history of Chalukya dynasty capital badami hampi badami Sakal
सप्तरंग

चालुक्यांच्या प्रभावाची बदामी

‘पूर्व मध्ययुगात’ या कालखंडात अनेक राजकीय सत्ता उदयास आल्या, त्यांपैकी एक प्रबळ आणि प्रमुख राजघराणं म्हणजे चालुक्य.

सकाळ वृत्तसेवा

- केतन पुरी

साधारणपणानं इतिहासाचे अनेक कालखंड आपल्याला माहीत आहेत, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. त्यातही, मध्ययुगीन कालखंड हा पूर्व, मध्य आणि उत्तर काळामध्ये विभागला गेला आहे.

ढोबळमानानं इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून ते बाराव्या शतकाच्या अखेरपर्यंतचा काळ हा ‘पूर्व मध्ययुगात’ मोडला जातो. या कालखंडात अनेक राजकीय सत्ता उदयास आल्या, त्यांपैकी एक प्रबळ आणि प्रमुख राजघराणं म्हणजे चालुक्य.

उत्तर कर्नाटकाचा भाग हा प्रभावक्षेत्र असलेल्या चालुक्यांनी नर्मदेपासून ते दक्षिणेत कांचीपर्यंत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. चालुक्यांची मुख्य राजधानी होती ‘बदामी’. चालुक्यांच्या अनेक शाखा दख्खन भागात नांदल्या.

त्यापैकी पश्चिमी चालुक्यांना राजधानीच्या नावामुळं ‘बदामी चालुक्य’ म्हणून इतिहासात ओळखले गेले. महाराष्ट्रातून कित्येक पर्यटक हंपीला जात असतात. बऱ्याच जणांच्या बोलण्यात ‘हंपी-बदामी’ चा एकत्र उल्लेख येतो.

त्यामुळंच लोकांचा असा गैरसमज आहे, की हंपीच्या जवळपास कुठंतरी किंवा हंपीच्या रस्त्यावरच बदामी आहे. पण वास्तवात बदामी हंपीपासून जवळपास दीडशे किलोमीटर लांब आहे आणि बदामी हंपीच्या उत्तरेला आहे. पण सर्रास हंपी आणि बदामीचा उल्लेख एकत्रच होत असल्याचं पाहतो.

बनशंकरी देवीच्या मंदिरामुळंसुद्धा महाराष्ट्रातील बऱ्याच घरांना बदामी माहीत आहे. बदामीचं पुरातन नाव वातापी. अगस्त्य ऋषी, आतापी-वातापी असुर आणि त्यांच्या मिथक कथेचा संबंध या गावाशी जोडला गेला आहे.

इथं असलेल्या भल्यामोठ्या तलावाचं नावसुद्धा ‘अगस्त्य’ आहे. बदामीला राजधानी स्थापन करून राज्य करणारा चालुक्य राजा म्हणजे पहिला पुलकेशी. त्यानंतर त्याचा मुलगा कीर्तिवर्मन आणि मंगलेश गादीवर आले. कीर्तिवर्मनचा मुलगा पुलकेशी दुसरा अतिशय पराक्रमी राजा म्हणून इतिहासात अजरामर झाला. या चारपाच राजांच्याच करकीर्दीत बदामीच्या प्रमुख वास्तूंची निर्मिती झाली असावी.

बदामीचा लालसर टेकड्यांचा प्रदेश अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. घोड्याच्या नालेचा आकार असलेल्या या डोंगरावर पाच लेण्या, काही मंदिरं आणि माथ्यावर भलीमोठी तटबंदी एवढं बांधकाम आजच्या घडीला पाहू शकतो.

तिकीट विक्री केंद्राच्या बाजूलाच काही पायऱ्या चढून वर गेल्यावर आपण पहिल्या लेणीसमोर येऊन थांबतो. बाहेरच्या बाजूला एका नृत्यमग्न शिवाचं-नटराजाचं पाच फुटी शिल्प आणि त्याच्या पायाजवळ गणेशाचं शिल्प कोरण्यात आलंय. आतील बाजूस हरिहर, महिषासुर मर्दिनी, अर्धनारीश्वर शिल्पे आहेत. या लेण्याची रचना मंदिराप्रमाणेच आहे. दख्खन भागात खोदीव मंदिरांची अतिशय शास्त्रोक्त रचना चालुक्य काळात प्रगत झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते.

मंदिराची जशी रचना असते अगदी त्याचप्रमाणे या लेणीतही मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृहाची रचना केलेली आहे. मुखमंडपाच्या मध्यभागी अतिशय सुंदर नागाचं अंकन केलंय.

नागांची अतिसुंदर शिल्पे तयार करावीत तर चालुक्यांनीच. सभामंडपातील एका खांबावर कार्तिकेयाची मूर्ती कोरण्यात आली आहे. ही शैव संप्रदायाला अर्पण केलेली लेणी आहे. दुसऱ्या लेणीकडं जात असताना एक नैसर्गिक लेणीची रचना आपल्या नजरेस पडते. ही लेणी नेमकी कोणत्या संप्रदायाशी संबंधित आहे, याविषयी अभ्यासकांचे मतभेद आहेत.

लेणीच्या मध्यभागी बोधिसत्त्वाचं शिल्प आहे, त्यामुळे काही अभ्यासक या लेणीला ‘बौद्ध लेणी’ म्हणून संबोधतात. दुसऱ्या लेणीमध्ये वैष्णव संप्रदायाशी निगडित अनेक शिल्प आढळून येतात. याही लेणीची रचना मंदिराप्रमाणंच आहे.

मुखमंडपात डाव्या व उजव्या बाजूला अनुक्रमे वराह आणि त्रिविक्रमाचं शिल्प आहे. त्रिविक्रमाचं शिल्प फार सुंदर आहे. बळिराजा आणि वामनाची कथा, शुक्राचार्य वगैरे लोक आणि त्रिविक्रम अवतारातील स्वरूपाचे अतिशय सुंदर चित्रण येथे केलंय. तसेच, समुद्रमंथन आणि कृष्णलीलेतील काही प्रसंगसुद्धा या ठिकाणी कोरले आहेत.

तिसऱ्या क्रमांकाची लेणी अतिभव्य, अतिसुंदर आणि महत्त्वाची आहे. या लेणीमध्ये मंगलेशाचा शिलालेख आहे. इथे चालुक्यांच्या आकर्षक कलेचं दर्शन आपल्याला घडतं. अनंतशायी विष्णूची राजस प्रतिमा, वराह, गदेवर हात टेकून उभा असलेला नृसिंह, त्रिविक्रम अशा प्रचंड मोठ्या आणि आकर्षक मूर्ती आपल्याला भुरळ पाडतात.

या लेणीमध्ये असणाऱ्या व्यालप्रतिमा सुद्धा अतिशय वेगळ्या आणि आकर्षित करणाऱ्या आहेत. लेणीचं छत नैसर्गिक रंगानं रंगवलं होतं, आजही त्याचे अवशेष आपण पाहू शकतो. चौथ्या क्रमांकाची लेणी जैन समाजाला समर्पित करण्यात आलेली आहे.

लेणीमध्ये भगवान पार्श्वनाथांची प्रतिमा आहे. या चारही लेण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे चालुक्यांची शिल्पकला. एकाच रांगेत खोदलेल्या या लेण्या एकाच वेळेस शैव, वैष्णव आणि जैन धर्माचं प्रतिनिधित्व करतात. चालुक्यांच्या राज्यातील धार्मिक प्रभावाची कल्पना यावरून आपण करू शकतो.

या लेण्यांच्या समोर असणारा अगस्त्य तलाव ओलांडून पलीकडच्या बाजूस गेलो, की बदामीचं संग्रहालय लागते. या संग्रहालयातील लज्जागौरीचं भलंमोठं शिल्प पाहणं म्हणजे निव्वळ आनंद. याच संग्रहालयाच्या बाजूनं एक रस्ता डोंगरावर जातो.

त्याच मार्गानं आपण किल्ल्यावर जाऊ शकतो. वाटेत एक शिवालय लागतं. वास्तविक ते गणेशाचं मंदिर असावं, पण गर्भगृहात कोणतीही प्रतिमा अस्तित्वात नाही. किल्ल्यावर जाणारा मार्ग फार सुंदर आहे. या भागात अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालंय.

किल्ल्याच्या माथ्यावर दुसरं शिवालय आहे. मंदिराचे मुखमंडप आणि सभामंडप पडले आहेत पण गर्भगृह आणि शिखर सुस्थितीत आहे. या मंदिरच्या समोरील बाजूस एक पायवाट डोंगराखाली उतरते. याच मार्गावर आपल्याला काही विजयनगर काळातील सुट्या शिल्पांचं दर्शन होतं.

अगस्त्य तलावाच्या एका बाजूस भूतनाथ मंदिर समूह आहे. याच मंदिराच्या मागील बाजूस पल्लव राजा नरसिंहवर्मन याचा शिलालेख आहे. चालुक्य आणि पल्लव यांच्यातील राजकीय संघर्ष हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. या पल्लव राजानं बदामीवर हल्ला केला आणि पुलकेशीचा पराभव केला. त्या विजयानंतर हा शिलालेख त्यानं कोरून ठेवला.

अजंठा, घारापुरी, वेरुळ आणि बदामीच्या शिल्पांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी समानता दिसते. एखाद्या कलेचा आणि कलाकाराचा प्रवास कशाप्रकारे होतो, याचाही अंदाज आपण या माध्यमातून काढू शकतो. पुण्यावरून कोल्हापूर-मुधोळ मार्गे किंवा सोलापूर वरून विजापूर-बागलकोट मार्गे बदामीला सहज पोचू शकतो. बदामीला राहण्याची आणि जेवण्याची सोयसुद्धा चांगली आहे. एकदातरी वाट वाकडी करून चालुक्यांच्या राजधानीला भेट द्यायलाच हवी.

(लेखक हे सध्या पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्त्व या विषयावर पीएच.डी. करत असून, पुरातत्त्वीय पर्यटनाच्या माध्यमातून मंदिर, शिल्प, लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: मतदारांनी विरोधकांना तोंडघशी पाडले, आम्ही विक्रम मोडले, भाजप नेत्याने मविआला डिवचले

Virat Kohli Hundred: विराटने ८१ व्या शतकासह रचले विक्रमांचे इमले अन् नंतर बुमराह-सिराजकडून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी सुरूंग

Ram Satpute :भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर, राम सातपुतेंनी केली 'या' मोठ्या नेत्याच्या हकालपट्टीची मागणी

Jalgaon Assembly Election 2024 Result : मंत्री गुलाबराव पाटील यांची गाडी सुसाट; विरोधक संपण्याच्या मार्गावर

South Maharashtra Election : दक्षिण महाराष्ट्रत महायुतीचा डंका,‘मविआ’चा विचका

SCROLL FOR NEXT