college sakal
सप्तरंग

लोकांच्या जिवाबरोबरचा खेळ थांबेल?

मी जालन्याला गेलो होतो. तिथं एका कॉलेजमध्ये माझं व्याख्यान होतं. स्टेशनवर उतरून बाहेर आल्यावर एक माणूस मला दिसला.

संदीप काळे saptrang@esakal.com

मी जालन्याला गेलो होतो. तिथं एका कॉलेजमध्ये माझं व्याख्यान होतं. स्टेशनवर उतरून बाहेर आल्यावर एक माणूस मला दिसला. पहाटेची वेळ, काही अंतरावरचा तो माणूस शेकोटी पेटवण्याच्या तयारीत होता. त्या माणसाला रिक्षाविषयी विचारावं, असे मी मनात ठरवलं. मी स्टेशनच्या बाहेर पडलो, गारवा अंगाला एकदम झोंबला. मी शेकोटी करणाऱ्या माणसाला विचारलं, ‘मला जालना शहरात जायचं वाहन कुठून मिळेल?’

तो म्हणाला, ‘थोडं पुढं जाऊन वळा. तिथं मिळेल.’ मी निघणार तितक्यात त्या संयोजकांचा फोन आला. ते म्हणाले, ‘मी तुम्हाला घ्यायला येतोय. मला थोडा वेळ लागेल.’ असं सांगून त्यांनी फोन ठेवला. मी त्या व्यक्तीला त्यांनी सांगितलेलं खेडं किती लांब आहे, असं विचारलं. त्यावर तो म्हणाले ‘बराच वेळ लागेल,’.

मी ज्या व्यक्तीशी बोलत होतो, त्यांचं नाव समाधान जाधव. समाधानचे आजोबा व्यंकोबा जाधव. तेव्हाचं उस्मानाबाद आणि आताचं धाराशिव इथून रोजगाराच्या निमित्तानं जालना इथं आले. लोखंडाच्या कंपनीत अगोदर वॉचमन आणि मग पुन्हा कामगार असं काम केलं. व्यंकोबा यांना कर्करोग म्हणजे कॅन्सर झाला, तेव्हा समाधान यांचे वडील देवबा यांचं नुकतेच लग्न झालं होतं. योग्य तो इलाज न झाल्यानं व्यंकोबा यांचं निधन झालं.

देवबा त्यांच्या वडिलांच्या लोखंडाच्या कंपनीत हेल्पर म्हणून काम करीत होते. समाधान दहावीला असेल, तेव्हा देवबा यांनाही कॅन्सर झाल्याचं कळलं. देवबा यांची आईही कॅन्सरनं गेली. आता समाधान यांचं वय बेचाळीस आहे. वयाच्या अडतिसाव्या वर्षी समाधानला कॅन्सर झाल्याचं पुढं आलं. समाधानला डॉक्टरांनी त्यांच्या घरातील सर्व माणसांना कॅन्सर का झाला हे सांगितल्यावर समाधान एकदम हादरून गेले.

लोखंडाची उत्पादनं तयार करणाऱ्या कंपनीतलं वातावरण आणि केमिकलच्या सततच्या संपर्कातून कॅन्सरसारखा हा गंभीर आजार झाल्याचं पुढं आलं. लोखंडी सळ्या आणि लोखंडातच्या विविध उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या या कंपन्यांच्या वातावरणात राहणाऱ्या आसपासच्या असंख्य माणसांभोवती कॅन्सरचा विळखा पडला. केवळ यात समाधानचं एक कुटुंब नाही तर जागोजागी ही परिस्थिती आहे, असं समाधान सांगत होता.

समाधान म्हणाला, ‘जगणं महत्त्वाचं होतं. माझ्या आजोबांनी कमी वयात माझ्या वडिलांवर सर्व जबाबदारी टाकली. माझ्यावर तीच गत आली. माझी बायको लवकर वारली. मला एक मुलगी आहे, त्यामुळं मला कुणी मुलगी देत नाही. इथं जो कुणी लोखंडाच्या कारखान्यात काम करतोय, त्यांना मुलगी देण्यास कुणी धजत नाही. मी तिथली नोकरी सोडली, आता या स्टेशनवर रेल्वेतून सामान उतरवण्याचं काम करतो.’

मला घेण्यासाठी संयोजक प्रा. नितीन सातव हे तेवढ्यात आले. मी समाधानचा निरोप घेऊन निघणार, तितक्यात समाधान म्हणाला, ‘मला पण वाटेत सोडा साहेब. आता मीही निघतो घरी.’ आम्ही गाडीत बसलो आणि पुन्हा गप्पा सुरू झाल्या. आता गप्पांमध्ये सातवही सहभागी झाले होते.

चर्चेत सातव म्हणाले, ‘माझ्या मुलीला कॅन्सर झाला, मी लोखंडी कंपनीच्या जवळ राहतो त्यामुळं हा आझार झाला हे मुलगी वारल्यावर डॉक्टरनं सांगितलं.’ सातव यांचं ऐकून मला धक्काच बसला. सातव म्हणाले, ‘‘हा जिल्हा विकासाबाबत एका तालुक्यासारखा आहे. याचं कारण बुद्धिवादी लोक इथं कमीच आहेच. त्या प्रत्येकाला माहिती आहे.

इथल्या वातावरणाला नकारात्मकतेचा गंध आहे. अनेक सर्व्हे झाले. अनेक अहवाल आले. तज्ज्ञ मंडळींनी या लोखंडांच्या कारखान्यानं नागरिकांच्या भवितव्याशी खेळणं थांबवावं, असं सुचवलं; पण त्यांचं ऐकतं कोण? वर्षानुवर्षे हे कारखाने असेच सुरू आहेत.’

आमच्या गप्पात समाधानचं घर कधी आलं समजलेच नाही. आम्ही घरात गेलो. घरात हार घातलेले फोटोच फोटो होते. समाधान यांनी या फोटोमागच्या प्रत्येक चेहऱ्याची करुण कहाणी मला सांगितली होती. ती पुन्हा माझ्या डोळ्यासमोरून येत होती. मी अस्वस्थ होऊन त्या घरातून बाहेर पडलो. सातवसर या विषयाचे कमालीचे अभ्यासक वाटत होते. त्यांनी मला सांगितले, ‘जालन्यात आणि जालना परिसरात अनेक घरी तुम्हाला असे कॅन्सरचे पेशंट दिसले तर नवल वाटू देऊ नका. जालन्याला कॅन्सरचे स्पेशल दवाखाने आहेत,’

मी दुसऱ्या दिवशी कार्यक्रम संपल्यावर ज्या भागात सर्व लोखंडाची उत्पादनं कऱणाऱ्या कंपन्या आहेत, तिथं फेरफटका मारला. तिथं परिस्थिती धक्कादायक आहे. मी त्या भागातील अनेक लोकांशी बोललो. ते सारे वर्षानुवर्षापासून जीव मुठीत धरून दिवस काढत आहेत.

या प्रश्नावर लढत असणाऱ्या अनेकांना मी भेटलो, अण्णा सावंत यांच्यासारख्या कायदेशीर लढाई देणाऱ्या व्यक्तीला मी बोलतं केलं. त्यातून खूप मोठं वास्तव पुढं आलं. या साऱ्या लोखंड बनवणाऱ्या कंपन्याचे हात किती दूरपर्यंत पोहचले आहेत, याचे अनेक दाखले मला चर्चेतून मिळत होते.

या प्रश्नावर पुढाऱ्यांनी कित्येक वेळा आवाज उठवला; पण काही फायदा नाही, असंही सांगण्यात आलं. माजी मंत्री आणि या प्रश्नाचे जाणकार माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरी आम्ही गेलो. त्यांच्याशी बोलताना अर्जुनभाऊ यांनी प्रदूषण, कॅन्सर, या कारखान्याच्या मालकांचे असणारे लागेबांधे, याची लांबलचक यादी माझ्यासमोर ठेवली. त्यांचं सारं ऐकून मी सुन्न झालो. माझ्या मनात एकच प्रश्न पडला होता, या विषयाला सोडवणारा कोणीही पुढं येणार नाही का? पीडित लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी कुणीही पुढं येणार नाही का?

विकास, हाताला काम, उद्योगांचा ध्यास हे आवश्यक आहे. ते झालंही पाहिजे; पण कमीत कमी खर्चाची मानसिकता घेऊन सरकार, प्रशासनाला हाताशी धरून कोट्यवधी लोकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या या कारखान्याला, निसर्गाला आव्‍हान देणाऱ्या खेळाला कोणी विरोध करणार आहे की नाही?

गरीब माणसाच्या आयुष्याची राखरांगोळी होते आणि श्रीमंतांच्या घरातून सोन्याचा धूर निघतो हे वर्षानुवर्षांपासून चालणारं चित्र बदलणार आहे की नाही? झोपेत असलेले पर्यावरणवादी आणि झोपेचं सोंग घेणारं सरकार लोकांच्या निष्पाप जिवांशी खेळणं थांबवणार कधी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT