शशी थरूर आणि बान की मून या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसपदासाठी २००६ मध्ये लढलेल्या दोघा उमेदवारांची पुस्तकं एका अनाकलनीय योगायागानं एकामागोमाग एक प्रसिद्ध झाली आहेत. त्या वेळी थरूर हे राष्ट्रसंघाचे उपमहासचिव होते, तर मून हे दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री. भारत व दक्षिण कोरिया यांनी या पदासाठी प्रथमच आपले उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत मून जिंकले व थरूर हरले. मात्र, या स्पर्धेमागची ‘गोष्ट’ आता जगासमोर आली आहे.
मून आपल्या ‘रिझॉल्व्हड्’ या पुस्तकात दावा करतात, ‘त्या वेळी अशी अफवा पसरली होती, की शशी थरूर यांना भारत सरकारचा पाठिंबा नाही. त्याचबरोबर थरूर यांनी जगभरातील नेत्यांना त्यांच्या संयुक्त राष्ट्रसंघातील कामाबद्दल फुगवून सांगितलं आहे.’ थरूर यांनी याबाबत सुरुवातीला विसंगत विधानं केली. त्यांच्या ‘प्राइड, प्रीज्यूडिस अँड पंडिट्री’ या पुस्तकातील एका प्रकरणात ते म्हणतात, ‘पंतप्रधान मनमोहनसिंग मला भेटले आणि त्यांनी मला थेट विचारलं, ‘तुम्हाला सरचिटणीसपदाची निवडणूक लढवण्यात रस आहे का?’ मला अगदी थेटपणे विचारलं गेल्यानं ‘नाही’ म्हणणं शक्यच नव्हतं.’ मात्र, नंतर थरूर असं सुचवतात की, त्यांच्या उमेदवारीचा प्रचार मनापासून केला गेला नाही आणि जो केला गेला तो अगदीच किरकोळ होता.
‘भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी आपलं कर्तव्य योग्य प्रकारे बजावलं नाही,’ असंही थरूर म्हणतात.
मोठ्या देशांच्या पाठिंब्याचा घोळ
सुरक्षा परिषदेच्या पाच कायम सदस्यांचा पाठिंबा किंवा नकाराधिकार न वापरणं हा या दोन्ही उमेदवारांसाठीचा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा होता. त्यातल्या त्यात वॉशिंग्टनचं मत सर्वाधिक महत्त्वाचं होतं. विचित्र गोष्ट अशी की, दोन्ही उमेदवारांना, ते आपल्यालाच मिळणार, असं वाटत होतं. थरूर लिहितात, ‘देशाच्या पंतप्रधानांना आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना, अमेरिका आपल्याला पाठिंबा देईल, असंच वाटत होतं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी, रशिया व ब्रिटनही आपल्यालाच पाठिंबा देतील, असं मत व्यक्त केलं होतं. त्याचबरोबर फ्रान्सशी माझे संबंध खूप चांगले असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं होतं. अशा प्रकारे पाच कायम सदस्यदेशांपैकी चार आपल्या बाजूनं असल्याचं गृहीत धरलं गेलं होतं.’
मून मात्र वेगळीच गोष्ट सांगतात. ‘माझी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच काँडोलिझा राईस, ‘माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे,’ असं म्हणाल्या. रशियाचे लाव्हरोव्ह यांनीही, मी तुमच्या उमेदवारीला विरोध करणार नाही, असं सांगितलं,’ असा दावा मून करतात. त्यांना फ्रान्सच्या पाठिंब्याबद्दल शंका होती.
फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्री डाउस्टे-ब्लाझे म्हणाल्या, ‘मी फ्रान्सची राजनैतिक मतं उचलून न धरणाऱ्या उमेदवाराला कधीही पाठिंबा देणार नाही.’ मून हे करत नव्हते, तर थरूर करत होते.
भारतानं अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्यासाठी अगदी थोडे प्रयत्न केले व त्यामुळं ते मत मून यांना गेलं. थरूर लिहितात, ‘एकाच गोष्टीनं खूप मोठा फरक पडला असता आणि ती होती अध्यक्ष बुश यांच्याशी वरिष्ठ पातळीवरून साधलेला संवाद. हा संवादही खूप आधीच्या टप्प्यातच व्हायला हवा होता. मनमोहनसिंग व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायण माझ्या उमेदवारीबद्दल गंभीर आणि प्रामाणिक होते. मात्र, त्यांचं पूर्ण लक्ष भारत-अमेरिका अणुकरारावर केंद्रित होतं. (या परिस्थितीत माझी उमेदवारी हा त्यांचा प्राधान्यक्रम नव्हता.)’
थरूर का हरले?
मग भारतानं थरूर यांनी उमेदवारी दिलीच का? थरूर जिंकून येण्याचा दावा करत होते तरी ते जिंकण्याची शक्यता कधीच नव्हती. त्यांना केवळ भारतीयांना एक भव्य स्वप्न दाखवायचं होतं. मात्र, हा मोठा फुगा शेवटी फुटला. शेवटी, अमेरिकेचा पाठिंबाही चीनच्या बाजूनं गेला. थरूर लिहितात, ‘चीनचे परराष्ट्रमंत्री मला म्हणाले की, आमचा देश तुमच्या मार्गात अडथळा बनणार नाही.’ पण याचा अर्थ पाठिंबा देणार की नकाराधिकाराचा वापर करणार नाही, यांपैकी काय होता? उलटपक्षी, चीनच्या अर्थमंत्र्यांनी मून यांना पेगॅससचा पुतळा त्यांना भेट दिला आणि म्हणाले, ‘हा पुतळा तुम्ही सरचिटणीसपदी निवडून आल्यावर तुमच्या कार्यालयात ठेवा.’ ’
मतदान सुरू झाल्यावर अमेरिकेनं, चीनचा फायदा होईल, अशी व्यवस्था केली. मून खुलासा करतात, ‘सुरक्षा परिषदेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत राईस यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी बोलून माझ्या नावाला पाठिंबा देण्यास सुचवलं होतं.’ आता केवळ फ्रान्स हाच देश उरला होता. मून यांनी ‘फ्रान्स संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता विभागाचं नेतृत्व करेल, असे संकेत दिले. याचा त्यांना मोठा फायदा झाला. थरूर यांनी असं कोणतंही आश्वासन दिलं नाही. थरूर यांनी, त्यांना कोणत्याही मोठ्या देशानं गांभीर्यानं न घेतल्यानं असं केलं होतं का?
मून मतदान कशा प्रकारे झालं, हेही स्पष्ट करतात.
मतदान चार टप्प्यांत होतं. मतदार ‘होय’, ‘नाही’ आणि ‘काहीही मत नाही’ या प्रकारे मतदान करतात. मून यांना ‘होय’ म्हणणारी मते १२ वरून १४ पर्यंत गेली व एकच नकारात्मक मत चौथ्या टप्प्यात बाहेर पडलं. थरूर यांची मतं कमीच होत गेली. त्यांची सुरुवात १० ‘होय’ व २ ‘नाही’ मतांनी झाली व नंतर ती १०-३ आणि ८-३ अशी कमीच होत गेली. मून लिहितात, ‘चौथ्या टप्प्यानंतर इतर सर्व उमेदवारांनी आपली उमेदवारी मागं घेतली व माझा विजय निश्चित झाला.’
थरूर यांचं मत असं आहे, की अमेरिकेला शक्तिशाली सरचिटणीस नको असल्यानंच मून निवडून आले. जिंकलेला उमेदवार कमजोर होता असा निष्कर्ष इतिहास कधीच काढणार नाही. मात्र, थरूर शक्तिशाली उमेदवार होते का हा प्रश्न नक्कीच उपस्थित करेल. अर्थात्, याचं उत्तर आपल्याला कधीच कळणार नाही...
(सदराचे लेखक हे दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
(अनुवाद : महेश बर्दापूरकर)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.