हिमालय म्हणजे देवभूमी. इथं देवांचा अधिवास अनादी काळापासून असल्याची अनेकांची श्रद्धा आहे, याच्या खुणा हिमालयात भटकंती करताना अनेकांना दिसतातही. याच हिमालयातील एक ‘महापर्वत’ म्हणजे नगाधिराज कैलास पर्वत. देवांचे देव महादेव यांचं आद्य ठिकाण, जिथं खऱ्या अर्थानं जीवन मोक्ष पावतं असा हा पर्वत. हिंदूच नव्हे तर बौद्ध अन जैन धर्मीयांचं पवित्र स्थान असलेला कैलास पर्वत हा जगभरातील अनेकांसाठी कुतूहलाचा विषय. अगदी दुर्गम भागांत, अति उंचीवर, हिमवर्षावानं नटलेल्या प्रदेशांत कैलास पर्वत वसलेला आहे.
तिबेट, नेपाळ व भारतीय सीमांवर असलेल्या ट्रान्स हिमालयातील अनेक अतिउंच शिखरांपैकी असलेल्या माउंट कैलासची उंची ६ हजार ६३८ मीटर इतकी आहे. या शिखराची रचना चौकोनाकृती असून टेक्टॉनिक प्लेट्सच्या तीव्र हालचालींमुळं असा आकार प्राप्त झाला असावा, असा भूगोल शास्त्रज्ञांचा कयास आहे.
कैलास पर्वताचा संपूर्ण भाग हा काळ्या-पांढऱ्या ग्रॅनाइटनं बनलेला असून शतकानुशतकं हवामानाचा, हिमवृष्टीचा झालेला परिणाम यावर दिसून येतो. पर्वताच्या चारही बाजू हिमानं आच्छादलेल्या असतात. काळ्या-करड्या, रूक्ष वाटणाऱ्या ओसाड डोंगरांच्या मधून उभारलेला पांढराशुभ्र कडा हा सर्वांचंच मन मोहून टाकतो. ग्रॅनाइट किंवा क्रिस्टलचं संस्कृत नाव म्हणजे केलास, अन् या केलासचं सुधारित रूप म्हणजे कैलास. म्हणून या पर्वत शिखराला कैलास नाव पडलं, असं सांगितले जातं.
कैलास पर्वताचं धार्मिक महत्त्व सर्वश्रुत आहे. हिंदू भाविक शेकडो वर्षांपासून कैलास मान सरोवर यात्रा करतात. कैलास शिखर आपल्या उजव्या हाताला ठेवून शिखराच्या भोवती प्रदक्षिणा अर्थात परिक्रमा करून मान सरोवरमध्ये डुबकी घेऊन मनःशांती व मनःशुद्धी करण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. ५६ किलोमीटरहून अधिक अंतर चालत पार करत ही परिक्रमा पूर्ण होते, यात १८- १९ हजार फूट इतक्या उंचीवर देखील जावे लागते.
या खडतर यात्रेसाठी लोक आपले प्राण पणाला लावून कैलासाच्या चरणी धाव घेतात. हा पर्वत शिखर एका अद्भुत ऊर्जेचा स्रोत आहे व यातूनच मोक्ष प्राप्ती होते, असा अनेकांचा विश्वास आहे. हिंदूच नव्हे तर बौद्ध धर्मीय देखील कैलास पर्वताला पवित्र स्थळाचा दर्जा देतात. कैलास पर्वत म्हणजे अध्यात्म्याचा स्रोत व शांतीचं प्रतीक.
जैनांचे पहिले तीर्थंकार रिषभांथा यांनी देखील कैलास पर्वताजवळील अष्टपदा येथे मोक्ष प्राप्ती केली, म्हणूनच हिंदू व बौद्धांप्रमाणं जैन धर्मीय देखील कैलास पर्वताची परिक्रमा करण्यासाठी, अष्टपदा येथे मोक्ष प्राप्तीचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असतात. अर्थात, येथील खडतर हवामान, अतिउंची, प्राणवायूचं असलेलं विरळ प्रमाण यामुळं कैलास यात्रा ही सगळ्यांनाच शक्य होते असं नाही. त्यात चीनच्या अधिपत्याखाली असलेल्या तिबेटमध्ये कैलास पर्वत वसलेला असल्यानं तिथं जाण्यासाठी परवानगी मिळविणं हे अजूनच अवघड जातं.
कैलास पर्वत हा गूढ व अगम्य असण्याची अनेक उदाहरणे आहेत. हा पर्वत म्हणजे पृथ्वीला स्वर्गाशी जोडणारा एक प्रकारचा पूलच. त्यामुळं अद्भुत शक्तींनी या परिसराला वेढलेलं आहे, असं अनेक जण मानतात. पर्वत शिखराच्या पायथ्याशी असलेला ‘मान सरोवर’ हा कोणत्याही ऋतूत एखाद्या स्थितप्रज्ञ ऋषींप्रमाणे स्थिर असतो. या परिसरात गेल्यावर मानवाची वाढ झपाट्यानं होतं, असं मानतात. कैलास मान सरोवर यात्रेहून आलेल्या अनेकांची नखं, केस हे तुलनेनं झपाट्यानं वाढलेली असतात, असं अनेक जण सांगतात. हे सगळं येथील अद्भुत ऊर्जेमुळे होतं, असं म्हणतात.
६ हजार ६३८ मीटर उंच असणाऱ्या कैलास शिखरावर आजपर्यंत एकही गिर्यारोहण मोहीम यशस्वी झाली नाही. म्हणजे कैलास शिखराचा माथा अजूनही मानवासाठी अनवट व अनभिज्ञ आहे. या शिखराला हिंदू, बुद्ध व जैन धर्मीयांमध्ये असलेलं अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदूंसाठी कैलास पर्वत म्हणजे आदी शंकराचे स्थान, हा तोच भाग जिथून पृथ्वी ही स्वर्गाला जोडली जाते. अशा पवित्र ठिकाणी उगीचच लोकांच्या श्रद्धेला आव्हान देऊन अट्टाहासाने चढाई करणे म्हणजे गिर्यारोहण नव्हे, अशी समस्त गिर्यारोहकांची भावना आहे.
इथल्या पावित्र्याचं महत्त्व जपत, लोकांच्या भावनेचा आदर करत गिर्यारोहक देखील कैलास पर्वतासमोर नतमस्तक होतात. याविषयी एकदा जगातील चौदा अष्टहजारी शिखरांवर पहिल्यांदा चढाई करणारे (ती देखील कृत्रिम प्राणवायूच्या मदतीशिवाय) इटलीचे प्रसिद्ध गिर्यारोहक रेन्होल्ड मेस्नर यांना कैलास शिखर मोहिमेविषयी विचारले असता ते म्हणाले, “ज्या पर्वत शिखराशी करोडो लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत, जिथं अनेकांची श्रद्धा असलेला देव वसला आहे, तिथं मी मुद्दामहून गिर्यारोहण मोहीम आखणे, हे मला सुसंगत वाटत नाही. गिर्यारोहणाचा पहिला नियम हाच आहे, की पर्वताचा आदर करणं. कैलास शिखराविषयी माझे मत सुस्पष्ट आहे. मी शिखरावर चढाईचा विचार करण्यापेक्षा नतमस्तक होण्यास अधिक प्राधान्य देईन.'
विशेष म्हणजे १९८० च्या दशकांत चीन सरकारनं रेन्होल्ड मेस्नर यांना कैलास पर्वत चढाई करण्याची परवानगी दिली होती, ती त्यांनी याच कारणांमुळे विनम्रपणे नाकारली.
कैलास पर्वत हा एक गूढ विषय आहे. येथे मिळणारी आत्मशांती, सतत बदलणारे हवामान व सोबतीला येथे जाणवणारी एक अद्भुत ऊर्जा ही कैलास पर्वताला इतरांपेक्षा वेगळं बनवते. हा नेहमीचा पर्वत नाही, असं येथे जाणारे असंख्य लोक सांगतात, मग ते ट्रेकर्स असो वा श्रद्धाळू ! इथे जाणारा व्यक्ती कोणत्याही धर्माचा असो, जगातील कोणत्याही प्रांताचा असो... सगळ्यांनाच कैलास पर्वत अद्भुत जाणवतो, हे मात्र नक्की!
(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक असून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.