hasya samrat marathi tv serial stand up comedy entertainment Sakal
सप्तरंग

हसताय ना, हसलंच पाहिजे!

आपल्यावर संस्कार होतो ‘स्वच्छ दात म्हणजे पांढरे दात’... मग ज्या लहान मुला-मुलींचे दात पिवळे असतात त्यांना सगळे कॉर्नर करू लागतात आणि मग ते हळूहळू चारचौघांत हसेनासे होतात.

अवतरण टीम

- विशाखा विश्वनाथ

जसं लहान मूल निरागस आणि निष्पापच असतं अगदी तसंच आपल्या ओठांवर आलेलं हसू देखणंचं असतं. दातांचा रंग, त्यांची ठेवण आणि त्यातल्या फटीमुळे ते हरवून बसायचं नसतं. कारण आपलं लाखमोलाचं हसू स्वतःसाठीच असतं.

मला आठवतं, मी लहान असताना ‘हास्यसम्राट’ नावाचा टीव्ही शो जोरदार चालायचा. ‘स्टॅण्डअप कॉमेडी’ नाव जेव्हा प्रचलित नव्हतं तेव्हाची गोष्ट आहे ही. मनोरंजनासाठी म्हणून ऐकवले जाणारे मजेदार किस्से आणि गमतीतून कुठलाही पेहराव न करता, अंगविक्षेप न करता फक्त आवाजाच्या चढ-उतारातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची कला त्यात सहभागी झालेल्या कलाकारांना चांगलीच अवगत होती.

अशाच कुठल्या तरी एका रिअॅलिटी शोमध्ये तर चक्क खी-खी, खो-खो, ही-ही, हा-हा, खसखस इत्यादी हसण्याच्या आवाजाशी साधर्म्य साधणाऱ्या शब्दांचा उपयोग गुणांकन देण्यासाठी व्हायचा.

‘साहेब-बीबी आणि मी’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ इत्यादींसारख्या मालिकांनीही प्रेक्षकांना खळखळून हसवलं. ‘टिकल ते पॉलिटिकल’ किंवा ‘घडलंय-बिघडलंय’सारख्या साप्ताहिक मालिकांमधून समाजात घडणाऱ्या लहान-मोठ्या घटनांवर मार्मिक टीका झाली. हसवता हसवता प्रेक्षकांना डोळस केलं.

हसण्यातूनही माणसं शहाणी होऊ लागली. सतत हास्याची जत्रा न भरण्याच्या त्या दिवसांत आणि आता ती भरतेय तेव्हाही विनोदी प्रसंग किंवा टीव्ही पाहताना हसणं या पलीकडेही माणसाला हसू येतं, आपण आपलं हसू जपलं पाहिजे याची नोंद न घेणारी कितीतरी माणसं आपल्या प्रत्येकाच्या आजूबाजूला आहेत.

कदाचित आपणही त्यातले एक असू शकतो याची आपल्याला जाणीवही कधी झालेली नसते. हसणं हरवत जाण्याची काही कारणं ही आपल्या कधी नजरेस पडलेली नसतात.

तुम्हाला माहितीय, आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी माणसं असतात ज्यांच्या दातांची नॅचरल शेड पिवळी असते.

आपल्यावर संस्कार होतो ‘स्वच्छ दात म्हणजे पांढरे दात’... मग ज्या लहान मुला-मुलींचे दात पिवळे असतात त्यांना सगळे कॉर्नर करू लागतात आणि मग ते हळूहळू चारचौघांत हसेनासे होतात.

आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी माणसं आहेत, ज्यांचे दात पुढे आलेले असतात, वाकडे असतात, दातात फटी असतात... आपल्यावर संस्कार होतो, मोत्याची सर असावी तसे एकसारखे दात म्हणजे सुंदर दात. मग असे दात नसणारी माणसं लाजतात, कसंनुसं हसतात.

आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी माणसं असतात ज्यांच्या नेमक्या पुढच्या दोन दातांत फट असते. त्यांना फोटो काढताना हसायला सांगितलं, की ते ओठ मिटून घेतात. स्माईल करतानाचे फोटो काढतच नाहीत.

त्यांच्या ओठाचं अवघडलेपण फोटोत स्पष्ट दिसतं. एखाद्या ग्रुप फोटोत ‘अरे तुझ्यामुळे फोटो खराब झाला’ असं वगैरे ऐकलं की मग ते लांब लांब राहू लागतात. आपल्या आजूबाजूला बरीच माणसं असतात जी खूप हसू शकतात; पण ती मंजुळ वगैरे हसत नाहीत. मोठ्याने खी खी करतात, बुलेटसारखी हसतात; मग त्यांना ‘काय घाण हसतो तू’ असं म्हटलं जातं आणि त्यांच्या हसण्याचा आवाजच हरवून जातो.

दुःख, दारिद्र्य, काळजी आणि चिंता या सगळ्या पलीकडेही माणसांचं हसू हरवत जाण्याची ही काही कारणं असतात. म्हणूनच आपल्या आजूबाजूला भरपूर हसू हरवून बसलेली माणसं असतात. हसण्याच्या, दात आणि जबड्याच्या ठेवणीच्या, दातांच्या रंगाच्या असण्यावरून अवतीभवती इतक्या गोष्टी खरंच घडत असतात आणि तरी या सगळ्यावर मात करून माणसं खरोखर हसू पाहतात.

दिसणं आणि हसणं याचा सततचा सहसंबंध आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण कधी न कधी जोडलेला असतो, त्यावरून कधी आपण कॉर्नर झालेले असतो, कधी आपण इतरांना कॉर्नर केलेलं असतं किंवा स्वतःच्या वा इतरांच्या मनात न्यूनगंडही बळावलेलं अनुभवलेलं असतं.

अशा वेळी संकोचाने वा भिऊन हसणं सोडून चालत नसतं. उलट अशावेळी स्वतःच्या दिशेने चार पावलं टाकून, आरसा जवळचा करत स्वतःसाठी हसायचं असतं. आतला आनंद बाहेर चेहऱ्यावर झळकता ठेवून ओठांवर आश्वासक हसू कायम बाळगून असलेला माणूस होणं तसं अगदीच सोपं नसलं तरी अशक्य नाही.

दिलासा देणारं, मनमोहक हसू प्रत्येकाचं असेलच असं नाही; पण म्हणून त्या हसण्याचं मोल कमी नसतं. तसंही अमुक एका प्रकारचं हसू प्रमाण आणि तमुक म्हणजे नाव ठेवण्यासारखं हे माणसांनी, माणसांना लावलेल्या फूटपट्ट्या आहेत.

जसं लहान मूल निरागस आणि निष्पापच असतं अगदी तसंच आपल्या ओठांवर हर्षभराने आलेलं, आनंदाने भारलेलं निष्कपट हसू देखणंचं असतं. दातांचा रंग, त्यांची ठेवण, त्यातल्या फटी या कशा कशाने ते हरवून बसायचं नसतं.

कारण आपलं लाखमोलाचं, कमावलेलं हसू कुणा कुणासाठी नसलं तरी स्वतःसाठी असतंच असतं. तेव्हा हरवायचं असेल तर न्यूनगंड, भीती, हसण्याविषयी असलेले गैरसमज या सगळ्यांना हरवून सातमजली हसता आलं पाहिजे. रविवारी जागतिक हास्य दिन आहे... त्या निमित्ताने माझ्यासह असं सातमजली हसत राहणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा!

vishakhavishwanath11@gmail.com (लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या साहित्यिक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT