Iran President Sakal
सप्तरंग

नातं बापूंच्या प्रेरणेशी !

महात्मा गांधींनी मांडलेल्या स्वदेशीच्या संकल्पनेच्या प्रसारासाठी व तरुणांना गांधीवादी विचारांशी जोडण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘राष्ट्रीय युवा संघटन’ हे तरुणांचं संघटन सुरू केलं.

हेरंब कुलकर्णी herambkulkarni1971@gmail.com

महात्मा गांधींनी मांडलेल्या स्वदेशीच्या संकल्पनेच्या प्रसारासाठी व तरुणांना गांधीवादी विचारांशी जोडण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘राष्ट्रीय युवा संघटन’ हे तरुणांचं संघटन सुरू केलं.

त्यानं तरुणवयात चरखा विकत आणला आणि तो चालवायचं शिक्षण घ्यायला म्हणून तो मणिभवनला गेला. तिथं गांधीवाद समजून घेत आगाखान पॅलेसमध्ये प्रशिक्षणाला गेला आणि बघता बघता गांधी समजून घेत गांधीवादी कार्यकर्ता कधी झाला, हे कळलंच नाही. सूतकताई, वस्तीस्वच्छता, जातीय दंगलीतील शांतता आणि दंगलग्रस्तांना आधार, स्वदेशीचा प्रसार आणि थेट इस्राईल-पॅलेस्टिन संघर्षात गाझापट्टीत जाऊन जागतिक शांततेसाठी प्रयत्न करत अनेकविध विषयांवर तो तरुण काम करू लागला. महात्मा गांधींच्या आस्थेच्या सर्व विषयांवर थेट वस्ती ते जागतिक शांततेसाठी काम करणारे हे कार्यकर्ते आहेत, फिरोज मिठीबोरवाला (संपर्क - ९०२९२७७७५१) महानगरीय एका उच्चभ्रू बोहरा कुटुंबातील हा तरुण. सुखवस्तू कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर उद्योजक होऊ शकला असता; पण त्याने सामाजिक कामाची वाट धरली. सुरुवातीला सांताक्रूझ येथील भीमवाडा वस्तीत लहान मुलांसाठी शिक्षणाचे वर्ग चालवले. त्या वस्तीतील प्रश्न सोडवताना विविध आंदोलनं व रचनात्मक काम सुरू झालं. त्यानंतर महालक्ष्मी परिसरात मेघवाल वस्तीतील मुलांसोबत व वस्तीतील प्रश्नांवर काम केलं. वस्ती स्वच्छता सुरू केली. या दोन्ही वस्त्यांनी फिरोज यांना तळातलं वास्तव दाखवलं. महात्मा गांधींच्या भाषेत त्यांना ‘अंतिम माणूस’ दिसला.

महात्मा गांधींनी मांडलेल्या स्वदेशीच्या संकल्पनेच्या प्रसारासाठी व तरुणांना गांधीवादी विचारांशी जोडण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘राष्ट्रीय युवा संघटन’ हे तरुणांचं संघटन सुरू केलं. त्याच काळात भारताने खुली अर्थव्यवस्था स्वीकारली होती. डंकेल कराराच्या निमित्ताने स्वदेशीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. फिरोज व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याकाळात स्वदेशी विषयावर पथनाट्य बसवलं व मुंबई आणि देशात १०० पेक्षा जास्त ठिकाणी पथनाट्यं सादर केली.

या पथनाट्यांमधून एकूणच विकासप्रक्रिया, अर्थव्यवस्था ही जागतिक हवी की स्थानिक, असे अनेक प्रश्न उपस्थित केले व पर्यावरणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. पर्यावरणाच्या व विकासाच्या प्रारूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मेधा पाटकर यांच्या नर्मदा जनआंदोलनात फिरोज सामील झाले. या आंदोलनातील महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेच्या गटात त्यांचा समावेश होता. या आंदोलनातून पुन्हा एकदा बापूंच्या शेवटच्या माणसाशी ते जोडले गेले.

त्याचकाळात बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर मुंबईत भीषण दंगल झाली, तेव्हा दंगलग्रस्तांचं अश्रू पुसण्याचं आणि पुनर्वसनाचं काम त्यांनी सुरू केलं. फाळणीच्या वेळी नौखालीत बापूंनी केलेलं काम फिरोज यांना त्यावेळी आठवत होतं. बॉम्बे सेंटरजवळील तुलसीवाडी या वस्तीत सर्व तरुण गांधीवादी कार्यकर्त्यांनी काम सुरू केलं. दंगलीत वस्ती सोडून गेलेले लोक पुन्हा वस्तीत यायला तयार नव्हते, इतके भेदरलेले होते. तेव्हा फिरोज व सहकारी रात्री त्या वस्तीत झोपत व धीर देत होते. त्यांच्या पुनर्वसनासाठी जवळपास वर्षभर सतत प्रयत्न केले. जातीय सद्‍भावनेबाबत काम करताना आणि अयोध्येच्या निमित्ताने इतका नरसंहार होऊनही ‘काशी, मथुरा बाकी है’ अशा घोषणा सुरू झाल्या. त्यातून पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालं, तेव्हा वेगवेगळ्या शहरांतून मूठभर माती बनारस येथे कार्यकर्त्यांनी नेली व बनारस शहरात विविध धार्मिक सद्‍भावना जागृती कऱणारे कार्यक्रम केले. धार्मिक सौहार्दाचं हे फिरोज यांचं काम थेट गांधींच्या प्रेरणेतून येतं.

त्या काळात गेल आमवेट यांचं जात-वास्तव मांडणारं पुस्तक त्यांनी वाचलं आणि प्रत्येक प्रश्नाची मांडणी जात-वास्तव लक्षात घेऊन केली पाहिजे असं वाटलं. पण, तत्कालीन गांधीवादी संघटन या अंगाने काम करत नसल्याने नंतरच्या काळात जातविश्लेषण करणाऱ्या इतर संघटनांसोबतही त्यांनी काम केलं. भारतात काम करताना जातविश्लेषण व आकलन अतिशय आवश्यक असल्याचं ते मानतात. फिरोज यांचं सर्वांत वेगळं काम म्हणजे, त्यांनी केलेले जागतिक शांततेचे प्रयत्न.

अमेरिकेच्या साम्राज्यवादाला ते सतत विरोध करतात. पॅलेस्टिनवर इस्राईलचं आक्रमण हे अलीकडच्या काळातील साम्राज्यवादाचं उदाहरण आहे, त्यासाठी विविध आशियायी देशांतील प्रतिनिधी सोबत नेत हिंसेची पर्वा न करता गाझापट्टीत जाऊन त्यांनी तेथील अत्याचारांना विरोध नोंदवला. ही कृती अतिशय धाडसी होती. पॅलेस्टिनच्या नागरिकांना आम्ही सोबत आहोत हा धीर दिला. सोबत मदत साहित्य नेलं. त्यानंतर फिरोज लेबेनॉनला गेले, सीरियाला गेले व दहशतीला न जुमानता त्यांनी तेथील हिंसेचा धिक्कार केला. जागतिक शांततेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून ते गांधींच्या निर्भयतेशी नातं सांगतात. त्याचबरोबर साम्राज्यवादविरोधी अनेक व्यासपीठांशी ते जोडले आहेत व सर्व जागतिक साम्राज्यवादविरोधी लढ्यांत जवळून संबंधित असतात. अलीकडच्या इराणच्या हिजाबविरोधी आंदोलनाचा ते अभ्यास करत आहेत.

मुस्लिम समूहाच्या प्रश्नावर काम करताना त्या प्रश्नावर व्यापक चर्चा व कृती करण्यासाठी Muslim intellectual forum स्थापन केलं. या माध्यमातून मुस्लिमांच्या विविध प्रश्नांवर अतिशय स्पष्ट व धाडसी भूमिका घेण्यात आल्या. त्यात ट्रिपल तलाकच्या सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देण्यात आला. इतर मुस्लिम संघटना त्याला विरोध करत असताना यांनी त्याला पाठिंबा दिल्याने इतर संघटनांनी त्यांच्याशी संपर्क तोडला, तरीही ते ठाम राहिले. फिरोज सांगतात की, या कायद्यामुळे जी भीती दाखवली जात होती, ती खोटी ठरली आहे, त्यामुळे आम्ही घेतलेली भूमिका योग्यच होती. झाकिर नाईकच्या धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या वक्तव्यांना त्यांनी विरोध केला. हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्यासाठी न्यायालयीन व प्रत्यक्ष संघर्ष केला. सलमान रश्दी यांच्यावरील हल्ले, उदयपूर येथील धर्मांधांनी केलेला खून, इराणमधील हिजाब, फ्रान्समध्ये कार्टूनवरून झालेले खून या विषयांवर पारंपरिक मुस्लिमांना न आवडणारी पण धर्मांधांना विरोध करणारी ठाम भूमिका त्यांनी सतत घेतली. ईशनिंदेला विरोध करण्यासारखे कायदेही ते नाकारतात. धर्मश्रद्धा ही सतत तपासली जात चिकित्सा होणे गरजेचं आहे, असा त्यांचा आग्रह आहे.

दंगली जशा राजकीय फायद्यासाठी वापरल्या जातात, तसंच काही दहशतवादी हल्लेही देशातील राजकीय स्वार्थ व आंतरराष्ट्रीय षड्‍यंत्र यातून घडतात का? याविषयी ते अतिशय धाडसी व धक्कादायक विधानं करतात. करकरे यांचा मृत्यू, अमेरिकेतील दहशतवादी हल्ला, पुलवामा व बालाकोट येथील हल्ले यावर ते काही तर्कशुद्ध प्रश्न उपस्थित करतात व त्याचे राजकीय परिणाम व आंतराराष्ट्रीय कट स्पष्ट करतात. केंद्र सरकारच्या नागरिकत्व विधेयकावरही तीव्र आक्षेप घेत त्यांनी मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात दीड लाख नागरिकांचं आंदोलन केलं व दिल्लीच्या शाईनबागसारखं मुंबईबाग असं सतत तीन महिने सत्याग्रह आंदोलन घडवलं. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ५० हजार शेतकऱ्यांचं मुंबईत आंदोलन करण्यात पुढाकार घेतला. इतकं त्यांचं संघटन मजबूत आहे. असा हा गांधीविचारांचा पाईक, वस्तीत अंतिम आदमीच्या सेवेपासून जागतिक शांततेसाठी युद्धभूमीवर जाऊन प्रयत्न करणारा, त्याची प्रत्येक कृती बापूंच्या प्रेरणेशी नातं सांगते...

(सदराचे लेखक हे शिक्षक व सामाजिक चळवळीत कार्यरत असून विविध विषयांवर लेखन करतात.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT