rishabh pant sakal
सप्तरंग

Rishabh Pant : पंतला स्वातंत्र्य द्या! तंत्र, सावधपणाच्या पिंजऱ्यात अडकवू नका

भारतीय संघानं एक उत्कृष्ट शतक बर्मिंगहॅम कसोटीत वांझोटं ठरवलं. त्या शतकाला विजयाचं एक गुटगुटीत बाळ व्हावं ही अपेक्षा होती.

द्वारकानाथ संझगिरी

भारतीय संघानं एक उत्कृष्ट शतक बर्मिंगहॅम कसोटीत वांझोटं ठरवलं. त्या शतकाला विजयाचं एक गुटगुटीत बाळ व्हावं ही अपेक्षा होती. मी रिषभ पंतच्या शतकाबद्दल बोलतो आहे. तो अफलातून खेळला. या खेळीआधी तो त्याचं नेतृत्व, काही खराब फटके ह्या निमित्तानं टीकेचे घाव सहन करत होता. ह्या शतकानं त्याचे काही घाव भरले असतील. पण शतकाला यशाचं कोंदण मिळालं तर ते झळाळून उठतं, ते कोंदण बेरस्टो आणि जो रुटने पळवलं.

पण, एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की, ज्या फूटपट्टीने आपण इतर फलंदाज जोखतो, ती फूटपट्टी पंतला लावायची नाही. त्याला तंत्र, सावधपणा, वगैरेंच्या पिंजऱ्यात अडकवून ठेवणं चुकीचं आहे, तो त्याचा खेळ नाही, ते त्याचं टेंपरामेंट नाही. जी सेहवागकडे पहायची आपली दृष्टी होती, त्याचदृष्टीनंच पंतकडे पहायला हवं. सेहवागनं जोखीम घेऊन आपल्याला कसोटीत ५० च्या आसपास सरासरीने धावा दिल्या. कदाचित पुढे पंतसुद्धा देईल. पण, सेहवागला आपण सरासरीच्या हिशेबात कधी मोजलं नाही, त्याने आक्रमकपणे खेळून जिंकायच्या संधी किती आणल्या याचा हिशेब मांडला. पंतच्या बाबतीतही तोच मांडायला हवा. पंत अजून सेहवागपर्यंत पोहचला नाही; पण त्याच रुळावर आहे. स्टेशन यायचं आहे.

त्याची बर्मिंगहॅम कसोटीतली खेळी पहा - ५ बाद ९८ वर तो आणि जडेजा एकत्र आले. चेंडू स्विंग होत होता. अँडरसन स्विंगचं जाळं विणत होता. आकाशात ढग होते. खेळपट्टी त्याक्षणी गोलंदाजीला अनुकूल होती. त्याने आक्रमणाचा मार्ग स्वीकारला; पण तो स्वीकारताना त्यानं प्रगल्भता दाखवली. फटके मारणं, त्यानं ठरवून टाकलं होतं; पण त्यासाठी चेंडूची निवड तो योग्य करत होता. तो चेंडू ओळखत होता, गोलंदाज नाही. म्हणून तो अँडरसनला पुढे सरसावत ठोकू शकला. या वेगवान गोलंदाजांवर केलेल्या आक्रमक हल्ल्यामुळं स्टोक्सला डावखुरा फिरकी टाकणारा लीच आणावा लागला आणि पंत समोर लीच म्हणजे कोल्हापूरकरांसमोर पांढरा रस्सा. बघता बघता त्याने खेळाची सूत्रं आपल्याकडे घेतली. कर्णधार स्टोक्स म्हणतो, ‘‘तो आमच्याविरुद्ध ही खेळी खेळला; पण तरीही आम्ही त्या खेळीचा आनंद लुटला. इतकी ती चांगली होती.’’

पूर्वी भारतीय क्रिकेटला अशी सवय नव्हती. मला अशा प्रतिहल्ला केलेल्या फार कमी खेळी आठवतात. चटकन आठवणाऱ्या दोन म्हणजे पतौडी यानं १९६८ मध्ये मेलबोर्न येथे ५ बाद २५ वरून ठोकलेल्या ७५ धावा. मग दुसऱ्या डावात ८५. सर डॉन ब्रॅडमन गहिवरले होते. आणि ती विश्वनाथ यांची वेस्ट इंडीजविरुद्ध ९७ ची खेळी. समोर आग आणि बरोबर फक्त चंद्रशेखर. त्या वेळी डीप पॉइंट क्वचित ठेवत, क्लाइव्ह लॉईडने विश्वनाथ खेळताना रॉबर्ट्ससाठी डीप पॉइंट ठेवला होता. विश्वनाथला ठोकलेला तो कुर्निसात होता.

पुढे वन-डेनंतर काळ बदलला. कधी कपिल, कधी अझर, मग सचिनने अशा अनेक खेळी केल्या. फॉलो ऑन दिल्यावरही प्रतिहल्ला करून जिंकता येतं हे लक्ष्मण यानं दाखवलं. मग सेहवाग आला आणि मग त्याने सचिन हे आक्रमकतेचं शिखर नाही, ती अजून उंचावता येते हे दाखवलं. टी-२० आल्यानंतर त्याचा परिणाम भारतीय फलंदाजीवर दिसला आणि पंत हे त्याचं अपत्य आहे.

सूर्यकुमार, संजू सॅमसन टी-२० तून बाहेर नाही आले; पण पंतनं कसोटी फॉरमॅट आत्मसात केला आणि ऑस्ट्रेलियात मालिका जिंकून दिली आणि मग काही कसोटी. काही वेळा जोखीम घेण्याच्या त्याच्या वृत्तीनं तो बाद होताना पाहताना आपली तळपायाची आग मस्तकात जाणार. काय फटका खेळला, म्हणून आपण चरफडणार. पण त्यातून तो शिकत जाईल.

२००४ च्या सुमारास सचिनच्या फलंदाजीतील आक्रमकता थोडी कमी झाली होती. त्या वेळी वासू परांजपे मला म्हणाला होता, ‘‘अरे सचिनला माझा निरोप दे. पेशन्स, खेळपट्टीवर नांगर टाक वगैरे गोष्टी ज्यांच्याकडे फटके नसतात त्यांच्यासाठी असतात, ज्यांच्याकडे फटके असतात त्यांनी फटके खेळायचे असतात.’’ सचिनला मी सांगितल्यावर तो जोरात हसला होता.

पंतसाठी हाच सल्ला आहे. फक्त फटक्यासाठी चेंडूची निवड जास्त चांगली होत गेली पाहिजे आणि थोडं नशीब हवं. क्रिकेट आता बदलत जातं आहे. फलंदाजीला सुनील गावस्कर किंवा राहुल द्रविडसारख्या फलंदाजीची गरज उरली नाही का? नाही असं नाही. गरज आहे, पण संघात एखादा, फार तर दोन. जेव्हा वातावरण, खेळपट्टी कडवी परीक्षा पहील, तेव्हा तशीच फलंदाजी हवी. आता तशा खेळपट्ट्या जगभर फार कमी झाल्या आहेत. सचिनसारखा किंवा आजचा विचार करायचा तर जो रुटसारखा खेळाडू दोन्ही प्रकारची फलंदाजी करू शकतो; पण टी-२० मुळे कसोटीतही बचावात्मक फलंदाजी मागे पडत चालली. कसोटी फलंदाज आता पूर्वीपेक्षा जास्त वेगवान स्ट्राइक रेटने खेळतात. बेरस्टोच्या या मोसमातल्या खेळी पहा, १३६ धावा ९२ चेंडूंत, १६२ धावा १५७ चेंडूंत, ७१ धावा ४४ चेंडूंत.

पूर्वी वन-डेत हा strike रेट ललामभूत ठरला असता. आपल्या विरुद्ध संघाचा कोसळता डाव वाचवताना त्याने १०६ धावा १४० चेंडूंत काढल्या. आज त्याने ‘मंदगतीने’ फलंदाजी केली असं वाटतं. पूर्वी हीसुद्धा झंझावाती वाटली असती. आता टी-२०चे फटकेसुद्धा कसोटीत मारले जातात. क्लासिकल फलंदाजी करणाऱ्या जो रुटने ते मारले. मग तो रॅम्प शॉट असो किंवा रिव्हर्स स्वीप. तो मारतो, क्लासिकल असून मारतो, तर पंत मारणारच. तो तर त्याच पाळण्यात वाढलाय. मुळात फटका हा फटका असतो. फक्त टी-२० मुळे प्रत्येक चेंडूचा सदुपयोग हवा म्हणून ते शोधले गेले आणि जोखीम घेऊन खेळले जातात.

पूर्वी ३०० च्या वर धावा काही या बचावात्मक फलंदाजी करताना झाल्या आहेत. यापुढे त्या तशा होणार नाहीत. ब्रॅडमन, सोवर्स, लारा, सेहवाग यांनी त्या आक्रमणातून उभ्या केल्या आहेत. लाराचा ४०० चा विक्रम मोडला जाणं कठीण आहे, पण तो मोडला गेला तर असाच पंतवृत्तीचा फलंदाज तो मोडणार. एका कार्यक्रमात मी एकदा सेहवागला विचारलं होतं, ‘‘लाराचा विक्रम कधी मोडतोस?’’ तो म्हणाला, ‘‘सचिनला सांगा. मी जास्तीत जास्त दीड दिवस फलंदाजी करू शकतो. ४०० ओलांडायला २ दिवस हवेत.’’

अगदी खरं. पूर्वी दिवसअखेर शतक होऊन १२५ धावा झाल्या की खूप मोठं वाटायचं. आता फलंदाज लवकर फलंदाजीला आला आणि शेवटपर्यंत राहिला तर पावणेदोनशे सहज होतात. आता लाराचा विक्रम मोडायची ताकत, पंतसारख्या फलंदाजाच्या वृत्तीने खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये आहे. म्हणून ती वृत्ती जोपासली पाहिजे.

स्टोक्स म्हणतो, ‘‘अशा खेळीमुळे कसोटी क्रिकेटमधली नकारात्मकता कमी होईल. कसोटीला अशा प्रकारच्या फलंदाजांची गरज आहे.’’ असो, बेरस्टो, रुटची आक्रमकता आणि बुमराचे अपरिपक्व डावपेच, यामुळे सामन्याच्या आव्हानात्मक काळातील एक बाजीप्रभू देशपांडे थाटाची खेळी विजयाला मुकली. प्रत्येक बाजीप्रभूच्या नशिबी, महाराज गडावर पोहचल्याच्या तोफा नसतात.

(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार असून, त्यांची क्रीडा विषयावरची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.) dsanzgiri@hotmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT