Paa Movie Sakal
सप्तरंग

नेहमीचा अवतार नसतानाही कामगिरी अव्वलच !

‘पा’मधील त्याने साकारलेल्या ‘ऑरो’त आपल्याला अमिताभचं नखही दिसत नाही की, या सिनेमात अमिताभ आहे हे आठवतदेखील नाही.

जी. बी. देशमुख gbdeshmukh21@rediffmail.com

‘पा’मधील त्याने साकारलेल्या ‘ऑरो’त आपल्याला अमिताभचं नखही दिसत नाही की, या सिनेमात अमिताभ आहे हे आठवतदेखील नाही.

आर. बाल्की ( याचं खरं नाव आर बालकृष्णन, पण याची ओळख त्या नावानं झाली नाही. जाहिरात क्षेत्रात बुलंद कामगिरी करून हा इकडे म्हणजे चित्रपटसृष्टीत आला.) यांनी २००७ मध्ये ‘चीनी कम’चं यश नोंदवलं. या यशानंतर हा तरुण दिग्दर्शक २००९ मध्ये अमिताभसोबतचा ‘पा’ हा दुसरा चित्रपट घेऊन आला. अमिताभचा चित्रपट पाहताना अमिताभचा विसर पडावा असा आश्चर्यकारक अनुभव या चित्रपटानं दिला. अमिताभचा चित्रपट म्हणजे त्याच्याविषयीच्या सगळ्या ऊर्मी जिवंत ठेवून पाहण्याचा विषय असताना, आपण अमिताभला विसरून त्यानं साकारलेल्या चरित्रात गुंतून जातो, हे एक आश्चर्य होतं.

‘पा’मधील त्याने साकारलेल्या ‘ऑरो’त आपल्याला अमिताभचं नखही दिसत नाही की, या सिनेमात अमिताभ आहे हे आठवतदेखील नाही. अमिताभपेक्षा सुमारे पस्तीस वर्षं कनिष्ठ असलेली त्याच्या मुलीच्या वयाची विद्या बालन त्याच्या आईची भूमिका करते आहे, किंवा मुलगा अभिषेक त्याच्या बापाची भूमिका करतो आहे, यातलं काहीही आश्चर्य वाटू नये, इतकी कमालीची जबरदस्त रचना होती ‘पा’ चित्रपटाची; आणि हेच त्याचं यश होतं.

इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना प्रेमात पडलेले विद्या बालन आणि अभिषेक बच्चन, विद्याला गर्भधारणा झाल्याचं लक्षात येताच विलग होतात. कारण, अभिषेकला शिक्षण पूर्ण करून भारतीय राजकारणात एक चांगल्या राजकारण्याची भूमिका पार पाडण्याची आकांक्षा असते आणि काही काळ तो लग्नासाठी तयार नसतो. त्याच्या जीवनात, त्याच्या करिअरमध्ये अडथळा बनून येणार नाही, असं वचन रागाच्या भरात देऊन विद्या निघून जाते. तरुण वयात विधवा झालेल्या तिच्या आईसोबत एकट्याने राहण्याचा ती निर्णय घेते आणि अभिषेकला कल्पना न देता त्याचं बाळ जन्माला घालते. पण, तिने स्वीकारलेलं लग्नापूर्वीचं मातृत्व अधिकच खडतर ठरतं, कारण तिच्या बाळाला ‘प्रोजेरिया’ हा लाखात एकाला होणारा आजार जन्मतःच असतो.

ती स्वतःच एक स्त्रीरोगतज्ज्ञ असल्यामुळे तिला ह्या आजाराविषयी सगळं कळत असतं. ह्या आजारातील मुलांची शरीरं वयाच्या पाचपट अधिक वेगाने परिपक्व होत जातात. म्हणजेच दहा वर्षांच्या वयातच ‘प्रोजेरिया’बाधित मुलगा पन्नास वर्षांचा दिसू लागतो आणि अशा मुलांचं एकूण जीवनमान सरासरी तेरा वर्षांचं असतं. विशेष म्हणजे, ही मुलं बुद्धीने तल्लख असतात. केवळ शरीराची वाढ वयापेक्षा पुढे धावणारी असल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व विचित्र पद्धतीने घडत असतं. तर, असा ‘प्रोजेरिया’बाधित बारा वर्षं वयाचा मुलगा ‘ऑरो ’ साकारला होता खुद्द अमिताभ बच्चनने..!

अशा प्रकारच्या चित्रपटात बघण्यासारखं काय असू शकतं, असा ठोकताळा बांधून थिएटरमध्ये गेलो आणि प्रोस्थेटिक मेक-अपमधील अमिताभ ओळखणं जड होऊन बसलं. वरील माहितीवरून गंभीर विषयावरील हा एक गंभीर चित्रपट आहे असं वाटावं, तर तेही अर्धसत्य! म्हणजे असं की, विषय गंभीर; परंतु ज्याच्याकडे आपण सहानुभूतीने बघावं, तो असाध्य आजाराचा रुग्ण दाखवलेला रुग्ण मात्र गमतीदार. सरासरी एका वर्षाचं आयुष्य उरलेला ऑरो बारा वर्षांच्या वयात, साठ वर्षांचं विचित्र म्हातारपण घेऊन पुढ्यात येतो. त्याची प्रकृती इतकी नाजूक की, वर्गातील सगळे सवंगडीसुद्धा त्याची काळजी घेत असतात. त्याच्या वर्गमित्रांसोबत घडणाऱ्या गमतीजमती, एका लहानशा गोड मुलीचं त्याच्या मागे लागणं, त्यांच्यातील हास्य-विनोद आणि मुलांमधील त्याची लोकप्रियता, हे इतक्या सहजपणे चित्रित झालं होतं की, थोराड वाटणारा हा मुलगा खऱ्या आयुष्यात तेव्हा सत्तरीला टेकलेला अमिताभ बच्चन आहे, हे आपल्या मनातही येत नाही. सिनेमातील अमिताभचे हलकेफुलके वन लायनर्स नवीन युगातील बालकांच्या तल्लख बुद्धीची साक्ष देऊन जातात. ‘गुगल से बच के कहाँ जाओगे’ असं कॉम्प्युटरवर सर्च करताना पुटपुटणं, ‘विष्णू तुम्हारे लिये अपनी जान दे सकता हू’ असं मित्राला बळंच म्हणणं; आणि आजीला नेहमी ‘बम’ (इंग्रजी ) असं संबोधत तिच्यासोबत जपलेलं खेळकर नातं ह्यांतून ऑरो व्यक्त होत जातो. इतक्या वेगळ्या प्रकारच्या आजारासोबत जगत असलेला ऑरो तुमच्याकडून कुठंही सहानुभूतीची अपेक्षा करत नाही.

अरुंधती नाग, विद्या बालन, अभिषेक बच्चन आणि परेश रावल हे सगळे अमिताभपेक्षा खूप कमी वय असलेले कलाकार अनुक्रमे त्याची आजी, आई , वडील आणि आजोबा म्हणून कसे शोभले असतील? ते कळण्याकरिता केवळ चित्रपट बघणं गरजेचं आहे. तरुण वयात थोड्याशा गैरसमजातून दुरावलेल्या आई-वडिलांना एकत्र आणण्यासाठी ऑरो ह्या प्रोजेरियाचा रुग्ण असलेल्या मुलाने केलेली आगळीवेगळी धडपड म्हणजे ‘पा’.

‘पा’ या प्रकरणात पहिला सलाम ठोकायचा तो अशी कलाकृती निर्माण होऊ शकते, असा निर्मितीपूर्व विश्वास ज्याला होता त्या आर. बाल्की ह्या बुद्धिमान दिग्दर्शकास. नंतरचा क्रम अरुंधती नाग, विद्या बालन, अभिषेक बच्चन, परेश रावल आणि चित्रपटात दाखविल्या गेलेल्या ‘ऑरो’च्या शाळकरी बालकलाकारांचा. त्यानंतर येईल इलैयाराजाचं अप्रतिम संगीत. मेक-अप कलाकारांपासून सगळ्यांनीच जीव ओतलेल्या या कलाकृतीत अमिताभ हरवला होता.

या चित्रपटात अमिताभचं अस्तित्व भूमिकेत विरघळून गेलं होतं. असंही म्हणता येईल की, अमिताभविरहित या चित्रपटात अमिताभने कमाल केली होती. हलक्याफुलक्या प्रसंगांमधून पुढे जात असतानाच चित्रपटातील प्रत्येक पात्राचं दुःख आपण नकळत हृदयात मुरवत जातो. आई-वडिलांचं पुनर्मिलन घडवून आणणारा ऑरो शेवटी त्याचं तेरा वर्षांचं दीर्घ आयुष्य आटोपून प्राण सोडतो, तेव्हा आपल्या धैर्याचा बांध फुटल्याशिवाय राहत नाही. ‘दीवार’, ‘शोले’, ‘मुकद्दर का सिकंदर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये अविस्मरणीय मरण-दृश्य साकारणारा अमिताभ, ‘पा’ सिनेमातील ‘ऑरो’चा अंत साकारताना अंतःकरणापासून हलवून टाकतो. सव्वादोन तास सतत नजरेसमोर राहूनही ऑरोने एकवेळाही अमिताभला पडद्यावर डोकावू दिलं नव्हतं, हे यश होतं अमिताभचं. वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी बारा वर्षांचा ऑरो साकारणाऱ्या अमिताभच्या अभिनयातून वयाच्या शंभर वर्षांपर्यंत असेच चमत्कार घडत राहोत, हीच सदिच्छा.

(सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे जाणकार अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT