India and China communication sakal
सप्तरंग

भारत-चीनदरम्यान हिंदी संवादाचा पूल

भारत आणि चीन अशा दोन्ही देशांना जवळ आणण्यासाठी भाषेची भूमिका फार महत्त्वाची आहे.

विनोद राऊत

बीजिंग आणि त्सिंगहुआ विद्यापीठातल्या भारतीय अध्यासन विभागाचे प्रमुख प्रोफेसर जियांग जिंकोई सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या ४० वर्षांपासून ते हिंदी साहित्याचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. ते अस्खलित हिंदी बोलतात. त्यांच्याशी साधलेला संवाद.

भारत आणि चीन अशा दोन्ही देशांना जवळ आणण्यासाठी भाषेची भूमिका फार महत्त्वाची आहे. भाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे; तर ते सभ्यतेचे, समाजाचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. भारतात कित्येक व्यक्ती इंग्रजी वाचतात; परंतु त्या भाषेत महाभारत, रामायण आहे का? त्यांच्याकडे चहा आहे का? दोन्ही देशांना एकमेकांना समजून घ्यायचे असेल, तर एकमेकांच्या भाषा अवगत करणे, समजणे अत्यंत गरजेचे आहे.

चीनमध्ये चिनी भाषेतील भारतावरील अनुवादित ग्रंथ वाचले पाहिजेत. त्याचप्रमाणे भारतात चीनची हिंदीतील अनुवादित पुस्तके तुम्हाला वाचावी लागतील. हिंदीत रामायण, महाभारत, वेद इत्यादी सर्व काही आहे. भारतीय सभ्यता, मध्यकालीन भक्तिमार्ग, कबीरदास, सुरदास आणि तुलसीदास आहे. दोन्ही देशांना एकत्र आणण्यासाठी भाषा महत्त्वाचे माध्यम आहे. त्यामुळे एकमेकांची भाषा शिकायला हवी.

थेट संवादाची कमतरता

सध्या भारत आणि चीनमध्ये संवादाची कमतरता आहे; मात्र अगदी सातव्या शतकापासून भारत-चीनमध्ये प्रगाढ संबंध आहेत, हे कुणी विसरू नये. कुमारजीव यांनी बुद्धसूत्रांचा अनुवाद चिनी भाषेत केला. त्यानंतर शुजांग यांनी भारतातून आणलेल्या सूत्रांचा चिनी भाषेत अनुवाद केला. हे एक मोठे काम होते. शुजांग जेव्हा चीनमध्ये परतले तेव्हा तत्कालीन चिनी सम्राटांनी त्यांना मंत्रिपद स्वीकारण्याची विनंती केली.

मात्र, भारतातून आणलेल्या सूत्रांचा अनुवाद हेच माझे काम असल्याचे सांगून त्यांनी ते नम्रपणे नाकारले. जुन्या काळात दळणवळण साधनांची कमतरता असूनही दोन्ही देशांचे एकमेकांसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. मग आता हे का शक्य होत नाही, याचा विचार दोन्ही देशांनी करायला हवा.

रवींद्रनाथ टागोर यांच्या चीनभेटीचे सुवर्णवर्ष

चीनमध्ये रवींद्रनाथ टागोर यांना खूप मान आहे. टागोर यांनी १९२४ मध्ये चीनची यात्रा केली. त्या भेटीला यंदाच्या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने चीनमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. परिषद, फिल्म फेस्टिवल आणि व्याख्याने होणार आहेत. रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला त्या वेळी आशियातील चीनवगळता अनेक देश ब्रिटिशांची वसाहत होते.

चीनच्या भेटीत टागोर यांनी सांगितले होते, की भारत-चीनमधील मतभेद कमी होऊ शकत नाहीत; परंतु एकमेकांसोबत बसून चर्चा नक्कीच करू शकतो. चीन आणि भारताची सभ्यता प्राचीन आहे. आपण दोघांनी एकमेकांसोबत चालले पाहिजे. दोन्ही देश पश्चिम संस्कृतीपासून दूर आहेत. दोन्ही देशांच्या सभ्यता एकमेकांनी समजून घेण्याची गरज आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, प्रयत्नात कमी पडलो, हे मी मान्य करतो.

हिंदी साहित्याबद्दल चिनी विद्यार्थ्यांना उत्सुकता

मी पेकिंग विद्यापीठात पहिल्यांदा भारतीय अध्यासन केंद्रात भारतीय धर्म, भारतीय सभ्यता असे अभ्यासक्रम सुरू केले. २०२२ पूर्वी मी पेकिंग विद्यापीठात हे अभ्यासक्रम चालवत होते. २०२२ मध्ये त्सिंगहुआ शिंगुवा विद्यापीठात आलो. चीनमधील टॉपच्या विद्यापीठांत दोघांची गणना होते. सुरुवातीला आमच्याकडे ५० विद्यार्थी होते. हळूहळू विद्यार्थी वाढायला लागले. ५० वरून त्यांचा आकडा १२० ते १५० पर्यंत गेला.

आजपर्यंत अध्यासन केंद्रातून जवळपास दोन हजार चिनी विद्यार्थ्यांनी हिंदी, उर्दू, बंगाली भाषा आणि साहित्याचा अभ्यास केला आहे. त्यावरून मी सांगू शकतो, की चिनी विद्यार्थ्यांमध्ये भारताबद्दल चांगली भावना आहे. त्यांच्यामध्ये भारताला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्यातही चीन समजून घेण्याची इच्छा आहे, असे मला प्रकर्षाने वाटते.

चांगल्या पुस्तकांची कमतरता

चीनमध्ये एकच भाषा आहे. सोबत तिब्बत, कोरिया इत्यादी भाषाही बोलल्या जातात. मात्र, सर्वांना चिनी भाषा समजते. भारतात मात्र असंख्य भाषा आहेत. भारत देश समजून घ्यायचा असेल, तर भारतीय साहित्य वाचायला हवे. त्यासाठी आम्ही रामायण, रामचरित मानस, रवींद्रनाथ टागोर, प्रेमचंद, सुरसागर इत्यादींची पुस्तके आणि भारतेंद्रू यांच्या नाटकांचा चिनी भाषेत अनुवाद करण्याचे काम केले. त्यासाठी निधीची आवश्यकता होती.

मी सरकारला पत्र लिहिले आणि मला तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात आला. आज रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्य, संगीत, कबीरदास आणि प्रेमचंद यांची पुस्तके चिनी भाषेत अनुवादित झाली आहेत. खरे तर पालीसह विविध भारतीय भाषा चिनीमध्ये अनुवाद करण्याची मोठी परंपरा कुमारजीव, शुजांग यांच्यापासून चीनमध्ये आहे. ती सुरू ठेवणे आवश्यक आहे.

भारतात चिनी भाषेबद्दल उत्सुकता कमी

बहुतांश भारतीयांचा इंग्रजी शिकण्याकडे आणि बोलण्याकडे अधिक कल आहे. मात्र आधुनिक चीनबद्दल जाणून घेण्यासाठी ते इंग्रजी साहित्याचा आधार घेतात. पाश्चिमात्य देशांना चीनबद्दल अढी आहे. त्यामुळे इंग्रजी पुस्तके वाचून त्यांचा चीनबद्दल अधिक गैरसमज किंवा फसगत होण्याची शक्यता आहे. चीनला ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे भारतात चिनी पुस्तके आणि साहित्याचा अनुवाद व्हायला हवा.

मात्र, त्याचे प्रमाण दुर्दैवाने कमी आहे. भारतात इंग्रजीनंतर फ्रेंच, जपानी भाषा शिकणाऱ्यांची संख्या जास्त आहे. माझी सर्वांना विनंती आहे, की भारतात भाषांतराचे काम वाढवायला हवे. महत्त्वाचे म्हणजे, एकमेकांच्या देशात भेटीगाठी वाढवायला हव्यात. अनेक भारतीय विद्यार्थी चीनमध्ये शिकत आहेत; मात्र त्या तुलनेने चिनी विद्यार्थी भारतात कमी शिकतात. त्यामागे व्हिसाची अडचण आहे. ती दूर करणे गरजेचे आहे. चायनीज स्टडी सेंटर होते. ते बंद झाले. मला राजकारणाशी घेणे-देणे नाही; परंतु हिंदीप्रमाणे चिनी भाषा समजण्याची गरज आहे.

हिंदीचे प्रेम

हिंदीला मी नव्हे; तर हिंदीने मला निवडले आहे, असे मला कायम वाटते. १९८५ मध्ये मी हिंदी शिकायला सुरुवात केली. मला १९८८- १९९० दोन वर्षे भारतात हिंदी साहित्य शिकण्याची संधी मला मिळाली. हिंदी ही केवळ भाषा नव्हे; तर भारतीय सभ्यता आहे. गेल्या ४० वर्षांपासून मी भारतीय साहित्याचा प्रचार सुरू केला. माझे जीवन मी केवळ हिंदी, भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचा प्रचार अन् प्रसार करण्यासाठी समर्पित केले आहे.

हिंदी साहित्याचा प्रभाव

मध्यकालीन भक्ती साहित्यातच मला आनंद मिळतो. मध्यकालीन साहित्यात कबीरदास, तुलसीदास आणि सुरदास आहेत. या सर्व साहित्यांत प्रेम हा अंत्यत महत्त्वाचा धागा आहे. उदाहरणार्थ, रामात सर्व काही आहे. तो एक चांगला पिता, भाऊ, पती अन् मुलगा सर्व काही आहे. कृष्णाच्या कथेत प्रेम आहे. सर्व भक्ती साहित्यात सर्वांसाठी अगदी जगासाठी प्रेम आहे. माझ्या आयुष्यावर भक्ती साहित्याचा मोठा प्रभाव आहे.

मित्र नाही; तर शत्रू बनायला नको

दोन हजार वर्षांपासून दोन देशांचे एकमेकांसोबत संबंध आहेत. गेल्या काही दशकांपासून ते ताणले गेले आहेत; परंतु ते पुन्हा प्रस्थापित होतील, याची मला खात्री आहे. आज राजकीय संबंध तणावपूर्ण आहेत. मात्र, एकमेकांना समजून घेण्यासाठी पीपल टू पीपल कनेक्ट वाढवण्याची गरज आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या नागरिकांना जास्तीत जास्त व्हिसा देण्याची गरज आहे.

दुसरे म्हणजे आम्ही दोस्त होऊ शकत नाही; तर कमीत कमी एकमेकांचे दुश्मन बनायला नको, अशी बॉटमलाईन दोन्ही देशांची आहे. दोन्ही देशांचे नेतृत्व एकत्र बसून नक्कीच संवाद साधतील. भारत-चीनमध्ये युद्ध होणार, हा पाश्चिमात्य देशांचा अपप्रचार आहे. कारण त्या देशांना भारत-चीन जवळ येणे पसंत नाही. सर्वत्र युद्धाची भाषा सुरू असताना भारत-चीन यांनी आम्हाला युद्ध नको, असे अनेकदा स्पष्ट केले आहे. या दोन्ही देशांना एकमेकांची गरज आहे. दोन्ही देशांतील जनतेच्या मनात भलेही एकमेकांबद्दल वाईट भावना असतील; परंतु त्यांना युद्ध नको, हे स्पष्ट आहे.

चिनी विद्यार्थ्यांना भारतीय नावे!

मी माझ्याकडे संशोधनासाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांना हिंदी नावे देतो. मी माझ्या गुरुजींकडून हिंदी शिकलो; परंतु माझ्या गुरुजींना भारतात जाण्याची संधी मिळाली नाही. मला मात्र ती मिळाली. त्यामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांना भारतीय नाव देतो. मी एकाला कृष्णा नाव दिले. त्यामुळे कमीत कमी त्या विद्यार्थ्याच्या मनात त्या नावामागचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता जागी होते. अशाने भारत-चीन संवादाचा पूल अधिक घट्ट होईल.

vinod.raut@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT