India recently recorded total of 104561 species of animals first country in the world  Sakal
सप्तरंग

प्राणिविश्वाचा अमूल्य ठेवा

अवतरण टीम

- केदार गोरे

देशात आढळणाऱ्या प्राण्यांच्या एकूण १,०४,५६१ प्रजातींची नोंद भारताने नुकतीच केली. अशी कामगिरी करणारा भारत जगातील पहिलाच देश. साहजिकच जैववैविध्याची नोंद करण्याच्या क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करू शकतो, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या देशातील प्राणिविश्वाच्या अमूल ठेव्याची नोंद संशोधक, प्राध्यापक, अभ्यासक आणि धोरणकर्त्यांना नक्कीच उपयोगी ठरू शकते.

काही दिवसांपूर्वी भारतीय प्राणी सर्वेक्षण (झूऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया - झेडएसआय) संस्थेने भारतात आढळणाऱ्या समस्त प्राणिमात्रांच्या संकलित केलेल्या सूचीचे वन आणि पर्यावरण मंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

एकूण १,०४,५६१ प्रजातींची विस्तृतपणे सूची तयार करणारा भारत जगातील पहिला देश ठरला, याचे विशेष कौतुक करायला हवे. भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था १९१६ पासून नित्यनेमाने प्राणिमात्रांच्या नोंदी करत आहे आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सूचीचे काम वर्षानुवर्षे भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था व इतर अनेक संस्थांच्या शास्त्रज्ञांशी चर्चा करून, शेकडो शोध निबंधांच्या संदर्भातून आणि नोंदी तपासून केले असावे, यात शंका नाही.

अभिमान वाटावा असा मैलाचा दगड भारताने गाठला आहे. अनेकांना भारतात प्राण्यांच्या इतक्या प्रजाती आहेत याचे आश्चर्य नक्कीच वाटले असेल; परंतु आपण जर भारताची जैवविविधता, भौगोलिक स्थिती, परिसंस्थांचे प्रकार इत्यादी सगळ्यांच्या थोडे खोलात शिरलो तर काही गोष्टींचा अधिक चांगल्या प्रकारे उलगडा होईल.

जगाच्या पाठीवर सुमारे ३.२९ दशलक्ष चौरस किमीपेक्षा जास्त पसरलेला भारत, विलक्षण जैवविविधतेसाठी सुप्रसिद्ध आहे. पृथ्वीतलावरील फक्त २.४ टक्के भूभाग व्यापूनसुद्धा, जगातील सुमारे ७ ते ८ टक्के वनस्पती आणि प्राणी प्रजातींची आतापर्यंत भारतात नोंद झाली आहे.

हिमालयापासून ते पश्चिम घाटापर्यंत आणि किनाऱ्यावरील खारफुटीपासून पानझडीच्या जंगलांपर्यंत, भारतात दहा प्रमुख जैव-भौगोलिक प्रदेश आहेत. उत्तरेकडील हिमालय पर्वत रांगा, वायव्येकडील विशाल उष्ण वाळवंट, ७५०० किमी लांबीचा समुद्रकिनारा, पूर्वेकडील घनदाट खारफुटी वने, मध्य भारतापासून पसरलेली डेक्कन द्वीपकल्पावरील पानझडी जंगले,

अंदमान आणि निकोबार बेटांसभोवताली पसरलेली प्रवाळांची विस्तीर्ण बेटे आणि पश्चिम घाट अन् पूर्व हिमालयातील सदाहरित जंगले; याशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या परिसंस्था जसे की, थंड वाळवंट, सवाना गवताळ प्रदेश आणि विस्तीर्ण सागरी क्षेत्र अन् त्यात आढळणारे समुद्री जीवांचे अद्‍भुत विश्व या सर्व अलौकिक नैसर्गिक ठेव्यांच्या जोरावर भारत जगातील काही मोजक्या निसर्गसंपन्न देशांच्या यादीत अनेक वर्षांपासून आपले स्थान राखून आहे.

देशाच्या काही भागांत अजूनही दुर्गम जंगले आहेत आणि शास्त्रज्ञ अजूनही उभयचर, सरपटणारे प्राणी, कीटक, खेकडे, मासे आणि पक्ष्यांच्या नवीन प्रजाती शोधत आहेत. हे सर्व इतके विस्मयकारक आहे, की भारताची गणना जगातील सर्वात ‘मेगा’ जैवविविधता आढळणाऱ्या देशांमध्ये केली जाते.

जगभरातील सुमारे ३६ जैवविविधता ‘हॉटस्पॉट’पैकी भारतात चार आहेत - गुजरातपासून केरळपर्यंत १६०० किमीवर पसरलेला ‘पश्चिम घाट’, काश्मीर ते अरुणाचल प्रदेश असा विस्तीर्ण प्रदेश व्यापलेली ‘हिमालय पर्वतरांग’, ब्रह्मपुत्रेच्या दक्षिणेकडील ईशान्य भारत (आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि अंदमान द्वीपसमूह...

येथील प्रदेश ‘इंडो-बर्मा’ म्हणून ओळखला जातो) आणि निकोबार द्वीपसमूहाचा भूभाग ‘सुंडालँड’ हॉटस्पॉटचा भाग आहे. या सर्व जैवविविधता हॉटस्पॉट्समध्ये अनेक प्रदेशनिष्ठ प्रजाती सापडतात. काही प्रजाती फक्त भारतात; तर काही भारतीय उपखंडात आढळून येतात... जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत!

भारतातील प्रत्येक नैसर्गिक परिसंस्था, मग ती जैवविविधता हॉटस्पॉट्सचा भाग असो व नसो, अद्वितीय निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी वाघ, सिंह, हत्ती किंवा गेंडा यांसारखे मोठे प्राणी असतीलच असे नाही; परंतु १,०४,५६१ प्रजातींपैकी अनेक लहान-मोठ्या-सूक्ष्म प्राण्यांचा अधिवास आढळून येतो.

जागतिक प्रदेशनिष्ठता (Endemism) क्रमवारीत भारत पक्ष्यांच्या ६९ प्रजातींसह दहाव्या स्थानावर आहे, १५६ प्रजातींसह सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये पाचवा आणि ११० प्रजातींसह उभयचरांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. ‘आययूसीएन’च्या रेड लिस्टनुसार, आतापर्यंत भारतात ७५८ प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजाती जागतिक स्तरावर धोकाग्रस्त आहेत.

भारतातील सस्तन प्राण्यांच्या १२६, पक्ष्यांच्या १९३, उभयचरांच्या ६६, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ३०, माशांच्या १२२, अपृष्ठवंशी प्राण्यांच्या ११३ आणि वनस्पतींच्या २५५ प्रजाती धोकाग्रस्त म्हणून घोषित झाल्या आहेत, ही अतिशय चिंताजनक बाब आहे.

पश्चिम घाटातील काही पर्यावरणदृष्ट्या अतिमहत्त्वाचे भाग ‘युनेस्को जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित झाले आहेत. निलगिरी लंगूर, लायन टेल्ड मकाक, ब्राऊन पाम सिव्हेट, मलबार सिव्हेट, निलगिरी मार्टेन, त्रावणकोर फ्लाइंग स्क्विरल आणि वेस्टर्न घाट स्ट्रीप स्क्विरल हे काही सस्तन प्राणी आहेत जे पश्चिम घाट प्रदेशनिष्ठ आहेत.

२०१४ मध्ये पश्चिम घाटात बेडकांच्या एकूण ४१ नवीन प्रजातींचा शोध लागला. मलबार ग्लायडिंग फ्रॉग, आंबोली बुश फ्रॉग, कोयना टोड, कोकण टायगर किंवा आंबोली टोड आणि बॉम्बे सिसिलिअन या उभयचरांच्या काही प्रजाती आहेत ज्या पश्चिम घाट प्रदेशनिष्ठ आहेत. २०२१ मध्ये संशोधकांच्या गटाने महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील हिरण्यकेशी नदीतून लोच माशाची एक नवीन प्रजाती शोधली.

गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या ६२ प्रजाती पश्चिम घाटातून सापडल्या आहेत. ‘वरदिया ॲम्बोलिएन्सिस’ या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी अतिशय सुंदर निशाचर गोगलगाय निसर्ग अभ्यासकांच्या चौकस नजरेमुळे जगासमोर आली. भारतात नोंद झालेल्या ४५५ सस्तन प्राण्यांच्या प्रजातींमधील १११ महाराष्ट्रात आढळतात. जगातील एकूण ११,१८८ पक्ष्यांच्या प्रजातींपैकी १,३५८ भारतात आढळतात; तर त्यातील ५५५ प्रजाती महाराष्ट्रात सापडतात.

अजूनही भारतातील अनेक भाग (पश्चिम घाट, ईशान्य भारत, हिमालयाचे दुर्गम भाग आणि अंदमान-नोकोबार द्वीपसमूह) शास्त्रज्ञांनी पुरेसा अभ्यासलेला नाही. अनेक प्रजाती अस्तित्वात असूनही विज्ञानाच्या माहितीकक्षेच्या पलीकडे आहेत, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या सूचींतून भारतातील प्राणिविश्वाचा अनमोल ठेवा जगासमोर आला आहे; परंतु आता तो जपण्यासाठी भारत कोणत्या उपाययोजना आखून त्यांची अंमलबजावणी करतो, याकडे सर्वांचे लक्ष राहील. शास्त्रज्ञ नवनव्या प्रजाती शोधत असतात, तेव्हा त्या सूची अद्ययावत ठेवणे क्रमप्राप्त ठरेल. या उपक्रमाचा उपयोग प्रजाती आणि त्यांच्या अधिवासाचे संवर्धन करण्यास व्हायला हवा.

भारताने आपल्या जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी संरक्षित क्षेत्रांचे (१०६ राष्ट्रीय उद्याने, ५७३ वन्यजीव अभयारण्ये, १२३ संवर्धन राखीव आणि २२० सामुदायिक राखीव) जाळे स्थापित केले आहे, ज्यात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या फक्त ६ टक्के क्षेत्राचा समावेश आहे.

भारत सरकारने माळढोक, डुगॉन्ग, सांगाई डीअर, गँजेटिक डॉल्फिन, एशियाटिक सिंह, सागरी कासवे, रेड पांडा, क्लाऊडेड बिबट्या, कॅराकल, मलबार सिव्हेट, हिम बिबट्या इत्यादी धोक्यात असलेल्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलली आहेत.

१९७३ मध्ये सुरू करण्यात आलेला ‘प्रोजेक्ट टायगर’ हा भारताचा पहिला प्रजाती विशिष्ट संवर्धन कार्यक्रम होता. गेल्या ५० वर्षांच्या प्रयत्नांमुळे जगातील १३ वाघ आढळणाऱ्या देशांपैकी भारताने निःसंशयपणे व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे; परंतु, भारतात आणखी अधिवास व परिसंस्था आहेत ज्यांना संरक्षित क्षेत्रांच्या यादीत स्थान मिळालेले नाही.

या सर्व परिसंस्थांना प्रयत्नपूर्वक संवर्धन कायक्रमांमध्ये सामावून घेण्याची आवश्यकता आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी भारतातील वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी आतापर्यंत केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत; पण दुर्दैवाने अनेक प्रजाती नष्ट होण्यापासून आणि त्यांच्या अधिवासांचे कायमस्वरूपी विनाश होण्यापासून ते अपुरे पडले आहेत.

प्रभावी संवर्धनासाठी स्थानिक समुदाय, प्रशासन, उद्योगसमूह आणि धोरणकर्त्यांसह विविध भागधारकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. नोंदल्या गेलेल्या १,०४,५६१ पैकी फक्त २१५० प्रजातींचाच वन्यजीव संरक्षण कायद्यात समावेश करण्यात आला आहे. बाकी प्रजातींची अस्तित्वाची झुंज दुर्दैवाने ‘होमो सेपियन्स’ (मानव) या प्रजातीच्या अवास्तव गरजा, अशाश्वत विकास, मानवी अनास्था या वृत्तींशी आहे हे कटू सत्य विसरून चालणार नाही.

gore.kedar@gmail.com (लेखक वन्यजीव अभ्यासक आहेत आणि गेल्या दोन दशकांहून अधिक काळ वन्यजीव संवर्धनात कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT