Balaji Kompalwar Sakal
सप्तरंग

बंधाऱ्यासाठी लढणारा ‘भगीरथ’

प्रा. कोम्पलवार यांचं सर्वांत मोठं काम म्हणजे, त्यांनी नांदेड जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभदायी ठरेल अशा बाभळी बंधाऱ्यासाठी केलेला लोकसंघर्ष.

हेरंब कुलकर्णी herambkulkarni1971@gmail.com

प्रा. कोम्पलवार यांचं सर्वांत मोठं काम म्हणजे, त्यांनी नांदेड जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभदायी ठरेल अशा बाभळी बंधाऱ्यासाठी केलेला लोकसंघर्ष.

एक प्राध्यापक आपलं काम करताना महात्मा गांधी - आचार्य विनोबांच्या प्रेरणेने सामाजिक कार्यात भाग घेत एका मोठ्या लढ्याचं नेतृत्व करतो आणि १० हजार एकर जमीन ओलिताखाली येईल असे बंधारे आंध्र प्रदेश सरकारशी संघर्ष करून त्यांना बांधायला लावतो. एक शिक्षक समाजशिक्षक म्हणून कसं काम करू शकतो, याचा वस्तुपाठ असलेले संघर्षशील गांधीवादी कार्यकर्ते आहेत नांदेडचे प्राध्यापक डॉ. बालाजी कोम्पलवार ( फोन - ९९७००३३१२५).

प्राध्यापक म्हणून सेवा करताना कोम्पलवार यांचा युवक बिरादरीशी संपर्क आला. त्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात पाच हजार वृक्ष लावले. लावलेले वृक्ष टिकत नाहीत ही तक्रार असते म्हणून काळजी घेत मग वृक्षांचे वाढदिवस करणं सुरू केलं. रक्तदान शिबिर, व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, सायकल यात्रा या माध्यमातून काम केलं. सर्वोदयी नेते गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्यासमवेत गांधीजींच्या विचार प्रसाराचं काम केलं.

बालाजी सातत्यानं खादी वापरतात. त्यांच्या दिवंगत पत्नी विनोबांच्या सहवासात राहिलेल्या व राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या होत्या. गंगाप्रसाद यांच्यासोबत खेड्यापाड्यांत ग्रामस्वराज्य चळवळीत काम केलं, त्यातून त्यांची जडणघडण झाली. त्यात वृत्तपत्राचं काम करताना समाजाच्या प्रश्नांचं आकलन उंचावत गेलं. महाविद्यालयातही तरुण विद्यार्थ्यांना त्यांनी विविध सामाजिक व राष्ट्रीय मोहिमेत सहभागी करून त्यांच्यावर सामाजिक संस्कार केले. बहिःशाल व्याख्यानमालेच्या माध्यमातून खेड्यापाड्यांमध्ये शेकडो व्याख्यानं दिली.

प्रा. कोम्पलवार यांचं सर्वांत मोठं काम म्हणजे, त्यांनी नांदेड जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभदायी ठरेल अशा बाभळी बंधाऱ्यासाठी केलेला लोकसंघर्ष. त्या संघर्षातून सर्वोच्च न्यायालयातून सरकारला बंधारा बांधायला भाग पाडलं. ‘डाउन टू अर्थ’ या जागतिक पातळीवरच्या मासिकानं या लढ्याची नोंद घेतली. जायकवाडी ते तेलंगण असं ४२५ किलोमीटर अंतराचं गोदावरीचं नदीपात्र आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात शेतांत पाणी घुसायचं आणि बॅकवॉटरने पुन्हा शेताचं नुकसान व्हायचं ते वेगळंच. अशा स्थितीत ते पाणी अडवून बंधारा बांधणं गरजेचं होतं; पण त्या पाण्यावर आंध्र प्रदेश हक्क सांगत होतं व महाराष्ट्र सरकार मात्र आक्रमक भूमिका घेत नव्हतं. नांदेड ते धर्माबाद या ९७ किलोमीटरमध्ये १३ बंधारे बांधण्याचं ठरलं; पण शेवटचा बाभळी बंधारा आंध्र प्रदेस सरकारच्या विरोधामुळे बांधला जात नव्हता. अशावेळी बालाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘बाभळी बंधारा सर्वपक्षीय कृती समिती’ स्थापन केली.

नांदेड जिल्ह्यातील नांदेड, धर्माबाद, मुदखेड, लोहा, नायगाव, बिलोली, उमरी अशा सात तालुक्यांतील शेतकरी संघटित केले. या समितीचे सचिव म्हणून प्रा. बालाजी सगळं नियोजन करत होते. महाराष्ट्र सरकार आंध्र सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घ्यायला कचरत होतं, अशावेळी आंदोलन हाच पर्याय होता. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं केली. सलग २८ तास रेल्वे रोको हे आंदोलन केल्याने देशपातळीवर त्याचे पडसाद उमटले व या सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल झाले. आंध्र प्रदेशातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दोन्ही बाजूने दगडफेक होत होती. त्यातच आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंदोलन करत आमदारांसह महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश केला आणि सरकारने त्यांना अटक केली. त्याचे पडसाद दोन्ही राज्यांत उमटले. महाराष्ट्र विधिमंडळात त्यांचा निंदा प्रस्ताव पारित झाला. इतक्या वादळी घटना घडूनही, इतक्या चर्चेनंतरही महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात प्रभावी भूमिका मांडत नसल्याने या समितीला सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं व बंधारा बांधणं कसं गरजेचं आहे ही बाजू मांडावी लागली.

पंतप्रधान मनमोहनसिंग यांचीही या शिष्टमंडळाने भेट घेतली. २.७४ टीएमसी पाणी मिळावं यासाठी भांडावं लागलं. शेवटी न्यायालयाने त्यातील ६० टीएमसी पाणी आंध्रचं बॅकवॉटर त्यांना द्यायला सांगितलं व एकदाच पाणी वापरायचं अशी अट घातली. त्यावर शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ व्हावा म्हणून आणखी एक बंधारा द्यावा अशी समितीनं मागणी केली, त्यावर न्यायालयानं दीड टीएमसी पाण्याचा बळेगाव बंधारा मंजूर केला. आज या दोन बंधाऱ्यांमुळे १० हजार एकर जमीन पाण्याखाली आली असून, शेतकरी आता बागायती शेती करत आहेत. त्या भागातील शहरी गावांना पाणीपुरवठा होत आहे. एक प्राध्यापक लोकसंघटन करून किती मोठा बदल घडवू शकतो याचं हे एक उदाहरण आहे.

त्यानंतरच्या काळात अण्णा हजारे यांच्यासमवेत त्यांनी काम केलं. अण्णांच्या दिल्लीच्या लोकपाल आंदोलनात महत्त्वाची भूमिका निभावली. अण्णा हजारे यांच्या ट्रस्टचे विश्वस्त व आंदोलनाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं.

दिल्लीतील लोकपाल आंदोलन होण्यापूर्वी त्यांनी नांदेडमध्ये ३० हजारची सभा घेऊन त्याला अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांना निमंत्रित केले. त्या सभेनंतर केजरीवाल म्हणाले की, इतक्या मोठ्या सभेत मी प्रथमच बोललो, इतकी ती सभा आंदोलन मोठं होण्यापूर्वी बालाजी यांनी घेतली. त्यानंतर मोदी सरकार आल्यानंतर २०१४ मध्ये भूमी अधिग्रहण विधेयक विरोधी देशातील सर्व शेतकरी संघटना एकत्र करून दिल्लीत आंदोलन केलं. वन रँक वन पेन्शन यासाठी लढा दिला. अण्णांच्या सर्व आंदोलनांत बालाजी कोम्पलवार अण्णांसोबत राहिले.

सध्या ते भारतातील १३ राज्यांत फिरून कल्पना इनामदार, अशोक सब्बन यांच्यासमवेत ‘राष्ट्रीय लोक आंदोलन’ उभारत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा बालाजी यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकरी कुटुंबांना विविध माध्यमातून ते मदत करतात. ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात त्यांनी काम केलं. त्यात १० तालुक्यांतील शेतकऱ्यांना नालासरळीकरण, खोलीकरण व तलावदुरुस्ती करत तलावातून गाळ काढून दिला. आत्महत्याग्रस्त ५०० कुटुंबांना २५ हजार रुपयांची मदत मिळवून दिली. अशा कुटुंबांतील विद्यार्थ्यांना वसतिगृहात मदत मिळवून दिली. शेतकरी आत्महत्या होऊ नयेत म्हणून गावागावांत जाऊन पथनाट्य सादर केलं, व्याख्यानं दिली. दुष्काळात गावोगावी दौरे केले. स्वतः सेंद्रिय शेती करतात व सेंद्रिय शेतीचा प्रसार करतात. माहितीचा अधिकार, जनलोकपाल या विषयांवर पुस्तकंही लिहिली आहेत. दिवंगत नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत जादूटोणाविरोधी कायदा, मेधा पाटकर यांच्यासोबत नर्मदा आंदोलन व अण्णा हजारे यांच्यासोबत माहिती अधिकार कायद्यासाठीच्या जागरण अभियानात सक्रिय सहभाग घेतला. मराठवाड्यात रेल्वे रुंदीकरण होण्यासाठी जी अनेक आंदोलनं झाली, त्या आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. जायकवाडी पाणीवाटप, नांदेड आयुक्तालय अशा काही सार्वजनिक मुद्द्यांवर ते न्यायालयातही गेले आहेत. एका प्राध्यापकाने जर ठरवलं, तर तो किती विविध पद्धतीने काम करू शकतो, याचं हे उदाहरण ठरावं.

(सदराचे लेखक हे शिक्षक व सामाजिक चळवळीत कार्यरत असून विविध विषयांवर लेखन करतात.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT