human body organs and health doctor heart attack case  Sakal
सप्तरंग

अवयवांची सभा

लिफ्ट बंद असल्याने सातव्या मजल्यापर्यंतच्या पायऱ्या चढत त्या व्यक्तीनं घर गाठला, दारावरची बेल वाजवली. बायकोने दार उघडल्यावर ती व्यक्ती घरात पाय ठेवणार इतक्यात त्याला अटॅक आला आणि काही कळायच्या आतच ती व्यक्ती धाडकन दरवाजातच कोसळली.

सकाळ वृत्तसेवा

- प्रा.विशाल गरड

एकदा काय झालं, एक व्यक्ती ऑफिस सुटल्यावर त्याच्या गाडीजवळ आली. दोनतीन वेळा स्टार्टर मारला तरी गाडी सुरू न झाल्याने त्याने लागलीच मेकॅनिकला फोन करून बोलावले. काही वेळानं मेकॅनिक आला आणि गाडीचं इंजिन चेक करून गाडीची तत्काळ सर्व्हिसिंग करण्याची सूचना केली.

त्या व्यक्तीनं परवानगी दिल्यानंतर मेकॅनिकने गाडी गॅरेजला नेली. गाडीच्या मालकाने जवळचे लोकल स्टेशन गाठले आणि लोकलच्या गर्दीतून वाट काढत काढत प्रचंड दगदगीनंतर तो घरी पोहोचला. लिफ्ट बंद असल्याने सातव्या मजल्यापर्यंतच्या पायऱ्या चढत त्या व्यक्तीनं घर गाठला, दारावरची बेल वाजवली. बायकोने दार उघडल्यावर ती व्यक्ती घरात पाय ठेवणार इतक्यात त्याला अटॅक आला आणि काही कळायच्या आतच ती व्यक्ती धाडकन दरवाजातच कोसळली.

बायको प्रचंड घाबरून गेली. आरडाओरडा करायला लागली पण अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या माणसांच्या घराचे दरवाजे बंद असल्याने लवकर आवाज पोहोचला नाही. दहा-पंधरा मिनिटांनंतर खालचा वॉचमन पळत आला. बायकोने ॲम्बुलन्सला फोन केला पण ट्रॅफिकमुळे जवळजवळ पाऊण तासाने ॲम्बुलन्स घरी पोहोचली.

अटॅकनंतर सुमारे दोन तासांनी त्या व्यक्तीला दवाखान्यात पोहोचवायला यश आले. डॉक्टरांनी सर्व चेकअप केल्यानंतर रक्तवाहिन्यात ब्लॉकेज असल्याचे सांगितले. त्यांच्यावर तत्काळ अँजिओप्लास्टी करावी लागेल. बायकोच्या परवानगीने त्या व्यक्तीला लगेच ऑपरेशन थिएटर मध्ये घेतले आणि त्याची अँजिओप्लास्टी झाल्यावर खबरदारी म्हणून त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं.

तो बेशुद्ध अवस्थेत असताना त्याच्या शरीरातील सर्व अवयवांनी बाहेर येऊन सभा भरवली आणि घरातून इथपर्यंत यायची वेळ त्याच्यावर का आली ? याची कारणे देऊ लागले. सभेच्या अध्यक्षस्थानी अर्थातच मेंदू असल्याने त्याच्यासमोर प्रत्येक अवयवाने आपापल्या तक्रारींचा पाढा वाचून दाखवायला सुरुवात केली.

हृदय : अध्यक्ष महोदय, माणूस त्याची गाडी नीट चालावी म्हणून सर्व्हिसिंग करतो पण शरीराच्या सर्व्हिसिंगकडे मात्र साफ दुर्लक्ष करतो. अहो, माझ्या आरोग्यासाठी मी दिवसभरातील फक्त पंचेचाळीस मिनिटे तरी त्यानं चालावं म्हणून विनंती करतो पण हा माणूस ऑफिसच्या तीन पायऱ्या आणि गाडीपर्यंतच्या पाच-पन्नास पावलांव्यतिरिक्त चालत नाही.

माझ्या नाकातोंडात घाण साचल्याने मी पूर्ण क्षमतेने रक्ताभिसरण करू शकत नाही. याआधीही त्याला तीनचार वेळा धाप लावून दिली पण तरीही यानं दुर्लक्ष केलं. त्याचवेळी चेकअप केलं असते तर आज इथं असं पडून राहायची वेळ आली नसती.

तोंड : माझ्यावर तर प्रचंड अत्याच्यार सुरू आहे. जे कधी चघळायला नको होतं त्याच गुटखा, मावा, खर्रा मधील सुपाऱ्यांना रवंथ केल्यासारखं चघळत बसावं लागतं. त्या कामात माझी कितीतरी लाळ रोज वाया जाते. शिवाय इकडं तिकडे भिंतीवर रस्त्यावर थुंकून घाण झाल्यानं मनाला वाईट वाटतं पण हा माणूस ऐकेल तर नवलच. तंबाखू आणि सिगारेटचं याला इतकं वेड लागलंय की एक वेळ जेवण नसलं तरी चालेल पण या गोष्टी याच्या खिशात हमखास सापडतील.

पाय : माझा तर उपयोग नेमका चालण्यासाठी आहे का गाडींचे क्लच आणि ब्रेक दाबण्यासाठी आहे, हेच समजत नाही. दिवसाकाठी थोडेही चालत नाही हा माणूस. जरा कुठं मोकळं व्हावं म्हटले की हा मटकन बसतो जाग्यावर. घरात सोफ्यावर बसतो, बाहेर जाताना गाडीत बसतो, ऑफिसात खुर्चीवर बसतो आणि घरी आल्यावर बेडवर झोपतो. माझी तर चालायची सवयच मोडली आहे. किती वर्ष झाली मी तळपायाची जाड त्वचा जमिनीला टेकवलेलीच नाही. मातीशी संपर्क येऊन कित्येक महिने लोटलेत.

यकृत : माझ्यावर तर नुसता अल्कोहोलचा पाऊस सुरू आहे. अरे माझी क्षमता किती, आकार किती, वजन किती आणि तरीही आजवर मी या माणसाच्या दिवसाकाठी दोन दोन तर कधी तीन तीन क्वार्टर पचवत आलोय. याच्या गाडीत तो प्रमाणापेक्षा जास्त ऑइल नाही टाकत, प्रमाणापेक्षा जास्त पेट्रोल नाही टाकत पण पोटात मात्र दारू टाकण्याचे याचं प्रमाण वरचेचर वाढतच चाललंय. वीकएण्डला तर याची मौज होते पण दोन दिवस मला ओव्हरटाइम करावा लागतो.

पोट : अरे माझी गत तर त्या कचराकुंडीपेक्षा बेकार झाली आहे. कारण कचरा कुंडीत फक्त एखाद्या वस्तूची आवरणे पडतात पण त्यात असलेला सगळा पदार्थ मलाच पचवावा लागतो. कसली कसली प्रिझर्वेटिव्ह, शीतपेयांमधली साखर, मैदा आणि चुकीच्या तेलानं पुरती वाट लावली आहे. अहोरात्र काम केलं तरी या माणसानं पोटात टाकलेला लोड वेळेत पचवणे आता मला कठीण जात आहे. त्यात हा माणूस ऑफिसमध्ये रोज दहा-बारा कप चहा पितो. त्याची साखर पचवण्यातच माझी ऊर्जा खर्च होते.

किडनी : माझ्यावर कामाचा इतका लोड झालाय, की या माणसाच्या रक्तात इतक्या प्रमाणात गोळ्या आणि ड्रग्ज आहेत की त्याला फिल्टर करता करता आम्ही वैतागून जातोय. याच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर उत्सर्जित करून करून शेवटी आम्ही दमून जातो पण रक्त अशुद्ध करण्याऱ्या गोष्टी ग्रहण करण्यात हा माणूस काही दमत नाही. आता आम्हीही निकामी होण्याच्या मार्गावर येऊन ठेपलो आहोत. सगळ्यांचे ऐकून घेतल्यावर शेवटी मेंदू बोलू लागतो.

मेंदू : अरे, मी तर तुम्हा सगळ्यांचा मॅनेजर आहे पण आज तुमच्या सर्वांच्या अडचणी समजून घेता घेता, डोळ्यांनी आणि कानांनी माझ्यात शिरलेला स्ट्रेस दूर करता करता रक्तवाहिन्या फुटण्याची वेळ आली आहे, तुम्ही सर्व जण रात्री आराम तरी करतात पण मला मात्र दोन शिफ्टमध्ये काम करावं लागते.

स्वतःच्या अडचणी दूर करत करत तुम्हाला सूचना देऊन शक्य तो प्रयत्न करून माणूस जिवंत ठेवावा लागतो. पण माणसाला माझ्या कामाची कदर नाही. भौतिक वस्तूंच्या आमिषापोटी तो पैशांच्या इतके मागे लागलाय की त्याचे अवयव हीच त्याची सर्वोच्च संपत्ती असल्याचे तो विसरलाय. निर्जीव वस्तूंना जीव लावायलाय, झोप हे माझ्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची पण हल्ली रात्री सुद्धा तो कामच करत बसायलाय. कधी सुट्टी असली तर लेट नाइट पार्ट्या करायलाय आणि रात्र रात्र जागून वेबसीरिज बघायलाय.

मेंदूचे बोलणे ऐकून झाल्यावर सर्व अवयवांनी त्यालाच विनंती केली, की त्याने माणसाला योग्य ती समज द्यावी. अवयवांचा ठराव झाल्याने मेंदू माणसाला अखेरचा निर्वाणीचा इशारा देत म्हणाला, “हे बघ माणसा, तुझ्या जन्मापासून आजतागायत विनामोबदला तुला अविरत सेवा पुरवतोय.

जेवढी काळजी तू तुझ्या गाडीची घेतोस तेवढीच जर आमची घेतलीस, तर तुला पुन्हा दवाखान्याची पायरी चढण्याची वेळ आम्ही तुझ्यावर आणणार नाहीत. मला माहीत आहे स्टॉक वर तुझा पन्नास लाखांचा पोर्टफोलिओ आहे, या शहरात उच्चभ्रू सोसायटीत तुझे तीन फ्लॅट आहेत, तुझ्या बँक अकाउंटमध्ये करोडो रुपयांच्या ठेवी आहेत.

तुझ्याकडे पस्तीस लाखांची कार आहे. पण जर तू इथून पुढे आमची काळजी घेणार नसशील, तर या वेळी तुला निदान दवाखान्यापर्यंत पोहोचण्याची तरी मुभा दिली. पुढील अटॅकला दुसरा श्वास घेण्याचीही उसंत देणार नाही. पडल्या ठिकाणाहून थेट तुझी रवानगी स्मशानात असेल. याद राख.”

(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT