Plastic in dinner plate sakal
सप्तरंग

जेवणाच्या ताटात प्लास्टिक!

समुद्राच्या तळापर्यंत प्लास्टिकचे प्रदूषण आढळून येतेय. शास्त्रज्ञांच्या मते, २०५० पर्यंत समुद्रांमध्ये माश्यांपेक्षा जास्त प्लास्टिक कचरा असेल.

अवतरण टीम

- जुही चावला मेहता

समुद्राच्या तळापर्यंत प्लास्टिकचे प्रदूषण आढळून येतेय. शास्त्रज्ञांच्या मते, २०५० पर्यंत समुद्रांमध्ये माश्यांपेक्षा जास्त प्लास्टिक कचरा असेल.

भविष्यात आपल्या नातवंडांच्या जेवणात प्लास्टिक हा मुख्य घटक असेल.

- अँथनी टी हिंक्स

काय, वाचून धक्का बसला ना? प्लास्टिक गरज नसतानाही आपल्या आयुष्याचा इतका महत्त्वपूर्ण भाग बनला आहे, की त्याला उपलब्ध असणारे पर्यायसुद्धा आपण सोयीस्करपणे नाकारतो आहोत. त्यामागचं मुख्य कारण काय, तर प्लास्टिक वापरून फेकून देता येतं. त्याचं ओझं आपल्याला होत नाही; पण आपणच हलक्या केलेल्या या ओझ्यामुळे निसर्गाचा श्वास कोंडतो आहे, हे आपण विसरतो. या प्लास्टिक नावाच्या महाराक्षसाचा आपल्या आयुष्यात कसा प्रवेश झाला तुम्हाला माहिती आहे का?

१९०७ मध्ये बेकेलाईटच्या शोधामुळे जागतिक व्यापारात कृत्रिम प्लास्टिक रेजिनचा परिचय झाला आणि त्याने उत्पादनामध्ये एक क्रांती घडवून आणली. साधारणतः १९३३ ते १९४५ या दुसऱ्या महायुद्धाच्या जवळपासच्या काळात प्लास्टिकचे नवीन नवीन शोध लागले. १९५०चा काळ पाहिला तर त्या वेळी प्लास्टिक उत्पादनामध्ये एकदम वाढ झाली. नवीन गोष्टीची जशी क्रेझ असते तशीच प्लास्टिकची निर्माण झाली. प्लास्टिकच्या नवीन नवीन गोष्टी वापरात आल्या. आकर्षक रंग आणि कमी किंमत यामुळे प्लास्टिक लोकप्रिय झाले.

१९६० च्या उत्तरार्धात आणि १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस प्लँक्टनचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना महासागरात प्लास्टिक प्रदूषण असल्याचे पहिल्यांदा लक्षात आले. प्लँक्टन म्हणजे समुद्री प्रवाहांच्या हालचालीमध्ये तरंगणारा प्राण्यांचा समूह. म्हणजे भटकणारा किंवा भटक्या.

जगातील महासागरांमध्ये एकूण किती प्रमाणात प्लास्टिक प्रदूषण पसरले आहे याविषयीचा ओशन ग्राफिक रिसर्च पहिल्यांदा २०१४ मध्ये प्रकाशित करण्यात आला. अंदाजे २,४४,००० टन वजनाचे किमान ५.२५ ट्रिलियन प्लास्टिकचे कण समुद्राच्या पृष्ठभागावर किंवा त्याच्या जवळ तरंगत होते, असा अंदाज त्यामध्ये नमूद करण्यात आला आहे.

हा प्लास्टिकचा महापूर दिवसेंदिवस इतका पसरत गेला की विसाव्या शतकाच्या अखेरीस माऊंट एव्हरेस्टपासून समुद्राच्या तळापर्यंत अनेक ठिकाणी त्याचे प्रदूषण आढळून आले. २०२१ च्या अभ्यासात असेही आढळून आले आहे, की नद्या आणि महासागरांमध्ये तसेच किनाऱ्यांवर साधारण ४४ टक्के प्लास्टिक कचरा असतो. ज्यामध्ये पिशव्या, पाणी-शीतपेयांच्या बाटल्या, रेस्टॉरंट्समध्ये पार्सल म्हणून देण्यात येणारे प्लास्टिक डबे इत्यादींचा समावेश आहे.

१९५० मध्ये जगभरात प्लास्टिकचे फक्त दोन दशलक्ष टन उत्पादन होत होते. तेच उत्पादन आता मात्र ४५० दशलक्ष टनांहून अधिक होते आहे. शास्त्रज्ञांच्या मते, गेल्या ७० वर्षांत प्लास्टिक उत्पादन आणि वापरामध्ये झालेली वाढ अशीच कायम राहिली, तर २०५० पर्यंत जगभरातील समुद्रांमध्ये माशांपेक्षा जास्त प्लास्टिक कचरा असेल.

जगातील ४० टक्के महासागर व्यापणाऱ्या पाच सबट्रॉपिकल जायर्समध्ये तरंगता प्लास्टिक कचरा जमा होत असल्याचे दिसून आले आहे. पृथ्वीच्या मध्य-अक्षांशांवर स्थित, या जायर्समध्ये उत्तर आणि दक्षिण पॅसिफिक सबट्रॉपिकल जायर्सचा समावेश आहे.

ज्यामध्ये पूर्वेकडील ‘गार्बेज पॅचेस’ने (महासागराच्या पृष्ठभागाजवळ फिरत असलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याचे मोठे भाग) समुद्री शास्त्रज्ञ आणि प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याशिवाय उत्तर आणि दक्षिण ॲटलांटिक सबट्रॉपिकल जायर्स आणि हिंदी महासागरातील सबट्रॉपिकल जायर्स या इतर जायर्समध्येही हळूहळू प्लास्टिक प्रदूषण पोहचते आहे.

प्लास्टिकने आपल्या जीवनात खूप मोलाची भर घातली आहे. ही एक स्वस्त आणि बहुउपयोगी सामग्री आहे. बांधकाम, घरगुती-वैद्यकीय उपकरणे आणि अन्न पॅकेजिंगसह विविध गोष्टींमध्ये ती वापरली जाते; पण सर्रास वापरण्यात येणाऱ्या या प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले जात नाही. प्लास्टिकचे विघटन होत नाही.

प्लास्टिकचा योग्य पद्धतीने पुनर्वापर होत नाही किंवा ते जाळले जात नाही. प्लास्टिक कचरा वर्षानुवर्षे जमिनीत साठवला जातो. त्यातून बाहेर निघणारे विषारी वायू जमिनीत जातात आणि जमीन प्रदूषित होते. प्लास्टिकमधून निघणाऱ्या विषारी रसायनांमुळे भूजलसाठा दूषित होतो आणि परिणामी तो आपल्या पर्यावरणाला प्रदूषित करतो.

साधारण एका वर्षाला एक ते दोन दशलक्ष टन प्लास्टिक कचरा महासागरात फेकला जातो. ज्यामुळे एक लाखाहून अधिक समुद्री पक्षी आणि प्राणी मृत्युमुखी पडतात. हा प्लास्टिकचा भस्मासुर असाच पसरत राहिला, तर आपल्या नातवंडांच्या प्रत्येक जेवणात प्लास्टिक येणारच आहे...

तुम्हाला काय वाटते?

juhichawlaoffice@gmail.com

(शब्दांकन : नीलिमा बसाळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT