Porn sakal
सप्तरंग

आपल्या मुलांपर्यंत पोर्न पोहोचतंय का...?

आपल्या मुलांपर्यंत पोर्न पोहोचतंय का...? तर, हो! त्यासाठी मुलांना पोर्न साईट्सवर जाण्याची गरजही आज उरलेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

- मुक्‍ता चैतन्य, muktaachaitanya@gmail.com

आपल्या मुलांपर्यंत पोर्न पोहोचतंय का...? तर, हो! त्यासाठी मुलांना पोर्न साईट्सवर जाण्याची गरजही आज उरलेली नाही. यूट्यूबपासून सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सॉफ्ट पोर्न किंवा ॲडल्ट कन्टेंट सहज बघायला मिळू शकतो. किसिंग सीन्स, लव्ह सीन्स, बेड सीन्स यांचा भडिमार रील्समध्ये आहे. इंटरनेटवर जितक्या चांगल्या गोष्टी आहेत तितक्याच मुलांसाठी धोक्याच्या जागाही आहेत. त्यातून ऑनलाईन गेल्यावर मूल काय बघेल यावर कुणाचंही नियंत्रण आज उरलेलं नाही. अशा वेळी आपल्या मुलांशी या सगळ्याविषयी बोलणं अत्यावश्यक आहे.

लहान मुलं, म्हणजे टीनएजर वयाच्या अलीकडची मुलं, जेव्हा या सगळ्या गोष्टी बघतात तेव्हा त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रतिमा, त्याविषयी पडणारे प्रश्न, त्यांचा गुंता असा बराच काळजी करावा असा विषय हळूहळू तयार होत जातो. त्याचप्रमाणे टीनएज वयात जी मुलं ॲडल्ट कन्टेंट बघतात तेव्हा ज्याप्रमाणे त्यांच्यात वयानुरूप येणारं नैसर्गिक कुतूहल असतं त्याचप्रमाणे या प्रतिमांमधून निर्माण होणाऱ्या काही कल्पनाही असू शकतात. त्या देहाच्या आजाराविषयी, दिसण्याविषयी, लैंगिक संबंधांविषयी, त्यातल्या ‘परफॉर्मन्स’ विषयी असू शकतात.

या सगळ्याबद्दल वेळीच आणि योग्य माहिती जर मुला-मुलींना दिली गेली नाही तर त्यांच्या मनातल्या कल्पना घेऊनच ते मोठेही होणार, डेट करणार आणि नंतरच्या काळात सहजीवनालाही सुरुवात करणार. वर्तमानाबरोबर भविष्यात होऊ शकणारे गुंते टाळण्यासाठी मुलांशी बोलणं आवश्यक आहे. ‘सेन्स मीडिया’ या सेवाभावी संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातल्या ५० टक्के मुलांपर्यंत पोर्न कन्टेंट वयाच्या तेराव्या वर्षी पोहोचतो आणि ते तो बघायला सुरुवात करतात.

‘आम्ही परत परत पोर्न साईट्सवर जाऊन पोर्न कन्टेंट बघतो’, असं ४४ टक्के मुलं म्हणतात, तर ‘ऑनलाईन भटकंती करताना आमच्यासमोर अचानक पोर्न कन्टेंट आला,’ असं ५८ टक्के मुलांचं म्हणणं आहे. खरं तर भारत सरकारनं अनेक पोर्न साईट्सवर बंदी घातलेली आहे, तरीही हा कन्टेंट इंटरनेटवर उपलब्ध होतोच. शिवाय, सॉफ्ट पोर्न प्रकारातला कन्टेंट यूट्यूबपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र बघायला सहज उपलब्ध असतो.

हा सगळाच विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे. सगळा दोष फक्त हातातल्या मोबाईलचा आहे आणि डेटाचा आहे असं नाही. इतरही अनेक बाबी यात महत्त्वपूर्ण असू शकतात. पैशाचं अवास्तव महत्त्व, पालकांची व्हॅल्यू सिस्टिम, मुलांमध्ये असलेला प्रचंड एकटेपणा आणि नैराश्य, स्पेस म्हणजे काय याबाबत पालक आणि मुलं यांच्यात असलेला कमालीचा गोंधळ, सेक्स एज्युकेशन न देणारी शिक्षणव्यवस्था, सेक्सविषयी मोकळेपणानं बोलण्याची मुभा नसणं, तसंच पोर्न किंवा ॲडल्ट कन्टेंट हा १८ वर्षं पूर्ण झालेल्यांनी बघणं अपेक्षित आहे; पण बघणारी व्यक्ती पूर्ण १८ वर्षांची आहे किंवा नाही याची खातरजमा केली जाण्यासाठीची कुठलीही यंत्रणा या साईट्सवर उपलब्ध नसते...अशा एक ना अनेक बाबी!

स्वस्त इंटरनेट आणि पालकांचे मोबाईल्स!

सहज, स्वस्त दरात किंवा फुकट वेगवान इंटरनेट उपलब्ध असल्यानं भारतात ‘पोर्न बूम’ आहे आणि त्यातच मुलांच्या हातात मोबाईल फार लहान वयात आल्यामुळं पोर्न शोधणं आणि पोर्न साईट्सवर जाऊन पोर्न व्हिडिओज् बघणं ही त्यांच्यासाठी विशेष वेगळी गोष्ट उरलेली नाही हे लक्षात घेतलं पाहिजे.

लहान मुलांच्या हातात कधी मोबाईल दिला पाहिजे याबाबतीत अजून आपल्याकडं पालक हवे तितके सजग झालेले नाहीत. मुलांना त्यांचे स्वतःचे आणि महागडे मोबाईल घेऊन देणं हा स्टेटस सिम्बॉल बनला आहे; पण मुलं तिथं जाऊन काय करतात याविषयी बोलण्याची तसदी मात्र कुणीही घेत नाही.

अनेकदा मुलांपर्यंत ॲडल्ट कन्टेंट पालकांच्या फोनमधूनच पोहोचतो हे माझ्या आजवरच्या कामातून अनेकदा लक्षात आलेलं आहे. व्हॉट्सॲपवर विविध सेक्स-क्लिप्स किंवा इतरही कन्टेंट फॉरवर्ड होत असतो. तो मोबाईलच्या गॅलरीत तसाच पडून असतो. पालक जर मोबाईलवर पोर्न बघत असतील तर गुगल-हिस्ट्रीमध्ये त्या लिंक्स उपलब्ध असतात. मुलांच्या हातात मोठ्यांचे फोन गेले की या गोष्टी मुलांना आयत्याच दिसून येतात. पालकांशी, शिक्षकांशी कसलाही संवाद नसल्यानं गोष्टी अधिकच गुंतागुंतीच्या होतात.

योग्य वयात योग्य माहिती

लिंगभाव आणि लैंगिक संबंध यांविषयी योग्य माहिती मिळवण्याचं पोर्न हे काही साधन नव्हे. मुळात स्वतःची लैंगिकता कशी समजून घेतली पाहिजे, आपले लैंगिक अग्रक्रम काय आहेत हे समजून घेणं ही एक सतत चालू असणारी प्रक्रिया आहे. ती दहाव्या-बाराव्या वर्षी सुरू होत असली तरी या वयात मुलांपर्यंत योग्य माहिती योग्य शब्दांत पोहोचण्याची नितांत गरज असते.

स्वतःच्या सुखाचा विचार करत असताना दुसऱ्याच्या सुखाचाही विचार आवश्यक आहे... स्वतःच्या आणि जोडीदाराच्या शरीराचा सन्मान आवश्यक आहे... शरीरसंबंधांपासून ते शरीराची स्वच्छता, लैंगिक अवयवांची स्वच्छता, असुरक्षित लैंगिक संबंधांतून होणारे आजार, त्यांतले धोके इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी समजण्याची, त्यांच्याबद्दल संवेदनशील असण्याची आवश्यकता असते. वयानुरूप या गोष्टी मुलांच्या आयुष्यात येणं आवश्यक असतं. ते सध्या होत नाहीय ही काळजी करावी अशी गोष्ट आहे.

सगळे बघतात म्हणून...

शाळेच्या बसमध्ये, व्हॅनमध्ये या ‘नाजूक’ आणि ‘गुप्त’ माहितीची देवाण-घेवाण केली जाते. जर एखाद्या मुलानं त्यात विशेष रस दाखवला नाही तर त्याला टार्गेट करण्याचं प्रमाणही बरंच आहे. तुम्हाला अश्लील जोक्स, शिव्या माहीत नसतील तर, तुम्ही न्यूड फोटो बघितले नसतील तर, तुम्ही सेक्स क्लिप्स बघितल्या नसतील तर तुम्ही फारच बावळट आहात असा एक समज पसरवला जातो.

आणि मग, समूहात राहण्याच्या धडपडीतून अनेक मुलं पोर्न बघायला सुरुवात करतात. वर्गात पोर्नबद्दल चालणाऱ्या चर्चेत आपल्यालाही बोलता आलं पाहिजे ही मूलभूत गरज त्यामागं अनेकदा असते. या गरजेतूनच शोधाशोध करायला मुलं मुलांकडूनच शिकतात.

न बोलण्याचा विषय!

लैंगिकता हा आपल्याकडं आजही न बोलण्याचा विषय आहे. या विषयावर बोलताना अनेक पालकांना, शिक्षकांना, शाळांना अवघडल्यासारखं होतं. संकोच वाटतो. त्यामुळं मुलांनी प्रश्न विचारले तरी ते टाळण्याकडं बहुतेकांचा कल असतो. आई-बाबा, शिक्षक किंवा मोठ्यांच्या जगानं नाकारलेले विषय मग मुलं ऑनलाईन शोधायला जातात. कारण, प्रश्न विचारला म्हणून गुगल त्यांना गप्प करत नाही! ‘हे वय आहे का असल्या गोष्टींचा विचार करण्याचं’ असं काहीही गुगल म्हणत नाही. जजमेंटल न होता गुगल त्यांच्या प्रश्नांची उत्तर देतं...पण ती उत्तरं बरोबरच असतील असं नाही.

कंटाळा नावाचा मोठा शत्रू

शाळा, शालेय आणि शाळाबाह्य विषयांचे विविध क्लास, अभ्यास या चक्रात मुलांना स्वतःसाठी वेळच नाही. निवांत लोळत पडतील,

इकडं तिकडं करतील असं मुलांच्या आयुष्यात आता घडतच नाही. ती सतत कशाला ना कशाला तरी जुंपलेली असतात. शहरात तर मुलांसाठी मोठी मैदानं नाहीयेत, घराबाहेर आणि बिल्डिंगबाहेर खेळायला जागा नसते. मुलं संध्याकाळची खेळत नाहीत, ती स्पोर्टस् क्लासेसना जातात! खेळायला मैदानंच उपलब्ध नसल्यामुळं ‘ग्राउंड लावण्या’ची पद्धत रूढ झालेली असते.

म्हणजे पुन्हा, मुलांना त्यांच्या मर्जीप्रमाणे खेळायला, हुंदडायला काही संधीच आजच्या जीवनशैलीत राहिलेली नाही. मग अशी मुलं शाळा, अनेक प्रकारचे क्लासेस आणि अभ्यास संपल्यावर थकतात आणि टीव्हीसमोर किंवा मोबाईलच्या स्क्रीनसमोर जाऊन बसतात. मुलांना स्पेस देण्याच्या नादात आपली मुलं काय करत आहेत हे बघणं पालक टाळतात.

हल्ली अजून एक गोष्ट सहज दिसते व ती म्हणजे, मुलांना सतत कंटाळा आलेला असतो. पालक बऱ्याचदा स्वतः कामात अडकलेले असतात किंवा फोनमध्ये. त्यामुळं मुलांकडं असलेल्या अवांतर वेळात, त्यांना धमाल येईल असं काहीही करण्यात पालक अनेकदा कमी पडतात. मुलांचा कंटाळा वाढत जातो आणि आपोआपच ऑनलाईन भटकंतीचं प्रमाणही!

या सगळ्याचे विविधस्तरीय परिणाम आहेत. ते शारीरिक आणि मानसिक आहेत. या सगळ्यावर उपाय काय? मुलं ॲडल्ट कन्टेंट बघताना दिसली तर काय केलं पाहिजे? ते पाहू या पुढच्या भागात...

(लेखिका ह्या ‘सायबर-मैत्र’च्या संस्थापक, तसंच सायबर-पत्रकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

जीगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

Waris Pathan: वारिस पठाण पत्रकार परिषद सुरु असतानाच ढसाढसा रडले, म्हणाले, सगळेच माझ्या मागे हात धुवून मागे लागले अन...

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

SCROLL FOR NEXT