Amitabh Bachchan Sakal
सप्तरंग

ज्येष्ठांना तारुण्य देणारा आविष्कार!

नव्वदच्या दशकात ‘जागतिकीकरण’ आणि ‘मुक्त अर्थव्यवस्थे’च्या लाटेत अनिवासी भारतीयांना हवेहवेसे वाटणारे, भारतीयत्वाचा भास करून देणारे प्रसंग चित्रपटात घालण्याचा ट्रेंड हिंदी चित्रपटांमध्ये १९९४ मध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’पासून सुरू झाला.

जी. बी. देशमुख gbdeshmukh21@rediffmail.com

नव्वदच्या दशकात ‘जागतिकीकरण’ आणि ‘मुक्त अर्थव्यवस्थे’च्या लाटेत अनिवासी भारतीयांना हवेहवेसे वाटणारे, भारतीयत्वाचा भास करून देणारे प्रसंग चित्रपटात घालण्याचा ट्रेंड हिंदी चित्रपटांमध्ये १९९४ मध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’पासून सुरू झाला.

नव्वदच्या दशकात ‘जागतिकीकरण’ आणि ‘मुक्त अर्थव्यवस्थे’च्या लाटेत अनिवासी भारतीयांना हवेहवेसे वाटणारे, भारतीयत्वाचा भास करून देणारे प्रसंग चित्रपटात घालण्याचा ट्रेंड हिंदी चित्रपटांमध्ये १९९४ मध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’पासून सुरू झाला. १९९८ या वर्षात ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाने दिग्दर्शनाचा श्रीगणेशा करणाऱ्या करण जोहर या तेव्हाच्या तरुण दिग्दर्शकाने याच पठडीतील ‘कभी खुशी, कभी गम’ हा चित्रपट २००१मध्ये पडद्यावर आणला. श्रीमंती थाट, उद्योगपतींचं घराणं, राजमहालासारखा बंगला, रोजच्या वापरातही भरजरी कपडे घालणारी माणसं, घरातल्या घरात पूर्ण मेक-अप केलेल्या महिला, अंगणात स्कूटर उभी असावी तसं दारात हेलिकॉप्टर, दिमतीला नोकर-चाकर अशी कुबेराची श्रीमंती असूनही पूजापाठ, संस्कार, करवा चौथ ही सगळी पारंपरिक सोंगं अनिवार्य. श्रीमंतांचा आनंद आणि श्रीमंतांचीच दुःखं; इथं फाटक्यांचं दर्शन नको. गरिबीचं रडगाणं नको, की भुकेल्यांची तीच ती मगजमारी नको.

‘कभी खुशी कभी गम’मध्ये अमिताभ एका बलाढ्य उद्योगसमूहाचा कर्ता पुरुष ‘यशोवर्धन रायचंद’च्या भूमिकेत दिसला. थांग लागू नये अशी प्रतिभा घेऊन जन्मलेल्या या कलाकाराने बेदरकार, गर्विष्ठ, पुरुषप्रधान मानसिकता असलेला उद्योगपती कुटुंबप्रमुख असा काही उभा केला, की सत्तरच्या दशकातील ‘गंदी नाली का किडा’ बनून प्रस्थापितांना आव्हान देणारा हाच का तो ‘विजय’, असा प्रश्न पडावा. गर्भश्रीमंतीतून आलेला रुबाब, सत्ता आणि घरामध्ये ‘कह दिया ना, बस कह दिया’ अशी जरब ठेवणारा परंपरावादी आणि त्याचवेळी साठीत प्रवेश झालेला असूनही तंदुरुस्त आणि स्टायलिश यशोवर्धन भारदस्त वाटला होता. चित्रपटाच्या पहिल्याच फ्रेममध्ये महागड्या काळ्या जोधपुरी सुटात पडदा व्यापून टाकलेला अमिताभ आपल्या भरभक्कम आवाजात म्हणतो की, ‘‘ऐसा क्यो होता है, की एक बाप अपने बेटे से कह नही पाता, की वो उससे कितना प्यार करता है। उसे गले लगाकर क्यो नही कह पाता की ‘आय लव्ह यू, माय सन....’ तो इसका मतलब ये तो नही, की एक बाप अपने बेटे से कम प्यार करता है।’’ आणि तिथूनच जनमानस अमिताभचं होऊन बसतं.

भव्य सेट्स, सगळीकडं चकाचक वातावरण, निवडक धार्मिकता, परंपरेचं तुणतुणं, शाहरूखची लोकप्रिय ओव्हरॲक्टिंग, काजोलची दिल्लीतील चांदनी चौकातल्या टिपिकल लहेज्यात ‘वड्डे वड्डे लोग, वड्डी वड्डी बाते’सारखी मनोरंजक बडबड, देखणा हृतिक रोशन आणि झिरो फिगरवाली करिना कपूर... हे पॅकेज होतं नव्या उपभोक्ता संस्कृतीत स्थिरस्थावर होऊ लागलेल्या आणि भारतीयत्वाच्या कोरड्या गप्पा मारायची हौस असलेल्या परदेशस्थ भारतीय तरुणांसाठी; पण अमिताभच्या चाहत्यांना एक गर्भश्रीमंत, दमदार अमिताभ पाहून मजा आली होती. परंपरा, संस्कार सांभाळणं आपल्या जागी आणि धनाढ्यांची व्यक्तिगत छानछोकी आपल्या जागी. श्रीमंतांची अद्‍भुत दुनिया दिसून येत होती ‘शावा, शावा, माहिया से शावा, शावा’ या भव्यदिव्य गाण्यात. यशोवर्धनच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीतील प्रचंड खर्चीक सेट लावलेल्या या गाण्यात उणीव म्हणून कशाचीच नव्हती.

या गाण्याचं मुख्य आकर्षण होतं शाहरुख, काजोल, राणी मुखर्जी हे तरुण कलाकार आणि नृत्य-समूहातील सहा फूट उंचीच्या, भारदस्त कपड्यांतील अमिताभचा आठ गोऱ्यापान ललनांसोबतचा नृत्याविष्कार. या गाण्यात तरुणांना लाजवेल असं पदलालित्य, मुद्राभिनय आणि ऊर्जेचं प्रदर्शन केलं होतं अमिताभने. अमिताभसाठी आवाज होता हरहुन्नरी सुदेश भोसलेचा. संगीतकार आदेश श्रीवास्तवच्या पंजाबी ठसक्यात सुदेशने ताल धरायला भाग पाडलं होतं. सुरुवातीपासून मध्यमवर्गीय मुलगी अशी प्रतिमा असलेली जया बच्चन मात्र या श्रीमंती जंजाळात ‘ऑड मॅन आउट’ वाटत राहते. या गाण्याच्या शेवटी टिपेला पोहोचलेल्या ठेक्यावर शाहरुख आणि अमिताभला एक उंचपुरी नृत्यांगना साथ देत असते. या ललनेसोबत नाचताना पूर्ण लयीत आलेला अमिताभ बेभान झालेला असतो. पंजाबी ठेक्याच्या गतिमान ठसक्यात आजूबाजूच्या गर्दीचं भान सोडून त्याने समोरच्या नृत्यांगनेसोबतचं स्त्रीसुलभ अंतर तोडलेलं असतं. आता पुढे काय, अशा उत्कंठेने प्रेक्षक खुर्चीतून अक्षरश: पुढे झुकलेले असतात. मादक ललनेसोबतच्या नृत्यातील मस्तीत अमिताभ वेगळ्याच दुनियेत पोहोचलेला असतो. तेवढ्यात पाठीमागून त्याच्या खांद्यावर जया बच्चनचा हात टेकतो, तरीही पठ्ठा शुद्धीवर येण्याचं नाव घेत नाही. मग शाहरुखच्या इशाऱ्यावर मोठ्या मुश्कीलीने अमिताभ त्या तंद्रीतून बाहेर येत मागे बघतो. काही क्षण तो अक्षरशः ब्लॉक झालेला असतो, शून्यात गेलेला असतो. जया बच्चन त्याला शांतपणे म्हणते, ‘बस किजीये, बहोत हो गया।’ जया बच्चनच्या शांत इशाऱ्याने स्तब्ध झालेल्या अमिताभने भानावर येणं, रसभंग होणं आणि आता या बायकोचं काय करावं, असा प्रश्न पडणं... इतके सारे अर्थ काही सेकंदांत व्यक्त केले होते. नवऱ्याला मर्यादेत ठेवणाऱ्या बायकोची नैतिक ताकत त्या दोन शब्दांत दिसून आली होती. इकडे बच्चनसाहेब त्यांच्या मनाविरुद्ध नृत्याच्या नशेतून वास्तवात येतात. अमिताभ, जया भादुरी आणि शाहरुखनं ते पाच-सात सेकंद केवळ मुद्राभिनयानं असे रंगविले आहेत, त्यावरून त्यांचा उच्च दर्जा कळावा.

चित्रपटात बायकोने केलेला हा रसभंग प्रेक्षकांतील नवऱ्यांनाच नव्हे, तर अविवाहित पुरुषांनादेखील चांगलाच झोंबलेला असतो. खऱ्या जीवनात नीतिमत्तेचं कडक वेसण धरून ठेवणाऱ्या बायका नवऱ्यांच्या भल्यासाठी त्यांचे असे रसभंग कितीदा करत असतील, हे नवरा-बायकोच जाणो. साठी आली म्हणजे आता आपलं आटोपलं, असा सार्वजनिक समज असण्याच्या त्या काळात अमिताभच्या ‘शावा, शावा’तील जोरदार धिंगाण्याने निवृत्तीला टेकलेल्या आणि नुकत्याच निवृत्त झालेल्या सगळ्या ‘उतरलेल्या’ फळांना अगदी नवा जोर आला, नवसंजीवनी मिळाली होती. साठीतही असेतसे विचार मनात येतात, यात जगावेगळं असं काही नाही, असा भरवसा खुद्द अमिताभने दिला होता. अमिताभ ज्येष्ठांच्या वयोगटात गेला आणि त्याने त्या वयोगटाला पुन्हा तरुणाई बहाल केली. उत्तरार्धात थोडा लांबलेला हा चित्रपट बघावा किंवा लक्षात रहावा तो अमिताभच्या ‘से शावा, शावा....’ ह्या साठीतील भन्नाट नृत्याविष्कारासाठी.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे जाणकार अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT