Uddhav Thackeray Sakal
सप्तरंग

राजकीय संस्कृतीचे एन्काउंटर !

हिंदी चित्रपटांतील हे संवाद सर्वांना तोंडपाठ आहेत. मात्र अशी डायलॉगबाजी ही फक्त चित्रपटांमध्ये असते, असे म्हणणाऱ्यांना आपले शब्द मागे घ्यावे लागणार आहेत.

हेमंत देसाई hemant.desai001@gmail.com

‘कुत्ते, कमीने, मैं तेरा खून पी जाऊँगा.

अगर माँ का दूध पिया है तो सामने आ...’

‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहेनशाह...’

हिंदी चित्रपटांतील हे संवाद सर्वांना तोंडपाठ आहेत. मात्र अशी डायलॉगबाजी ही फक्त चित्रपटांमध्ये असते, असे म्हणणाऱ्यांना आपले शब्द मागे घ्यावे लागणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करून प्रकाशझोतात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी (२४ ऑगस्ट ) पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका होईपर्यंत व नंतरदेखील महाराष्ट्रात प्रत्यक्षातील कृतींचा आणि शब्दांचाही राडा झाला. ‘सिंहाच्या गुहेत या. आम्ही दोन हात करायला तयार आहोत’, असे आव्हान नारायण राणे यांच्या चिरंजीवांनी दिल्यानंतर युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी, ‘ आम्ही उंदराच्या बिळासमोर आलो आहेत. पण ते काय करू शकले’, अशी प्रति-आव्हानात्मक भाषा केली.

एकेकाळी नारायण राणेंवर तुफान टीका करणारे भाजपचे कोकणातलेच माजी आमदार प्रमोद जठार यांनी तर, ऐतिहासिक नाटकांतील संवादांची आठवण व्हावी, अशी भाषा केली. ‘छत्रपती संभाजी महाराजांना याच परिसरात फंदफितुरीने अटक करण्यात आली. मात्र त्यानंतरही औरंगजेबाला यश आले नाही. उलट त्याचे थडगे बांधले गेले. त्याचप्रकारे या कारवाईमुळे महाविकास आघाडीचे थडगे बांधले जाणार आहे’, असे ते गरजले. आग्र्याहून सुटका, बेबंदशाही व महारथी कर्णसारखी नाटके लिहिणारे सुप्रसिद्ध नाटककार विष्णुपंत औंधकर आज हयात असते, तर कदाचित त्यांनाही या संवादांपासून प्रेरणा मिळाली असती.

‘घरात घुसून हिशेब चुकते करू’, असे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड गरजले. तर शिवसेनेच्या दुसऱ्या एका नेत्याने ‘कोथळा बाहेर काढू’ आणि आणखी एका मावळ्याने तर ‘एन्काउंटर’ करण्याचीही गर्जना केली. शिवसेनेचे एक मंत्री गुलाबराव पाटील यांनी तर ‘राणे यांना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून इलेक्ट्रिकचे शॉक दिले पाहिजेत’, असे ‘सुविचार’ व्यक्त केले. नाशिक, कल्याण, ठाणे, उल्हासनगर अशा ठिकठिकाणी भाजपच्या कार्यालयांवर हल्ले झाले. विविध भागांत भाजप आणि शिवसेना हे कार्यकर्ते परस्परांना भिडले. हाणामारी वा दगडफेक केल्यावर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते ताबडतोब माध्यमांसमोर येऊन, अंगावर आले तर शिंगावर घेऊ, किंवा आम्ही शिवरायांचेच मावळे आहोत, आम्ही वाट्टेल ते सहन करणार नाही, असे ऐकवत होते. काहीजणांनी तर अफगाणिस्तान, तालिबान असे वेगवेगळे शब्द उच्चारून, या राड्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप दिले!

राज्य सरकारने सूडबुद्धीतून राणे यांना अटक केल्याची टीका करताना, राणे यांची भाषा ‘ठाकरी’ असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. केंद्रीय मंत्र्यांना अटक ही देशातील दंडेलशाहीची पहिलीच घटना असल्याची चुकीची माहिती त्यांनी दिली. वास्तविक वाजपेयी सरकारमधील केंद्रीय मंत्री मुरासोली मारन आणि टी. आर. बालू यांना २००१ मध्ये जून महिन्यात तामिळनाडूत अटक करण्यात आली होती. चेन्नईतील फ्लायओव्हर घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ही कारवाई झाली होती. त्यावेळी अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता मुख्यमंत्री होत्या, जो आज भाजपचा मित्रपक्ष आहे ! कोल्हापुरी, पुणेरी, कोकणी, ठाकरी भाषा याच्यातील फरकही सांगून राणे यांचे त्यांच्याच पक्षातर्फे कोडकौतुक केले जात आहे. मात्र माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘वक्तव्याचे समर्थन नाही. पण राणेंविरोधी कारवाईत पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याची’ वकिली भूमिका घेतली.

‘वादावादी, हाणामाऱ्या झाल्या, तरीदेखील आम्ही भाऊच आहोत आणि भाऊच राहणार आहोत, कारण हिंदुत्व हा आमच्यातला समान धागा आहे’, असे उद््‌गार चंद्रकांत पाटील यांनी काढले. वास्तविक शिवसेनेचे सध्याचे हिंदुत्व हे उसने व नकली असल्याचे मत यापूर्वी अनेक भाजप नेत्यांनी वारंवार व्यक्त केले आहे. शिवाय हा भाऊ अहोरात्र फक्त वसुली करत असल्याचा आरोप असेल, तर अजूनही भाजपची त्याच्यावरची माया आटत कशी नाही, असा प्रश्न पडतो.

राणेंना झालेली अटक ही घटनाविरोधी असल्याचे मत भाजप पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केले आहे. मात्र जामीन मंजूर करताना न्यायालयाने भविष्यात असे वक्तव्य करता, येणार नाही, तसेच कागदपत्रे व पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असे राणेंना बजावले होते. याचा अर्थ, राणे यांचे वक्तव्य न्यायालयालाही आवडलेले नव्हते. राज्य सरकारने त्यांच्यावर गुन्हा नोंदवणे, हे पुरेसे होते. अटक करण्याची कारवाई करण्याचे करण नव्हते. तसेच या वक्तव्यांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे स्वतः तक्रार करण्याचा (खासदार विनायक राऊत यांनी नंतर ती केली) मार्ग खुला होता. असो. परंतु या अटकेमुळे राणे यांच्याभोवती इतका प्रकाशझोत पडला की, जनआशीर्वाद यात्रेचे उद्दिष्टच बाजूला पडले. शिवसेना विरुद्ध भाजप, या सामन्याचे रूपांतर ठाकरे विरुद्ध राणे यात झाले. तसेच स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण होऊन ७५व्या वर्षाकडे देशाची वाटचाल सुरू झाली आहे, हे उद्धव यांना पूर्णपणे माहीत असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. ‘अमृतमहोत्सव’ असा उल्लेखही त्यांनी केला होता, पण थोडी शंका आल्यामुळे त्यांनी मुख्य सचिवांना त्यांनी ‘अमृतमहोत्सव ना, की हीरकमहोत्सव?’ असे विचारले. बोलताना अशा प्रकारची गोष्ट कोणाकडूनही घडू शकते. पण अशा गोष्टीला मोठी चूक, देशद्रोह, असे म्हणण्याचा पराक्रम फक्त भाजप नेतेच करू शकतात...एखादी घटना वा गोष्ट आपल्या बाजूने कशी फिरवायची, ही चलाखीही अर्थातच फक्त त्याच मंडळींकडे आहे. आमच्या पक्षात येणाऱ्यांना पक्षाची धोरणे व शैली स्वीकारावी लागते, असा दावा करणाऱ्या वॉशिंग मशीनवादी पक्षाने आता राणे यांच्या शैलीची प्रशंसा सुरू केली आहे.

ठाकरे विरुद्ध राणे, या सामन्यात एकमेकांवर प्रहार करण्यात आले आणि राज्यात ठिकठिकाणी रस्त्यांचे रूपांतर रणभूमीत झाले. राज्यात शिवसेना सत्तेत असतानाही शिवसैनिक हैदोस घालत असताना, अनेक ठिकाणी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांना बदडले जात होते, असेही दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहखाते असून, त्यांनी कोणतीही ठाम भूमिका घेतल्याचे दिसून आले नाही. तुम्हाला योग्य वाटेल, ते करा, असे पोलिसांना सांगून हात वर करणे योग्य नाही. आपल्याविषयी शेळपट, बुळचट, घरकोंबडा, पांढऱ्या पायाचे, अशी सातत्याने टीका करूनही उद्धव यांनी त्याबद्दल शक्यतो प्रतिक्रिया न देण्याची भूमिका घेतली.

मात्र त्यांना एकेरी संबोधले जाऊ लागले आणि पुढे कानशिलात ठेवून देण्याचे उद् गार काढण्यापर्यंत राणे यांनी मजल मारल्यानंतर मात्र शिवसैनिक उसळले. आपण गेल्यानंतर शिवसेनेत दम राहिला नाही, माझ्यापुढे उभे राहण्याची कोणाचीही शामत नाही, असे सातत्याने आव्हान दिले गेल्यानंतर सामान्य शिवसैनिक उसळून उठणार, हे माजी शिवसैनिक राणे यांना ठाऊक आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याच्या वल्गना केल्या, तेव्हाही दादरचे शिवसैनिक आक्रमक झाले होते. सत्तेत गेल्यापासून शिवसेना तशी शांतच होती आणि पूर्वीइतकी सक्रिय नव्हतीच. राणेगिरीमुळे सेनेचा संघटनात्मक फायदा होऊ शकतो, हे खरे. परंतु या राड्याच्या वेळी भाजपच्या टीकेला एकत्रितपणे व समर्थपणे तोंड देण्यात महाविकास आघाडी कमी पडली. शिवाय कोणाचा राजकीय फायदा होतो की नाही यापेक्षा, अशा हिंसक घटनांमुळे लोकांना झालेल्या त्रासाची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्ह करून सर्वांना शांततेचे आवाहन करायला हवे होते व मुख्यतः शिवसैनिकांना आवरणे आवश्यक होते.

थोडी राणे-ठाकरे संघर्षाची पार्श्वभूमी बघू या. १९९९ साली शिवसेना उमेदवारांच्या यादीत उद्धव यांनी आपल्याला अंधारात ठेवून, परस्पर १५ उमेदवारांची नावे बदलली. त्यापैकी अकरा उमेदवार हे स्वतंत्रपणे वा दुसऱ्या पक्षातून लढून विजयी झाले. हे बंडखोर उमेदवार पक्षात असते, तर तेव्हा सत्ता स्थापन करणे जमले असते, असे मत राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात व्यक्त केले आहे. २००२ साली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांची हत्या झाली. त्या संकटकाळात विरोधी पक्षनेते असलेल्या राण्यांच्या कणकवलीतल्या घराची जाळपोळ झाली. तेव्हा शिवसेनेचा कोणताही नेता आपल्या बाजूने ठामपणे उभा राहिला नाही, हीदेखील राणे यांची खंत होती. २००३ साली महाबळेश्वरला शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राणेंचा विरोध न जुमानता, उद्धव ठाकरे यांच्या नावाची पक्षाचे कर्यकारी प्रमुख म्हणून घोषणा करण्यात आली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘रंगशारदा येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना, ‘सेनेत पदांचा बाजार मांडला जातो आहे’, असे जाहीर वक्तव्य राणे यांनी केले होते. २००५ मध्ये शिवसेनेचा निरोप घेत, राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तेव्हापासून गेली १६ वर्षे ते फक्त आणि फक्त उद्धवना टार्गेट करत आहेत.

रुपेरी पडद्यावर अँग्री यंग मॅनचा जमाना सुरू झाल्यानंतर, रोमँटिक हिरो राजेश खन्ना मागे पडला. तर हल्लीच्या राजकारणातही तडकफडक डायलॉग, किस्सेबाजी, नकला आणि काहीही करून हेडलाइन मॅनेजमेंट करणे, हे महत्त्वाचे बनले आहे. भाषेचे नवे प्रयोग महाराष्ट्रात सुरू झाले, ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून. त्यानंतर या ठाकरी भाषेचे सार्वत्रिकीकरण झाले आहे. याच भाषेचे पुरस्कर्ते राणे हे कधीही पूर्ण महाराष्ट्रात नाव असलेले नेते नव्हते व नाहीत. त्यांचा प्रभाव पूर्ण कोकणातही नाही. तो फक्त सिंधुदुर्गपुरताच मर्यादित आहे. मात्र राजकारण जेव्हा मूळ मुद्द्यांपासून भरकटलेले, उथळ आणि चॅनेलकेंद्री बनले, तेव्हापासून फक्त सर्वपक्षीय खळखळाट आणि थयथयाट सुरू झाला. भाजप, सेना, काँग्रेस वा राष्ट्रवादी असो, संयमी, विवेकी, नेमस्त नेतृत्व मागे पडू लागले. राजकारणाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अविचारी, भंपक आणि फक्त चुरचुरीत व चुरुचुरु बोलणाऱ्यांची चलती सुरू झाली. आज भाजपसारख्या सत्ताधारी पक्षातही जुन्या निष्ठावंतांची कोंडी सुरू आहे. वसंतराव भागवत, उत्तमराव पाटील, रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्या सहवासात व विचारधारेत वाढलेले लोक आज पक्षात पैसेवाल्या इंपोर्टेड नेत्यांचा उत्कर्ष बघून ‘जे जे होईल, ते ते पाहावे’, असे म्हणत गप्प आहेत.

एकेकाळी महाराष्ट्रात सत्ताधारी व विरोधी पक्षांतील सबंध स्नेहभावाचे होते. १९५७ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. मात्र त्यामुळे एस. एम जोशी, उद्धवराव पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्या संबंधांत कुठलीही बाधा आली नाही. संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर मराठवाड्याच्या विकासासाठी यशवंतरावांनी औरंगाबादला औद्योगिक परिषद भरवली होती आणि त्यास एसेमना अगत्याने बोलावले होते. तर एकदा उद्धवरावांच्या गौरव समारंभासाठी यशवंतराव औरंगाबादला आले होते. मी काँग्रेसचा असतानाही मला मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला होता. या शब्दांत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी असल्याचा दाखला दिला जातो. मतभेद असले, तरी मनभेद नाही, हे आणखी एक टाळीखाऊ वाक्य. अलीकडील काळात मात्र महाराष्ट्रात पूर्वीच्या या राजकीय संस्कृतीचाच एन्काउंटर झाला आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार व लेखक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT