Inscription sakal
सप्तरंग

राष्ट्रकूट राजांचा शिलालेख

सकाळ वृत्तसेवा

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

वेरुळच्या अविश्वसनीय भासणाऱ्या लेणींच्या विश्वात गेल्यावर आपल्याला इतर कशाचंही भान राहत नाही. पण दुर्दैवानं वेरुळच्या ३४ लेणींपैकी केवळ काही मोजक्याच लेणी पर्यटक पाहतात. फार कमी पर्यटक लेणी क्र. २९ ते ३४ या लेणींना भेट देतात. वेरुळच्या भव्य लेणींमध्ये लेणी क्र. २९ चा क्रमांक लागतो. ही लेणी धुमार लेणी म्हणून ओळखली जाते.

धुक्यानं व्यापून गेलेली, म्हणून धुमार. कैलास लेणं सोडलं, तर इतर लेणींची नावं ही अलीकडच्या काळात म्हणजेच १००-१५० वर्षांमध्ये रूढ झालेली आहेत. धुमार, नीलकंठ, रामेश्वर, जानवसा, कुंभारवाडा, गणेश लेणी, दशावतार लेणे, रावण की खाई या नावांनी आज ही लेणी प्रसिद्ध आहेत.

या भागावर राज्य करणाऱ्या काही महत्त्वाच्या राजघराण्यांमध्ये राष्ट्रकूट राजांचा क्रमांक लागतो. या राष्ट्रकूट राजांनी दोन प्रकारांमध्ये बांधकाम केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी महाराष्ट्रात लेणी खोदली. एकाश्म मंदिरे उभारली. एकाश्म म्हणजे एकाच दगडापासून निर्माण केलेलं मंदिर किंवा वास्तू. दुसऱ्या टप्प्यात त्यांनी बांधीव मंदिरांची उभारणी केली.

राष्ट्रकूटकालीन बांधीव मंदिरांचं प्रमाण आपल्याला कर्नाटक विशेषतः उत्तर कर्नाटक भागात जास्त आढळून येते. या राष्ट्रकुटांच्या काळात निर्माण झालेल्या अद्‍भुत वास्तू म्हणून वेरुळच्या लेणींकडं अभ्यासक पाहतात. यामध्ये लेणी क्र. १५, १६, २१, २२, २७, २९ या लेणींचा प्रामुख्याने क्रमांक लागतो.

लेणी क्रमांक पंधरा ही ‘दशावतार लेणी’ म्हणून प्रसिद्ध आहे. ही लेणी काहीशी उंचावर खोदली असून काही पायऱ्या चढून आपल्याला लेणीच्या मुख्य परिसरात जाता येते. ही दोन मजली लेणी आहे. ज्याप्रकारे लेणी क्र. ११ आणि १२ ची रचना आहे, अगदी तशीच. या लेणीच्या समोर एक स्वतंत्र नंदी मंडप उभारण्यात आलाय. या मंडपाच्या मागील बाजूस, पश्चिम दिशेला एक महत्त्वाचा शिलालेख कोरण्यात आला आहे.

वेरुळच्या संपूर्ण ३४ लेणींमधील एकमेव राष्ट्रकूट राजाचा शिलालेख असल्यामुळं याचं महत्त्व प्रचंड आहे. राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याचा हा शिलालेख असून, या लेणीची निर्मिती होत असताना तो स्वतः इथं उपस्थित होता, अशाप्रकारचा मजकूर त्यामध्ये कोरला आहे. राष्ट्रकूट राजांची वंशावळ, त्यांनी केलेले पराक्रम, दंतीदुर्ग राजाच्या लढाया अशा अनेक गोष्टींचा समावेश या लेखामध्ये करण्यात आला आहे. या लेणीच्या वरच्या मजल्यावर आपल्याला भगवान शिव आणि विष्णूच्या अनेक अवतारांची शिल्पे कोरल्याचं पाहायला मिळतात.

भगवान शिवानं मार्कंडेय ऋषीचं प्राण रक्षण करताना यमाचा केलेला अंत, रावणानं कैलास उचलण्याचा केलेला प्रयत्न, शिव आणि पार्वतीचा विवाह सोहळा, त्रिपुरांतकांचा अंत करण्याची कथा, शिव-पार्वती यांच्यामध्ये रंगलेला सारीपाटाचा खेळ यांसोबत कालिया मर्दन, लाडक्या गजेंद्रला मगरमिठीतून सोडवण्यासाठी गरुडावर स्वार झालेला विष्णू, वराह, नरसिंह अवतार, त्रिविक्रम यांसारख्या कित्येक पुराणकथांनी ही लेणी सजली आहे. ही सर्व शिल्पे आठ-दहा फूट उंचीची आहेत. राष्ट्रकूट राजा दंतीदुर्गच्या शिलालेखामुळे ही लेणी प्रचंड महत्त्वाची आहे. पुढे लेणी क्र. १७ ते २० अनेक छोट्या-मोठ्या लेणींचा समूह आहे. लेणी क्र. २१ महत्त्वाची लेणी आहे.

