- श्रीकृष्ण पुराणिक
आश्वलायन, शाखायन, बौधायन, आपस्तंब, पारस्कर, गोभिल, कौशिक आदी सतरा गृह्यसूत्रे आज उपलब्ध आहेत. धर्मसूत्रांत त्रैवर्णिक समाजाचे आश्रमधर्म व लौकिक आचारधर्म, म्हणजे कायदे व राजधर्म, सांगितलेले आहेत.
वर्णधर्म व आश्रमधर्म हे धर्मसूत्रांचे मुख्य विषय होत. मनू, याज्ञवल्क्य इत्यादींच्या ‘स्मृतीं’च्या पूर्वी झालेले आणि मुख्यतः गद्यात्मक सूत्रशैलीत लिहिलेले हे ग्रंथ आहेत.
वेदांगे : वेदांमधल्या विधिनिषेधांच्या पालनानंच आपल्या भावी पिढ्यांचं ऐहिक व पारलौकिक कल्याण होईल अशी - वेदांना पूर्ण प्रमाण आणि पवित्र मानणाऱ्या - वैदिकांची श्रद्धा होती. त्यामुळे वेदांचं पठण पिढ्यान्पिढ्या चालू ठेवून वैदिक साहित्य जिवंत ठेवलं गेलं.
त्याच कारणानं वेदांचं बौद्धिक चिंतनही सुरू झालं व त्या चिंतनातून वैदिकांना बौद्धिक ज्ञानाचा पाया घालता आला. त्यातून वेदांगे निर्माण झाली. ‘शिक्षा’, ‘कल्प’, ‘व्याकरण’, ‘निरुक्त’, ‘छंद’ आणि ‘ज्योतिष’ अशी एकूण सहा वेदांगे आहेत.
वेदागांमध्ये या प्रत्येक अंगाची विस्तृत माहिती व त्यावरचं भाष्य आहे. ज्योतिषांतर्गत खगोलशास्त्र, बीजगणित यांचा अभ्यासही वेदांगांत आढळून येतो. वेदांगांमधलं बीजगणित, भूमिती, आयुर्वेद, खगोलशास्त्र आदींचा आढावा एका स्वतंत्र लेखाद्वारे घेता येऊ शकेल इतकी सामग्री त्यात आहे.
शिक्षा : वेदमंत्रांचं उच्चारण शुद्ध व अचूक होण्याच्या दृष्टीनं ध्वनिशास्त्राचा अभ्यास करून रचण्यात आलेल्या शास्त्रांना ‘शिक्षा’ असं म्हणतात. काही प्राचीन शिक्षाग्रंथ आज उपलब्ध नसले तरी ध्वनिशास्त्राविषयी मान्यताप्राप्त अशा सर्वसामान्य निष्कर्षांचा आपापल्या शाखेनुसार विचार करणारे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यांना ‘प्रातिशाख्ये’ असं म्हणतात.
कल्प : या वेदांगाला ‘कल्पसूत्रे’ असंही म्हणतात. कल्पसूत्रांमध्ये श्रौतसूत्रे, शुल्बसूत्रे, गृह्यसूत्रे आणि धर्मसूत्रे यांचा समावेश होतो. ‘संहिता’ व ‘ब्राह्मणग्रंथ’ यांमधल्या यज्ञसंस्थेचं सांगोपांग स्वरूप व्यवस्थित, एकत्र आणि विषयवार उपलब्ध व्हावं यासाठी श्रौतसूत्रे निर्माण झाली.
काही श्रौतसूत्रांना - उदाहरणार्थ : बौधायन, मानव, आपस्तंब व कात्यायन यांना - ‘शुल्बसूत्र’ नावाचा अध्याय जोडलेला असतो. यज्ञकुंड, यज्ञवेदी, यज्ञमंडप तयार करताना घ्यायच्या मोजमापांचं गणित शुल्बसूत्रांत सांगितलेलं असतं. भारतीय भूमितीचं प्राथमिक स्वरूप शुल्बसूत्रांत दिसतं. गृह्यसूत्रांत नामकरण, उपनयन, विवाह आदी सोळा संस्कार, तसंच श्राद्धे यांचे विधी सांगितलेले आहेत.
व्याकरण : वेदमंत्रांतले शब्द अपभ्रष्ट होऊ नयेत, तसंच संधी होऊन शब्दात बदल होत असल्यामुळे मूळ शब्द कसा आहे तो कळावा, तसंच अर्थही कळावा यासाठी वैदिक मंत्रांचा पदपाठ तयार करण्यात आला. तो करताना व्याकरण अगोदरच तयार होतं. पदपाठ तयार झाल्यानंतर संस्कृत भाषेत बदल झाले. तेव्हा सबंध शिष्ट संस्कृतचं व्याकरण तयार झालं. अनेक व्याकरणं झाली. त्यांत पाणिनीचं व्याकरण श्रेष्ठ ठरलं.
निरुक्त : वेदांची भाषा कालांतरानं समजणं कठीण जाऊ लागलं, त्यामुळे शब्दांची व्युत्पत्ती व अर्थ सांगण्याचं शास्त्र निर्माण झालं. तेच ‘निरुक्त’ होय. वेदांमधल्या शब्दांचे व धातूंचे संग्रह म्हणजे ‘निघंटू’ वा शब्दकोश. वैदिक समानार्थी व अनेकार्थी पदांचा वा धातूंचा जो सर्वप्राचीन उपलब्ध कोश आहे त्याला ‘निघंटू’ असं नाव आहे. या कोशावर यास्काचार्यांनी लिहिलेलं भाष्यही ‘निरुक्त’ या नावानं प्रसिद्ध आहे.
छंद : छंद या वेदांगाला ‘छंदोविचिती’ अशीही संज्ञा आहे. वेदांमधले बरेच मंत्र छंदोबद्ध असून वेदमंत्रांनी करायच्या यज्ञकर्माशीही ते निगडित आहेत. ‘ब्राह्मणग्रंथां’मध्ये छंदांच्या गूढ व अद्भुत सामर्थ्याची वर्णनं येतात. पिंगल यांचा ‘छंदःसूत्र’ हा ग्रंथ या वेदांगाचा प्रतिनिधिक ग्रंथ मानला जातो.
ज्योतिष : वेदकाली ज्योतिष हे सहावं वेदांग तयार झालं होतं. सत्तावीस नक्षत्रं, चंद्राच्या अवस्था, सूर्याचं संक्रमण, ऋतूंची परिवर्तने या सर्वांचं पद्धतशीर परिगणन यज्ञाच्या निमित्तानं वैदिक ऋषीला काळजीपूर्वक करावं लागे.
श्रौत व गृह्यकर्मांसाठी लागणारं पंचांग वैदिक काळी अस्तित्वात आलं. सत्तावीस नक्षत्रांची आकाशातली मांडणी ही प्रथम वेदकाली वैदिकांनी शोधली. शुक्लयजुर्वेदात ‘नक्षत्रदर्श’ म्हणजे ज्योतिष याचा उल्लेख आलेला आहे. वेदांगज्योतिषाचे बरेच ग्रंथ लुप्त झाले असून ‘लगध’नामक आचार्यांचा ‘ज्यौतिषम्’ (इसवीसनपूर्व १४००) हा एकच लहानसा निबंध शिल्लक राहिला आहे.
या निबंधाचे ऋग्वेद शाखेत ३६ व यजुर्वेद शाखेत ४४ श्लोक आढळतात. यांतले अनेक श्लोक क्लिष्ट असून त्यांचा अर्थ नीट लागत नाही. त्यात ‘३६६ दिवसांचं वर्ष व पाच वर्षांचं एक युग होतं,’ असं म्हटलेलं आहे.
उत्तरायण व दक्षिणायन केव्हा होतं, याचं गणित त्यात सांगितलेलं आहे. लगध यांच्या कालखंडात गर्ग या आचार्यांनी केलेली ‘गर्गसंहिता’ आज लुप्त झालेली असली तरी तिच्यातले संदर्भ नंतरच्या ग्रंथांमध्ये घेतलेले आढळतात. या आचार्य गर्गांचा महाभारतात ज्योतिषशास्त्रज्ञ म्हणून निर्देश केलेला आहे. ‘पितामहसिद्धान्त’ हा ग्रंथही याच कालखंडात झाला. त्याचा सारांश वराहमिहिरानं ‘पंचसिद्धान्तिके’त दिलेला आहे.
वेदकालातले ज्योतिषनिबंध नष्ट का झाले हे सांगणं कठीण आहे. तथापि, त्याचं एक कारण दिसतं ते असं की, इसवीसनानंतर पुराणांचा प्रसार झाला. पुराणांमध्ये अतिशयोक्ती करण्याची व साधी माहिती अद्भुत पद्धतीनं मांडण्याची प्रवृत्ती वाढली...परिणामी,
वेदांगज्योतिषातली साधी व वास्तविक कालगणनापद्धती पुराणिकांनी सोडून दिली व अवास्तव कालगणनेत इतिहास सांगण्यासाठी ‘युग’ व ‘कल्प’ यांच्या वर्षसंख्या फारच फुगवल्या, त्यामुळे वेदांगज्योतिष नष्ट झालं असावं, असा तर्क आहे.
स्मृती : वैदिकांच्या समाजसंस्थेत वेदपूर्वकालापासून सूत्रकालापर्यंत जे सामाजिक व धार्मिक आचार-विचार रूढ होते त्यांचा संग्रह म्हणजे ‘स्मृती’. गृह्यसूत्रे, धर्मसूत्रे व व्यवहार केवळ स्मरणानं लक्षात राहत नव्हते व सुरक्षितही राहत नव्हते म्हणून ते ग्रंथरूपानं पुढं आले. विविध विधिनिषेधांची, कर्मकांडांची, आचारांची आणि सामाजिक रूढींची मांडणी या ‘स्मृतीं’मध्ये आहे.
आश्वलायन, आपस्तंब, पारस्कर, गोभिल, कौशिक, बौधायण अशी सतरा मुख्य धर्मसूत्रे व गृहसूत्रे आहेत व या ‘स्मृती’ त्यांवर आधारित आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आजपर्यंत संपादित वा ज्ञात नसलेल्या सेहेचाळीस ‘स्मृतीं’चं संपादन करून त्या संग्रहित केलेल्या आहेत. यावरून एकूण ‘स्मृतीं’चा विस्तार लक्षात यावा.
सध्या एकच प्रसिद्ध वा कुप्रसिद्ध ‘स्मृती’ आहे व ती म्हणजे ‘मनुस्मृती’. मुख्य म्हणजे तीत इतर काही ग्रंथांप्रमाणेच काही पाठांमध्ये चातुर्वर्ण्याचं रूप वर्णिलेलं आहे. ते पाठ आजच्या दृष्टीनं जातिभेदवाचक मानले गेलेले असले तरीही ‘मनुस्मृती’मधला इतर खूप मोठा भाग तत्कालीन धर्माचं विवेचन व इतर रूढींची मांडणी असा आहे.
पुराणे : नावाप्रमाणेच पुराण म्हणजे जुनं, जुन्या काळचं. पुराणांची निर्मिती विश्वनिर्मितीच्या रहस्य-उकलीपासून ते आजपर्यंतच्या इतिहासाची नोंद घेण्यासाठी केली गेली आहे. हे विश्वनिर्मितीचं रहस्य आजच्या भाषेत वैज्ञानिक आधार असलेलं असेल असं नाही, तर तत्कालीन तत्त्वज्ञानावर आधारित असलेल्या विश्वनिर्मितीचं, इतिहासाचं वर्णन करणं, वेगवेगळ्या राजांची वर्णनं, वंशावळी, भूगोल, काळ आदी सर्वांचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. त्यातही ‘महापुराणे’ व ‘उपपुराणे’ असा भेद आहे.
महापुराणांचे प्रकार अठरा आहेत व ते असे : १. ब्रह्म, २. पद्म, ३. विष्णू, ४. शिव, ५. भागवत, ६. भविष्य, ७. नारद, ८. मार्कंडेय, ९. अग्नी, १०. ब्रह्मवैवर्त, ११. लिंग, १२. वराह, १३. स्कंद, १४.वामन, १५. कूर्म, १६. मत्स्य, १७. गरुड, १८.
ब्रह्मांड. पुराणांमध्ये देव-असुरांची युद्धे, भूगोल आदींचं वर्णन आहेच; पण त्याशिवाय विविध चरित्रे, व्रतवैकल्ये, स्मार्त, धर्मशास्त्र, तीर्थस्थाने इत्यादी विषयही आहेत. पुराणातला इतिहास हा विविध देवांची अद्भुत वर्णनं, अतिशयोक्ती व कल्पनाविलासानं भरलेला आहे, त्यामुळे बऱ्याचदा कालमापन करून इतिहासाशी पडताळणी करणं अवघड होऊन बसतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.