Rajnikant sakal
सप्तरंग

रजनीकांत नावाचे वादळ

शिवाजी गायकवाड अर्थात रजनीकांत यांनी गेल्या डिसेंबरमध्ये ७३ वा वाढदिवस साजरा केला. आजही ते सुपरहिट चित्रपट देत आलेत.

अवतरण टीम

- गिरीश वानखेडे

शिवाजी गायकवाड अर्थात रजनीकांत यांनी गेल्या डिसेंबरमध्ये ७३ वा वाढदिवस साजरा केला. आजही ते सुपरहिट चित्रपट देत आलेत. एवढी मोठी उंची गाठूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत, हे विशेष. त्यांच्या साधेपणाचे किस्से आणि त्यांच्या अचाट शक्तीवरील विनोद चाहत्यांना अक्षरशः वेड लावतात.

चिरतरुण अभिनेते रजनीकांत यांनी गेल्या डिसेंबरमध्ये आपला ७३ वा वाढदिवस साजरा केला. याच महिन्यात त्यांचा १६८ वा चित्रपट ‘जेलर’ प्रदर्शित झाला. तमिळ चित्रपटसृष्टीतील आजवरचा तो मेगाहिट सिनेमा असल्याची घोषणाही करण्यात आली. ‘जेलर’ने जगभरात ६०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. रजनीकांत हे एक असे कलाकार आहेत ज्यांचे एकाहून अधिक चित्रपट ५०० कोटी क्लबमध्ये समाविष्ट आहेत.

या वयातदेखील रजनीकांत किती कार्यक्षम आणि चपळ आहेत, ही गोष्ट सर्वांनाच अचंबित करणारी आहे. अजूनही ते हिट चित्रपट देतच राहणार, याची खात्री त्यांच्या चाहत्यांनाही आहे. ती सत्यात उतरवत नजीकच्या भविष्यात रजनीकांत यांचे अनेक दर्जेदार चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत.

फेब्रुवारी महिन्याच्या ९ तारखेला रजनीकांत यांचा ‘लाल सलाम’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या या चित्रपटात रजनीकांत आणि सुप्रसिद्ध क्रिकेटपटू कपिलदेव आपल्याला पाहुण्या कलाकाराच्या रूपात भेटायला येणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या हिने केले आहे.

या चित्रपटातून रजनीकांत केवळ पाहुणा कलाकार म्हणून दिसणार असले, तरीही त्यांच्या देश आणि जगभरातील चाहत्यांची संख्या लक्षात घेता तो चांगली कमाई करणार, असे भाकीत केले जात आहे. कोणत्याही चित्रपटात रजनीकांत काही क्षणासाठी जरी दिसणार असले, तरीही तो चित्रपट त्यांचा असतो. मग, ‘लाल सलाम’मध्ये तर ते काही काळासाठी पडद्यावर वावरणार आहेत. म्हणजे मग हाही चित्रपट रजनीकांत यांचाच..!

‘लाल सलाम’नंतर रजनीकांत नायकाच्या भूमिकेत असलेला ‘वेट्टैयन’ हा ॲक्शन ड्रामा चित्रपट जूनच्या सुमारास प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत टी. जे. ज्ञानवेल. ज्ञानवेल यांच्या कामाचा दर्जा आपण समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि सुपरहिट ठरलेल्या ‘जय भीम’ चित्रपटाद्वारे अनुभवला आहे. ‘जय भीम’ने ज्ञानवेल यांना उत्कृष्ट दिग्दर्शकांच्या यादीत स्थान मिळवून दिले आहे.

‘वेट्टैयन’ चित्रपटातील कलाकार मंडळीही सुप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन पाहुण्या कलाकाराच्या रूपात दिसणार आहेत. रजनीकांत यांच्या सोबतीने आपल्याला फहाद फाजिल, राणा दगुबट्टी, मंजू वॉरियर, माधवन, कंगना रानौतही दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती लायका प्रॉडक्शन्सने केली आहे. चित्रपटाला संगीत दिले आहे अनिरुद्ध रविचंद्रन या संगीतकाराने. अनिरुद्धचा रजनीकांत यांच्याबरोबरचा हा चौथा चित्रपट आहे.

हे दोघे यापूर्वी २०१९ मध्ये ‘पेट्टा’, २०२० मध्ये ‘दरबार’ आणि २०२३ मध्ये ‘जेलर’ चित्रपटात एकत्र आले होते. प्रत्येक वेळी अनिरुद्धच्या कामाची प्रशंसा झाली आहे. तर, एकंदरीतच ‘वेट्टैयन’च्या निमित्ताने यशस्वी दिग्दर्शक, यशस्वी संगीतकार, तितकीच यशस्वी निर्माती कंपनी आणि आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणाऱ्या दिग्गज कलाकारांची फळी एकत्र आली आहे. प्रेक्षकही तितक्याच आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

त्यानंतर नोव्हेंबरच्या सुमारास रजनीकांत यांचा १७१ वा चित्रपट ‘थलैवर’ प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन लोकेश कनकराज यांनी केले आहे. चित्रपटाचे संगीतही अनिरुद्ध याचेच आहे. निर्मिती आहे कलानिधी मारन यांची. लोकेश कनकराज यांचा मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला विजय अभिनीत ‘लिओ’ चित्रपट हिट ठरला होता. त्यानेही ६०० कोटींची कमाई केली आहे.

यापूर्वी कमल हासन अभिनित ‘विक्रम’, कार्थीसोबतचा ‘कैथी’ (याचा हिंदी रिमेक - अजय देवगणचा ‘भोला’) आणि विजयचा ‘मास्टर’ हे चित्रपट दिग्दर्शित करून लोकेशने लोकप्रियता मिळवली आहे. लोकेशचा हा सहावा चित्रपट आहे. त्यानंतर रजनीकांत यांचा पुढचा म्हणजेच १७२ वा चित्रपट असेल मारी सेल्वराज यांच्याबरोबर. मारी सेल्वराज हे जातीवादावर संतुलित भाष्य करणाऱ्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत.

मारी सेल्वराज पा रंजीत यांच्या विचारधारेचे पाईक आहेत. सेल्वराज यांच्या मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘मामनन्’ चित्रपटाची रजनीकांत यांनी प्रशंसा करून त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यानंतरच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित मारी सेल्वराज यांनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती.

‘परियेरुम पेरुमल’ हा मारी सेल्वराज दिग्दर्शित आणि पा रंजीत यांची निर्मिती असलेला चित्रपट पाहून धनुषने त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याची परिणती म्हणून ‘कर्णन्’ चित्रपटाची निर्मिती झाली.

नेल्सन दिलीपकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली रजनीकांत यांचा १७३ वा चित्रपट येणार आहे. तमिळ चित्रपट क्षेत्रात दबदबा असलेल्या नेल्सन दिलीपकुमार यांच्या मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’ने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. यापूर्वी त्यांच्या ‘बिस्ट’, ‘डॉक्टर’ आणि ‘कोलामावू कोकिला’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. ‘जेलर’मध्ये सोबत काम करताना या युवा दिग्दर्शकाने रजनीकांत यांचा विश्वास संपादित केला.

त्यामुळेच रजनीकांत यांनी आणखी चित्रपट करण्याची तयारी दाखवली. अशा या नव्या पिढीतील ऊर्जेने भरलेल्या दिग्दर्शकासोबत रजनीकांत करत असलेले चित्रपट खास असणारच, यात तीळमात्र शंका नाही. त्यानंतर रजनीकांत यांचा १७४ वा आगामी चित्रपट कार्तिक सुब्बाराज यांच्या सोबतीने केला जाणार आहे. कार्तिक सुब्बाराज हे तमिळ चित्रपटातील प्रथितयश दिग्दर्शक असून यापूर्वी २०१९ मध्ये त्यांनी रजनीकांत यांच्याबरोबर ‘पेट्टा’ हा सुपरहिट चित्रपट केला होता.

या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन अनिरुद्धनेच केले होते. याच चित्रपटातून नवाजुद्दीन सिद्दिकीने तमिळ चित्रपटात पदार्पण केले होते. कार्तिक सुब्बाराज याने यापूर्वी ‘जिगर थंडा’, ‘इरावती’, ‘पिझ्झा’ (याचे हिंदी, कन्नड, बंगाली रिमेक तयार करण्यात आले आहेत)... तर अशा दिग्दर्शकाबरोबर जर रजनीकांत चित्रपट करत असतील, तर याचा अर्थ असा की त्यांना केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटाचे कथानक लिहिले गेले असणार.

एकुणात येत्या वर्षभरात रजनीकांत तमिळ चित्रपटसृष्टीत कमालीच्या यशस्वी मानल्या जाणाऱ्या दिग्दर्शकांसमवेत अनेक चित्रपट करणार आहेत. त्यांची ही युती प्रेक्षकांसमोर दर्जेदार मनोरंजनाचा नजराणा पेश करेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे. रजनीकांत यांच्या चित्रसृष्टी प्रवासाचे सिंहावलोकन केले, तर त्यांनी आजवर १६८ चित्रपटात काम केले आहे.

त्यात तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि बंगाली भाषेतील चित्रपटांचा समावेश आहे. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ तसेच दादासाहेब फाळके हा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. रजनीकांत यांनी नाना प्रकारच्या भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत. आपल्या कारकीर्दीची सुरुवात त्यांनी खलनायकी भूमिकांनी केली होती.

त्यांचा पहिला सुपरहिट चित्रपट होता ‘बिल्ला’ जो १९८० मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अमिताभ यांच्या ‘डॉन’चा रिमेक होता. रजनीकांत यांनी आजवर अमिताभ बच्चन यांच्या ११ हिंदी चित्रपटांच्या तमिळ रिमेकमध्ये काम केले आहे. १९८३ मध्ये आलेल्या ‘अंधा कानून’ चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपट जगतात प्रवेश केला, तोदेखील अमिताभ यांच्या सोबतीने..

त्यानंतर आलेल्या गिरफ्तार, हम, चालबाज, फुल बने अंगारे, जॉन-जॉनी-जनार्दन या हिंदी चित्रपटांतून त्यांनी संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. अमिताभ यांच्या अमर-अकबर-ॲन्थनी, मजबूर, दिवार, त्रिशूल, लावारिस या चित्रपटांचे रजनीकांत यांनी केलेले तमिळ रिमेक चांगले चालले होते. कदाचित याच कारणाने रजनीकांत अमिताभ यांना आपले आदर्श मानतात.

शिवाजी गायकवाड म्हणजेच रजनीकांत यांचा जन्म बेंगळुरू शहरात मराठी पोलिस हवालदार पित्याच्या कुटुंबात १९५० मध्ये झाला. त्यांचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील मावडी कडेपठारचे रहिवासी होते. भावंडांमध्ये शेंडेफळ असलेल्या शिवाजी यांना लहानपणीच मातृवियोगाचे दु:ख झेलावे लागले. रजनीकांत यांनी आपले शालेय शिक्षण कन्नड माध्यमातून पूर्ण केले. शालेय जीवनातच त्यांनी शाळेत होणाऱ्या नाटुकल्यांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या होत्या.

मोठेपणी त्यांनी भाकरीचा चंद्र शोधताना विविध प्रकारची कामे केली. बेंगळूर शहराच्या परिवहन मंडळात त्यांनी बस कंडक्टरचे कामही केले. याच दरम्यान त्यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊन अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. याच काळात त्यांच्या कलागुणांना हेरून प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक के. बालचंद्र यांनी पहिला चित्रपट दिला. त्यांनीच शिवाजी गायकवाड यांचे ‘रजनीकांत’ असे नामकरण केले. पहिल्याच चित्रपटात त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत समीक्षकांची प्रशंसा मिळवली होती.

‘बिल्ला’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर रजनीकांत यांनी मागे वळून पाहिले नाही. १९९१ मध्ये थलपती, १९९१ मध्ये मुथ्थू, १९९५ मध्ये बादशहा इत्यादी चित्रपटांनी त्यांना यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. रजनीकांत यांनी मधली काही वर्षे चित्रपटातून संन्यासदेखील घेतला होता. अनेक प्रयोगात्मक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.

आपल्या कारकीर्दीत त्यांनी अमिताभ बच्चन, कमल हासन, मामुटी, मोहन बाबू, आमिर खान अशा दिग्गजांबरोबर काम केले आहे. पण, कारकिर्दीची एवढी मोठी उंची गाठूनही या सच्च्या कलाकाराचे पाय जमिनीवर आहेत. त्यांच्या साधेपणाचे किस्से आणि त्यांच्या अचाट शक्तीवरील विनोद प्रसिद्ध आहेत. ‘काला’ या चित्रपटात ते आंबेडकरी चळवळीच्या नेत्याच्या रूपात आपल्याला दिसले.

‘कबाली’ आणि ‘काला’ चित्रपटांत त्यांनी दलित भूमिका निभावली होती. आता परत एकदा ते जर ज्ञानवेल, मारी सेल्वराज यांच्यासोबत चित्रपट करणार असतील, तर त्यातून त्यांचा जातीभेदाच्या प्रश्नाला प्राधान्य देण्याकडे कल दिसून येतो. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी प्रसंगी राजनैतिक बाजू मांडणारी विधाने करण्याची हिंमत या बादशहाने दाखवून दिली आहे.

(लेखक प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: पुण्यात भयंकर प्रकार, भरदिवसा बंदूक नाचवत तरुणांचा राडा; पाहा व्हिडिओ

Cash Seized: निवडणुकीच्या धामधुमीत पावणेदोन कोटींवर मुद्देमाल जप्त; 80 लाखांचे अमली पदार्थ तर 27 लाखांच्या दारूचा समावेश

IND vs NZ: जसप्रीत बुमराहला मुंबई कसोटीतून का बाहेर केलं? BCCI ने सांगितलं खरं कारण

तब्बल ५ वर्षांनी स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका घेणार निरोप; अभिनेत्यानेच पोस्ट करत सांगितलं, म्हणाला- आता लवकरच...

Vidhansabha Nivadnuk 2024: काका-पुतणे झाले, आता महाराष्ट्र पाहणार मामा-भाच्याची लढत; कुठे रंगणार सामना? कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT