कविकुलगुरू असा ज्यांचा भारतातच नाही, तर संपूर्ण विश्वात लौकिक आहे असे थोर महाकवी व नाटककार म्हणजे कालिदास! आषाढ शुद्ध प्रतिपदा हा दिवस ‘कालिदास दिन’ म्हणून साजरा केला जातो. कालिदासांचं नेमकं चरित्र उपलब्ध नाही. ज्या उपलब्ध आहेत त्या रंजक दंतकथा; परंतु मेघदूत या त्यांच्या आजही लोकप्रिय असलेल्या खंडकाव्यातील अजरामर झालेले शब्द ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या उल्लेखामुळेच आजचा मासारंभाचा दिवस ‘कालिदास दिन’ म्हणून मानला जाऊ लागला.
- ऋचा थत्ते
कालिदास या नावाशिवाय संस्कृत साहित्याला पूर्तताच येत नाही. त्यांची थोरवी सांगणारा एक श्लोक प्रसिद्ध आहे.
पुरा कवीनां गणनाप्रसंगे। कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासः।
अद्यापि तत्तुल्यकवेरभावात्। अनामिका सार्थवती बभूव॥
पूर्वी कवी मोजत असता पहिले कालिदासांचे नाव घेताना करंगळी दुमडली गेली; पण त्या तोडीचे दुसरे नावच नसल्याने शेजारील बोटाचे अनामिका हे नाव सार्थ ठरले, असा याचा अर्थ... या एका श्लोकावरूनही या महाकवीची थोरवी काय असेल, याची आपल्याला कल्पना येते आणि त्यांच्या साहित्याचा आस्वाद घेऊ लागल्यावर तर अक्षरशः भानच हरपून जाते.
कालिदासांनी सात साहित्यकृती साकार केल्या. त्यामध्ये रघुवंश आणि कुमारसंभव ही दोन महाकाव्ये, ऋतुसंहार आणि मेघदूत ही खंडकाव्ये; तर मालविकाग्निमित्रम्, विक्रमोर्वशीयम् आणि अभिज्ञान शाकुंतलम् अशा तीन नाटकांचा समावेश आहे. ‘कवी भास्कराच्या प्रतिभेतून निर्माण झालेल्या या सात कृती म्हणजे वाङ्मय नभोमंडळात चमकणारे एक सप्तरंगी इंद्रधनुष्यच होय’ असे गौरवोद्गार संस्कृत महाकाव्यांचे अभ्यासक डाॅ. के. ना. वाटवे यांनी काढले आहेत.
कालिदासांचे नाव कालिदास कसे आणि त्यांच्या साहित्यकृतींची निर्मिती याविषयीच्या कथा कशा गुंफल्या गेल्या आहेत, हे पाहणे मोठे रंजक ठरेल. मुळात कालिदास चक्क मूर्ख समजले जात. मात्र, एका बुद्धिमान राजकन्येने ‘जो मला शास्त्रार्थात पराभूत करेल त्याच्याशीच मी विवाह करेन’ अशी प्रतिज्ञा केली होती.
अनेक विद्वानांना वादविवादात तिने पराभूत केले. यामुळे ती अधिकच घमेंडी झाली. अशा या गर्विष्ठ राजकन्येला धडा शिकवण्याच्या हेतूने काही पंडितांनी सूडबुद्धीने कारस्थान करून तिचे लग्न कालिदासाशी घडवून आणले.
पण सत्य लक्षात येताच तिने याला हाकलून दिले. या अपमानाने व्यथित होऊन या युवकाने कालिमातेची घोर साधना केली. त्यावर प्रसन्न होऊन देवीने त्याला बुद्धी आणि प्रतिभेचेही वरदान दिले. म्हणून हा कालिदास! असा हा प्रतिभावान झालेला कालिदास घरी परत आला, तेव्हा राजकन्येने विचारले - अस्ति कश्चित वाग्विशेष:?
अर्थात वाणीला काही वैभव प्राप्त झाले का? तिने हा प्रश्न करण्याचा अवकाश, कालिदासाने तिच्या प्रश्नाच्या तीन शब्दांपासून सुरू होणाऱ्या तीन रचना तिथल्या तिथे रचून सादर केल्या. त्यामध्ये ‘अस्ति’ शब्दापासून कुमारसंभवाचा आरंभ झाला. ‘कश्चित’ शब्दाने मेघदूताची सुरुवात झाली, तर ‘वाग्’ शब्दातून रघुवंश महाकाव्याचा उगम झाला.
कालिदासांच्या साहित्यात उपमा हे ठळक वैशिष्ट्य असल्याने ‘उपमा कालिदासस्य’ ही उक्ती प्रसिद्धच आहे. त्यातही ‘दीपशिखा’ ही उपमा तर इतकी विलक्षण लोकप्रिय झाली, की ‘दीपशिखा कालिदास’ असंही नामकरण केलं गेलं. तो मूळ श्लोक असा -
सञ्चारिणी दीपशिखेव रात्रौ यं यं व्यतीयाय पतिंवरा सा।
नरेन्द्रमार्गाट्ट इव प्रपेदे विवर्णभावं स स भूमिपालः।।
या श्लोकामध्ये कवी कालिदासांनी राजकुमारी इंदुमतीस रात्रीच्या प्रहरी मार्गामध्ये येणारा प्रदेश उजळून टाकणाऱ्या दीपशिखेची म्हणजेच मशालीची उपमा दिली आहे. राजकुमारी इंदुमती हातामध्ये वरमाला घेऊन ज्या ज्या राजासमोर उभी राहते, तेव्हा तिच्या अभिलाषेने त्या प्रत्येक राजाचे मुख उजळते.
परंतु जेव्हा राजकुमारी राजाला अव्हेरून पुढे सरकते, तेव्हा मात्र त्याचे मुख म्लान होत जाते, अशी नितांत सुंदर कल्पना कालिदास या श्लोकाद्वारे मांडतात. उपमा अलंकाराचा असा सौदर्याविष्कार केवळ अद्वितीयच म्हणावा लागेल! उपमेतील या सौंदर्यामुळेच कालिदासांना ‘दीपशिखा कालिदास’ म्हणून संबोधले जाऊ लागले.
कालिदासांच्या एकंदरीत साहित्याचे निरीक्षण करून अभ्यासकांनी ते ‘शैव’ म्हणजे शिवभक्त असल्याचा अंदाज वर्तवला आहे. रघुवंशाच्या प्रारंभी मंगलाचरणात त्यांनी शिवपार्वतीला वंदन केले आहे. ‘मालविकाग्निमित्रम्’ नाटकाच्या आरंभी त्यांनी अष्टमूर्ती शंकराची प्रार्थना केली आहे. ‘विक्रमोर्वशीयम्’ व ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ या दोन्ही नाटकांच्या आरंभीही शिवाचीच स्तुती केली आहे. तसेच त्यांच्या मेघदूत व अन्य साहित्यात शिवभक्ती वेळोवेळी अनुभवास येते. कालिदासांच्या साहित्यकृतींचा थोडक्यात आढावा घेऊया...
१) ऋतुसंहार ः ही कालिदासांची पहिली निर्मिती. या खंडकाव्याचे वर्णन मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांचा आधार घेऊन करायचे झाल्यास ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’ असे करता येईल. ऋतू जसा कूस बदलेल, तसं जणू कॅलिडोस्कोप फिरवल्यासारखं सृष्टीचं चित्रही बदलत असतं. सहा सर्गात ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर व वसंत या ऋतूंचे चित्रदर्शन म्हणजे ऋतुसंहार!
२) मेघदूत ः हेही खंडकाव्यच! पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन भागांत असलेल्या या दूतकाव्याची रचना मंदाक्रांता वृत्तात केलेली आहे. कुणी एक यक्ष त्याच्या कर्तव्यात चुकल्याने कुबेर त्याला शाप देतो. त्यानुसार यक्षाला आपल्या अलकानगरीपासून दूरवर रामगिरी येथे वास्तव्य करावे लागले.
साहजिकच प्रिय पत्नीचा आत्यंतिक विरह भोगावा लागला. अशा वेळी पूर्ण निर्जन अशा त्या ठिकाणी आषाढाच्या पहिल्या दिवशी झालेले काळ्या मेघाचे दर्शनही त्याला इतके दिलासादायक वाटते, की त्या निर्जीव मेघालाच तो आपला दूत मानून त्याच्याद्वारे आपला संदेश आपल्या पत्नीला पाठवू पाहातो.
कथा खरं तर एवढीच आहे; पण रचनाकार साक्षात कालिदास आहेत. त्यामुळे पूर्वमेघात अलकानगरीपर्यंत जाण्याचा मार्ग आणि उत्तरमेघात केलेले अलकानगरीचे वर्णन हे दोन्ही भाग अत्यंत उत्कंठावर्धक आणि रसपूर्ण आहेत हे वेगळे सांगायलाच नको.
इतके, की विविध भारतीय भाषांमध्ये याची भाषांतरे झाली. अगदी मराठीतही शांता शेळके, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर यांच्यासह कित्येकांनी अनुवाद केले आणि आजही होतच आहेत.
३) कुमारसंभव ः शिवपार्वतीचा पुत्र कार्तिकेय याच्या जन्माची कथा म्हणजे कुमारसंभव हे महाकाव्य. ब्रह्मदेवाच्या वरामुळे तारकासुर नावाच्या दैत्याने उच्छाद मांडला होता. या त्रासातून वाचण्यासाठी सर्व देव ब्रह्मदेवास शरण गेले. तेव्हा शिवपार्वतीचा पुत्र तारकासुराचा वध घडवून आणेल असे सांगितले. त्यानुसार देवांनी आधी या दोघांच्या विवाहाची योजना आखली. पार्वतीने कठोर तप करून शंकरांना जिंकले. त्यानंतर झालेला पुत्र कार्तिकेय याला आपला सेनापती करून देवांनी तारकासुराचा वधही घडवून आणला, असे या महाकाव्याचे थोडक्यात कथानक.
४) रघुवंश ः रघुवंश हे कालिदासांचे १९ सर्ग असलेले महाकाव्य. याची कथा थोडक्यात सांगणे तर अगदीच अशक्य. कारण या महाकाव्याचा एकच नायक नसून रघुकुळातील अनेक राजे याचे नायक आहे. दिलीप, रघू, अज, दथरथ, श्रीराम... हे या कुळातील सर्वच राजे आदर्श आणि महाकाव्यातील रसपरिपोषही विलक्षणच!
५) मालविकाग्निमित्रम् ः कालिदासांचे हे पहिले नाटक. या पाच अंकी नाटकात अग्निमित्र हा नायक आणि विदर्भाच्या राजाची बहीण मालिका यांच्या प्रेमाची कथा या नाटकात आली आहे.
६) विक्रमोर्वशीयम् ः कालिदासांचे हे दुसरे नाटक. राजा पुरुरवा व इंद्राच्या दरबारातील अप्सरा उर्वशी यांच्या प्रेमाची ही कथा. याही नाटकाचे पाच अंक!
७ ) अभिज्ञान शाकुंतलम् ः हे कालिदासांचेच नव्हे; तर संस्कृत साहित्सृष्टीतील हे सर्वोत्कृष्ट नाटक मानले जाते.
काव्येषु नाटकं रम्यम्। तत्र रम्य शकुंतला॥ असे जे म्हटले जाते, त्यावरून लक्षात येते, की पूर्वी नाटक हा काव्याचाच एक प्रकार मानला जाई. त्यामुळे काव्यांमध्ये सर्वोत्तम नाटक आणि त्यातही सर्वश्रेष्ठ शाकुंतल! असा या नाटकाचा लौकिक आहे. शाकुंतल म्हणजे शकुंतलेचा पुत्र भरत, त्याची ओळख दुष्यन्ताला कशी होते हा या नाटकाचा मुख्य कथाभाग.
मात्र सात अंकी नाटकाचा हा शेवटचा भाग असल्याने शकुंतलेची भूमिका नायिकेची व तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. या नाटकाची मूळ कथा महाभारतात येते. मात्र या नाटकातील प्रसंगांची अप्रतिम गुंफण, वर्णनशैली, रसपरिपोष, संवाद, व्यक्तिरेखा या सगळ्यातून कालिदासांची उत्तुंग प्रतिभा सातत्याने स्पर्शून जाते.
जर्मन कवी ‘गटे’ हे काव्य डोक्यावर घेऊन नाचला ही गोष्ट प्रसिद्धच आहे. भारतीय भाषांबरोबरच जर्मन व रशियन भाषांमध्येही त्याची भाषांतरे झाली आहेत. ‘शाकुंतल’ नाटकाबद्दल कवी गटे म्हणतात, ‘‘हे रसिका, तुला ग्रीष्म आणि वसंत या दोन्ही ऋतूंतील फळे एकदम हवी असतील, स्वर्ग आणि पृथ्वी या दोन्ही ठिकाणचे सौख्य एकत्र हवे असेल, तर हे मित्रा, तू ‘शाकुंतल’ नाटकाचा आस्वाद घे.’’
गटेंचे हे उद्गार खरोखर विलक्षण आहेत. एक भारतीय म्हणून ज्या ज्या गोष्टींचा आपल्याला अभिमान वाटतो, त्यामध्ये महाकवी कालिदासांचे नाव अग्रक्रमाने येते यात शंकाच नाही. अत्यंत सुमधुर आणि सर्व भारतीय भाषांची जननी असलेल्या अशा देववाणीचे अर्थात संस्कृत भाषेचे साहित्यदालन आपल्या सप्तरंगी कलाकृतींनी समृद्ध करणाऱ्या कविकुलगुरू कालिदास यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!
rucha19feb@gmail.com (लेखिका निवेदिका व व्याख्यात्या आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.