-करण थापर
saptrang@esakal.com
गेल्या रविवारी मला व्हॉट्सअपवर एक मेसेज आला आणि तो मला काँग्रेसच्या गोंधळलेल्या स्थितीत अधिकच भर टाकणारा वाटला. या मेसेजमध्ये म्हटलं होतं : ‘काँग्रेस पक्ष आता पूर्णपणे बदलला आहे का? पक्षातील सर्व सदस्य आता दारूपासून दूर गेले आहेत का? आणि गांधी घराणं आता पास्त्याबरोबर वाइनच्या दोन घोटांचा आनंद घेत नाही का?’
काँग्रेसमध्ये प्रवेशास इच्छुक असणाऱ्यांना दारूपासून दूर राहण्याची अट घालण्यात आल्याच्या त्या दिवशीच्या बातमीवरची ही तशी संयमी प्रतिक्रिया म्हणायला हवी. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियानं (पीटीआय) दिलेल्या वृत्तानुसार, ‘कुणालाही काँग्रेस पक्षात प्रवेश करायचा असल्यास त्यानं ‘आपण अल्कोहोल वर्ज्य केलं आहे,’ असं जाहीर करणं अनिवार्य असल्याचं,’ पक्षानं स्पष्ट केलं आहे. खरं तर, यामध्ये अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र, आपण सुरुवात दारूपासून करू या.
दारूवर बंदी कशासाठी...
काँग्रेस अल्कोहोलच्या विरोधात का आहे? देवांचं आवडतं पेय ‘सोमरस’ आहे हे त्यांना माहीत नाही का? आपले अनेक साधू चरस घेणं पसंत करतात. त्यामुळं थोडं मद्यपान किंवा चिलीम ओढणं आपल्या पवित्र परंपरेला धरूनच आहे. खरं तर, हा प्रश्न १९२० मध्ये महात्मा गांधी यांनी, पक्षाचं सदस्यत्व घेण्यासाठी दारूपासून दूर राहण्याची जी अट घातली होती, त्या अटीपासून सुरू होतो. मात्र, ही गोष्ट शंभर वर्षांपूर्वीची आहे आणि तेव्हापासून जग आणि भारतही निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर बदलला आहे.
मात्र, काँग्रेसच्या सदस्यांना या रंगीत द्रव्यापासून स्वतःला दूर करायचं असल्यास पक्षानं त्या काळी घालून दिलेल्या इतर आचार-विचारांचं काय? उदाहरणार्थ : ब्रह्मचर्याचं पालन. गांधीजींनी ते नव्यानंच लग्न झालेल्या कृपलानींवर लादलं होतं. ते आज काँग्रेसच्या सर्व सदस्यांना अनिवार्य का करू नये? अगदी प्रसंगोचित विचार करायचा झाल्यास, दररोज संध्याकाळी मद्यपानाचा आनंद घेणाऱ्या एका चांगल्या काँग्रेसकार्यकर्त्याचं आता काय होणार? काही जणांना तर दुपारच्या वेळेसही हा आनंद घ्यायचा असतो!
मला असे अनेक काँग्रेसजन माहीत आहेत, जे केवळ घरात बसून एकट्यानं नव्हे, तर मोठ्या पार्टींमध्येही मद्यपानाचा आनंद लुटतात. खरं तर, हातात ग्लास असल्यानंच त्यांची सोबत आनंददायी ठरते! विशेष म्हणजे, यातील काही स्वतःच्या हातानं वाइन आणि दुर्मिळ सिंगल माल्ट सर्व्ह करतात. त्यामुळं ते सर्वांत चांगले यजमानही ठरतात!
यामुळेच मी व्हॉट्सअप मेसेजमध्ये, गांधीघराण्याबद्दल उपस्थित केलेल्या मुद्द्याकडं येतो. मला नक्की माहीत नाही; पण मला खात्री आहे की, या तीन गांधींपैकी एकानंही एक थेंबही घेतला नाही यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. नेहरू मद्यपान करत होते हे मला माहीत आहे. आणि इटलीमध्ये जन्मलेल्यांनी आणि वाढलेल्यांनी ही चव चाखली नसेल अशी शक्यताच नाही!
कार्यकर्ता की मजूर?
आता आपण दुसऱ्या अटीकडं येऊ. प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, ‘नव्या सदस्यांनी हे लिहून द्यायला हवं की ते शारीरिक श्रम आणि कामं करतील.’’ अरे बाप रे, का बरं? ते राजकीय पक्षात प्रवेश करत आहेत, रस्तेकामावरचे मजूर म्हणून नव्हे. त्यांना राजकारणी बनायचं आहे, मजूर नाही. आणि तुम्ही राहुल किंवा प्रियांकाला कुदळ किंवा फावडं हातात घेतलेलं कधी पाहिलं आहे का? आणि मला खात्री आहे, यातील काहीही सोनियांच्याही हातात शोभून दिसणार नाही! मग नव्या सदस्यांसाठी ही अट कशासाठी?
पक्षांतर्गत लोकशाहीचं काय?
तिसरी अट सर्वांत अनाकलनीय व अक्षम्य अशीच आहे. ‘पक्षाच्या नव्या सदस्यांनी हे लिहून देणं आवश्यक आहे की, ते सार्वजनिक व्यासपीठावरून पक्षाची धोरणं आणि कार्यक्रमांवर कोणतीही टीका करणार नाहीत,’ ही ती अट. सार्वजनिक ठिकाणी बंडखोरीची भाषा करू नये इथपर्यंत मी समजू शकतो. मात्र, मतभेद किंवा मतांतर व्यक्तही करायचं नाही हे कशासाठी? काँग्रेसला आपल्या विरोधातील मत केवळ बंद दरवाजाच्या आड व्यक्त करायला परवानगी देणारा ‘लोकशाही’ पक्ष व्हायचं आहे का? ही अट वाचल्यावर तुम्हाला, काँग्रेस पक्षाला लोकशाही म्हणजे काय हे समजतं अथवा नाही, अशीच शंका येईल.
पक्षाला ‘हायकमांड’ हे सर्वोच्च अधिकारपद आहे हेच सुचवायचं आहे आणि यातील सर्वांत भीतिदायक, भेदक संदेश हा आहे की, हायकमांड ‘देवता’ असून तुम्ही तिला नमन केलंच पाहिजे. या सर्वांतून मला एकच निष्कर्ष निघत असल्याचं समजतं आणि तोच निष्कर्ष तुम्हीही काढला नाही तर मला आश्चर्य वाटेल : काँग्रेस पक्ष आपलं गतवैभव परत मिळवण्यासाठी संघर्ष करतो आहे, मात्र, हे करताना तो गोष्टी स्वतःसाठी सोप्या करण्याऐवजी आपल्याच मार्गात खोडे घालत चालला आहे. खरं सांगायचं तर, पक्ष स्वतःला उतरणीला लावायचं काम स्वतःच करतो आहे.
अल्कोहोल आणि मजुरीसंदर्भातील भारतीय जनता पक्षाची भूमिका काय आहे हे मला माहीत नाही. मात्र, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी वाइनचा आनंद लुटत असत आणि मोदी सरकारमधील अनेक मंत्री त्यापेक्षा ‘स्ट्राँग’ गोष्टींना प्राधान्य देतात. मात्र, काँग्रेससंदर्भातील ही बातमी त्यांच्या नेतृत्वासाठी आनंददायीच ठरेल. आणि पक्षातील दारू न घेणारेही या बातमीचा छानपैकी ‘आस्वाद’ घेतील!
(लेखक हे दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
(अनुवाद : महेश बर्दापूरकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.