शानमध्ये अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा आणि शशी कपूर. 
सप्तरंग

'शोले'नंतर 'शान'चं काय झालं?

जी.बी.देशमुख gbdeshmukh21@rediffmail.com

काही कलाकृती अशा घडून जातात, ज्या पूर्ण झाल्यांनतर असा पराक्रम आपल्या हातून घडला आहे यावर त्याच्या कर्त्याचा सुद्धा विश्‍वास बसू नये, अशी स्थिती असते. ‘शोले’च्या अजब-गजब यशानंतर पुन्हा दुसरा सिनेमा तयार करण्यास रमेश सिप्पींना तब्बल पाच वर्षं लागली होती. त्याची कदाचित दोन कारणं असावी. ‘शोले’पेक्षा अधिक भव्य-दिव्य असं काय बनवलं जाऊ शकतं तो एक प्रश्‍न आणि दुसरं मुळात ऑगस्ट १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ची लोकप्रियता तोपर्यंत तसूभरही कमी झाली नव्हती. १९८० मध्ये मुंबईच्या मिनर्व्हा टॉकीजमध्ये ‘शोले’ची जागा रमेश सिप्पींच्याच ‘शान’नं घेतली. अर्थात, ‘शोले’ची शान नंतरही अबाधीतच होती. ‘शोले’इतकं उत्तुंग असं काही पुन्हा घडणं नव्हतं. ‘शान’ चित्रपटसुद्धा बऱ्यापैकी मनोरंजनात्मक मूल्य राखून होता.

खलनायकांच्या गटात एक वेगळाच मापदंड ठरलेल्या गब्बरसिंगनंतर पाच वर्षांनी रमेश सिप्पी आणि सलिम -जावेद नवा खलनायक पेश करणार होते, कुलभूषण खरबंदा - म्हणजेच शाकाल !! त्याच्याविषयी खूप उत्कंठा निर्माण करण्यात आली होती. त्याचे बूट सोन्याचे, त्याचा ड्रेस लाखो रुपयांचा इ.इ. सिनेमा पाहिला तेव्हा प्रेक्षकांनी खरबंदाला दाद दिली. ‘‘अजीब जानवर है, कितना भी खाये भूखाही रहता है’’ असं म्हणत त्याच्या पाळीव मगरीचं कौतुक तो असं काही करायचा, की प्रेक्षकांचा थरकाप उडत असे. रामगढच्या ग्रामीण वातावरणात बनवल्या गेलेल्या डाकू-पट “शोले”ची शहरी आवृत्ती बनविण्याचा सिप्पींचा प्रयत्न होता. आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत गुन्हेगारी क्षेत्रात दहशत पसरविणारा ‘शाकाल’ शहरी गब्बर म्हणून सिप्पींनी आणला होता. ज्याप्रमाणे ‘शोले’मध्ये लहानात लहान चरित्र सुद्धा मजबुतीनं लिहिले गेले होते, आणि त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली होती, तसं काही ‘शान’मध्ये जमलं नव्हतं. सुनील दत्त, शशी कपूर सोबतच अतिरिक्त वाटावी अशा एका भूमिकेत शत्रुघ्न सिन्हा होता. बिंदिया गोस्वामी, परवीन बाबी आणि राखीसुद्धा ठिसूळ पायाच्या भूमिकांवर उभ्या होत्या.

एका प्रामाणिक आणि बहादूर पोलिस अधिकाऱ्याचे दोन भाऊ भुरटे चोर असूनसुद्धा त्याच्या लाडाचे असतात, ये बात कुछ हजम नहीं होती. पटकथेतील असले दोष चित्रपटात वापरण्यात आलेल्या तेव्हाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापुढे झाकले गेले होते. त्यांचा प्रामाणिक पोलिस अधिकारी असलेला भाऊ सुनील दत्त जेव्हा ‘शाकाल’कडून मारला जातो, तेव्हा कुठं हे दोघं गंभीर होतात. अचाट खर्चाचे आधुनिक चित्रीकरण, कुलभूषण खरबंदानं रंगवलेला टकलू खलनायक शाकाल, आर. डी. बर्मनचं संगीत आणि एका मिश्किल भूमिकेतील अमिताभ बच्चन या बाबी चित्रपटाच्या आधार ठरल्या होत्या. पहिल्याच दृश्यात हे दोघं युनूस परवेझ या हॉटेल मालकास गंडवतात. त्यात एक नकली हिरेचोर बनलेल्या अमिताभनं मजा आणली होती. एका दृश्यात आलिशान गाडीतून उतरलेल्या बिंदिया गोस्वामीच्या सौंदर्याची तारीफ करणारा शशी कपूर आणि तो करत आहे ती गाडीची तारीफ आहे, असे समजणारा अमिताभ मजा आणतात. अजून एका प्रसंगात परवीन बाबीची प्रतीक्षा करत एका हॉटेलमध्ये बसलेला अमिताभ एका अनोळखी स्त्रीबरोबर वेळ घालविण्यासाठी गप्पा मारता मारता त्यांच्या भविष्यातील फॅमिली प्लॅनिंगपर्यंत पोहोचून जातो, तो पण एक वैशिष्ट्यपूर्ण विनोदी प्रसंग होता. ‘मेरा ये उसूल हैं की मैं घरमे घुसकर मारता हूँ’ असल्या कडक संवादांसाठी तर अमिताभचा जन्मच होता. उषा उथपच्या पुरुषी आवाजातील टायटल साँग ‘दोस्तोसे प्यार किया’ आणि शेवटी ‘यम्मा, यम्मा’ या आर. डी. बर्मन आणि मोहम्मद रफीच्या आवाजातील ठसकेबाज गाण्यानं मजा आणली होती. त्यात अमिताभनं केलेलं नृत्य मस्त जमलं होतं.

‘शोले’शी तुलना झाल्यानंतरही ‘ शान ’ तरून जाण्याची दोनच कारणं होती. पहिलं कारण कुलभूषण खरबंदानं रंगवलेला टकलू ‘शाकाल’ हा खलनायक आणि दुसरं अमिताभची हलकीफुलकी विनोदी भूमिका, त्याच्या जोरदार ॲक्शन आणि सर्वांत महत्त्वाचं त्याचं सिनेमात केवळ असणं. एखाद्याचा जमाना असणं म्हणजे नेमकं काय असतं ते ज्यांनी अमिताभचा तो काळ अनुभवला, तेच सांगू शकतील. ‘शान’मधील हलक्या-फुलक्या भूमिकेनंतर रमेश सिप्पींनी अमिताभला साक्षात दिलीपकुमारच्या पुढ्यात उभा केला होता ते ‘शक्ती’ मध्ये. त्या रंगलेल्या सामन्याबद्दल पुढीलवेळी. 

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT