Jaisingh Kumbhar writes about enlightened educational revolution Dudhgaon  sakal
सप्तरंग

शैक्षणिक क्रांतीनं उजळलेलं दुधगाव

१८६४ मध्ये आऊबीन आंबू कासार या इथल्या शाळेच्या विद्यार्थिनीचा दाखला

जयसिंग कुंभार,

१८६४ मध्ये आऊबीन आंबू कासार या इथल्या शाळेच्या विद्यार्थिनीचा दाखला

सांगलीच्या पश्‍चिम बाजूचा भाग म्हणजे कृष्णा-वारणाकाठावरचा ऊसपट्टा. साखर कारखान्यांनी इथं आणलेली समृद्धी दिसते. हिंदकेसरी मारुती मानेंचं कवठेपिरान आणि त्यापलीकडे दुधगाव. या दोन गावांची वैशिष्ट्यं म्हणजे मानेभाऊंच्या गावाने बलोपासना केली, तर दुधगावने ज्ञानोपासना. दुधगावच्या या परंपरेचा मागोवा घ्यायचा तर इथल्या जिल्हा परिषद शाळेचं दफ्तर धुंडाळलं तर बराच ऐवज सापडतो. १८६४ मध्ये आऊबीन आंबू कासार या इथल्या शाळेच्या विद्यार्थिनीचा दाखला दिसतो. पुण्यात सावित्रीबाईंची भिडे वाड्यातील मुलींची पहिली शाळा सुरू झाली ते वर्ष होतं १८४८. याच दुधगावमधून अवघ्या महाराष्ट्रातील बहुजनांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवणाऱ्या भगीरथ कर्मवीर भाऊरावांच्या रयतच्या शैक्षणिक मॉडेलची सुरुवात झाली. शिक्षणाच्या तीव्र आसक्तीची ही मुळं अशी रुजलेली. या गावाने शिक्षणाची समृद्धी अनुभवली आणि अवघ्या पंचक्रोशीलाही दिली.

शिक्षणातून आलेली दुधगावची समृद्धी अगदी मोजक्या शब्दांत सांगायची, तर इतकंच सांगता येईल की, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतून दरमहा चार कोटी रुपये दुधगावमध्ये येतात. ही रक्कम असते इथल्या सेवानिवृत्त सरकारी नोकर-शिक्षकांच्या पेन्शनची. आज गावात असलेल्या लोकसंख्येच्या दुप्पट दुधगावकर राज्याच्या कानाकोपऱ्यांत नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरावलेत.

गावच्या सामाजिक कार्यात पुढे असणारे कार्यकर्ते अविनाश कुदळे यांनी हा बदल अगदी मोजक्या शब्दांत मांडला. ते म्हणाले, ‘‘ग्रामीण महाराष्ट्रात ज्ञानाची गंगा घरोघरी नेणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा प्रारंभ दुधगावमध्ये झाला, तो दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून. १९०९ मध्ये भाऊसाहेब कुदळे यांनी ही संस्था स्थापन केली. दुधगावमध्ये १८६० च्या आधी गावात प्राथमिक शाळा होती. हा कालखंड सावित्रीबाईंची पुण्यातील शाळा सुरू झाली त्याजवळचाच. आऊबीन कासार यांचा १८६४ चा शाळेचा दाखला मिळतो. अद्याप देशात स्वातंत्र्याच्या चळवळीचं वारंही सुरू झालं नव्हतं तो हा काळ. १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली आणि देशभरात नव्या विचारांची बीजपेरणी सुरू झाली. स्वातंत्र्यलढ्यात या गावातील तीस स्वातंत्र्यसैनिकांनी कारावास भोगला. तथापि खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यासाठी भारतीय समाजात शिक्षण प्रसाराची गरज असल्याचा विचार विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच भाऊसाहेब कुदळे यांच्यासारख्या धुरिणांच्या मनात सुरू झाला. भाऊसाहेबांनी तेव्हाच्या शेठ चतुरभाई पितांबर शहा यांच्या वाड्यात १९०९ मध्ये दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. एखाद्या खेडेगावात शिक्षण प्रसारासाठी शिक्षण संस्था स्थापन करणं म्हणजे त्या गावधुरिणांच्या दूरदृष्टीची कल्पना यावी. इथंच कर्मवीर आश्रम व्यवस्थापन समितीचे जबाबदार सदस्य होते. रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेचं बीजच ते. सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांची सोय एकत्र असली पाहिजे, याचा विचार सर्वप्रथम त्यांनीच दुधगावमध्ये अमलात आणला. आज शतकभराच्या दुधगावच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घ्यायचा तर स्वतंत्र ग्रंथच लिहावा लागेल.’’

दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष, इतिहासाचे गाढे अभ्यासक, राजर्षी शाहूंचे दिवाणबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे यांची १९०६ मध्ये या गावात सभा झाली. लठ्ठेंच्या भाषणाच्या प्रभावातून भाऊसाहेब कुदळे यांनी गावात शाळा सुरू करायचा निर्णय घेतला. अप्पा दादा पाटील, नाना येडेकर, शामगोंडा पाटील या व्यापारी मंडळींनी पुढाकार घेत आश्रमशाळा स्थापन केली. आजूबाजूच्या गावांतून मुलं इथं वसतिगृहात येऊ लागली. सर्व जाती-धर्मांची मुलं एकत्र राहू लागली, शिकू लागली. ते त्यावेळचं ड्राय बोर्डिंग होतं, त्यासाठी गावागावांतून धान्य-रॉकेल गोळा व्हायचं, व्यापारी त्यासाठी पैसा मोजायचे. पलीकडच्या कुंभोज गावातले कर्मवीर अण्णा या सर्व नेतेमंडळींशी संबंधित होते. शाहूंच्या विचाराने प्रभावित झालेल्या अण्णांनी इथला ड्राय बोर्डिंगचा प्रयोग ‘रयत’च्या रूपाने विस्तारताना १९१९ मध्ये सातारा जिल्ह्यातील काले इथं त्यांनी ‘रयत’ची स्थापना केली आणि दुधगावच्या शैक्षणिक विस्तारालाही गती मिळाली. कारण इथल्या बोर्डिंगचे विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी रयतला जाऊ लागले आणि रयतमध्येच शिक्षकही होऊ लागले.

हा शैक्षणिक प्रवास मांडताना सध्या सांगलीतील आरवाडे हायस्कूलमध्ये शिक्षक असणारे दादासाहेब पाटील म्हणाले, ‘‘गेल्या सव्वाशे वर्षांतील दुधगावच्या या शैक्षणिक प्रवासाचा मागोवा खूप रंजक आहे. ग्रामीण भारत कसा कसा घडत गेला याचाही हा प्रवास आहे. आज दुधगावच्या प्रगतीचे दृश्‍य ठोकताळे मांडायचे, तर गावात चार बॅंकांच्या शाखा आहेत, सुस्थितीतील नऊ पतसंस्था आहेत, सुमारे १७ हजार लोकसंख्या आहे आणि साडेतीन हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुला-मुलींच्या दोन शाळा आहेत. याशिवाय पहिली ते पाचवीची स्वतंत्र खासगी शाळा आहे, जिल्हा परिषदेमार्फत चालवलं जाणारं उर्दू हायस्कूल आहे. रयत शिक्षण संस्थेची मुला-मुलींची दोन हायस्कूलं आणि एक कनिष्ठ महाविद्यालय आहे. दुधगावच नव्हे, तर पंचक्रोशीतील गावांमधून इथं विद्यार्थी येतात. आजही ही परंपरा सुरू आहे. या शिक्षणपरंपरेमुळे सर्व जाती-धर्मांतील मुलं शिकत आहेत. परिणामी हजारो शेतकरी कुटुंबांचं जीवनमान उजळलं. अगदी अवघ्या गेल्या चाळीस वर्षांतील या प्रगतीचं मोजमाप आकड्यांत करता न येणारं. त्यातलं एक उदाहरण द्यायचंच असेल तर राज्यातील प्रत्येक तालुक्‍यात दुधगावचा किमान एक शिक्षक शंभर टक्के असणारच. राज्यातील विविध जिल्हा परिषदा, रयत, लठ्ठे, विवेकानंद, बाहुबली विद्यापीठ, कासेगाव शिक्षण संस्था अशा विविध संस्थांमध्ये गेल्या चाळीस वर्षांत सुमारे तब्बल १३०० शिक्षकांनी सेवा केली आहे. त्याआधीचा हिशेबच नाही. त्यांनी महाराष्ट्रातील खेडोपाड्यांतली मुलं शिकवली आहेत. अगदी आजघडीला त्यातले साडेचारशे शिक्षक कार्यरत आहेत.’’

‘‘दुधगावच्या शिक्षकांच्या बहुसंख्येमुळे शिक्षकांच्या विविध आर्थिक संस्थांच्या अध्यक्षपदाची धुराही अनेक दुधगावकरांकडे आली. कै. प्रदीप पाटील, सुनंदा कुदळे, जगदीश नलावडे, अजितकुमार हेरवाडे, काकासाहेब कोले, अनिल कुदळे अशा अनेकांनी या आर्थिक संस्थांचं नेतृत्व करताना आर्थिक शिस्त पाळत संस्थांना उन्नत केलं. दहा-पंधरा वर्षांपूर्वी आर्थिक अरिष्टाच्या वादळात जिल्हाभरातील पतसंस्थांची वाताहत झाली; मात्र दुधगावमधील पतसंस्था आजही ताठ कण्याने अर्थकारण करीत आहेत.’’

नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यांत हजारो दुधगावकर आता स्थिरावले आहेत. गावाचं ऋण मान्य करून ती सारी मंडळी गावच्या शैक्षणिक विकासासाठी सदैव तत्पर असतात. स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्वच खेड्यांमध्ये दिसणाऱ्या अस्पृश्यतेला जैन समाजबहुल दुधगावमध्ये विद्यार्थी वसतिगृहामुळे सुरुंग लागला. या अठरापगड जातींची, अस्पृश्य समाजातील मुलं इथं एकत्र राहायची. या मुलांनी पुढे अनेक क्षेत्रांत योगदान दिलं. त्याची कैक उदाहरणं सांगता येतील. त्यातली काही उदाहरणं सांगायला हवीत. दक्षिण महाराष्ट्रात शैक्षणिक प्रसार करणाऱ्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष झालेले मेघाजीराव कांबळे दुधगावच्या वसतिगृहात शिकले. पोलिसदलातून डीआयजी म्हणून निवृत्त झालेले इथले राम येडेकर, जे गाजलेल्या शोले चित्रपटाचे कला दिग्दर्शक होते, रयत शिक्षण संस्थेचे निरीक्षक राहिलेले आणि आबालाल शेखही याच वसतिगृहाचे विद्यार्थी, ज्यांना कर्मवीरांनी सातारला शिक्षणासाठी नेलं. वसतिगृहातील मुलं उपवासी राहू नयेत म्हणून रयतमाउली लक्ष्मीबाईंनी आपलं मंगळसूत्र गहाण ठेवलं, त्या प्रसंगाचे ते साक्षीदार. हे आबालाल राज्याच्या शिक्षण संचालकपदापर्यंत पोहचले. आता त्यांची पुढची पिढी लंडनवासी आहे. अठरापगड जातींमध्ये आलेली शैक्षणिक क्रांती अचंबित व्हावं अशीच ही यादी. आजच्या वर्तमानातही राज्यभर मूळचे दुधगावकर असलेले शेकडो उच्चपदस्थ आहेत, ते शिक्षणाच्या वाघिणीचं दूध पिऊनच पुढं आले आहेत.

गावात मागासवर्गीयांचे कांबळे आणि आवळे अशी दोन प्रमुख कुटुंब. यातील तीनशे कुटुंबं आज मुंबईत स्थायिक झाली आहेत, ते तिथं उच्चपदस्थ आहेत. तेच शेख, कळवात, जमादार, पठाण, मुल्ला अशा मुस्लिम कुटुंबांबाबतही सांगता येईल. शिक्षणाने येणारी सक्षमता वेगवेगळ्या रूपांत प्रगटते. आमच्या ‘सकाळ’चे एक वितरक कै. अजित कुदळे यांचं उदाहरणही असंच. ते ‘सकाळ’चे बातमीदार, सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि गावातील वसंतदादा पाटील पतसंस्थेचे संचालक, सोसायटीचे अध्यक्ष होते. तसं ते अल्पशिक्षितच; मात्र गावच्या राजकारणात कायम सक्रिय राहिलेले.

शिक्षणाने पिढ्यांच्या विचारांच्या कक्षा विस्तारल्या, गावकरीही देशभर विस्तारले. शिक्षणाने मिळालेली प्रगतीची संधी साधण्यासाठी आडमुठे, कुदळे, कोले, साजणे, पाटील, देशमुख, लवटे, धनवडे, भोसले अशा तालेवार शेतकरी कुटुंबांतील दुधगावकर मंडळींनी आता राज्यातील अनेक शहरं, गावांत कायम निवास केला आहे. त्यामुळे त्यांचं शिवार खंडाने करण्यासाठी कर्नाटकातून अनेक शेतमजूर आले आणि कायमस्वरूपी दुधागावकर झाले. कधीकाळी इथली तंबाखू कर्नाटकसह देशभरातील अनेक राज्यांत जायची, ते पीकही हद्दपार झालं. आता ऊसच ऊस. त्यामुळे नापिकीचं संकटही दिसतंय. ही ऊसशेती बाहेर राहून करून घेणारे दुधगावकर महाशिवरात्रीला दुधेश्‍वराच्या यात्रेला हमखास येतात. जैन, मुस्लिम, मराठा अशा विविध जाती-धर्मांचे लोक ग्रामदैवताच्या पालखी मिरवणुकीत सहभागी असतात. ही यात्रा म्हणजे स्वतंत्र भारताचं भव्य स्वप्न म्हणजेच नियतीशी करार मांडणाऱ्या नेहरूंच्या समग्र भारताचं दर्शन घडवते. धर्म-जातिभेदाच्या भिंती इथं गळून पडलेल्या असतात. शिक्षणाची कास धरलेल्या दुधगावचा हा प्रवास तेव्हाच्या समस्त ग्रामीण भारताचा झाला असता तर...? एक खरंच की, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना हा प्रवास कुठून सुरू झाला हे आजच्या पिढीने सवड काढून जाणून घेऊनच गत पिढ्यांच्या नावाने बोटं मोडली पाहिजेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT