Plants sakal
सप्तरंग

मनी रुजणारं चांगुलपण...

डोळ्यांची तहान आणि मनांची भूक पोटभर भागवणारी जर्मनी अर्थात तो देश मनात घर करून बसतो म्हणजे बसतो. मुळात अवघा युरोप मनांवर गारुड करणाराच.

डॉ. केशव सखाराम देशमुख

डोळ्यांची तहान आणि मनांची भूक पोटभर भागवणारी जर्मनी अर्थात तो देश मनात घर करून बसतो म्हणजे बसतो. मुळात अवघा युरोप मनांवर गारुड करणाराच. जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वीत्झर्लंड ह्या तीन देशांची मोठी अशी सफर आमचा आनंद रुंदावणारी अशीच. अलीकडं दीड महिना आम्ही जर्मनीत जावई-लेकीकडं म्युनिक शहरात राहून भारतात परतलो.

येथील प्रत्येक दिवस म्हणजे हा काळजात रुतून बसलेला. काळजांवर कोरलेला. जर्मनीतली किंवा एकूण युरोपातली थंडी भोवतालाला वेढून असलेली अशीच असते. म्हणजे सूर्यनारायणाचं दर्शन दुर्मीळात मोडावं अगदी असं. ऊन पडलं आणि ते दिवसभर टिकून राहिलंच तर ते म्हणजे ‘गुडलक’. अन्यथा, आपलं हे कायम महाबळेश्वर असंच तिथलं एकूण वातावरण.

नेमक्या या आमच्या तेथील वास्तव्याच्या काळात आम्ही थंडी अशी जोरदार अनुभवली. सोसली. म्हणजे जणू हाडांना धडक मारणारी थंड. सप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबरातली जर्मनीची थंडी अफाट. अर्थात अगदीच तेथील बच्चे कंपनी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक अशा थंडीचा मस्त एन्जॉय करतात.

दैनंदिन कामात तिथल्या नागरिकांचा कुठला खंड म्हणून नाही. हातात सिगार, पेयाची कुठली एखादी बाटली, जीन्स पॅन्ट, लांब बूट, झबलेदार मोठे उबदार कोट, जीव की प्राण असलेल्या उत्तम दर्जाच्या सोबतीला सायकली... अशा दैनंदिन अवतारांमध्ये रोजच्या ‘घड्याळवेळा’ पाहत धावणारी सर्व प्रकारची इथली माणसं जर्मनीत पाहिली.

‘टाइम इज मनी’ आणि ‘वर्क इज वर्कशिप’ हा जीवनशैलीचा झालेला युरोपिअन माणसांचा दैनंदिनीचा धडा खूपच ज्ञानग्यान शिकवणारा म्हणायला हवा. त्यांची कार्यमग्नता आणि वक्तशीरपणा एखाद्या अलंकारासारखा.

गर्द झाडांनी प्रायः अरण्यानं झाकलेला युरोप पाहताना घरांपेक्षाही झाडं, फुलांचे ताटवे, सर्वदूर हिरवीगार दिगंता पार दिसणारी हिरवीगर्द अशी हजारो किलोमीटर्स व्यापून पुढं जाणारी कुरणंच कुरणं, आपलं अंतःकरण जणू हिरवंगर्द करूनच टाकतात. प्रत्येक घरांच्या सजावटी किंवा घरी दारांपुढच्या दर्शनी बाजूही फुलांच्या वेलींनी किंवा रंगीत झुलत्या-लोंबत्या तरल फुलांनी डवरलेल्या दिसतात. सौंदर्याचा डोळा आणि सौंदर्यलक्षी इथल्या प्रत्येकच माणसांचं मन ह्या गृहशोभेमधून कळूनच येतं.

सगळी घरं कशी शांत विपश्यनेत बसल्यागत. उगी कुठं रिकामा माणूस किंवा रिकामी माणसं उगीच तिथं कुठंही चकाट्या पिटत बसलेली एकदाही आम्हाला दिसली नाहीत. कार्यमग्नता आणि कार्यकुशलता अर्थात युरोपची अचंबित करणारीच. शिवाय त्यांच्यातला सौजन्य, आदब, शिष्टाचार हाही मोठा वैभवी. भूषणावह. ‘कुठलीच ओळख आपली नसताना हास्यवदने येताजाता अभिवादन करणारी- ‘हाय- हॅलो’ करणारी माणसं तर सतत आम्हाला भेटली.

हे असं त्यांचं माणुसकीचं वर्तन आमचं समाधान रुंदावत जाणारंच होतं. आम्ही मोटारीनं हजारो किलोमीटरचा ऑस्ट्रिया, स्वीस, तसेच जर्मनीचा प्रवास कित्येक दिवस अनेकदा केला. तेव्हा एवढे दिवस फिरताना जाणवलं असं ते हे, की भरधाव धावणाऱ्या कोणत्याही गाड्यांचे एवढ्या दिवसांत कधीच ‘हॉर्न’ ऐकायला मिळाला नाही. हॉर्न ना आमच्या गाडीचा वाजला, ना इतर अनेक कुठल्या वाहनांनी हॉर्न वाजवला.

एवढ्या भव्यदिव्य चकचकीत हायवेवर सुद्धा ना कुठे वाहनं तुंबलेली अथवा खोळंबलेली दिसली; ना कुठं नाके किंवा पोलिस उभे सुरक्षा सुरळीततेसाठी होते. ‘स्वयंशिस्त’ दिसेल सर्वत्र. आवाज नाही, गोंधळ मुळीच नाही. कुठलंही शहरं घ्या किंवा युरोपातील हायवेची वाहतूक व्यवस्था घ्या. सर्वत्र असा ‘अडथळा’ कुठेच कधीही आम्हाला आमच्या नजरेला पडला नाही. कुठेच भटकी-मोकाट कुत्री किंवा तत्सम प्राणी गतिरोधकाचा भागही झालेला पाहायला मिळाले नाहीत.

उलट शनिवार-रविवार हे दोन दिवस मालवाहू वाहनांना ठरवून पूर्ण विश्रांतीचे असतात तिथे. या दिवशी प्रवास-पर्यटन करणाऱ्या, आनंदाची लूट करणाऱ्या नागरिकांसाठी ते दोन दिवस युरोपातील ‘महामार्ग’ खुले असतात. अवजड, मालवाहू ट्रक सदृश वाहनांचे महामार्गांवर स्वतंत्र प्रशस्त जागोजागी थांबे दिलेले आहेत. तिथे ते शनिवार-रविवारी बैठक मारून असतात. जनहिताला मोठी जागा तिथे.

आरोग्य, आहार, विहारांकडे सर्वांचे फार लक्ष आढळले. पर्यावरणाची संस्कृती जपणारा जर्मनी किंवा सर्व तऱ्हेच्या खेळांकडे जीवनावश्यक म्हणून पाहणारा युरोप किंवा सायकल चालवणं, ही बाबच अपरिहार्य मानणारे सारे हे देश किंवा घरांच्या मागेपुढं अनिवार्यपणे शोभिवंत बागबगिचा, सर्वत्र खेळांची साधन ठेवणारे देश किंवा एकंदर वर्तुळाकार घरांची रचना करून मध्यभागी जागजागी अतिविशाल गार्डन उभी करणारे हे देश सुंदर अशा जगण्याच्या पातळीवर किती किती पुढं आहेत.

सायकल आणि कुत्री - सर्वठायी जीवनसाथीदार

अत्यंत उंच, महागड्या गाड्यांचा वापर करणारे हे अवघे युरोपीय नागरिक तेथील लहान सर्व मुलेमुली किंवा ज्येष्ठ नागरिक (काठींच्या आधाराशिवाय असलेले) सर्रास सायकलींचाच वापर करतात. बागेतही सायकली वापरतात. सायकलींसाठी ‘स्वतंत्र प्रकारचे रस्ते’ आणि लोकाना चालावयासही रस्तेही अगदी स्वतंत्र. धक्का, अपघात, टक्कर, धडक हे विचाराल तर त्यांचा टक्का शून्य. वाहतूक पूर्णतः सुरक्षित, सर्वत्र.

कारण येथे शिस्त मोडतच नाही कुणी आणि बेफामपणे म्हणावी अशी गर्दीही मुळीच कुठं दिसत नाही. अगदी ‘शुद्ध बीजापोटी’ म्हणावे त्याप्रमाणे लहानशी सर्वत्र चिमुरडी मुलंही मायबापांसोबत सायकल चालवत घरांबाहेर पडतात. उगी कडेवर घेऊन लेकरांचे उगी फाजील लाड इथे नाहीत. प्रेम आहेच, पण बाळकडू जणू मिळाल्यागत जन्मांपासून व्यायाम, सुदृढता, खेलकूद युरोपच्या रक्तातच जणू जन्मलेली. बलवान असा सुंदर जीवनाचा हा युरोपीयांचा धडा ‘हेल्दी’ म्हणावा असाच.

तसेच घरोघरी छोट्या देहयष्टींची अनेक प्रकारच्या जातींची बारीक, सुंदर, नानारंगी, लांबट देहांची दिसणारी प्रचंड पाळीव कुत्री म्युनिकभर आढळली. त्यांच्या मागेपुढं मालक किंवा मालकीण. त्यांच्या पूर्णतः अगदी आज्ञेत असलेली ही सारी कुत्री. दोरींचा हाती एक्स्टेंशन बॉक्स आणि त्याला जोडूनच वाटा, बागांमधून मस्त फिरणारी कुत्री.

छंदांचा, आवडीचा भाग म्हणूनच पोसलेली. त्यांच्या विष्ठा जमा करावयाला मालकही पिशव्या घेऊन सोबतच. घाणीचा मुद्दा शून्य. म्हणजे आपलं शहर, आपला परिसर हा सर्वांचा, ही जपलेली धारणा किंवा जणू व्रत. त्यामुळं स्वच्छता ही म्हणजे युरोपचा आभाळाएवढा आरसा.

मुळात निसर्गपूजकता नि स्वच्छता दृष्ट लागावी अशीच. प्रदूषणमुक्त आणि व्यायाममुक्त सायकली व सायकलस्वार प्रचंडच. इथल्या माणसांनी सायकलवर केवढी प्रीती करावी? अगदी म्हणजे महागड्या मोटारींमधून बाहेरगावी पडतानाही लोक मोटारींच्या मागं सायकलींच्या स्टँडला सायकली ‘हँग’ करून ते घर-गावं सोडतात, प्रवासी होतात, जिथे जाऊ, थांबू तिथे सायकल वापर हा हमखास ठरलेला. त्यामुळे आरोग्य म्हणाल तर एक नंबर तिकडे बहुतेकाचे.

सर्व जण फिटनेस, त्वचा, सौंदर्याबाबतीत माणसं टकाटक. पानतंबाखू, पानविडा, चहालेले हा विषयच तिकडे नाही. थुंकून रस्ते, भिंती, हॉटेल ‘रंगवणारे’ हे असे दिव्य-लोक-दर्शन आम्हाला युरोपात कुठेही मुळीच दिसले नाही. पेयवाद भरपूर. पण तो शिष्ट-शिस्त-संमत आणि कुठेच पडण्या, लोळण्याएवढा मुळीच नाही.

बिअरसारखा द्रवरूप पदार्थ अन्नासारखा वापरणारा हा तेथील माणूस कुठंच कधी बरळलेला-पडलेला आम्हाला औषधालाही दिसला नाही. आहारांमध्ये सतत एखादे कुठले पेय (शिष्टसंमत) आणि पावांचे, अर्थात ब्रेडचे अगणित आकार-चवींचे पदार्थ रोज त्यांच्या दिमतीला. मांसाहारही अर्थात मुबलक, प्रचंड. विशेषतः घराघरांतून दरवळत बाहेर पडणारा पावाचा सततचा गंध हा भूक आणि सुख चाळवणाराच.

निर्मळ परिसर हे चित्र सगळीकडं. कुठं म्हणून घाण, कचरा आढळतच नाही. भव्यदिव्य मार्ग-वाटा वेढून असणारी उंच उंच झाडी मनातनाला मोहित करून टाकणारी. अवघा युरोप हा असा झाडांनी डवरलेला. गवतांची हिरवीगार कुरणं आपली नजर जेवढी लांब जाईल, तिथवर पसरलेली प्रसन्नच प्रसन्न. फिरावयासाठी असणाऱ्या बागाही अशाच, स्वच्छ, प्रसन्न, आल्हाददायक. खेळांच्या साधनांनी भरून श्रीमंत असलेल्या.

रिकामी रानं-शेतं तुरळक. कुठं कुठं भोपळ्यांचे लावलेले ढीग अनेक स्थळी. कुठं मोहरींची बहरलेली शेतं नजर भरून असलेली तर कुठं सूर्यफुलांची, मक्यांची शेतं. ढवळ्या-काळ्या ठिपक्यांच्या बलदंड गायींचे चरणारे कळप, असेच मेंढ्यांचे कळप, घोड्यांचे कळपही दिसले. पाळीव प्राणिदर्शन असे दिसले जे की त्या अवाढव्य हिरव्या कुरणांवर उमटूनच दिसायचे.

गायींच्या गळ्यात बांधलेल्या मोठमोठ्या घंटांचा आरव त्या अवाढव्य हिरव्यागार अरण्यामध्ये जणू संगीताची एक प्रकारची मस्त धून उमटवत राहतो. बाकी, बकऱ्या किंवा कोंबड्या कुठं म्हणून नजरेला पडल्या नाहीत; पण गुबगुबीत देहांचे काळेशार कावळे मोठ्या प्रमाणात. तसेच झुबकेदार मोठ्या शेपटांच्या करड्या रंगाच्या खारीही. झाडांवर बागेत सरसर धावणाऱ्या सुंदर खारी मन खेचून घेणाऱ्या. निसर्ग सांभाळणारी आम जनता तर आम जनतेला जणू सांभाळणारा निसर्ग.

या युरोपाच्या अमर तत्त्वामध्ये येथील लोकांचे समंजसपण, त्यांची कौशल्ये, त्यांचे अफाट ज्ञान आणि त्यांची एकूण प्रगती सामावलेलीच असली पाहिजे; इतपत आमच्या मनांची खात्री झाली. येथे हवा पूर्णतः शुद्ध, वापरावयाचे-प्यायचे स्वच्छ, उत्तम आणि सर्वत्र एकसारखे मिनरल वॉटर बॉटल तिकडे आहेत. पण त्याचे लाड फार नाहीत. कारण एकंदरच सर्वत्र शुद्धता हीच ओळख असल्यामुळे खाण्यापिण्यात तिथे तशा हेराफेरीला फार जागाच नसावी.

एवढेच कशाला... कदाचित झगडाबघेडा, शिवीगाळ, तारस्वरात बोलणे, हाणामारी ही असेल- नसेल पण ही रूपेही आम्हाला कुठं नजरेस पडली नाही. ‘आपण भले आणि आपले काम भले’ या प्रकारचा हा धागा घेऊन युरोपिअन जनमानस रुजले असावे. हे दीडदोन महिन्यांत आमच्या नीट लक्षातच आले.

इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वोत्तम. ट्राम, रेल व्यवस्था किंवा जोडगाड्या बसेस, टॅक्सी आणि सायकलींसह सर्वांकडे स्वतःची वाहनं खूप; परंतु शिस्तबद्ध, नीट. विद्यार्थिनी, स्त्रिया या सर्वांसाठी पूर्णतः सुरक्षित युरोप. कुठेही धोका, भय, असुरक्षितता नाहीच असे कळले. नागरिक सुरक्षित आणि मोकळा श्वास घेणारे इथले एकूण वातावरण. वाट पाहाणं, केव्हा गाडी येईल? असे हे प्रश्नच नाहीत. कारण वाहतूक व्यवस्थेची मुबलकता तसेच सुरक्षितता, स्वच्छता आणि काळजी घेणं ही जणू सर्वठायी एक प्रकारची युरोपची वचनबद्धताच.

कायदा किंवा नियम पाळणं हे मात्र आपोआपच आलं. यात सूट मुळीच नाही किंवा सुटकाही नाही. चुकीला क्षमा नाहीच मुळी. या भुईवरचा स्वर्ग संबोधावा इतकी सर्वठायी सुंदरता ही युरोप व्यापून आहे. निसर्गाचे मुळातले चांगुलपणच इथल्या लोकांतही उतरलेले जाणवते. तसेच जर्मन या आपल्या मूळ भाषेचा यथार्थ अभिमान असणारी ही माणसं अगदीच त्यांच्या भाषेचा आग्रह धरतील; पण दुःस्वास करत मात्र नाहीत.

आमची देहबोली, रूपरंग पाहून ‘यू आर इंडियन’ म्हणून ही माणसं अभिवादन घेतात. तसेच अभिवादन देतात. मोकळं हसतमुख बोलतील. अडचणीत तुम्हाला मदत करतील. जगाच्या पाठीवरचं हे एक जाणवलेलं अंतर्बाह्य चांगुलपण ध्यानीमनी मुरवत, मनोमन स्वीकारत मायदेशात आम्ही आनंदानं परतलो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT