- जुही चावला मेहता
प्लास्टिक आपलं आयुष्य पोखरत चाललं आहे. प्लास्टिकमधील घातक रसायनं पाणी आणि जमीन दूषित करत आहेत, तरीही आपण ते रोज वापरतोय. आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
मागील लेखात आपण ‘५ जी’ लहरींचा गर्भाशयातील अर्भकावर सुरुवातीच्या काळात काय परिणाम होतो याविषयी चर्चा केली; पण रेडिएशनसारख्या अजून एका महाराक्षसाच्या जाळ्यात आपण सतत वेढले जात आहोत. तो आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे आणि नकळत आपण त्याचा मोठ्या प्रमाणावर सर्रास वापर करतो आहोत.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या वापरात असलेल्या कुठल्या ना कुठल्या वस्तूच्या माध्यमातून हा महाराक्षस आपल्या शरीरात प्रवेश करतो. तुम्हाला साधारण अंदाज आला असेल, की मी कशाबद्दल आणि कोणत्या प्रकारच्या प्रदूषणाबद्दल बोलत आहे. अर्थातच प्लास्टिकविषयी... साहजिकच तुमच्या मनात प्रश्न आला असेल, की मी आज या विषयी का बोलते आहे.
नुकताच मी एक व्हिडीओ पाहिला आणि त्यात जी माहिती समोर आली तिने धक्काच बसला. व्हिडीओत म्हटले होते, की प्लास्टिकचे सूक्ष्म कण आता गर्भामध्येही आढळले आहेत. हे ऐकायला खूप भयानक आहे; पण आपण पसरवलेल्या प्रदूषणाच्या महापुराचे पडसाद आता भावी पिढीमध्येही दिसायला लागले आहेत आणि हे अत्यंत धोकादायक वास्तव आहे.
प्लास्टिक आणि त्याच्या प्रदूषणाविषयी मला अगदी गप्पांच्या ओघात माहिती मिळाली. मी माझ्या कुटुंबासोबत सुट्ट्यांची मजा घेत होते. त्या वेळी माझे दीर हेमनाभ यांनी मला प्लास्टिक प्रदूषणाविषयी सांगितले. तुला माहिती आहे का, की महासागरामध्ये प्लास्टिकची बेटे आहेत, असा प्रश्न त्यांनी मला केला. प्रथमच मी त्याबाबत ऐकत होते.
आधी माझा त्यावर विश्वासच बसला नाही. मग जेव्हा मी त्याबद्दल वाचले तेव्हा माझ्या लक्षात आले, की नॉर्थ पॅसिफिक महासागरात दहा मिलियन चौरस मीटर आकाराची प्लास्टिकची तरंगणारी बेटे तयार झाली आहेत. जगातील बाकीच्या महासागरांमध्ये अशी पाच बेटे आहेत.
जेव्हा मी हे ऐकले तेव्हा माझा विश्वासच बसला नाही. प्लास्टिक, जे आपण दररोज वापरतो... टूथब्रश, दुधाची पिशवी, पिशवी, डबे इत्यादी किती तरी वस्तू प्लास्टिकच्या असतात. घरात येणारी प्रत्येक गोष्ट प्लास्टिकमध्ये रॅप करून येते. प्रत्येक ठिकाणी आपण प्लास्टिक वापरतो... त्या क्षणी मला असे वाटले की चांगले शिक्षण घेऊनही एक उत्तम नागरिक होण्यासाठी मी अपयशी ठरले आहे.
आपणा सर्वांना प्लास्टिकबद्दल माहिती आहे. प्लास्टिकचे विघटन होत नाही. पृथ्वी त्याला शोषून घेऊ शकत नाही. प्लास्टिक एक विषारी कचरा आहे. त्यातून निघणारी घातक रसायने आपले पाणी आणि जमीन दूषित करतात. प्रत्येक शहराच्या आणि गावाच्या बाहेर ढिगा-ढिगाने प्लास्टिक कचरा जमा होत आहे.
आपल्या देशात आणि शहरात प्रत्येक रस्ता प्लास्टिक कचऱ्याने खच्चून भरलेला आहे. रस्त्यावर राहणारी जनावरे पोट भरण्यासाठी काही तरी खात असतात. त्या खाण्याबरोबर प्लास्टिकचा कचरा त्यांच्या पोटात जातो. मला खात्री आहे, जर अशा जनावरांची तपासणी केली तर काही अंश का होईना त्यांच्या पोटात प्लास्टिक नक्कीच सापडेल.
प्लास्टिक खरंच पर्यावरणाला इतका घातक आहे, हा विचार स्वस्थ बसू देत नव्हता. मग त्याबाबत मी माहिती वाचायला सुरुवात केली. मिळालेली माहिती अतिशय धक्कादायक होती. आपल्या मुलांसाठी आपण कुठल्या प्रकारचे जग निर्माण करतो आहोत, असा प्रश्न मनात येत राहिला. एक साधी प्लास्टिकची पिशवी आणि त्याचे एवढे गंभीर परिणाम पर्यावरणावर होत आहेत.
आपल्या नकळत आपण किती सहजपणे त्याचा वापर करतो आहोत आणि प्रदूषण वाढवत आहोत, असा विचार मनात येताच जास्तच अपराधीपणाची भावना मनात आली. आपण आज काय करतो आहोत याची जाणीव आपल्याला असणे खूप गरजेचे आहे. कारण, आपण आज जे काही करतो आहोत, जसे वागतो आहोत त्याचे परिणाम आपल्या मुलांना भोगावे लागणार आहेत. आपल्याला हे ठरवणे खूप गरजेचे आहे, की आपल्या मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी आपण मागे काय सोडून जातो आहोत?
प्रगतीच्या नावाखाली आज सर्रास झाडांची कत्तल होते आहे. वाढत्या प्रदूषणाचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवरही होतो आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आपल्यावर आणि आपल्या मुलांच्या आरोग्यावर होतो आहे... आणि हे सर्व आपल्या आजूबाजूला घडत असूनदेखील आपण पुन्हा पुन्हा तीच चूक करतो आहोत.
या पुढे आपण प्लास्टिक प्रदूषण आणि त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम याविषयी चर्चा करणार आहोत. जी माहिती मी वाचली, त्यावर जे काही उपाय करता आले, या प्रवासात काय काय अनुभव आले, काय नवीन शिकले हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हीसुद्धा तुम्हाला जे शेअर कारावंसे वाटेल ते नक्की मला ई-मेलद्वारे कळवा.
juhichawlaoffice@gmail.com
(शब्दांकन : नीलिमा बसाळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.