सर्वांनाच लेखन-वाचनातून-पुस्तकातून विकासाची वाट सापडेल असे नाही. प्रत्येक मूल वेगळं मानलं तर नक्कीच मुलांना शाळेत आपलेपणा वाटेल.
सर्वांनाच लेखन-वाचनातून-पुस्तकातून विकासाची वाट सापडेल असे नाही. प्रत्येक मूल वेगळं मानलं तर नक्कीच मुलांना शाळेत आपलेपणा वाटेल. ते जे काही शिकतायत, करतायत त्यात त्यांना रस वाटू शकेल. शाळेत येणं ही जबरदस्ती न वाटता तो एक आनंदादायी प्रवास ठरू शकेल.
खेडोपाडी शाळांवर गेलं की एक चित्र साधारणतः दिसतं. नवीन पाहुण्यापुढं, अनोळखी लोकांपुढं पोरं बोलताना बुजतात, घाबरतात, पुढे येऊन बोलत नाहीत. शिकण्याचा कंटाळा येतो. घरचीही अनेक कारणं असतात, ज्यामुळं शाळा लवकर सोडली जाते. वर वर पाहिलं तर कोणतेही हावभाव नसणारे चेहरे दिसतात. कधी उलट चित्र दिसते. त्यांचा दांडगटपणा दिसतो. बेशिस्त दिसते. मारामारी दिसते. त्यांच्यात मोठ्यांचं ऐकायची वृत्ती नाही. असे पुढच्या पिढ्यांवर येता-जाता नकळत शिक्केही लावले जातात. पण हे केवळ हिमनगाचं टोक आहे. विविध परिस्थितीतून शिकणाऱ्या मुलांच्या मनात किती तरी काही घडत असेल, हे सगळं समजून घ्यायला आपल्या शिक्षणव्यवस्थेत जागा आणि संधी आहे का? त्यांच्या भावविश्वात इंच-इंच का होईना, पण आत शिरता येईल का? त्यांच्या जागेवरून जगाकडे पाहता येईल का? चळवळीच्या शिक्षण प्रकल्पात काम करताना आलेले हे काही अनुभवक्षण...
मला गावाबाहेर जायचंच नाही...
ज्ञानीला कोण नाही ओळखत गावात? आणि ज्ञानी कुणाला ओळखत नाही? ज्ञानेश्वरीला गावातल्या सगळ्या खबऱ्या ठाऊक. कोणाकडच्या शेळीला काल पहाटे वासरू झालं इथपासून कोण यंदा ग्रा.पं. सरपंच झालं सगळं तिला बरोब्बर माहीत. गावात कुणी नवीन आलं की ज्ञानीच त्यांना गाव दाखवते. २६ जानेवारी, १५ ऑगस्टला तयारीत हमखास पुढे असते. गावात कुठल्याही कार्यक्रमात, लग्नात कामासाठी पुढे सरसावते. तिला तिचा गाव फार आवडतो. तिची ही हुशारी पाहून कित्येकदा संस्थेवाले तिला विचारतात- तुला शहरात नेतो, चांगली शिकशील, मोठी होशील, पण ‘‘मला मुळी गावाबाहेर जायचंच नाही...’’ ती तोंडावर सांगते.
इथे शहरात जायला गावातली अनेक मुलं संधी शोधतायत, पण ज्ञानीला तिचा गाव सोडायचा नाही. तिच्या आई-बाबांना ‘ही पोर गावात राहून काय करेल, गावात काय राहिलंय हिच्यासाठी’ या चिंतेत असतात. ज्ञानीला ‘या कशा-कशाची’ पर्वा नाही. ती कधी एखाद्या झाडाच्या शेंड्यावर, कधी वाऱ्याच्या वेगाने सायकलवर, कधी गुरांपाठी शीळ घालत मुक्त हिंडत असते...
आम्ही शाळेत का येऊ?
सत्राला जातानाच धनंजय, सुप्रिया, नंदन काष्टीपाडाच्या फाट्याशी असलेल्या भेंडीवर बसून चिंचा खात होते. त्यांना ‘शाळेत चला’ म्हटलं तर म्हणाले, ‘आज आम्ही सुट्टी टाकतोय.’
‘का पण?’
‘आम्हाला नाही यायचं शाळेवर.’ त्यांना आज पाखरांवर जायचं होतं. पक्षी पाहायला, जंगलात गलोल घेऊन लपत-छपत पाठलाग करायला, माळरानावर निवांत फिरायला यांना चिक्कार आवडतं. मग अख्खा दिवसही कमी पडेल त्यांना पाखरांमागे हिंडायला! जाता जाता त्यांना सांगितलं, आज आपण शाळेवर पक्ष्यांच्याच गप्पा मारणारोत.. ती तिघं तिथेच झाडावर बसून हसत-पाहत राहिली एकमेकांकडे... एव्हाना वर्गात पक्ष्यांची चर्चा चांगलीच रंगली होती. वर्गाबाहेर पाहिलं तर धनंजय, सुप्रिया, नंदन सायकलवरनं लगबगीनं उतरत होते. आमच्या गराड्यात ही तिघं सहज मिसळली... धनंजय सनकन्हुरला पक्ष्यांच्या अंड्याबद्दल पाऽर हातवारे करून काय काय सांगायलाही लागला होता...
ती दोघं काहीच न बोलता परतली
निखिल आणि अंकुश नेहमीप्रमाणे शाळेवर उशिराच आले. सरांचा ओरडा खाल्ला- फटके खाल्ले. बाकीच्यांनी त्यांची टिंगलटवाळी केली. ते निमुटपणे पाठच्या बाकावर जाऊन बसले. त्यांना काहीही विचारलं तरी ते कधीच काही बोलत नहीत. जेमतेम तीनचार शब्द. बऱ्याचदा मधल्या सुट्टीत सगळीजण डबा खायला जातात, तेव्हा ही दोघं मात्र खिशात हात घालून इथं तिथं भरकटत बसतात. घुटमळतात शिक्षकांच्या खोलीपाशी. त्यांच्या डोळ्यात सतत एक लख्ख चमक असते आणि चेहऱ्यावर कोरडा करकरीत भाव. एकदा हेमांगी सहज बोलता बोलता म्हणाली, त्यांचे आई-बाबा दोघंही दारू पितात रोज आणि झोडतात त्यांना. त्यांच्या त्याच कोरडेपणात सगळ्याची उत्तरं लपली असावीत.
खिडकीतून वर्गापर्यंतचा प्रवास
मनीष खूप दांड्या मारतो. केव्हाकेव्हाच शाळेवर येतो. त्याचा आजोबा सुतारकाम करतो. शाळेवरची पोरं सांगत होती. त्या दिवशीच्या सत्रात ‘मुडा’ कसा बनवतात याची चर्चा चालली होती. ‘मुडा’ म्हणजे मासे बनवण्याचं साधन. बांबूचं बनवतात. त्याच्या बारीक पट्ट्या तासून एक एक विणावं लागतं. वर्गात पोरं सांगत होती. तेवढ्यात मनीष सांगायला लागला, ‘‘अरे आधीच कसा विणायचा? आधी बुटी लावायची, नीट मापून घ्यायचं, मग ना विणत जायचं.’’ तो खिडकीबाहेरूनच ओरडून सांगत होता. एरवी शाळेत यायला कंटाळणारा हाच मनीष. तो आता खिडकीतून आत वर्गात ‘मुडा’ घेऊनच आला. सगळ्यांना कसा बनवायचा ते सांगायला.
मैदानावर ती एक रॉकेट असते...
हर्षला कायम पाठच्या बाकावर बसते. इतरांना सोप्पी वाटणारी गणितं तिला सोडवता येत नाहीत. मग सरांचा-मॅडमचा ओरडा खाते. सातवीत असली तरी तिला अजून खणखणीत वाचता येत नाही, याचं तिच्या घरच्यांना वाईट वाटतं. मग ते तिला मारून मुटकून गावच्याच सरांकडे ज्यादा वर्गासाठी पाठवतात. त्यातही ती कसाबसा पळ काढते. वर्गात तिचा पाय ठरत नाही. तिला शाळेत-गावात एक ‘उडाणटप्पू’ मुलगी म्हणूनच ओळखतात. हिचं काही अभ्यासात लक्ष नाही, दहावी तरी जेमतेम होईल का?... पण तीच हर्षला जेव्हा वर्गाबाहेर मैदानात येते; तेव्हा एखाद्या सुसाट रॉकेटसारखी पळते. डोंगर झपझप् चढते. खो-खो खेळताना भल्या भल्यांना हरवते. कपारीतून डोहात उड्या मारते. कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या छतावर सराईतपणे चढून कौलं नीट करते. तिने शाळेला एकदा जिल्हास्तरीय बक्षीसही मिळवून दिलंय.
कुणाच्या घरी सकाळी जेवण शिजतच नाही. कुणाचे घरवाले कामाच्या शोधात शहरगावी भटकतात. कुणी खेळात तरबेज, तर कुणाचे बोलणे सतत ऐकावेसे वाटणारे. कुणी आत्मविश्वासाविना इतकं हरवून गेलेलं. ‘शाळा’- ‘शिकणं’ याभोवती किती तरी पदर आहेत. याची जाणीव ही असंख्य मुलं आपल्याला करून देतात. ज्ञानी, मनीष, हर्षला, अंकुशसारखी किती तरी मुलं-मुली आपल्या आसपास असतीलही. सगळ्यांच्या व्यक्त व्हायच्या जागा वेगळ्या. गरजा वेगळ्या. हे सर्वजण शिक्षणाकडे आशेनं पाहत आहेत.. पाठ्यपुस्तकं तीच असतील, पण या सर्वांपर्यंत ती पोचवताना वेगवेगळ्या संधी निर्माण करू शकू का?
(लेखिका ‘वयम्’च्या कार्यकर्त्या आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.