सप्तरंग

नर्मदेची लेकरं...

देशात सर्वाधिक काळ व तीन राज्यांत सुरू असलेलं व लाखो प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देणारं आंदोलन म्हणून नर्मदा जन-आंदोलनाची नोंद करावी लागेल.

हेरंब कुलकर्णी herambkulkarni1971@gmail.com

देशात सर्वाधिक काळ व तीन राज्यांत सुरू असलेलं व लाखो प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देणारं आंदोलन म्हणून नर्मदा जन-आंदोलनाची नोंद करावी लागेल.

देशात सर्वाधिक काळ व तीन राज्यांत सुरू असलेलं व लाखो प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देणारं आंदोलन म्हणून नर्मदा जन-आंदोलनाची नोंद करावी लागेल. या आंदोलनानं एकूण विकासाच्या परिभाषेलाच आव्हान देत पर्यायी विकासनीतीची मांडणी केली. शेकडो कार्यकर्त्यांना जोडत हे आंदोलन मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात पुढं गेलं.

मध्यंतरी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव इथल्या आंदोलनाच्या कार्यालयाला भेट दिली. तेव्हा १५ वर्षांपेक्षा जास्त काळ या आंदोलनात आणि ‘नवनिर्माणा’त पूर्ण वेळ काम करणारे चेतन साळवे, लतिका राजपूत, सियाराम पाडवी, खेमसिंह पावरा यांची भेट झाली. एखाद्या विराट आंदोलनात बिनचेहऱ्यानं काम करणारे असे कार्यकर्ते हीच कोणत्याही आंदोलनाची शक्ती असते याचा तेव्हा प्रत्यय आला.

लतिका राजपूत (९४२३९०८१२३) यांच्या घरात सामाजिक कार्याची कोणतीही पार्श्वभूमी नाही. लतिका मुंबईत वाढल्या. सन २०१० मध्ये त्यांनी ‘मास कम्युनिकेशन’ची विद्यार्थिनी म्हणून मेधा पाटकर यांची मुलाखत घेतली. ‘तुमच्यासारख्या युवकांनी आंदोलनाला जर एक वर्षं दिलं तर आंदोलन नक्कीच पुढं जाईल,’ असं लतिका यांना पाटकर म्हणाल्या व या वाक्यानं लतिका प्रभावित झाल्या.

धडगाव आणि अक्कलकुवा या भागात आंदोलनाच्या वतीनं ‘जीवनशाळां’चं व इतर काम सुरू होतं. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर इतर कुठली नोकरी न करता लतिका यांनी एक महिना हे काम पाहिलं व वेगळं शिक्षण देणाऱ्या या जीवनशाळांच्या त्या समन्वयक झाल्या. सन २०१२ पासून ते आजपर्यंत त्या हे पद सांभाळत आहेत.

सरकारी शाळा नीट चालत नाहीत म्हणून त्या भागातील मुलांच्या शिक्षणासाठी ‘जीवनशाळा’ हा जीवनाशी जोडलेला एक प्रयोग आहे. सध्या सात शाळांमध्ये ७२५ विद्यार्थी शिकतात. काही शाळांना भेट द्यायला पाच तास चालावं लागतं. या शाळांचं सर्व नियोजन लतिका बघतात.

‘नर्मदा बचाओ आंदोलनां’तर्गत चालणारं सरदार सरोवर प्रकल्पबाधितांचं पुनर्वसन, जमीनखरेदी, आरोग्याच्या व कुपोषणाच्या तिथल्या समस्या, रेशन-रोजगाराचे प्रश्न यांवरही त्यांनी काम केलं असून पुनर्वसनाच्या प्रक्रियेत सरकारशी भांडून जमीन मिळवून देण्यापासून प्रसंगी सहकार्यकर्त्यांसमवेत मोर्चे काढून, निदर्शनं करून आदिवासींचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. किमान दोन हजार प्रसूत महिलांना बुडीत मजुरी, तसंच १५०० आदिवासी शेतकऱ्यांना सिंचनसुविधा लतिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळवून दिली. ‘नवसंजीवनी’ व ‘गाभा’ या कुपोषणासंदर्भात स्थापन झालेल्या जिल्हा समित्यांच्या व राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेतील समितीच्या त्या अशासकीय सदस्य आहेत. समाजशास्त्राच्या पदवीधारक, वकील, तसंच ‘मास कम्युनिकेशन’मधील पदवीधारक असलेल्या लतिका सामाजिक काम करणाऱ्या युवतींसाठी समाजसेवेचं रोल मॉडेल ठराव्यात.

चेतन साळवे (९३०७५७९९०४) हे धुळे जिल्ह्यातील निमगूळ या गावचे. घरची परिस्थिती बेताचीच. घर चालवण्यासाठी व्यवसाय करणं गरजेचं असताना अशी वेगळी वाट निवडून ते आंदोलनात पूर्ण वेळ कार्यकर्ता झाले. अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी अतिशय आक्रमक रीतीनं काम केलं. या आंदोलनात त्यांची गाणी विशेष गाजली...आंदोलनाच्या मागणीनंतर प्रकल्पबाधितांची खरी संख्या निश्चित करण्यासाठी ‘कार्यबल’ची स्थापना करण्यात आली, तर नर्मदेसह तिच्या उपनद्यांना येणाऱ्या पुरामुळे नेमकं किती क्षेत्र पाण्याखाली जाणार यासाठी ‘तलांकनिश्चिती’चं सर्वेक्षण करण्याचं ठरलं. या सर्वेक्षणात चेतन यांचं प्रत्यक्ष योगदान आहे. सरदार सरोवर धरणामुळे प्रत्यक्ष बाधित होत असलेल्या; परंतु शासनाच्या यादीत अस्तित्व नसलेल्या या लोकांचे पुरावे चेतन यांनी गोळा केले. त्यांना तसं घोषित करवून घेऊन त्यांना पुनर्वसनाचे हक्क मिळवून देण्यासाठी चेतन यांनी विशेष प्रयत्न केले. सन २००८ मध्ये जमिनीच्या खरेदीप्रक्रियेत झालेला भ्रष्टाचार शोधून चार दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन व प्रत्येकी १८ लाख रुपये दंड अशी कार्यवाही झाली. त्या वेळी घेतलेल्या परखड भूमिकेमुळे जमीनखरेदीच्या पुढील प्रक्रियेत भ्रष्टाचाराला आळा बसला.

निमगव्हाण व मणिबेली या दोन गावांत गरजेपोटी शाळा सुरू झाल्या. नर्मदेकाठच्या डनेल या गावात ही शाळा सुरू करण्यात चेतन यांनी पुढाकार घेतला. यासंदर्भात गावांमध्ये बैठका घेऊन, लोकांचा सहभाग कसा असावा यावर चर्चा करत, अवघ्या आठ दिवसांत त्यांनी लोकांच्या शंभर टक्के सहभागानं व श्रमदानानं शाळा उभी केली, एकही रुपया खर्च न करता! सन १९९९ मध्ये चेतन यांनी या शाळेत राहून या मुलांना दोन महिने शिकवलंही.

रोजगार हमीच्या कामात मोठ्या प्रमाणावर झालेले गैरव्यवहार त्यांनी अनेक वेळा उघडकीस आणले. या ३५ वर्षांच्या संघर्षात १५ हजार विस्थापित कुटुंबांना जमिनीच्या बदल्यात जमीन देऊन त्यांच्या पुनर्वसनप्रक्रियेत ते सहभागी झाले.

सियाराम पाडवी हे नर्मदा जनआंदोलनानं सुरू केलेल्या पहिल्या जीवनशाळेचे विद्यार्थी आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील डनेल या गावी असलेली त्यांची शेती व घर बुडालं. अशा कुटुंबात असणारे सियाराम शाळेत आले. तिथून धुळे इथं पुढील शिक्षणासाठी गेले आणि बारावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते ‘नर्मदा नवनिर्माण’मध्ये पूर्ण वेळ काम करत आहेत. विद्यार्थी असतानाही ‘लडाई-पढाई साथ साथ’ असं काम त्यांनी केलं. आंदोलन सुरू असताना सियाराम हे पावरा भाषेतून गाणी गात. धरण बांधल्यावर आदिवासींचा मासेमारीवरचा हक्क स्थापित आंदोलनानं प्राप्त करून घेतला व एकूण १८ मच्छिमार सोसायट्या स्थापन केल्या. त्यात आज ८०० मच्छिमार आहेत. या सर्व सोसायट्यांचा त्यांनी संघ तयार केला असून त्या संघाचे सियाराम अध्यक्ष आहेत. सियाराम यांनी प्रयत्न करून ४० नावा, मोटारबोर्ड, पिक-अप व्हॅन संबंधितांना मिळवून दिल्या आहेत...मच्छिमारांना स्वतःच्या पायावर उभं राहायला त्यांनी मदत केली आहे.

जीवनशाळेत शिकलेले खेमसिंह पावरा हेही नर्मदा जन-आंदोलनाचे पूर्णवेळ कार्यकर्ता आहेत. जीवनशाळेत प्राथमिक शिक्षण झाल्यावर नंतर ते बारावीपर्यंत शिकले. आंदोलनात काम करताना जातीच्या दाखल्याबाबत त्यांनी महत्त्वाचं काम केलं. जातीचे दाखले मिळत नसल्यानं शिक्षणासाठी खूप अडचण येई. त्यासाठी योगिनी खानविलकर व इतर सर्व कार्यकर्त्यांनी शासकीय कार्यालयांना कुलूप घातलं व दाखले सुलभ पद्धतीनं देण्याची पद्धत सरकारला सुरू करावी लागली. गावागावात जाऊन फॉर्म भरून घेणं व दाखले पोहोचवणं यासाठी खेमसिंह यांनी पुढाकार घेतला. आतापर्यंत या सर्व कार्यकर्त्यांनी हजारो दाखले मिळवून दिले आहेत.

सन २०१३ मध्ये ‘अभियाना’नं ‘शोभा वाघ छात्रावास सुरू’ केलं. याची जबाबदारी खेमसिंह यांच्याकडे आहे. ते व त्यांच्या पत्नी मीना या विद्यार्थ्यांची काळजी घेतात व नर्मदा जन-आंदोलनाच्या कार्यालयाचं कामही पाहतात. खानोलकर याही कित्येक वर्षं हीच सर्व कामं पूर्ण वेळ करत होत्या, ‘जीवनशाळा’ची कामं बघत होत्या; पण आता त्या कायदेशीर आघाडीवर काम करतात. ‘नवनिर्माण ट्रस्ट’च्या त्या विश्वस्तही आहेत. असे हे मेधा पाटकर यांचे सारे बिनीचे कार्यकर्ते. आंदोलनासंदर्भात पाटकर या देशभर फिरत असताना हे कार्यकर्ते ‘नर्मदा घाटी’त संघर्ष आणि ‘नवनिर्माणा’चं का करत राहतात. तर, सलग दीड दशकापासून काम करणारी अशी ही नर्मदेची लेकरं...

(सदराचे लेखक हे शिक्षण व सामाजिक चळवळींत कार्यरत असून विविध विषयांवर लेखन करतात.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT