांचे उपग्रह अंतराळात पाठवून इस्रो परकीय चलन मिळवीत आहे. जी राष्ट्रे भारताला अंतराळ संशोधनासाठी लागणारे साहित्य पुरवायला नकार देत होती, ती राष्ट्रेही भारत देश समर्थ, स्वयंपूर्ण झाल्यामुळे सहकाराचा हात पुढे करीत आहेत. गगनयानाच्या यशामुळे अंतराळ संशोधनातील नवीन दालन खुले होणार आहे. इस्रोच्या यशामुळे प्रत्येक भारतीयाला आपल्या विज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा अभिमान वाटत आहे.
इस्रोचे कार्य बंगळूर, अहमदाबाद, तिरुअनंतपूरम, डेहराडून, महेंद्रगिरी, हसन, हैदराबाद, श्रीहरीकोटा, तिरुपती आणि शिलाँगमधील २० विभागात सुरू आहे. अनेक खासगी उद्योग इस्रोला साहित्य पुरवीत आहेत. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, असे कार्य इस्रो करीत आहे. डॅा. विक्रम साराभाई, एम. जी. के. मेनन, सतीश धवन, यू. आर. राव, के. कस्तुरीरंगन, जी. माधवन नायर, के. राधाकृष्णन्, शैलेश नायक, ए. एस. किरणकुमार, के. सिवन् आणि एस. सोमनाथ इस्रोच्या यशाचे शिल्पकार ठरले आहेत.
dakrusoman@gmail.com
(लेखक प्रसिद्ध खगोल अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.