डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तीन गुरूपैंकी एक गुरू म्हणजे संत कबीर. तथागत गौतम बुद्ध, महात्मा जोतिबा फुले आणि संत कबीर...
उत्तर भारतातील एक प्रसिद्ध संत म्हणून संत कबीर यांना ओळखले जाते. काळाच्या पुढे जाऊन विचार करणार्या संतांपैकी एक संत समाजसुधारक म्हणजे, संत कबीर होते. आपल्या दोह्यांच्या माध्यमातून त्यांनी समाज मनावर असलेल्या वाईट विचारांच्या अवडंबरावर परखड टीका केली. अंधश्रद्धा, रुढी परंपरा, चालीरींती, समाजात जाती मधील भेदभाव दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जेव्हा भारतातील महान संतांचे नाव घेतले जाईल, त्यामध्ये सगळ्यात अग्रेसर नाव हे संत कबीर यांचेच राहील हे निर्विवाद सत्य आहे.
संत कबीर हे हिंदी साहित्यातील महान व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जन्माबाबत अनेक मते मतांतरे आढळतात. आई वडील यांच्याबाबतीत सुद्धा अनेक प्रश्न इतिहासकार उपस्थित करतात. अनेक मते मतांतर असून सुद्धा संत कबीर यांचा जन्म 1398 मध्ये काशी या ठिकाणी झाला असे मानले जाते.
संत कबीर हे अनेक भाषांमध्ये निष्णात होते. साधूसंत यांच्यासमवेत भ्रमंती करताना त्यांना अनेक भाषांचे ज्ञान अवगत झाले होते. परंतु, अनेक भाषांचे ज्ञान असले तरी आपले विचार समाजात पेरण्यासाठी मात्र ते स्थानिक भाषेचाच अवलंब करीत. स्थानिक भाषेमधील केलेले त्यांचे उपदेश जनतेच्या अंतर्मनात राज्य करीत.
संत कबीर हे निर्भीड आणि नेहमी सत्य बोलणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. संत कबीर यांना हिंदू - मुस्लिम धर्माच्या ऐक्याचे प्रतिक मानले जात असले तरी संत कबीर यांना मात्र, जीवन जगण्याची योग्य पध्दत यालाच आपला धर्म ते मानत. संत कबीर यांनी आपल्या कार्यकाळात खूप लिखाण केले. नाथ परंपरा, सुफी परंपरा यांचे मिश्रित भाव त्यांच्या दोह्यांमध्ये जाणवतात. आपल्या दोह्यांच्या माध्यमातून त्यांनी जनतेला डोळे उघडण्यास भाग पाडले. मानवता, नैतिकता आणि आध्यात्मिकता याचे त्यांनी धडे दिले. संत कबीर त्याचबरोबर अहिंसेचे प्रचारक आणि अनुयायी होते. आज त्यांची आठवण काढण्याचे कारण म्हणजे, आजच्या दिवशी 624 वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला. आजही, त्यांचा प्रेमाचा दोहा आपल्याला सतत प्रेमाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत असतो.
संत कबीर यांनी लिहिलेल्या दोह्यांचा थोडक्यात आढावा...
पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय,
ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय।
संत कबीर म्हणतात, पोथी, पुराण वाचून जगातले सगळेच लोक काही, पंडित, विद्वान किंवा ज्ञानी झाले नाही. परंतु, त्याऐवजी जर प्रेमाचे फक्त अडीच अक्षर समजून घेतले तरी तुम्ही पंडित, विद्वान किंवा ज्ञानी व्हाल.
जाति न पूछो साधु की, पूछ लीजिये ज्ञान,
मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान।
संत कबीर म्हणतात, एखाद्या व्यक्तीजवळ खूप ज्ञान असेल तर त्याची कधीही जात विचारू नये, त्याच्या जातीपेक्षा कधीही त्याच्याकडे असलेले ज्ञान अधिक महत्वाचे असते. उपमा देताना संत कबीर म्हणतात, नेहमी तलवारीची किंमत करा त्याच्या म्यानाची नव्हे.
हिन्दू कहें मोहि राम पियारा, तुर्क कहें रहमाना,
आपस में दोउ लड़ी-लड़ी मुए, मरम न कोउ जाना।
संत कबीर म्हणतात, हिंदू लोक म्हणतात राम आमचा आहे, मुस्लिम लोक म्हणतात रहमान आमचा आवडता आहे. याच गोष्टींवरून ते आपआपसात आयुष्यभर भांडत असतात, शेवटी मात्र दोघांनाही सत्य काय आहे हे समजत नाही.
दुर्लभ मानुष जन्म है, देह न बारम्बार,
तरुवर ज्यों पत्ता झड़े, बहुरि न लागे डार।
संत कबीर म्हणतात, मनुष्य जन्म फार दुर्लभ असतो. मनुष्य जन्म वारंवार मिळत नाही. ज्या प्रमाणे झाडावरून गळालेलं पान पुन्हा जोडता येत नाही त्याचप्रमाणे मनुष्याच्या जन्माचे असते.
निंदक नियरे राखिए, ऑंगन कुटी छवाय,
बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय।
संत कबीर म्हणतात, आपली निंदा करणार्या निंदकाला, आपल्या बद्दल वाईट बोलणार्याला जितके जवळ ठेवता येईल तेवढे जवळ ठेवावे. कारण, असे माणसे आपल्याला आपले दोष दाखवून देतात. अशी माणसे साबण, पाणी न वापरताच आपल्याला स्वच्छ करण्याचे काम ते करत असतात.
रात गंवाई सोय के, दिवस गंवाया खाय।
हीरा जन्म अमोल सा, कोड़ी बदले जाय।
संत कबीर म्हणतात, रात्र झोपण्यात घालविली, दिवस खाण्यात घालविला, मनुष्य जन्म इतका अनमोल आहे की, जो तुम्ही असा वाया घालविला. आयुष्य सार्थकी, न लावणार्या जन्मांची किंमत फक्त एका कवडी इतकीच राहिली आहे.
जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नाही |
सब अँधियारा मिट गया, दीपक देखा माही |
संत कबीर म्हणतात, जेंव्हा मला अहंकाराने घेरले होते त्यावेळेस मला कधीही देवाचे दर्शन झाले नाही. परंतु, गुरूच्या उपदेशाने, त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून मला ज्ञानाचा प्रकाश दिसला, आणि माझा अज्ञानरूपी अंधकार दूर झाला.
अति का भला न बोलना, अति की भली न चूप,
अति का भला न बरसना, अति की भली न धूप।
संत कबीर म्हणतात, जास्त बोलणेही योग्य नाही आणि कमी बोलणेही योग्य नाही ज्याप्रमाणे जास्त पाऊस आणि जास्त ऊन योग्य नाही. दोन्हीही, प्रकृतीसाठी हानिकारक आहे. याचाच अर्थ, सगळे काही प्रमाणात असायला हवे.
दोस पराए देखि करि, चला हसन्त हसन्त,
अपने याद न आवई, जिनका आदि न अंत।
संत कबीर म्हणतात, जो मनुष्य दुसर्यांचे सतत दोष काढता काढता स्वतःचेच दोष विसरून जातात, त्यांचा कुठेही अंत नसतो.
धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय,
माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय।
संत कबीर म्हणतात, बाग सांभाळणार्या माळीने झाडाला कितीही पाणी घातले तरी, ऋतू आल्यावरच झाडाला फळे लागतात. त्याचप्रमाणे, धैर्य ठेऊन केलेलेच काम पूर्णत्वास जाते.
जिन खोजा तिन पाइया, गहरे पानी पैठ,
मैं बपुरा बूडन डरा, रहा किनारे बैठ।
संत कबीर म्हणतात, जे मेहनत करतात त्यांना काहीना काहीतरी मिळते. जसे कोणीतरी खोल पाण्यात जाऊन काहीतरी आणतात परंतु, असे काही बिचारे लोक आहेत ज्यांना बुडण्याच्या भीतीने किनार्यावर बसून काहीही आढळत नाही.
संत कबीर यांनी आपल्या दोह्यांच्या माध्यमातुन, जीवनातील साध्या पद्धतीने दैनंदिनी सांगितली आहे. त्यांचा साध्या राहणीमानावर त्यांचा विश्वास होता. सत्य, अहिंसा आणि सदाचार अशा गुणांचे ते पुरस्कर्ते होते. चुकीच्या चालीरींतीना त्यांनी कडाडून विरोध केला, आणि एक नवी संत परंपरा भारतात चालू केली. संत कबीर यांच्यासारखे संत भारतात जन्माला आले, हे अभिमानास्पद आहे परंतु, आजचे संत पाहिले की, ती संत परंपरा चुकल्यासारखी वाटते. नाही का?
संपादन - नरेश शेंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.