रामेश्वर लेणीमध्ये आपल्याला अनेक महत्त्वाच्या गोष्टी आढळून येतात. या लेणीमध्ये उत्तरेकडील भिंतीवर शिव आणि पार्वतीच्या लग्न सोहळ्याचं शिल्प कोरलेलं आहे. यात पार्वतीनं शिवाच्या प्राप्तीसाठी केलेला तप, शिवानं पार्वतीची घेतलेली परीक्षा, ब्रह्मानं हिमालयाकडे केलेली लग्नाची बोलणी आणि शिव-पार्वतीचा विवाह सोहळा हे सर्व प्रसंग त्या एकाच भिंतीवर कोरलेले आहेत.

दख्खनच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वाचं आणि दुर्मीळ शिल्प आहे. या लेणीच्या बाहेर गंगेचं अतिशय अप्रतिम असं शिल्प आहे. अभ्यासकांच्या मते गंगेची एवढी सुंदर प्रतिमा सबंध भारतात इतरत्र कुठेही नाही. पुढे लेणी क्र. २२, नीलकंठ लेणीमधील सप्तमातृकांचे शिल्प अप्रतिम आहे.

काल आणि गणेशाच्या सोबत बसलेल्या या सप्त मातृका अतिशय सुबक, आकर्षक आणि जिवंत भासतात. या लेणीमध्ये असणारे द्वारपाल आपल्याला पट्टडकल येथील विरुपाक्ष मंदिरातील द्वारपालांची आठवण करून देतात. पुढे गणेश लेणी समूहामध्ये अनेक छोट्या-मोठ्या लेणी आहेत. त्या ओलांडून पुढे गेल्यास आपल्याला लेणी क्र. २६ नजरेस पडते. ही भव्य लेणी आहे.

या लेणीमधील दोन शिल्पं अतिशय महत्त्वाची आहेत. पहिलं, लेणीच्या दक्षिण भागात असलेलं कुबेराचं भव्य आठ-दहा फुटांचं शिल्प आणि दुसरं लेणीच्या छतावर कोरलेले सूर्याचे शिल्प. सूर्याच्या शिल्पाचे स्थान विचारात घेता, ही लेणी सूर्यदेवाला समर्पित आहेत हे लक्षात येतं.

पुढे लेणी क्र. २७ मध्ये कृष्ण, बलराम आणि त्यांची बहीण एकानंशाचे एकत्रित शिल्प लेणीच्या प्रवेशद्वारच्या बाजूला कोरलेले आहे. या लेणीच्या बाजूने एक रस्ता धबधब्याच्या खालून लेणी क्र. २९ कडे जातो. याच मार्गावर छोट्या लेणींचा समूह आपल्याला नजरेस पडतो. लेणी क्र. २९, धुमार लेणं. मुंबईजवळ असलेल्या घारापुरीच्या लेणीचं स्थापत्य आणि धुमार लेणीचं स्थापत्य मिळतं जुळतं आहे.

वेरुळच्या सर्वांत सुरुवातीच्या काळात खोदण्यात आलेल्या लेणींमध्ये या लेणीचा समावेश होतो. ही अतिशय भव्य लेणी आहे. या लेणीतील शिल्पांची उंची जवळ जवळ पंधरा फुटांच्या आसपास आहे. लेणीचं स्थापत्य, शिल्पकला यांचा विचार करता ही लेणी इसवी सनाच्या सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात खोदण्यात आली असल्याचं अभ्यासक सांगतात. अंधकासुर-गजासुर वध, नटराज, कल्याण सुंदर, रावण कैलास उचलतानाचे शिल्प यांसारखे अनेक पौराणिक प्रसंग या लेणीमध्ये कोरलेले आहेत.

वेरुळच्या या हिंदू लेणी दख्खनच्या स्थापत्य परंपरेतील अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिल्या जातात. राष्ट्रकूट, कलचुरी, चालुक्य, पल्लव यांसारख्या राजसत्तांच्या कला व स्थापत्याचा प्रभाव या लेणीसमूहावर आपल्याला दिसून येतो.

या लेणी दख्खनचं प्रतिबिंब म्हणून सुद्धा आपण पाहू शकतो. या लेणी महत्त्वाच्या आहेतच, पण या सर्वांमध्ये वेगळी ठरलेली आणि जगप्रसिद्ध झालेली अद्वितीय लेणी म्हणून लेणी क्र. १६ ‘कैलास मंदिर’ ओळखली गेली. या अद्‍भुत निर्मितीची माहिती पुढील भागात घेऊ या.

(लेखक हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन-मध्ययुगीन भारतीय इतिहास हेदेखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT