Holi Celebration sakal
सप्तरंग

बुरा तो मानो होली है...

आधीच्या काळी विनोद, व्यंग अन् उपहास होळी निमित्तच व्हायचे. आता बाराही महिने शिमगा सुरू असतो. आता संवेदनशून्य जगात धाडसाने सांगावे लागेल, ‘बुरा तो मानो होली है!’

श्याम पेठकर

आधीच्या काळी विनोद, व्यंग अन् उपहास होळी निमित्तच व्हायचे. आता बाराही महिने शिमगा सुरू असतो. आता संवेदनशून्य जगात धाडसाने सांगावे लागेल, ‘बुरा तो मानो होली है!’

काळ किती बदलला आहे, असे काळाच्या प्रत्येकच टप्प्यावर म्हटले जाते. आजची ‘ड्युड’ तरुण पिढीही, ‘आमच्या लहानपणी...’ म्हणत उसासे टाकतेच. थोड्या फार फरकाने होते तेच. म्हणजे कधी काळी जॉनी वॉकर तरुणींना, ‘पलट तेरा ध्यान किधरऽऽ’ म्हणून छेडत होता, नंतर आमीर खान ‘आती क्या खंडाला?’ असे विचारू लागला. आता आमीरच्याही मुलीचे लग्न झाले आहे.

मात्र, काळ आता बदलला आहे, असे जोर्राने वाटले आताच; कारण परवा आम्ही चार-दोन मित्र भेटलो. एक मित्र त्याच्या बायकोला (चक्क लग्नाच्या) घेऊन आला होता. त्याने ओळख करून दिली तर दुसरा त्याला म्हणाला, ‘किती बॅकवर्ड आहेस, अजूनही आपल्याच बायकोला घेऊन फिरतो...’

काळ कसा बदलत जातो याचे आणखी एक उदाहरण म्हणजे वि. आ. बुवा नावाचे विनोदी लेखक होते. ते एका नियतकालिकात वाचकांच्या वाचाळ प्रश्नांना तसलीच उत्तरे द्यायचे. प्रश्नांनाही दर्जा होता आणि उत्तरे विनोदी वाटत असली तरीही अंतर्मुख करणारी होती. बुवांना विचारले एका वाचकाने, ‘बुवा, आताचा काळ आणि जुना काळ, यात काय फरक आहे?’ तो काळ साधारण १९७५-८०चा असावा. बुवांनी उत्तर दिले, ‘आधीच्या काळात आम्ही लग्न करायचो आणि मग बायकोवर प्रेम करायचो.

आताच्या काळात लोक प्रेम करतात आणि मग लग्न करतात.’ नंतरचा आमच्या पिढीच्या काळात प्रेम केल्यावर लग्न केलेच पाहिजे, असे राहिले नव्हते. अगदी आत्ता, साधारण २०१०च्या आसपास कवी अशोक नायगावकर यांचे एका वृत्तपत्रात प्रश्नांना उत्तरे देण्याचे सदर चालले होते. नायगावकरांनाही तोच प्रश्न विचारला, ‘‘आताचा काळ आणि जुना काळ, यात काय फरक आहे?’’ नायगावकरांनी उत्तर दिले, ‘‘जुन्या काळात लोक आपल्याच बायकोसोबत हनिमूनला जायचे!’’

...तर सांगायचे हेच की, काळ असा बदलत जातो. आता कुणाला खरोखरीच कशाचेच काही वाटेनासे झाले आहे. आधीच्या काळी शिमग्याच्या बोंबा ठोकल्या जायच्या. पोळ्याला झडत्या म्हटल्या जायच्या. होळीला रंग उधळले जायचे. आता ‘२४ बाय ७’ सर्वच क्षेत्रांंत लोक रंगच उधळत असतात. या बोंबा, झडत्यांमध्ये वर्षभर कुणी काय वावगे वागले असेल तर त्याची मस्त झडती घेतली जायची.

आता मात्र बोंबा ठोकायला ‘कब है होली?’ असे विचारावेच लागत नाही. त्या काळात बोंबा ठोकतानाही मार्मिक टिप्पणी करताना तोल सांभाळला जायचा. म्हणजे ‘आंधळ्याला आंधळा न म्हणता सूरदास म्हणायचे’ असे पाळले जायचे. आता सोशल मीडियाचा जमाना आला आहे. माणसांपेक्षा फोन स्मार्ट झाले आहेत. त्यामुळे बोंबा ठोकायला होळीची वाट बघावी लागत नाही. ‘मुह मे आया बक दिया और पेट मे आया तो...’ अशी गत आहे.

ज्याला जेव्हा, जसे वाटेल, तसे-तेव्हा, हव्या त्या प्रमाणात बोंबांची घाण समाजमाध्यमांच्या वॉलवर ओतली जात असते. त्यामुळे जिथे आधी घाण केली जायची तिथे ती होत नाही. सार्वजनिक शौचालये, बाथरूमच्या भिंती आणि समाजमाध्यमांची ‘वॉल’ यात फरक राहिला नाही. त्या भिंतींवर जसे वंगाळ लिहिले जायचे ते आता या वॉलवर लिहिले जाते. त्यामुळे आता सार्वजनिक शौचालये, बाथरूमच्या भिंती तुलनेने स्वच्छ वाटू लागल्या आहेत...

समाजमाध्यमांमुळे तर मस्तच सोय झाली आहे. वर्षभर होळी आणि बोंबा असतात. तेव्हा या बोंबांमधलीही मजा गेली आहे. त्यातली सेन्सिटिव्हीटी संपली आहे. कधी काळी आठवते, की एका होळीच्या पुरवणीत मी एका चकणा डोळा अस्मानात उडवत त्यांच्या साहित्य संघाच्या पार्किंगमध्ये ‘हिलती कार’वाला कारनामा करणाऱ्या साहित्यिकाबद्दल रसाळ भाषेत लिहिले होते.

त्यात थेट वर्णन नव्हते, नाव असण्याचा सवालच नव्हता तरीही ते साहित्यिक महोदय अवमान याचिका दाखल करण्याची भाषा करू लागले. माझा युक्तिवाद हाच की, ‘आत नाव कुणाचेच नाही...’ तर त्यांचे उत्तर हेच, की वर्णन माझेच आहे ना... आयडेंटीफाय होतो ना! म्हणजे बघा त्या काळात लोक किती सेन्सिटिव्ह होते. त्यांना वाईट वाटायचे. कारण त्या काळात लोक केवळ हमाम मेच्च नंगे होते थे... आता तसे नाही, सरेआम लोक ‘तसे’ होतात.

आजकाल सगळेच उलटे सुरू आहे. गावांमधली गोदरी बंद झाली पाहिजे म्हणून सरकारने गोदरीमुक्त गावे, ही योजना राबविली. म्हणजे गावखेड्यातील लोकांनी उघड्यावर घाण करू नये, असे सरकारला वाटते. जेव्हा गावखेड्यातले लोक उघड्यावर शौचाला बसायचे (अजूनही बसतातच) तेव्हा गावातली घरे माणसांचीच असायची अन् गावात कुणाला कुत्रा चावला तर तो कुणाचा आहे, हे ओळखता यायचे. आता तर मुलगा कुणाचा आहे, हे कळत नाही.

मागे मी एका शहरात पत्ता विचारत फिरत होतो. एका घरासमोर एक लहान मुलगा रडत बसला होता. कुणी लक्षच देत नव्हते. घरात भांडणाचे जोरजोरात आवाज येत होते. मी त्याला आपुलकीने विचारले, ‘‘बाळा का रडतोस?’’ इतक्या आपुलकीची त्याला सवय नसावी म्हणून तो आणखीच रडू लागला. मी त्याला विचारले, ‘‘बाळा का रडतोस? कुणाचा मुलगा आहेस तू?

आई-बाबा कोण तुझे? घरात भांडणे कशाची सुरू आहेत?’ तो म्हणाला, ‘तुमच्या दोन्ही-तिन्ही प्रश्नांची उत्तरे एकच आहेत... मी कुणाचा मुलगा आहे, हे ठरविण्यासाठीच भांडणे सुरू आहेत अन् म्हणून मी रडत आहे.’ मला त्या मुलाची खूप कीव आली. वाटले, माय-बाप हा कुणाचा म्हणून भांडत आहेत, या मुलाच्या मनावर काय परिणाम होत असेल... मी त्याला जवळ घेतले, म्हटले, ‘जाऊदे बाळा, मोठ्यांच्या भांडणात लक्ष देऊ नको, त्यांना कळत नाही...’ त्यावर तो मुलगा म्हणाला, ‘त्यांच्या नादानीवर, अज्ञानावरच रडू येतंय मला. काय भांडत बसले, मी त्या दोघांचाही मुलगा नाही...’

...तर त्या म्हणजे अगदी वीसेक वर्षांपूर्वी काळात गावात कुत्रा कुणाचा आहे, हे कळत होते. शहरात मुलगा कुणाचा हेच कळत नव्हते. शहरात घरे माणसांचीच असतात आणि घरावर पाटी असते, ‘कुत्तेसे सावधान!’

आताच्या काळात लोकं एकीकडे नसत्या बाबतीत सेन्सिटिव्ह झालीत अन् बाकी सर्वंकष जाणिवा संपल्यात की काय, अशी स्थिती आहे. आमच्या गावचा बंडूभाऊ म्हणाला, ‘‘तुम्हाले सांगतो, आजची परस्थिती अशी हाय का, जिथं जाव लपाले थोच बसते कापाले...’’ आता त्याच्या या सरळ वाक्यावरही कुणी आक्षेप घेऊ शकतो. आधीच्या काळी, विनोद-उपहास हा होळीला केला जायचा.

महामूर्ख संमेलने भरविली जायची. आता तसे राहिले नाही. महामूर्ख संमेलने होत नाहीत होळीला, अशी खंत आमच्या एका मित्राने फेसबुकवर व्यक्त केली. आता महामूर्ख संमेलने तशीच सुरू असतात. त्यासाठी होळीची वाट कशाला बघावी लागते? राजकारणात तर सर्रास ते सुरू असते.

बरे शहाण्यांचा मूर्खपणा दाखविला की ते समंजसपणे ती टीका घेत सुधारणा करतात. वेड्यांना वेडा म्हटले, की ते चिडतात. आक्रमक होतात. आधीच्या काळी होळीला शहाण्यांचा मूर्खपणा दाखविला जायचा. आता शहाणे फारसे राहिलेच नाहीत. मूर्ख बेटे कधी कधी शहाण्यांसारखे वागतात आणि त्यांना त्यांचा शहाणपणा दाखवून कौतुक केले की भडकतात... आमची बदनामी करून राहिले म्हणतात.

मी कधी काळी टीव्हीवर ‘टिकल ते पोलिटिकल’ या प्रहसनात्मक कार्यक्रमात लिहायचो. आता तसले कार्यक्रम होऊच शकत नाहीत. कारण त्याच काळात ‘घडलंय-बिघडलंय’ या कार्यक्रमावर एका नेत्याच्या समर्थकांनी हल्ला चढविला अन् स्टुडिओची तोडफोड केली. त्यानंतर असले सामाजिक, राजकीय व्यंग दाखविणारे कार्यक्रम बंदच झाले.

व्यंगचित्रकारांना अटक केली जाऊ लागली. अगदी अर्थाचा अनर्थ अन् पाण्याचा पदार्थ केला जाऊ लागला. आता हेच पाहाना, एका व्यंगचित्रकाराने सहज व्यंगचित्र काढले, डुकरीण आपल्या पिलासोबत ‘चरते’ आहे. पिल्लू विचारते, ‘आई माणसं काय खात असतील गं?’ डुकरीण त्याला रागावते अन् म्हणते, ‘जेवताना घाण गोष्टींची आठवण का करतोस?’ आता यात काय होते? पण एका नेत्याने त्या व्यंगचित्रकाराला आपल्या समर्थकांसह मारले अन् त्याच्यावरच केस टाकली.

पोलिसांनीही त्याला अटक केली. का? तर नेत्याचे म्हणणे हेच की, ‘हे माझ्यावर कॉमेंट आहे.’ डुकरांचा अन् तुमचा काय संबंध? तर म्हणे, त्याच्या विरोधकाने त्याला गेल्याच आठवड्यात डुक्कर म्हटले होते. शहराच्या घाणसफाईच्या कामातही त्याने पैसे खाल्याचा आरोप होता. पोलिसांनीही जावईशोध लावला की, त्या व्यंगचित्रकाराने डुकराचा चेहरा अगदी त्या नेत्यासारखा काढला (!)

आधीच्या काळी कसे विनोद, व्यंग, उपहास होळीलाच व्हायचे. जसे चमचमीत पदार्थ केवळ दिवाळीला व्हायचे. बाराही महिने देशीच नव्हे; तर जगातले कुठलेही चमचमीत पदार्थ केव्हाही, कधीही मिळतात. कपडे खरेदीचा दिवाळीचाच मौसम राहिला नाही. तसेच व्यंग-विनोदालाही होळीच हवी असे नाही. राजकारणात तर सतत शिमगा सुरू असतो. म्हणून आता जसा होळीलाच विनोद असे राहिले नाही, बारोमास तो सुरू असतो.

कुठल्याही मनोरंजन वाहिनीवर एकतरी विनोदी कार्यक्रम असतोच. मात्र, त्यातले विनोद सपक झाले आहेत. केवळ शाब्दिक कोट्या अन् त्याही अगदीच मिळमिळीत. समाजाचे, सांस्कृतिक बाबतीतले, प्रशासनाचे दोष दाखविणारे विनोद नाही करायचे. राजकारणावर स्कीट नको... कारण आम्हाला सहन होत नाही.

म्हणून विनोद बाराही महिने आहे; पण अगदीच ‘मुंगी स्विमिंग टँकमध्ये का पोहत नव्हती? हत्ती उतरला होता...’ असले करुणा दाटून यावेत, असे विनोद केले जातात. एकमेकांच्या शारीरिक व्यंगावरच मग यांना विनोद करावे लागतात. पुरुषांना सतत साड्या नेसवून भद्दी विनोदनिर्मिती करावी लागते. त्यामुळे विनोद नि:सत्व झाला आहे. चुकणाऱ्याचे कान टोचणारा विनोद राहिलाच नाही.

एकीकडे असे सुमारीकरण होत असताना कुणाला कशाचेच काही वाटेनासे झाले आहे. राजकारणातच नव्हे; तर सार्वजनिक जीवनातही कोण कुणासोबत कधी बसेल, काहीच सांगता येत नाही. खोके, बोके, झोके सगळेच कसे ओक्के झाले आहे. त्यामुळे होळीच्या दिवशी कधी काळी विनोद करताना न्यून दाखवत, हसत-हसवत चुका दाखविताना, मर्मावर बोट ठवताना सांगावे लागे, ‘बुरा ना मानो होली है.’

आता एकूणातच लोक इतके मोबाईलमग्न झालेत, आभासी जगात हरविलेत आणि त्यामुळे राजकारणातील कर्ती मंडळी इतकी संवेदना हरवून बसली आहे की आता होळीच्या त्या जुन्या बोंबा ठोकणे सुरू करावे लागेल धाडसाने अन् सांगावे लागेल, ‘बुरा तो मानो होली है!’

pethar.shyamrao@gmail.com

(लेखक प्रसिद्ध नाटककार आणि कथाकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT