ganjgolai latur sakal
सप्तरंग

शंभरीपलीकडची ‘गंजगोलाई’

प्रत्येक शहरात अशी एखादी वास्तू असते, की ती त्या शहराची ओळख करून देते, इतिहासाची साक्षीदारही ठरते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून लातूर ही राज्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ राहिली.

हरी तुगावकर

प्रत्येक शहरात अशी एखादी वास्तू असते, की ती त्या शहराची ओळख करून देते, इतिहासाची साक्षीदारही ठरते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून लातूर ही राज्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ राहिली.

प्रत्येक शहरात अशी एखादी वास्तू असते, की ती त्या शहराची ओळख करून देते, इतिहासाची साक्षीदारही ठरते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून लातूर ही राज्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ राहिली. निजामाच्या राजवटीखाली असलेल्या लातूरमध्ये शंभर वर्षांपूर्वी गंजगोलाईची निर्मिती झाली. केवळ एक वेस आणि मनोरा (टॉवर) असलेल्या गंजगोलाईचं स्वरूप आज भव्यदिव्य झालं आहे. त्यावेळेपासून आजही गंजगोलाईच्या परिसरातल्या १६ रस्त्यांवर वेगवेगळ्या बाजारपेठा उभ्या आहेत. लातूरच्या गेल्या शंभर वर्षांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक विकासाची गंजगोलाई साक्षीदार आहे. इतकंच नव्हे, तर लातूरच्या सामाजिक सलोख्याचं प्रतीक म्हणूनही गंजगोलाई उभी आहे.

मराठवाडा, त्यात लातूर हे निजाम राजवटीतील शहर; पण स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठी बाजारपेठ म्हणूनही शहराची ओळख. येथील सूतगिरणी, डालडा फॅक्टरी एकेकाळी नावाजलेली होती. येथील माल बाहेर नेता यावा म्हणून इंग्रजांनी लातूर ते मिरज अशी नॅरोगेज रेल्वे शंभर वर्षांपूर्वी सुरू केली होती. शेतमालाची बाजारपेठही मोठी होती. देशभरात हा माल जात होता. इतकं महत्त्व इथल्या बाजारपेठेला होतं. आजही तेच महत्त्व येथील व्यापाऱ्यांनी कायम ठेवलं आहे. आजही येथील शेतमाल देशाच्या विविध भागांत जात आहे.

‘गंज’ हा उर्दू शब्द असून, त्याचा अर्थ बाजारपेठ असा आहे. ‘गोलाई’ म्हणजे गोलाकार. गंजगोलाई म्हणजे गोल आकाराची बाजारपेठ. हैदराबादच्या निजाम राजवटीतील गुलबर्गाचे तत्कालीन सुभेदार राजा इंद्रकर्ण बहादूर यांच्या हस्ते १९१७ मध्ये या गंजगोलाईची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. पुढे १९४६ मध्ये नगररचनाकार फायायुजुद्दिन यांनी गंजगोलाई या ऐतिहासिक स्थळाचा सुनियोजित आराखडा तयार केला. हा आराखडा तयार करण्यासाठी देश-विदेशांतील बाजारपेठांचाही त्यांनी विचार केला, त्यानंतर याची उभारणी केली. गंजगोलाईला १६ रस्ते येऊन मिळतात. प्रत्येक रस्त्यावर वेगळी बाजारपेठ, अशी ही गंजगोलाईची अप्रतिम रचना वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.

आजही सराफगल्ली, लोखंडगल्ली, कापडगल्ली, भुसारगल्ली, भांडेगल्ली, भंगारगल्ली, अडत लाइन अशा प्रत्येक रस्त्यावर एक बाजारपेठ अस्तित्वात आहे. जन्मलेल्या बाळाला लागणाऱ्या साहित्यापासून ते अंत्यविधीला लागणाऱ्या साहित्यापर्यंत सर्वच वस्तू या ठिकाणी मिळतात. देशात अशी बाजारपेठेची रचना कुठेच पाहायला मिळत नाही. सध्या मॉल संस्कृती तयार होत आहे; पण गंजगोलाई हा एक मोठा मॉलच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरत नाही, हे या गंजगोलाईचं वैशिष्ट्य आहे. देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळालं; पण लातूर मात्र निजाम राजवटीत असल्याने इथं लढाई सुरूच होती. स्वातंत्र्यचळवळीचं एक प्रमुख केंद्र लातूर बनलं होतं. अनेक स्वातंत्र्यसैनिक भूमिगत होऊन विरोध करीत असत. निजामाने या गंजगोलाईची निर्मिती करीत आतमध्ये एक मनोरा (टॉवर) उभारला होता, तर पूर्वेस एक वेस तयार केली होती. गंजगोलाई उभारल्याने येथील व्यापाऱ्यांची सोय केली गेली; पण शहरावर टेहळणी करून नजर ठेवण्यासाठी या मनोऱ्याचा निजाम वापर करीत असे. दररोज या मनोऱ्यावर उभारून निजामाचे पोलिस टेहळणी करीत. निजामाची मोठी दहशत असल्याने मनोऱ्याकडे कोणी जात नसे.

१९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला म्हणून जल्लोष सुरू झाला. त्या वेळी येथील स्वातंत्र्यसैनिकांनी अत्यंत धाडसाने, निजाम पोलिसांचा कडक पहारा असताना, त्यांना चकमा देऊन गंजगोलाईतील मनोऱ्यावर निजामशाहीचा फडकणारा ध्वज उतरवून तिरंगा चढवला. या इतिहासाची साक्षीदारही गंजगोलाई आहे. २०१७ मध्ये गंजगोलाई शंभर वर्षांची झाली. शंभर वर्षं येथील सामाजिक, आर्थिक, राजकीय इतिहासाचीही ती साक्षीदार आहे.

स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनंतर गंजगोलाईतील मनोरा ढासळत गेला. या मनोऱ्याच्या पायथ्याला जगंदबादेवीची स्थापना करण्यात आली, लहान मंदिरही उभारलं गेलं. या ठिकाणी १९६७ पासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली. त्या वेळी माणिकराव सोनवणे, बाबूअप्पा पारशेट्टी, काशिनाथअप्पा पंचाक्षरी, भुजंगप्पा महाजन, शिवाप्पा अंकलकोटे आदी धुरिणांनी याकरिता पुढाकार घेतला. लोकसहभागातून मंदिराची उभारणी केली. जगदंबामातेची उत्सवमूर्तीही बसवण्यात आली. ऐंशी-नव्वदच्या दशकात गंजगोलाईची भव्य इमारत तयार झाली. नगरपालिकेने व्यापारी संकुलही उभारलं. बाजारपेठेसोबतच या जगदंबामातेच्या दर्शनासाठी हिंदू बांधवांसोबतच मुस्लिम बांधवही येतात. गंजगोलाईत व्यवसाय करणाऱ्या मुस्लिम बांधवांची संख्याही लक्षणीय आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणूनही गंजगोलाई आज उभी आहे. बाहेरून येणारा प्रत्येक जण गंजगोलाईला अवश्य भेट देतो.

गंजगोलाईतील जगंदबा नवरात्र महोत्सव समितीने आपलं वेगळेपण जपलं आहे. आजही समितीचे अध्यक्ष शिवशरणप्पा बिडवे व सचिव बसवंतप्पा बरडे यांनी ते पुढे कायम ठेवलं आहे. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने शास्त्रीय संगीताचा वारसा जपणारी ही गंजगोलाई आहे. आतापर्यंत पं. वसंतराव देशपांडे, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. श्रीधर फडके, कुमार गंधर्व, पं. अजित कडकडे, श्रीकांत देशपांडे, राहुल देशपांडे, प्रभाकर कारेकर अशा अनेक मान्यवरांनी हजेरी लावत लातूरच्या रसिकांना शास्त्रीय संगीताचा आस्वाद दिला आहे. शास्त्रीय संगीताचा वारसा जपणारी गंजगोलाई म्हणूनही तिची ओळख राहिली आहे.

गंजगोलाई ही केवळ बाजारपेठ राहिली नाही. ती जशी इतिहासाची साक्षीदार बनली, तशी सांस्कृतिक केंद्रही बनली. इतकंच नव्हे, तर स्वातंत्र्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीची साक्षीदारही गंजगोलाई आहे. येथील राजकीय नेते प्रत्येक निवडणुकीत गंजगोलाईतील जगदंबामातेचं दर्शन घेऊनच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जातात. येथूनच मिरवणुका काढल्या जातात. आजही ही परंपरा कायम आहे. निवडणूक रंगात आल्यानंतर सत्ताधारी असो, अथवा विरोधी पक्ष असो, त्यांच्या नेत्यांच्या सभा गंजगोलाईत झाल्याशिवाय निवडणूक संपतच नाही. देश तसंच राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा आवर्जून गंजगोलाईत घेतल्या जातात. गंजगोलाईत सभांना होणारी गर्दी कोणाचं पारडं जड आहे हे सांगून जाते, इतकं महत्त्व गंजगोलाईतील सभांना राजकीय नेते देत आले आहेत. या राजकीय सभांचीदेखील गंजगोलाई साक्षीदार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT