India sakal
सप्तरंग

सवलतींपेक्षा सुयोग्य वातावरण हवं

गुरुपौर्णिमा नुकतीच झाली. गुरुंचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांना आदरपूर्वक प्रणाम करायचा हा दिवस. आपण वाचतो, ऐकतो, विचार करतो. त्यातील काही आचरणात आणायचा प्रयत्न करतो.

प्रताप पवार

गुरुपौर्णिमा नुकतीच झाली. गुरुंचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांना आदरपूर्वक प्रणाम करायचा हा दिवस. आपण वाचतो, ऐकतो, विचार करतो. त्यातील काही आचरणात आणायचा प्रयत्न करतो. ही सुरुवात आपल्या जन्मापासून होते. आई- वडिलांबरोबर आपल्यातील मानवी जडणघडणेला सुरुवात होते. ती नंतर गुरु, अनेक पुस्तके, व्यक्ती, माध्यमं यातून आपलं शिक्षण आपल्या अखेरपर्यंत सुरूच असतं.

सध्या मला जो शिकण्याचा आनंद मिळतो ते माझे सर्व कुटुंबीय, अगदी नातवंडं यांच्याकडूनसुद्धा! प्रवास, मित्र, विविध व्यक्ती यासुद्धा यात येतातच. नुकताच परदेशातून परत आलो. तिथंही अनेक विचारवंत लोक भेटतात. तिथले घडणारे बदल दिसतात. माझं विचारमंथन सुरू होतं. आपल्या देशाची तुलना ही अविभाज्य भाग असते.

गप्पा मारताना इंग्लंडमधील काही गोष्टी समजल्या. थोडेफार माहिती होतं, परंतु सर्व वरवरचं. तेथील प्रधानमंत्र्यांचं घर हे गेली २५०-३०० वर्षे एका इमारतीमधील चार बेडरूम्स असलेली एक सदनिका आहे. संपूर्ण इमारत नाही. तिथं कोणताही नोकर नसतो. पंतप्रधानांनी आपली सोय स्वखर्चानं करायची असते. त्यांच्या घरातील कोणालाही सरकारी गाडी, नोकर किंवा संरक्षणासाठी माणूस नसतो.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान सरकारी गाडीनं प्रथेप्रमाणं राजवाड्यात गेले. आपल्या राजीनाम्याचं पत्र दिलं. जाताना ते स्वतःच्या गाडीने गेले. घरापर्यंत पोचवायला सुद्धा सरकारी गाडी मिळाली नाही. सध्या झालेले पंतप्रधान आपल्या गाडीनं आले. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावरच सरकारी गाडीनं सरकारी निवासस्थानामध्ये राहायला गेले.

त्यांनी निर्माण केलेली लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारली. आपल्याकडं मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान यांचा ताफा, त्यांची सुरक्षा व्यवस्था ही पूर्वीच्या महाराजांपेक्षा दहा किंवा १०० पटीनं अधिक असेल. अर्थात हे जनतेच्या पैशावर. आपली नोकरशाही आहे. तिला नोकरीची शंभर टक्के शाश्वती. निवृत्त झाल्यावर मरेपर्यंत निवृत्तिवेतन. तरीही कामचुकारपणा आहेच. ९० टक्के लोक अधिकाराचा वापर करताना कामासाठी पैसे घेणारे आहेत. वेळेवर काम करीत नाही. वगैरे. परंतु हे इंग्लंडमध्ये अजिबात नाही. मग हा बदल का?

असं सांगण्यात आलं, की १८८० पासून ब्रिटिश अधिकाऱ्यांना भारतात पाठविण्याच्या वेळी दोन महत्त्वाच्या सूचना केलेल्या असत. एक म्हणजे भारतीय लोकांमध्ये कायम मतभेद होत राहतील याची काळजी घ्यायची. त्यासाठी अनेक धर्म, भाषा, जाती मदत करतील.

दुसरं म्हणजे भारतीय लोकांची आर्थिक, वैज्ञानिक, औद्योगिक प्रगती होणार नाही यासाठी सजग राहायचं. कोणत्याही प्रकल्पासाठी शेकडो कायदे, प्रश्न उभे करायचे. नवीन नवीन कर आकारणी करून जनतेचा पैसा सरकारकडं आला पाहिजे. आता आपल्याकडं ‘जीएसटी’च्या नावाखाली महिन्याला दोन लाख कोटी रुपये जमा होतातच ना, तसं.

आपल्याकडं या पैशाचा उपयोग रेवड्या वाटण्यात, ८० कोटी लोकांना फुकटात धान्य देण्यात, बहिणीसाठी सुमारे ५० हजार कोटी, तर भावांसाठी कदाचित एक लाख कोटी खर्च करण्यात धन्यता वाटते. एक वस्तुनिष्ठ उदाहरण सांगतो, जे मी स्वतः अनुभवलेलं आहे. संरक्षण खात्यात आपण एखादं उत्पादन घेऊन गेल्यास ते स्वीकारलं जात नाही.

कारण नियम, कायदा असा केलेला आहे, की तुमच्या व्यवसायाला या क्षेत्रातील निदान २० वर्षांचा अनुभव हवा. भांडवल एक हजार कोटी रुपयांच्या वर हवं. या कायद्यात ९९ टक्के भारतीय कंपन्या बसत नाही. मग आयात हाच पर्याय राहतो ना ? सर्व काही नियमांवर बोट ठेवून... जे या बाबू लोकांनीच केलं आहे.

चीन सर्व वैज्ञानिक क्षेत्रात अमेरिका-युरोपच्याही पुढं प्रगत झाला आहे. जगातील या सर्व देशांना त्याची काळजी वाटते. याच चिनी लोकांना ब्रिटिशांनी अफूचं व्यसन लावलं व संपूर्ण देश कित्येक दशकं अफूच्या अधीन झालेला होता. चीनची प्रगती होऊ नये म्हणूनच ब्रिटिशांनी तसं केलं. त्याबरोबर प्रचंड पैसाही कमावला.

आपल्याबाबत ब्रिटिशांनी आणखी एक काळजी घेतली. सरकारी नोकरांना भरपूर सवलती, अधिकार, निवृत्तिवेतन वगैरे गोष्टी देऊन त्याची सर्व निष्ठा आपल्याकडं वळवली. तीच गोष्ट संरक्षण दलामध्ये केली. यापुढं भारतीय सैन्य, इंग्रजांकरता मरायला तयार होतंं. प्रसंग आला तर भारतीयांनाच मारायला तयार होते. याला अपवाद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्यासाठी लोक जाणीवपूर्वक बलिदान करायला तयार असत.

१८१८ मध्ये आपलेच बांधव असलेल्या सैनिकांकरवी मराठी सत्तेचा पाडाव केला. सेनापती बापू गोखलेंना मारण्यात त्यावेळच्या भारतीय सैन्यानं धन्यता मानली. भारतीय पोलिसांनी स्वातंत्र्यसैनिकांना छळलं तर जालियनवाला बागेत जनरल डायर हवं ते करू शकला. परदेशी सत्ताधाऱ्यांना अगदी अल्लाउद्दीन खिलजी, बाबर ते इंग्रज यांना या देशावर आपल्याच लोकांच्या साहाय्यानं एक हजार वर्षे राज्य करता आलं.

मोगल आणि इंग्रज यांच्यातला फरक असा, की मोगल इथंच स्थायिक झाले तर इंग्रजांनी पूर्ण लूट करून भारताला जगातील पहिल्या क्रमांकाचा दरिद्री देश बनवलं. यातून गेली एक हजार वर्षे एक मानसिकता निर्माण झाली. ती म्हणजे हे सरकारी आहे; माझं नाही. मग कोणी रेल्वे, सार्वजनिक बस पेटवल्यानं माझं काय नुकसान होणार आहे. वाहतुकीचे नियम असोत वा कोणताही सरकारी प्रकल्प असो.

समाज त्याकडं तिऱ्हाईत म्हणूनच बघतो. वाहतुकीचे नियम सरकारी आहेत, मग ते मी पाळणार नाही. घरातील कचरा रस्त्यावर फेकेन. ते नगरपालिका किंवा महानगरपालिका उचलेल अथवा उचलणार नाही. माझं घर स्वच्छ आहे ना मग बाकीचं काम सरकारचं आहे. त्याच्याशी माझं काही कर्तव्य नाही, संबंध नाही.

वरील सर्व विवेचन हे अनेकांच्या चर्चेतून, वाचनातून, प्रत्यक्ष अनुभवातून लेखनात उतरलं आहे. यातील मताशी सहमत व्हाल अशी अपेक्षा नाही. परंतु जेव्हा दुबई, सिंगापूरसारख्या ठिकाणी मी जातो, तेव्हा लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती असेल, तर वाळवंटाचं नंदनवन कसं घडतं, याचं प्रत्यक्ष स्वरूप पाहायला मिळतं. ज्या ज्या देशांची उत्तम प्रगती झालेली दिसते. तिथं देशहिताच्याच निर्णयांबद्दल सत्तेवरील आणि विरोधी पक्षांमध्ये वाद नसतो. आपल्याकडं सर्वोच्च नेतेच विरोधकांच्या द्वेषानं बरबटलेले दिसतात. अगदी वैयक्तिक पातळीवर. मग एकत्र निर्णय कसे होणार?

चीन एवढी जबरदस्त मुसंडी मारतो हे दिसत असूनही आपले राज्यकर्ते मतांच्या प्रलोभनाला बळी पडलेले दिसतात. संशोधन, उत्तम शिक्षणावर उद्योग क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करायला पैसे कोठून उपलब्ध होणार? हे समजा केलं तर मतं थोडीच मिळणार आहेत. मग धार्मिक भावना, फुकटच्या सवलती यांचा मारा करा. निवडून यायला ते उपयुक्त ठरतं. तुलना करायचीच असेल तर चीन, इस्राईल, सिंगापूर कशाला हवेत, शेजारी पाकिस्तान आहेच ना!

आपली प्रगती जरूर होत आहे. परंतु चीनसारखा जबरदस्त शत्रू आपल्या सीमेवर आहे. त्याला तुल्यबळ प्रगतीनं तोंड देण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. यामुळं वरील विचार हे काळजीपोटी येत राहतात. नुकतंच ‘पुण्यभूषण पुरस्कार’ वितरण समारंभात विजय भटकरांनी परम संगणक निर्माण करून अमेरिकेला शह दिल्याचं सांगितलं.

अशी क्षमता असलेले शेकडो भटकर, माशेलकर, नारायण मूर्ती आपल्या देशात निर्माण होऊ शकतात. त्यासाठी सुयोग्य वातावरण हवं. माझ्यासारखे लोक विचार करतात, की जे आपल्या हातात नाही त्याबद्दल काळजी करण्यापेक्षा आपण काय योगदान देऊ शकतो तिथंं सर्व ताकद लावू या. ते करण्यात खूप समाधान आहे. समाज घडवू या, सरकार बरोबर राहून अथवा सरकारशिवाय आपला खारीचा वाटा हा निश्चित महत्त्वाचा आहे. पटतंय का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT