Elephant sakal
सप्तरंग

वो सात दिन

कर्नाटकातील नागरहोळेचे जंगल सुमारे ५,५०० चौरस किमी पसरलेल्या निलगिरी बायोस्फीअर राखीवचा एक महत्त्वाचा भाग आहे. तिथे हत्ती विशेषत्वाने आढळतात.

अवतरण टीम

- केदार गोरे, gore.kedar@gmail.com

कर्नाटकातील नागरहोळेचे जंगल सुमारे ५,५०० चौरस किमी पसरलेल्या निलगिरी बायोस्फीअर राखीवचा एक महत्त्वाचा भाग आहे. तिथे हत्ती विशेषत्वाने आढळतात. हत्ती समोर आल्यास काय अन् कशा प्रकारे खबरदारी घ्यावी, याचे धडे आम्ही गिरवले होते. हत्तीसारखा महाकाय प्राणी केवढ्या जलदगतीने धावू शकतो, याचा अनुभव आम्हालाही आला. पिल्ले जवळ असताना हत्ती विशेष आक्रमक होतात. आम्ही तो थरारक अनुभव घेतला. हत्तीने केलेला तो अल्प ‘पाठलाग’ उत्कंठावर्धक आणि कधीही न विसरता येणारा होता.

सध्या सुरू असलेल्या वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून एप्रिल १९९९ मध्ये अनुभवलेल्या काही थरारक क्षणांविषयी आज लिहितोय. एप्रिल १९९९ मध्ये प्रख्यात व्याघ्रतज्ज्ञ डॉ. उल्लास कारंथ यांच्या एका अभ्यास प्रकल्पात स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याचा सुवर्णयोग चालून आला. सात दिवस कर्नाटकातील नागरहोळे राष्ट्रीय उद्यानातील घनदाट जंगलात तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली पायी फिरून वन्यजीवांविषयी बरेच काही शिकता येणार होते.

नागरहोळेविषयी काही नियतकालिकांमधून वाचले होते. नागरहोळेचे जंगल सुमारे ५,५०० चौरस किमी पसरलेल्या निलगिरी बायोस्फीअर राखीवचा एक महत्त्वाचा भाग आहे. नागरहोळेला लागून असलेले कर्नाटकातीलच बंदीपूर, तमिळनाडूतील मदुमलाई, मुकूर्थी व सत्यमंगलम आणि केरळमधील वायनाड, आरलम, करीमपुळा व सायलेंट व्हॅली या साऱ्या संरक्षित क्षेत्रांचा संलग्न परिसर निलगिरी बायोस्फीअर राखीव म्हणून घोषित झाला आहे. भारतातील वाघ, हत्ती आणि इतर जैवविविधतेच्या संवर्धनाच्या दृष्टीने या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आधी मुंबई ते बंगळुरू उद्यान एक्स्प्रेसचा २४ तासांचा रेल्वे प्रवास आणि मग बसने मैसूरमार्गे नागरहोळे. नागरहोळेत उतरलो त्या वेळी साधारण दुपार होती. सर्व स्वयंसेवकांची राहण्या-खाण्याची सोय कर्नाटक वन खात्याच्या शयनगृहात केली गेली होती. पटापटा सांबार-भाताच्या जेवणावर ताव मारून अडीच वाजता डॉ. कारंथ यांच्या प्रशिक्षण सत्रासाठी सज्ज झालो.

डॉ. कारंथ यांनी सविस्तरपणे नागरहोळेतील वन्यजीवांविषयी माहिती दिली आणि विशेषतः हत्ती समोर आल्यास काय अन् कशा प्रकारे खबरदारी घ्यावी, हे अधोरेखित केले. त्यानंतर कर्नाटक वन विभागाचे निवृत्त वन परिक्षेत्र अधिकारी चिन्नप्पा यांनी वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा, झाडांवर नखे किंवा शिंग घासल्याने होणाऱ्या खुणा, लोळण्याच्या जागा, तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांच्या विष्ठांचे प्रकार याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

जंगलात वावरताना निसर्गाची भाषा कशी समजून घ्यायची, याचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले होते. प्रशिक्षणाचे तास संपल्यावर चार वाजता आम्हाला गाडीतून जंगल भ्रमंती करवली. नागरहोळेतील जंगल दमट आणि शुष्क पर्णपाती प्रकाराचे असून साग, हेदू, ऐन, धावडा, पळस, शिसम, चंदन आदी अनेकविध प्रजातींचे वृक्ष, बांबू व इतर वनस्पतींनी नटलेले आहे.

चांगल्या संख्येने असलेले वाघ, बिबट्या, हत्ती, रानकुत्रे, अस्वल, कोल्हे, मुंगूस, भेकर, शेकरू इत्यादींसारखे प्राणी या जंगलातील समृद्ध जैवविविधतेत अधिक भर घालतात. जंगल भ्रमंतीत अनेक हत्ती, गवे, सांबर, चितळ यांचे कळप दिसले. एके ठिकाणी दोन हत्ती दिसल्यावर आमची गाडी थांबली. त्या हत्तींना पाहताना सुमारे वीस हत्तींचा कळप झाडीतून बाहेर आला व खाता खाता गाडीभोवती विखुरला.

हत्ती शांतपणे झाडांची साल, फांद्या व बांबू लीलया खेचून काढत होते आणि त्यावर ताव मारत होते. मधेच वाघाची डरकाळी वाटावी असा आवाजही काढत होते. हत्ती आमच्या वाहनापासून लांब जाईस्तोवर आमची गाडी तेथेच थांबली होती. हत्तींना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही किंवा ते डिवचले जाणार नाहीत याची खबरदारी घेण्यात येत होती.

दुसऱ्या दिवशी पहाटेच ठरलेल्या वनवाटांपाशी दोन-दोनच्या गटांमध्ये गाडीने सोडण्यात आले. तांबडं फुटताच आम्ही ठरलेल्या पाऊलवाटेवरून चालू लागलो. वाटेत दिसणाऱ्या व ऐकू येणाऱ्या मोठ्या सस्तन प्राण्यांच्या नोंदी करायच्या होत्या. आम्हाला कॅमेरा नेण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे दुर्बिणीतून केलेली निरीक्षणे नोंदवत होतो. पक्षी निरीक्षण करण्यालाही मज्जाव होता.

तरीही शक्य होईल तसे अनेक पक्ष्यांच्या नोंदी मनातल्या मनात करत होतो. मलबारी कवड्या धनेश, मलबारी कर्णा, बदाम ठिपक्यांचा सुतार, पांढऱ्या पोटाचा सुतार, निळ्या पंखांचा पोपट, पिचू पोपट, पिवळ्या भुवईचा बुलबुल, छोटा शिंजीर, पहाडी मैना या व इतर अनेक पक्ष्यांचे दर्शन घडले. वेळोवेळी मोर आणि रानकोंबड्यांचे आवाज जंगलातील शांतता भंग करीत होते. वनवाटेवरील नोंदी संपवून जवळच्या रस्त्यापाशी येऊन आम्ही थांबलो.

ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे गाडी आम्हाला न्यायला आली. परत जाताना अचानक एक अस्वल रस्त्यावर आले आणि आमची गाडी पाहून थबकले. अस्वलाची दृष्टी फारशी चांगली नसते. अनेक वेळा ते माणसाच्या अचानक समोर येतात आणि मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी पडते. गोंधळलेल्या अवस्थेत गाडीकडे काही वेळ पाहून ते अस्वल आल्या पावली परत गेले.

कॅम्पकडे परतल्यावर जेवण आणि थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी निरीक्षणांची देवाण-घेवाण झाली. एका गटाला वाघोबाने दर्शन दिले होते; तर कुणी रानकुत्रे पाहिल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशीची उत्कंठा आणखीनच वाढली होती. आम्ही सगळे कॅम्पबाहेर बसून चर्चा करत होतो. दिवस मावळतीला आला होता. आमच्या समोरील जंगलातून चितळांचा एक कळप जंगलाला लागून असलेल्या मोकळ्या जागेत चरत होता.

तेवढ्यात एका मोठ्या ऐन वृक्षाच्या बुंध्याशी काहीतरी असल्याचे जाणवले. जंगलात असे आभास अनेक वेळा होतात. वाळवीचे वारूळसुद्धा एखाद्या प्राण्याप्रमाणे भासते चटकन. म्हणून खात्री करण्यासाठी डोळ्याला दुर्बीण लावली आणि माझा डोळ्यांवर विश्वास बसेना. समोर साक्षात बिबट्या हरणांच्या शिकारीच्या प्रयत्नात दबा धरून होता. त्याच्या भेदक डोळ्यांनी एका हरणाला हेरले होते. माझ्या आयुष्यातले पहिले बिबट्या दर्शन होते ते.

आनंदाच्या भरात माझ्या तोंडून अनेक वेळा ‘लेपर्ड, लेपर्ड’ असे शब्द निघताच सगळ्यांच्या नजरा माझ्या दुर्बिणीच्या दिशेने वळल्या आणि बिबट्याला शोधण्याची लगबग सुरू झाली. मी माझ्या डोळ्यांवरची दुर्बीण न काढताच बिबट्या उभा असल्याचे ठिकाण सांगायचा प्रयत्न करत होतो. जंगलातील प्राणी तेथील अधिवासाशी कमालीचे एकरूप होतात आणि म्हणूनच माझ्या सहकाऱ्यांना बिबट्याला शोधणे कठीण जात होते.

इतक्यात चितळांना बिबट्याची चाहूल लागली आणि त्यांच्या ‘अलार्म कॉल’ने जंगल दुमदुमून गेले. त्या गोंधळात वानरांनीही आपल्या आवाजाची पुस्ती जोडली. भक्ष्याला भक्षक आधी दिसल्याने बिबट्याची शिकार करण्याची संधी हुकली आणि तो शांतपणे जंगलात निघून गेला.

बिबट्या परत जाताना मात्र सर्वांना दिसला आणि कॅम्पमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. कळपातील एका चितळाला जीवदान मिळाले होते. असा जीवन-मरणाचा खेळ निसर्गाच्या पटावर कायमच होत असतो. कधी भक्षक बाजी मारतात; तर कधी भक्ष्याचे नशीब साथ देते. माझ्यासाठी मात्र ती पाच मिनिटे अविस्मरणीय ठरली होती.

दुसऱ्या दिवसाच्या सकाळी जंगलातील ज्या भागात गेलो तेथे बांबूचे गर्द जंगल होते. निरीक्षणे नोंदवत पुढे जात होतो. अचानक खुरांचे मोठाले आवाज होऊन पायाखाली स्पंदने जाणवली. गर्द झाडी असल्याने त्या आवाजाच्या दिशेने पाहूनही काही दिसत नव्हते. गव्यांचा एक कळप आमची चाहूल लागताच उधळला होता. काही अंतरावर थांबून नर आणि मादी गवे नजरा रोखून व नाकपुड्या फुगवत आमच्याकडे पाहू लागले.

सकाळच्या कोवळ्या उन्हात काळेभोर आणि बलदंड शरीराचे नर गवे आखाड्यातील पहिलवानाप्रमाणे भासत होते. आम्हीही त्यांच्या नजरेतील भीतीयुक्त सावधगिरी नाहीशी झाली, असे जाणवल्यावर पुढे निघालो. डॉ. कारंथ आणि चिनाप्पा यांच्याकडून मिळालेले जंगल वाचनाचे धडे वेळोवेळी उपयोगी पडत होते.

आम्ही पाऊलवाटेच्या अखेरच्या टप्प्यावर पोहोचलो. रस्त्यापाशी येऊन निरीक्षण वहीत नोंदी पूर्ण करत असतानाच अगदी थोड्याच अंतरावरून भयावह भासावा, असा हत्तीचा चित्कार कानावर पडला. सभोवताली बांबूचे घनदाट वन होते, त्यामुळे चित्कारणारा हत्ती नजरेस पडत नव्हता. आम्ही कोणतीही हालचाल न करता स्तब्ध उभे होतो. एकमेकांशी फक्त डोळ्यांनी संवाद साधत हत्तीची चाहूल घेऊ लागलो.

दोन मिनिटांनी एक मादी हत्ती झाडीतून रस्त्यावर आली आणि आमच्या दिशेने डोळे रोखून पाहू लागली. आमच्यातील अंतर जेमतेम पन्नास फूट असावे. ती कान पसरून आणि सोंड उंचावून आम्हाला कसला तरी इशारा देत होती. तिच्या असे वागण्याचे कारण तिच्यासोबत असलेले तिचे पिल्लू असावे, असा अंदाज आला. कान पसरून ती पुन्हा एकदा चित्कारली आणि काही समजायच्या आत तिने आमच्या दिशेने धावायला सुरुवात केली.

आम्हालाही उलट्या दिशेने धावण्यावाचून काही गत्यंतर नव्हते. थोडे अंतर धावल्यावर मागे वळून पाहिले तर ती हत्तीण अजूनही आमच्या दिशेने धावत होती. इतका महाकाय प्राणी एवढ्या जलदगतीने धावू शकतो याचे आश्चर्य वाटले. छातीत धडधडत होते; पण हा हत्तीचा ‘मॉक चार्ज’ आहे, हे लक्षात आल्याने गंमतही वाटत होती. लहानपणी कुत्रे पाठी लागल्यामुळे मी असा धावलो होतो आणि त्यानंतर हत्तीने त्या दिवशी पळायला भाग पाडले होते.

सुमारे दीडशे मीटर धावलो असू. मग मात्र दम लागला. अजून धावणे शक्य नव्हते. आम्ही एका झाडापाठी लपून झाडाच्या बुंध्यावर हातातील लाकडी पॅडने मारून आवाज काढू लागलो. त्या आवाजाने किंवा आम्ही पिलापासून बरेच दूर गेलो याची खात्री पटल्याने असेल कदाचित; पण हत्तीण धावायची थांबली. तरीही आमचा पाठलाग सोडत नव्हती. साधारण पाच-दहा मिनिटे ती आमच्याकडे पाहून चित्कारत होती. थोडे मागे जाऊन पुन्हा ती आमच्या दिशेने यायची.

तितक्यात तिचे पिल्लू बांबूच्या झाडीतून बाहेर आले. ती पिल्लाच्या दिशेने आमची चाहूल घेत घेत जाऊ लागली व काही वेळाने हत्तीण आणि पिल्लू जंगलात नाहीसे झाले. आम्ही मात्र त्याच जागी थिजल्यासारखे बराच वेळ उभे होतो. पिल्ले जवळ असताना हत्ती विशेष आक्रमक होतात. आम्ही नकळत हत्तीण व तिच्या पिल्लाच्या जवळ आलो होतो आणि म्हणूनच तिने आमच्यावर धावून आम्हाला पिल्लापासून लांब नेले होते. तो पाठलाग फक्त आमच्यासाठी सावधानतेचा इशारा होता.

थोड्या वेळाने आम्हाला न्यायला गाडी आली आणि आम्ही कॅम्पवर पोहोचलो. हत्तीने केलेला तो अल्प ‘पाठलाग’ उत्कंठावर्धक आणि कधीही न विसरता येणारा होता. नागरहोळेतील ‘वो सात दिन’ जंगल विश्वातील अनेक मोलाचे धडे उलगडून बरेच काही शिकवून गेले.

(लेखक प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक, निसर्ग संवर्धक आणि ‘द कॉर्बेट फाउंडेशन’चे संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

Farmer : भरपाईपासून ५० हजार शेतकरी वंचित,गतवर्षी रब्बी हंगामात झाले होते पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT