Indian Drawing sakal
सप्तरंग

भारतीय चित्रपरंपरा : नाट्यशास्त्र व षडांगे

चीन भारतीय समाज हा मुळातच अत्यंत समृद्ध असणाऱ्या जैन, बौद्ध आणि वैदिक तत्त्वज्ञानानं संपन्न आहे. साहजिकच, भारतीय कलांमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला अनुभवता येतं.

सकाळ वृत्तसेवा

- प्रा. अर्चना अंबिलधोक, archanaambildhok.9@gmail.com

चीन भारतीय समाज हा मुळातच अत्यंत समृद्ध असणाऱ्या जैन, बौद्ध आणि वैदिक तत्त्वज्ञानानं संपन्न आहे. साहजिकच, भारतीय कलांमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला अनुभवता येतं. चित्रकलेपर्यंत पोहोचण्यापूर्वी याचे संदर्भ लहान लहान शिल्पांमध्ये अनुभवता येतात. या सदरातल्या अनेक मान्यवर लेखकांच्या आजवरच्या लेखांमधून हे आपण पाहिलं आहे, तसंच मौर्य काळातल्या शिल्पकलेवर पर्शियन व ग्रीको-रोमन कलेचा प्रभाव आपण अनुभवला आहे.

अजिंठ्यासारखी भित्तिचित्रं निर्माण होताना चित्रकथनामध्ये कलाकारांनी चित्रांच्या सांगतेपणासाठी तात्त्विक मूल्यांचा वापर यशस्वीपणे केल्याचं दिसून येतं. या सर्वांचा विचार करताना महाकवी भास व महाकवी कालिदास अशा विचारवंतांचा प्रभाव कलेवर निश्चितपणे आहे.

त्यापैकी भरतमुनी यांच्या ‘नाट्यशास्त्र’ या ग्रंथाचा व वात्स्यायन ऋषी यांच्या ‘कामसूत्र’ या ग्रंथातल्या षडांगांचा चित्रकलेच्या संदर्भात आपण विचार करणार आहोत. भरतमुनींच्या ‘नाट्यशास्त्र’ या ग्रंथाची निर्मिती इसवीसनाच्या प्रारंभाच्या आसपास झाली आहे. नाट्यशास्त्रानुसार,‘सुख-दुःखासमवेत लोकस्वभावाचं अभिनयातून दर्शन घडवणं म्हणजेच नाट्य होय’.

रस, भाव, अभिनय, धर्म, वृत्ती, प्रवृत्ती या सर्वांचं दर्शन आपल्याला नाट्यातून होतं. नाट्यशास्त्रात ध्वनी, नाट्याभिनय, रसरंग, मुद्रा अभिनय, वाचिक अभिनय, स्वरसाधना या सर्वांचे दाखले पाहायला मिळतात.

रंगमंचावरचा अवकाश भरतमुनींनी विविध रूपांनी प्रकट केला आहे. ‘नटाचं शरीर हे जणू वाद्य आहे आणि नट हा त्या वाद्याचा वादक असतो’ अशी संकल्पना त्यांनी मांडली. याच पद्धतीनं चित्रकलेत व्यक्तिचित्रण करत असताना कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचं परिपूर्ण प्रकटीकरण झाल्यास प्रेक्षकाला कलाकृतीच्या आस्वादाचं आत्मिक समाधान मिळतं.

नाट्यशास्त्राबद्दल महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे यांनी ‘नाट्यासंबंधीच्या इतक्या विषयांचा परामर्श घेणारं, ओघवत्या भाषेत चर्चा करणारं पुस्तक जगात इतरत्र सापडणं कठीण आहे,’ असे गौरवोद्गार काढले आहेत.

प्राचीन ग्रंथसंपदेत ‘विष्णुधर्मोत्तरपुराण’ नावाचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्याच्या समकालीन असलेल्या वात्स्यायनांनी ‘कामसूत्र’ या त्यांच्या ग्रंथातल्या

रूप भेदा: प्रमाणानी, भाव लावण्य योजनम्।

सादृश्य वर्णिकाभंगा: इति चित्रं षङ्गकम्।।

या श्लोकात चित्रकलेच्या प्रमुख सहा अंगांचा (षडांगे) उल्लेख केला आहे.

अजिंठा-वेरूळ इथल्या चित्रकलेत व शिल्पकलेत या षडांगांचा महत्त्वपूर्ण वापर झालेला प्रत्ययास येतो. या सहा मूल्यांचा चित्रकलेची प्रमुख प्रमाणके म्हणून वापर झाला. आजही चित्रकलेत त्यांचा उपयोग केला जातो.

रूपभेद

या षडांगांमधला ‘रूपभेद’ म्हणजे आकार किंवा आकृती. आकार हा बाह्य, तसंच मानसिक अशा दोन्ही प्रकारचा असतो. ‘ज्योति पश्यंती रूपानि’... ज्याप्रमाणे प्रकाशानं वस्तूचं दर्शन घडतं त्याप्रमाणे डोळ्यांच्या ज्योतीमुळं वस्तूच्या आकाराचं, रंगाचं, वस्तुमानाचं ज्ञान कलाकाराला होतं. कलाकृतीतल्या वस्तू कठीण, मऊ, कोमल, शुभ्र, कृष्ण, लहान-मोठ्या अशा असणं म्हणजे कलाकाराचं त्या वस्तूवरच्या रूपाशी एकरूप होणं. उदाहरणार्थ : अजिंठा-वेरूळ इथल्या लेण्यांमधल्या आकृतींचा विचार करता एखादी मूर्ती झोपलेली आहे अथवा जागी आहे हे त्या शरीराच्या अवयवातल्या व्यक्त केल्या गेलेल्या चेतनांमधून स्पष्ट होतं. दृश्यरूप, मानसिक रूप, सुंदर अथवा असुंदर रूप असे रूपाचे विविध प्रकार प्रमाणित करण्यात येतात.

‘जे उचित तेच सुंदर आहे’ हे या प्रमाणावरून स्पष्ट होतं. उदाहरणार्थ : नाट्य, चित्र अथवा शिल्प यांच्यात दुष्ट प्रवृत्ती दर्शवताना ‘रूपभेद’ हे सौंदर्यमूल्य अधिक प्रभावी करण्यासाठी असुंदर आकार किंवा हावभाव उपयोगी ठरतात.

प्रमाणबद्धता

प्रमाण म्हणजे आकृतीच्या रचनेचं व तिच्या मांडणीचं परस्पर प्रमाणबद्ध प्रकटीकरण होय. समुद्राच्या लहान-मोठ्या असंख्य लाटा छोट्या कागदावर प्रतीत करताना कलाकार फिक्या आणि गडद निळ्या रंगाचे लहान-मोठे सहज फटकारे वापरून कलाकृतीची निर्मिती करतो. त्याची व्याप्ती ही मानवाच्या कल्पनाशक्तीपर्यंत जाऊ शकते. त्याचबरोबर दूरचं-जवळचं, लांबी-रुंदी, लहान-मोठेपणा या बाबी दर्शवण्यासाठी हे प्रमाण अनुसरून चित्रकारांना ते प्रभावीपणे वापरता येतं.

भावयोजना

भाव म्हणजे कल्पना, उद्देश, वस्तूचं स्वरूप किंवा मर्म होय. व्यक्तीच्या अंतर्मनातल्या भावनांचं बाह्यरूपातून योग्य प्रकटीकरण करणं होय. चित्रकार ए. एच. मूलर यांनी काढलेल्या ‘नजरकैदेत...’ या चित्रात छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आकृतीमध्ये उजव्या हाताची आवळलेली मूठ आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव यांतून चित्रकारानं प्रसंगाचं गांभीर्य परिपूर्णपणे प्रकट केलं आहे. औंध इथल्या ‘भवानी संग्रहालया’तलं हे चित्र आहे.

लावण्ययोजना

चित्रामध्ये सौंदर्य निर्माण करणं म्हणजेच लावण्य होय. लावण्य हे बाह्य सौंदर्याचं प्रकट रूप आहे. सौंदर्य हे देश, काळ, परिस्थिती, अभिरुची, संस्कृती आणि संस्कार यांच्या मिश्रणातून घडतं. उदाहरणार्थ : उत्तरेकडील ‘सावळी’ म्हणून सर्वसामान्य ठरणारी व्यक्ती दक्षिणेकडं ‘उजळ’ ठरू शकते.

सादृश्यता

सादृश्य म्हणजे साम्य. चित्रकार ज्या वस्तूचं, व्यक्तीचं, समूहाचं किंवा दृश्य प्रसंगाचं चित्रण करणार आहे, त्याच्यात दृश्य साधर्म्य असणं म्हणजे सादृश्यता होय. उदाहरणार्थ : रिचर्ड अटेनबरो यांच्या ‘गांधी’ या सिनेमात चित्रित केलेला मोठा जनसमूह हा त्या काळातल्या खऱ्या छायाचित्रासारखा वाटत असल्यामुळे अत्यंत प्रभावी ठरतो.

वर्णिकाभंग

वर्ण म्हणजे रंग. या रंगाचा योग्य वापर करून चित्रकाराला चित्रकृतीत भावनिर्मिती साधता येते. वर्णिका म्हणजे कुंचला अथवा ब्रश. कुंचला आणि रंग यांच्या योग्य वापरातून उमद्या कलाकृतीची निर्मिती होत असते. उदाहरणार्थ : सत्शील रामाचं चित्र शांत फिक्या आकाशी रंगात खुलून येतं, तर क्रूरकर्मा रावण गडद करड्या रंगात प्रभावी ठरतो.

भारतीय चित्रपरंपरेचा आढावा घेत असताना भरतमुनींचं नाट्यशास्त्र आणि वात्स्यायन ऋषींनी विशद केलेली षडांगे ही चित्रकलेच्या अभ्यासकाला व रसिकालादेखील कलाकृतीचा विश्लेषणात्मक आस्वाद घेण्यासाठी उपयोगी ठरतात.

(लेखिका ह्या कोल्हापूरमधल्या कनिष्ठ महाविद्यालयात इंग्लिशच्या अधिव्याख्याता असून, भारतीय सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासक आहेत, तसंच कोल्हापूरमधल्याच एका कलासंस्थेच्या सचिव आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT