Amar Habib Sakal
सप्तरंग

सर्जकाच्या स्वातंत्र्यासाठी ‘किसानपुत्र-आंदोलन’

साहित्यिक आणि कार्यकर्ते असलेले अमर हबीब यांनी शरद जोशी यांच्याबरोबर अनेक वर्षं काम केलं आणि आता शेतकरी-कुटुंबांतील शिकलेल्या मुला-मुलींना बरोबर घेऊन ते शेतकरीविरोधी कायदे मोडण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत.

हेरंब कुलकर्णी herambkulkarni1971@gmail.com

साहित्यिक आणि कार्यकर्ते असलेले अमर हबीब यांनी शरद जोशी यांच्याबरोबर अनेक वर्षं काम केलं आणि आता शेतकरी-कुटुंबांतील शिकलेल्या मुला-मुलींना बरोबर घेऊन ते शेतकरीविरोधी कायदे मोडण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत.

साहित्यिक आणि कार्यकर्ते असलेले अमर हबीब यांनी शरद जोशी यांच्याबरोबर अनेक वर्षं काम केलं आणि आता शेतकरी-कुटुंबांतील शिकलेल्या मुला-मुलींना बरोबर घेऊन ते शेतकरीविरोधी कायदे मोडण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत. मेळावे, पदयात्रा, प्रशिक्षणं यांबरोबरच सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत शेतकरी-तरुणांना दिशा देत आहेत. यातून महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचं, नव्या पिढीचं शेतकरी-आंदोलन उभं राहत आहे. या आंदोलनाची रचना रूढार्थानं इतर संघटनांसारखी नाही. या संघटनेला अध्यक्ष नाही, सचिव नाही की कार्यकारिणीही नाही. अतिशय अनौपचारिक पद्धतीची ही संघटना आहे.

अंबाजोगाईचे अमर हबीब (८४११९०९९०९) यांनी जयप्रकाश नारायण यांच्या ‘छात्र युवावाहिनी’त कामाला सुरुवात केली. त्यांनी आणीबाणीला विरोध केला म्हणून तुरुंगवास झाला. त्यानंतर ‘मराठवाडा’ दैनिकात लातूर इथं काम केलं. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यावरून मराठवाड्यात दलितांवर अत्याचार झाले, तेव्हा नामांतराच्या बाजूनं त्यांनी आंदोलनात भाग घेतला. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात ते जखमी झाले. थेट दवाखान्यात दाखल करावं लागलं. गुन्हा दाखल होऊन पुन्हा तुरुंगवास झाला.

सानेगुरुजी यांच्या ‘आंतरभारती’ चळवळीत ते अनेक वर्षं काम करतात. सध्या ते ‘आंतरभारती’चे कार्याध्यक्ष आहेत. ‘आंतरभारती’चं अधिवेशन दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांत होतं.

हबीब हे अंबाजोगाईत विविध उपक्रम राबवतात. अन्य राज्यांतून येऊन इथल्या परंपरांशी एकरूप होत ‘आंतरभारती’ जीवन जगणाऱ्यांना ते दरवर्षी कार्यक्रम आयोजित करून पुरस्कार देतात. स्वत:च्या कुटुंबात त्यांनी आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिलं. आंतरभारती चळवळीत त्यांचं असं महत्त्वाचं योगदान आहे.

शेतकरीनेते शरद जोशी यांच्यासमवेत हबीब यांनी १९८० पासून काम केलं. आंबेठाण येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या कामाची जबाबदारी जोशी यांनी त्यांना दिली. शेतकरी-संघटनेच्या बहराच्या काळात हबीब यांनी शेकडो कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलं. अंबाजोगाई येथील ‘ज्वारीपरिषदे’च्या नियोजनात त्यांचा सहभाग होता. मराठवाड्यातील खेड्यापाड्यात फिरून संघटनेच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली.

खुली व्यवस्था प्रभावीपणे कशी राबवावी याबद्दल जोशी यांच्या अखेरच्या काळात त्यांच्याशी हबीब यांच्या अनेक चर्चा झाल्या. शेतकरी-संघटनेतील त्यांचे सहकारी अनंतराव देशपांडे व त्यांनी दीर्घ चर्चा करून, खुली व्यवस्था शेतीत व ग्रामीण भारतात प्रभावीपणे अंमलात येत नसल्याचं महत्त्वाचं कारण शेतकरीविरोधी कायदे हे आहे, हा निष्कर्ष काढला.

ते कायदे हटवण्यासाठी त्यांनी संघटना उभारण्याचा विचार सुरू केला; पण नेहमीच्या पद्धतीची संघटना न उभारता शेतकरी-कुटुंबांतील तरुण-तरुणींना शोषणाची जाणीव करून द्यावी व त्यांना संघटित करावं यावर त्यांनी काम सुरू केलं. देशपांडे हेही शेतकरी-संघटनेतले अनेक वर्षांपासूनचे आक्रमक कार्यकर्ते. सभेत उभं राहून तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना प्रश्न विचारणारे. जोशी यांच्या अखेरच्या काळात ते त्यांच्यासमवेत सातत्यानं होते. शेती विकून त्या पैशातून ऊसपरिषद घेणारे अनंतराव हे हबीब यांच्यासारखंच झपाटलेलं व्यक्तिमत्त्व. या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी २०१४ पासून तरुणांना ‘किसानपुत्र-आंदोलना’शी जोडायला सुरुवात केली.

हबीब म्हणाले : ‘शेतकरी व स्त्रिया हे दोन सर्जक संपत्तीची निर्मिती करत असतात, त्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. खुली व्यवस्था औद्योगिक क्षेत्रात व इतरत्र आली; पण ती शेतीतही यायला हवी. ती न येण्यात शेतकऱ्यांच्या विरोधातले तीन प्रमुख कायदे हेच सर्वात मोठे अडथळे आहेत; त्यामुळे, कमाल शेतजमीन धारणा कायदा रद्द करा...आवश्यक वस्तूंचा कायदा रद्द करा...जमीन अधिग्रहण कायदा रद्द करा...या तीन मागण्या ‘किसानपुत्र आंदोलन’ सातत्यानं मांडत आहे; किंबहुना या तीन मागण्यांभोवतीच आंदोलन सुरू आहे.’

या तीन कायद्यांना आव्हान देता येऊ नये म्हणून ते कायदे परिशिष्ट ९ मध्ये टाकण्यात आले आहेत (या परिशिष्टाला न्यायालयात आव्हान देता येत नाही).

या देशात उद्योजक कितीही जमीन खरेदी करू शकतात; पण शेतकऱ्यांना मात्र ५४ एकर जिरायतीपेक्षा किंवा १८ एकर बागायतीपेक्षा जास्त जमीन बाळगता येत नाही. त्यामुळे मोठे उद्योजक शेतीत गुंतवणूक करत नाहीत व शेती एक उद्योग म्हणून विकसित होत नाही व शेतीचे तुकडे पडत जाऊन शेतकरी आत्महत्येच्या दारात उभा राहतो. ‘आवश्यक वस्तू कायद्या’मुळे सरकारला शेतीमालाच्या बाजारात हस्तक्षेप करण्याची संधी मिळते. सरकार त्यातून भाव पाडते. कांदा, तूर, ऊस यांबाबत अनेकदा हे दिसलं आहे. त्यामुळे लायसेन्स परमिट कोटा राज सुरू होऊन भ्रष्टाचार वाढला आहे. ग्रामीण औद्योगिकीकरणावर मर्यादा आल्या. जमीन अधिग्रहण कायद्यान्वये शेतकऱ्यांची जमीन काढून घेऊन ती उद्योगपतींना देऊन त्यातून राजकारणी व अधिकारी पैसे कमावतात. शेतकऱ्याला भूमिहीन, बेकार करून भांडवलदारांना अधिक श्रीमंत करणारी ही व्यवस्था आहे म्हणून जमीन अधिग्रहण अधिकार सरकारला नकोच आहे व म्हणून हे तीन कायदे रद्द करावेत अशी किसानपुत्रांची मागणी आहे.

शेतकरीविरोधी कायदे शेतकऱ्यांच्या समस्यांना कसे कारणीभूत आहेत याचं विवेचन वेगवेगळ्या ठिकाणी तरुणांच्या परिषदा घेऊन सुरुवातीच्या काळात करण्यात आलं, तसंच कायदे-परिषदांचंही आयोजन करण्यात आलं. शेतीचा प्रश्न हा शेतीमालाच्या भावाचा नसून तो शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा आहे...शेतकरीप्रश्न हा गरिबीचा नसून शेतकऱ्यांच्या गुलामीविषयीचा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ट्रेड युनियनच्या पद्धतीनं संघटना करण्यात अर्थ नाही हा विचार मांडण्यात आला व त्यानंतर मकरंद डोईजड या कार्यकर्त्यानं या कायद्याच्या विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

सन १९८६ मध्ये साहेबराव करपे या शेतकऱ्यानं कुटुंबीयांसह केलेली आत्महत्या ही पहिली नोंदवलेली आत्महत्या मानली जाते. दर १९ मार्चला ‘किसानपुत्र-आंदोलना’चे कार्यकर्ते या दिवशी उपवास करतात. हबीब व कार्यकर्त्यांनी या महिन्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत पदयात्रा काढल्या आहेत. खेड्याखेड्यात जाऊन ते शेतकऱ्यांचं प्रबोधन करतात. दिल्लीतही जाऊन त्यांनी धरणे-आंदोलन केलं. सोशल मीडियाचा प्रभावी वापर हे सारे तरुण करतात. या कायद्याविषयीच्या पोस्ट दर सोमवारी सगळेजण सोशल मीडियावर टाकतात. त्याला ‘सोमवारची पोस्ट’ असं म्हटलं जातं. अशा वेगवेगळ्या पद्धतींनी शेतकरी-कुटुंबांतील पुढची पिढी शेतकरी-आंदोलनाशी जोडली जात आहे.

एकेकाळी मुंबईत ‘दलित पँथर’नं ज्याप्रमाणे शिक्षित व नागरी भागातील दलित तरुणांना दलितांच्या प्रश्नांशी जोडलं होतं, त्याचप्रमाणे आज शेतकरी-कुटुंबांतील तरुण ‘किसानपुत्र-आंदोलना’शी जोडले जात आहेत.

मयूर बागूल, डॉक्टर आशिष लोहे, संगीता देशमुख, मकरंद डोईजड, संदीप धावडे, विश्वास सूर्यवंशी, अस्लम सय्यद हे आणि इतर तरुण-तरुणी चर्चा, कविता, चित्रं...अशा वेगवेगळ्या माध्यमांतून हा विचार समाजापर्यंत पोहोचवत आहेत.

हबीब हे प्रसिद्ध लेखकही आहेत. अंबाजोगाई शहरात होणाऱ्या साहित्यिविषयक सर्व उपक्रमांत ते उपक्रमांच्या नियोजनासह सहभागी असतात. असे हे अमर हबीब आज शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीला शोषणाची, गुलामीची जाणीव करून देत आहेत व सर्जकाचं स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यासाठी या पिढीला सज्ज करत आहेत...

(सदराचे लेखक हे शिक्षण व सामाजिक चळवळींत कार्यरत असून विविध विषयांवर लेखन करतात.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT