Nitin Chandrakant Desai  esakal
सप्तरंग

Nitin Desai : ‘नितीन देसाई आणि काही उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापकीय धडे ’

दुर्दैवी घटनेचे उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापकीय कंगोरे बरेच असू शकतात जे बारकाईने पहायला हवेत.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. गिरीश जाखोटिया

जोधा अकबर, लगान या हिंदी चित्रपटांना व ‘कौन बनेगा करोडपती’ सारख्या ज्ञानवर्धक कार्यक्रमासारख्या भव्य, व्यावसायिक व वित्तीय फायद्याच्या हिंदी उपक्रमांना आपल्या कलात्मक दृष्टीचा आणि स्टुडिओचा आधार देणाऱ्या नितीन देसाईंनी आत्महत्या करीत स्वतःचे अमूल्य जीवन संपवले.

ही घटना प्रचंड दुःखद तर आहेच, परंतु ती भावनिक गुंतवणूक बाजूला ठेवून अभ्यासनीयही आहे. या दुर्दैवी घटनेचे उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापकीय कंगोरे बरेच असू शकतात जे बारकाईने पहायला हवेत.

विशेषतः वेगळी वाट चोखाळणाऱ्या महाराष्ट्रीय उद्योजकांनी या प्रसंगी हे विश्लेषण कठोरपणे करायला हवे. नितीन देसाईंच्या कंपनीचे बिझनेस मॉडेल ( उद्योगाचा ढाचा) व अर्निंग मॉडेल (वित्तीय ढाचा) यांची विस्तृत माहिती उपलब्ध नाही.

यास्तव काही गोष्टी इथे तर्काने मांडाव्या लागतील. कोरोना महासाथीचा धक्का बसण्यापूर्वी सन २०१६ व २०१८ मध्ये देसाईंनी १८५ कोटींचे कर्ज एडेलवेस समूहाच्या ईसीएल या वित्तपुरवठा कंपनीकडून घेतले होते. ही रक्कम नंतर व्याज धरून सन २०२३ मध्ये २५२ कोटींवर पोहोचली.

कोरोनातील एकूणच ठप्प झालेल्या उद्योजकीय घडामोडींमुळे जानेवारी, २०२० पासून देसाईंच्या कंपनीला परतफेडीची अडचण भेडसावू लागली. यातून मार्ग काढण्याचे त्यांनी अनेक प्रयत्न केले परंतु बहुधा दिवाळखोरीच्या शक्यतेने त्यांनी आपल्याच उत्तुंग कारकिर्दीची दुर्दैवी अखेर केली.

कलात्मक डिझाइन्स व कल्पनांचे पेटंट्स आणि कॉपी राईट्स घेतल्यास अशा ''इनटॅन्जीबल'' मालमत्तेचे मोठे वॅल्युएशन त्यांच्या ''अर्निंग पॉवर'' नुसार होऊ शकते जे तारण म्हणून वापरता येते.

तीन वर्षांच्या कालावधीत छोट्या महाराष्ट्रीय ठेवीदारांना आवाहन करून योग्य व्याजदराने जर ठेवी मिळवता आल्या असत्या तर इसीएलचे कर्ज फेडता आले असते. दिवाळखोरीचा भावनात्मक ताण न घेता व्याज माफ करवून घेऊन न्यायालयातून कर्जफेडीचे दीर्घमुदतीचे हफ्ते मिळवता आले असते.

उद्योग करताना बऱ्याचवेळा कमालीचा निगरगट्टपणा वापरावा लागतो जो मुळात मराठी माणसाकडे कमी असतो. त्यातही कलावंताकडे तो बहुदा नसतोच. अशा वेळी कलावंताने फक्त कलेची बाजू सांभाळत उद्योजकीय व्यवस्थापन हे सक्षम भागीदाराला किंवा व्यवस्थापकाला

सोपवायला हवे. बहुतेक नामांकित खेळाडू व अभिनेते हे आपापल्या उद्योगाचे व्यवस्थापन स्वतः पहात नाहीत. व्यूहात्मक निर्णयांमध्ये अर्थातच मालकाचा प्रमुख सहभाग असावा. मोठमोठ्या कंपन्यांचे मालक वा प्रमुख भागधारक हे सक्षम संचालकांची व सल्लागारांची याचसाठी मदत घेतात. देसाईंचा ''उद्योजकीय कौन्सिलर'' कुणी होता का, हे माहीत नाही.

कसलेला बुद्धिबळपटू हा शेवटपर्यंत हार न मानता जिंकता जरी येत नसल्यास त्याचा डाव ''ड्रॉ'' किंवा ५० टक्के विजयात परावर्तित करतो. यासाठी न संकोचता तो आपल्या ''कोच''ची मदत घेतो. देसाई यांच्या निधनानंतर दूरचित्रवाणीवर अनेक राजकीय धुरंधरांनी हळहळ व्यक्त केली परंतु या ''राजकीय नेटवर्क''चा फायदा देसाईंना बहुदा घेता आला नाही किंवा त्यांनी तो घेतला नाही असे सकृतदर्शनी दिसते. ‘सीर सलामत तो पगडी पचास’ या म्हणीनुसार देसाईंनी कलावंताची भावनिक उत्कटता बाजूला ठेवावी म्हणून त्यांच्या किती मित्रांनी प्रयत्न केले, हे माहीत नाही.

‘एकाच पिशवीत सर्व अंडी ठेवू नयेत" अशी जगप्रसिद्ध म्हण आहे. कोरोनामध्ये अनेक उद्योजकांना आपले विशेष किंवा महागडे प्रॉडक्ट्स व सेवा या विकता आल्या नाहीत. त्या भयंकर काळात लोकांची प्राथमिकताच वेगळी होती. निसर्गाचा कोप, युद्ध, मोठे सरकारी बदल, जागतिक मंदी इ. गोष्टी या केव्हाही उद्भवू शकतात.

यास्तव उद्योजकाचे "बिझनेस मिक्स" हे साधारणपणे मोठे असावे. देसाईंच्या बिझनेस मिक्समध्ये भारतातील मध्यम आकाराच्या शहरांमधील छोट्या ''फ्रांचायजी स्टुडिओ''ची संकल्पना अंमलांत येऊ शकली असती. अथवा नफ्याचा काही हिस्सा देत भोजपुरी, तमिळ, तेलुगू, मल्याळी, बंगाली, कानडी, मगधी, गुजराती अशा प्रादेशिक भाषांमधील शुटिंगचे काम दलालांमार्फत मिळविता आले असते.

कोणतीही नामांकित ऑटोमोबाईल कंपनी ही आपल्या वाहनाचे ८० टक्के सुटे भाग छोट्या पुरवठादारांकडून बनवून घेते व वाहनांची विक्री डिलर्सच्या साखळीतून करते. म्हणजे उत्पादन व विक्रीचा मोठा ताण ही कंपनी इतरांवर सोपवते.

लगान अथवा कौन बनेगा करोडपती सारखे चित्रण करताना आपल्या स्टुडिओच्या भाड्यासोबत या प्रचंड नफा कमावणाऱ्या कलाकृतींमधील वार्षिक नफ्याचा थोडा हिस्सा मागता आला असता. ‘एन डी स्टुडिओ’ हा ब्रँड सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला असता तर त्याचा एक ''मदर ब्रँड'' म्हणून उपयोग करत कपडे, खेळणी, फर्निचर इ. वेगळ्या प्रॉडक्ट्ससाठी तो वापरता आला असता. यामुळे ''बिझनेस डायव्हर्सिफिकेशन''ही झाले असते व एकाच व्यवसायात असण्याचा धोका कमी झाला असता. कॅशफ्लोहीही सुधारला असता.

आपण पुन्हा देसाईंच्या कर्जाकडे येऊयात. उत्तम व्यूहात्मक सल्लागार'' हा जपानी बँकेच्या कर्जाचा सल्ला देऊ शकला असता. अत्यंत कमी व्याजदराने व दीर्घमुदतीचे जपानी कर्ज शोधता आले असते. देसाईंची बहुदा शेवटची इच्छा होती की त्यांचा स्टुडिओ सरकारने घेऊन तरुण उमद्या कलाकारांना उपलब्ध करून द्यावा.

आपल्या ख्यातनाम स्टुडिओचे ''सार्वजनिकीकरण'' स्वतः देसाई करू शकले असते. व्याज बाजूला ठेवल्यास १८५ कोटीच्या कर्जाची परतफेड ही छोट्या गुंतवणूकदारांना ''नॉन वोटिंग किंवा प्रिफरंस शेअर्स'' देऊन उभ्या करावयाच्या भागभांडवलातून करता आली असती. महत्त्वाची बाब म्हणजे देसाईंची कंपनी ही ''प्रायव्हेट लिमिटेड'' होती.

तिला ''पब्लिक लिमिटेड'' बनवून स्टॉक मार्केटवर तिचे लिस्टिंग करता आले असते. यामुळे उद्योगाचे मूल्यांकन नीटपणे ठरले असते व ते वाढलेही असते. ''शेअर प्रिमियम'' घेत ही पब्लिक कंपनी बाजारातून मोठे स्वस्तातले भागभांडवल ऊभे करू शकली असती व कर्जाची परतफेडही होऊ शकली असती. पब्लिक लिस्टेड कंपनी झाल्याने काही अत्यंत फायदेशीर असे आंतरराष्ट्रीय करारमदारही करता आले असते. हॉलिवूडच्या सुविधा आणि तंत्रज्ञान येथील छोट्या चित्रपट निर्मात्यांना उपलब्ध करून देता आल्या असत्या.

सन २०२० ते २०२३ दरम्यान आपल्या व्यवसायाची व्युहात्मक, वित्तीय व प्रक्रियात्मक पुनर्रचना करीत खर्चावर नियंत्रण, महत्त्वाच्या व्यवस्थापकांना उद्योजकीय नेतृत्व सोपवणे, विस्ताराच्या नव्या व्यूहरचनांवर सर्व ‘स्टेकहोल्डर्स’शी साधकबाधक चर्चा करणे, सामूहिक जबाबदारी वाढवणे इ. गोष्टींवर देसाई व त्यांच्या टीमने काम केले असणारच.

डोंगराच्या टोकावर प्रौढ गरूड एकटाच बसून वेदना सहन करीत आपले जुने पंख उपटून फेकून देतो व नव्या पंखांसाठी जागा उपलब्ध करतो. उद्योजकाला गरूडाप्रमाणे एकट्याने पुनरुज्जीवनाची लढाई लढण्याची गरज नसते. त्याची टीम, त्याचे नेटवर्क व आणिबाणीत मदतीला येणारे हितचिंतक ही त्याची मोठी शक्ती असायला हवी.

देसाईंनी निरोप घेण्यापूर्वी दोन महत्त्वाची विधाने केली असल्याचे सांगितले जाते - ‘लालबागच्या राजाला माझा शेवटचा नमस्कार’ आणि ‘पाऊले चालती पंढरीची वाट’. देसाईंना हजारो छोटे गुंतवणूकदार हे ''वारकरी'' म्हणून जोडता आले असते. गणपती तर बुद्धीची देवता. उद्योजकीय निर्णय घेताना ह्रदयापेक्षा बुद्धीचे ऐकायचे असते.

एका दिवाळखोरीने सारेच काही संपत नाही. देसाई आपल्या तरुण सवंगड्यांसोबत पुन्हा एकदा नवी मांडामांड करु शकले असते. आपल्या अत्यंत लाडक्या शिवरायांची आम्ही आठवण तर रोज करतो परंतु त्यांची शिकवण अंमलांत आणत नाही.

स्वराज्याला वाचवायला स्वभावातील लवचिकता वापरत शिवरायांनी पुरंदरचा तह केला होता. आम्ही त्यांचे खरोखरीचे वारसदार जर असू तर डाव असा अर्ध्यावर नाही सोडून जाणार ! नितीन देसाई या अद्‍भूत अजोड आणि सर्वप्रिय कलावंतास हार्दिक आदरांजली !

वर्ष २०२० ते २०२३ या तीन - चार वर्षांमध्ये देसाईंनी आपल्या मित्रांच्या नेटवर्कला व्यावसायिक पद्धतीने वित्तीय मदतीचे कोणकोणते कल्पक प्रस्ताव सुचवले होते, ही माहिती उपलब्ध नाही. प्रत्येक उद्योजकाने स्वतःच्या कंपनीबाहेर आपली खाजगी मालमत्ता समांतरपणे उभी केली पाहिजे, जी अशा संकटसमयी कामाला येते.

बरेच मनस्वी स्वभावाचे उद्योजक व्यवसायवृद्धीसाठी सहज उपलब्ध असणारे कर्ज उचलतात ज्याच्या जाचक अटी नंतर त्रास देऊ लागतात. देसाईंनी खाजगी वित्त कंपनीकडे न जाता सरकारी बँकेचा विचार केला होता का ? १८५ कोटींचे कर्ज घेताना स्थावर मालमत्तेचे तारण व भविष्यकालीन कमाई, यांचे मूल्यांकन आणि व्याजाचा दर व परतफेडीचा कालावधी या गोष्टींचा बारकाईने अभ्यास देसाईंच्या वित्त सल्लागाराने केलाच असणार.

(लेखक हे व्यवस्थापकीय, उद्योजकीय व वित्तीय सल्लागार आहेत. देशात व परदेशात त्यांनी विविध विषयावर दोन हजारांहून अधिक व्याख्यानं दिली आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT