‘आँखो को वीजा नही लगता, सपनों को सरहद होती नही...बंद आँखो से रोज सरहद पार चला जाता हूँ मिलने मेहंदी हसन से...’ पाकिस्तानात जन्मलेले आणि फाळणीनंतर सदैव भारताचेच झालेले ज्येष्ठ कवी गुलज़ार यांनी आपल्या भावनांना अशी मोकळी वाट करून दिली आणि तुडुंब गर्दीला वेगळ्याच दुनियेत नेलं.
‘पाकिस्तान हा मला माझा शेजारी वाटतो...तो मला घराची दुसरी खोली किंवा खोलीची दुसरी खिडकीच भासतो. मी त्याला वेगळा पाहूच शकत नाही,’ असं सांगत त्यांनी फाळणीच्या दुःखद आठवणींना उजाळा दिला.
‘सर्व भारतीयांना आपल्या नेत्यांत प्रभू श्रीरामासारखा नेता पाहिजे असतो, जो साऱ्या देशाला कुटुंबासारखं मानेल. सर्वसामान्य जनतेनंही श्रीरामासारखं व्हायला हवं...आपल्यात तितकीच देशभक्ती हवी; तेव्हा कुठं आपला देश पूर्वीप्रमाणे जगात अग्रगण्य होईल,’ असा आशावाद लोकप्रिय तरुण लेखक अमिश त्रिपाठी यांनी व्यक्त केला.
विज्ञानाला रोखणं अशक्य आहे; पण विज्ञानाचा वापर कसा केला पाहिजे हे आत्मसात करणं शक्य आहे. शास्त्रज्ञ रॉबर्ट ओपेनहायमर यांनी अणुबॉम्ब तयार केल्यानंतर उर्वरित जीवनात त्याच्या घातक परिणामांचा विचार करून,
जगाला विज्ञानाचा योग्य वापर करण्याचा धडा दिला. ओपनहायमर यांचे चरित्रकार काई बर्ड यांनी हे सांगतानाच, जर ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ चुकीच्या दिशेनं गेल्यास मानवजातीला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला.
जयपूरमध्ये ता. एक ते पाच फेब्रुवारीदरम्यान पार पडलेल्या ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’मधल्या लेखकांची ही प्रातिनिधिक मतं. वास्तवाला थेट भिडणं, प्रवाहाच्या विरोधात असली तरी आपली मतं ठामपणे मांडणं ही लेखकाची जबाबदारी असते. या साहित्योत्सवात नेमकं हेच घडत असतं. त्यामुळे इथं वाचक, रसिक तुडुंब गर्दी करतात.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या उत्सवात लेखकच ‘राजा’ असतो. व्यासपीठावर केवळ त्याचंच अधिराज्य असते. राजकारणी, संयोजक यांपैकी कुणालाही इथं थारा नसतो. त्यामुळं इथं देशी-विदेशी मिळून चोवीस भाषांमधल्या पाचशेहून अधिक वक्त्यांनी आपलं विचारधन मांडलं.
या वक्त्यांमध्ये कोण नव्हतं? गुलज़ार, शशी थरूर, सुधा मूर्ती, रघुराम राजन, मदन लोकूर, अमिताभ कांत, डॉ. रघुनाथ माशेलकर, देवदत्त पटनायक, पवन वर्मा, विशाल भारद्वाज, आनंद नीलकांतन, पेरुमल मुरुगन,
मणिशंकर अय्यर, गुरुचरण दास, मार्गारेट अल्वा, बद्रिनारायण...नावांची ही यादी न संपणारी आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, खासदार, शास्त्रज्ञ,
अभिनेते, दिग्दर्शक, फॅशन डिझायनर असे सारे इथं येताना पद-प्रतिष्ठेचा डामडौल बाजूला ठेवून येतात व केवळ लेखक म्हणून या उत्सवात सहभागी होतात. बहुतांश मुलाखतकार हेदेखील लेखकच असतात, त्यामुळे वाचकांना समृद्ध अनुभव मिळतो.
इथं लेखकही मार्गदर्शकाची भूमिका बजावत नाहीत. इथं ते त्यांच्या पुस्तकावर, त्यातलं लेखन-आशय-निर्मितिप्रक्रिया यांवर गंभीरपणे काही सांगत राहतात. यावरून अनेकदा वैचारिक जुगलबंदीही अनुभवायला मिळते.
साहित्यात सध्या सुरू असलेल्या प्रवाहांचं प्रतिबिंब इथं अचूक उमटतं. गेली काही वर्षं ‘मायथॉलॉजी’वरच्या (मिथ्य कथा/ पुराणकथा) पुस्तकांचा बोलबाला आहे. यातले बेस्टसेलर लेखक अमिश त्रिपाठी, देवदत्त पटनायक, आनंद नीलकंठन, अरुंधती सुब्रह्मण्यम यांनी इथं आपापली भूमिका मांडली.
‘द असुरा वे’चे लेखक नीलकंठन यांनी हट के मुद्दा मांडला. ते म्हणाले : ‘‘देवांना आव्हान देणाऱ्या असुरांनाही पौराणिक कथांमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. असं का? याचा विचार करताना मी असुरांचा अभ्यास करण्याचं ठरवलं. तेव्हा लक्षात आलं की, कलियुगात यश मिळवण्यासाठी असुरांचेही काही गुण कामी येतात; पण त्यांचा संयतपणे वापर केल्यासच आपला टिकाव लागू शकेल.’’
जैन तीर्थंकरांवर आधारित पटनायक यांचं ‘बाहुबली’ हे पुस्तक सध्या चर्चेत आहे. याबाबत ते म्हणाले : ‘‘देशात जैन समुदाय अवघा एक टक्का आहे; पण ‘जीडीपी’त त्यांचा वाटा दहा टक्के आहे.
जगभर प्रत्येक धर्माची विचारसरणी मायथॉलॉजीवर आधारलेली आहे. इतिहास व मायथॉलॉजी या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. इतिहास हा भूतकाळातल्या तथ्यांवर आधारित असतो, तर मायथॉलॉजी विश्वासावर बेतलेली असते. हा फरक लक्षात घेतला पाहिजे.’’
देशातला विकास, तसंच व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही या विषयांवर इथं वेगवेगळ्या पुस्तकांच्या निमित्तानं चर्चा झडल्या. त्यांत भाग घेताना नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत म्हणाले : ‘‘ ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातूनच भारत विश्वगुरू होऊ शकतो.
जागतिक पुरवठासाखळीत स्थान निर्माण करण्यासाठी निर्यातीवर व उत्पादनावर भर देणं क्रमप्राप्त आहे. यूपीआय, कोट्यवधी बॅंकखाती व स्टार्ट अपच्या माध्यमातून देश पुढं जात आहे.’’
दुसऱ्या बाजूला, रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेतल्या वास्तवाकडं लक्ष वेधलं. ते म्हणाले : ‘‘नोटाबंदीनंतर देशाचा आर्थिक विकासाचा दर घसरण्यास सुरुवात झाली. सध्याच्या विकासदरानुसार, भारत हा २०४७ पर्यंत विकसित देश होऊच शकत नाही.
सध्या देशात ‘दोन भारत’ आहेत. एक आत्ताच विकसित झालेला आहे, तर दुसरा भारत असा आहे की, जिथं ऐंशी कोटी लोक दोन वेळच्या जेवणासाठी पॅकेजकडे डोळे लावून बसलेले असतात. ही दरी कमी करण्यासाठी प्रत्येक घरात एकाला चांगली नोकरी हवी; पण तेवढ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत नाहीत.’’
राजकारणी असूनही लेखक म्हणून लोकप्रिय असलेले शशी थरूर यांनी एकाच दिवशी तीन चर्चासत्रांत भाग घेतला. ते म्हणाले : ‘‘ देशात निवडणुका वेळेवर होत असल्या तरी, विविध राज्यांत विरोधी पक्षांची सरकारं असली तरी लोकशाहीमूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. विरोधकांना संसदेत बोलू दिलं जात नाही.
तपाससंस्था केवळ विरोधकांवरच कारवाई करते हे त्याचंच द्योतक आहे. काँग्रेस पक्ष हिंदूविरोधी नाही. आमच्यातले ऐंशी टक्के नेते हिंदूच आहेत. देशातही तेवढेच हिंदू आहेत; पण वीस टक्के असलेल्या अन्य धर्मीयांचाही नागरिक म्हणून सन्मान व्हायला हवा. तो आम्ही करतो.’’
गेल्या काही वर्षांत इथं येणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जात आहे. त्यामुळे अनेक हौशी लोकही इथं आता मोठी गर्दी करत असतात. त्यांच्यासाठी फॅशनेबल कपडे, दागिने, अन्य वस्तूंचे स्टॉल असतात. सेल्फी काढण्यात धन्यता मानणाऱ्या या गर्दीबाबत प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी वेगळीच टिपण्णी केली.
ते म्हणाले : ‘‘वाचनाशी फारसा संबंध नसलेले लोकही इथं गर्दी करतात हेही वाईट नाही. इथं सर्व प्रकारच्या विचारसरणी एकत्र नांदतात. यानिमित्तानं त्यांच्या कानावर चार चांगले शब्द पडतात. न जाणो, यातल्या एखाद्या ओळीनं, शब्दानं त्यांचं सारं जीवनदेखील बदलू शकतं.’’
या ठिकाणी मराठी साहित्यसंमेलनाची आठवण पदोपदी आल्याशिवाय राहत नाही; पण या दोन्ही संमेलनांची तुलना करणं चुकीचं ठरेल. कारण, हा उत्सव ‘मास’साठी नसून ‘क्लास’पुरताच असतो. त्यामुळं इथं येण्यासाठी तिकीट काढावं लागतं.
या काही मर्यादा गृहीत धरल्या तरीही मराठी साहित्यसंमेलनासारखा सोहळा आयोजित करताना इथल्या काही गोष्टी नक्कीच अनुकरणीय अशा आहेत; विशेषतः राजकारण्यांचा कमी वावर, लेखकांना दिला जाणारा सन्मान व प्राधान्य, वेळेचं काटेकोर पालन, नव्या पुस्तकांवरच चर्चा या गोष्टी नक्कीच अनुकरणीय आहेत.
संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे. एकमेकांची मतं पटोत अथवा न पटोत, संवाद सर्वांमध्येच हवा; मग तो कुणीही असो, अती उजवा अती डावा किंवा मध्यममार्गी. संवादातूनच विचारांना चालना मिळते आणि नव्या स्वप्नांना पालवी फुटते.
आजूबाजूच्या कर्कश कोलाहलात सध्या हा संवाद कुठं तरी खुंटत चालला आहे असं वाटण्यासारखी परिस्थिती अनुभवायला मिळते. अशा परिस्थितीत साहित्यिकांच्या या मेळ्यात विचारांची मुक्त उधळण अनुभवायला मिळाली; जिनं वाचकांना विचारप्रवृत्त केलं, पुढच्या जगण्याची दिशा दाखवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.