Emperor Ashok esakal
सप्तरंग

Emperor Ashok : अपूर्वाई अशोककालीन स्तंभांची!

अशोकानं लेणींची उभारणी केली, स्तूप उभारले. बौद्ध धर्माच्या (Buddhism) प्रचार आणि प्रसारासाठी जे जे शक्य आहे ते सगळं केलं.

सकाळ डिजिटल टीम

अशोकानं काही स्तंभांवर आपले लेख कोरून ठेवले आहेत, तर काही स्तंभांवर लेख दिसून येत नाहीत. अभ्यासकांच्या मते, काही स्तंभ हे अशोकपूर्व काळातील असावेत.

केतन पुरी ketan.author@gmail.com

सम्राट अशोकाच्या (Emperor Ashoka) काळात खोदण्यात आलेल्या लेणींविषयी आपण मागील लेखात माहिती घेतली. अशोकानं लेणींची उभारणी केली, स्तूप उभारले. बौद्ध धर्माच्या (Buddhism) प्रचार आणि प्रसारासाठी जे जे शक्य आहे ते सगळं केलं. यांच्यासोबतच अशोकानं आणखी एका गोष्टीमध्ये आपलं भरीव योगदान दिलं, ज्याला आज आपण ‘अशोककालीन स्तंभ’ म्हणून ओळखतो. स्तंभांची उभारणी करण्यामागं अनेक कारणं आहेत. ऋग्वेदात या स्तंभांना ‘युप’ या नावानं संबोधण्यात आलंय.

यज्ञ करताना किंवा कोणत्याही प्रकारचा यज्ञविधी करताना जमीन आणि आकाश यांच्यामधील अक्ष म्हणून हा युप यज्ञ करणाऱ्या व्यक्तीच्या मार्फत उभा करण्यात येत असे. अशोकाचे स्तंभ (Pillars of the Ashoka Period) आणि त्यांची व्याप्ती ही मौर्य साम्राज्याच्या प्रदेशात असल्याचं आपल्याला दिसून येतं. मौर्य कालखंडानंतर या स्तंभांना त्यांच्या मूळ जागेवरून हलवल्याचे उल्लेख इतिहासात वाचायला मिळतात.

फा हीआन हा परकीय प्रवासी जेव्हा भारतात आला, तेव्हा त्यानं या स्तंभाची पूजा होताना पाहिल्याचं लिहून ठेवलंय. सारनाथ, कोसंबी, पाटलीपुत्र यासोबतच हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) कोपरासारख्या ठिकाणी सुद्धा अशोकाचे स्तंभ पाहिल्याचं तो सांगतो. अल बरुनीनं हे स्तंभ प्रत्यक्ष पाहिले होते आणि ते कोणत्या तरी धातूपासून बनवले असावेत, असं निरीक्षण त्यानं नोंदवलंय. यानंतर चौदाव्या शतकात मोठी गंमत झाली. फिरोझ शाह तुघलक याच्या कारकीर्दीत अशोकाचे काही स्तंभ त्याच्या मूळ जागेवरून हलवण्याचे आणि या तुघलकाच्या राजधानीत किंवा त्यानं बांधलेल्या किल्ल्यात आणून ठेवण्याचे आदेश देण्यात आले. ‘सिरत इ फिरुझशाही’ आणि ‘तारीख इ फिरुझशाही’सारख्या ग्रंथांमध्ये याची सविस्तर वर्णनं वाचायला मिळतात. टोप्रा येथील स्तंभ दिल्लीला आणण्यासाठी फिरोझशाहनं काय काय खटाटोप केले, याचे सविस्तर वर्णन या समकालीन ग्रंथामध्ये केले आहे.

लांब चाळीस चाकांची एक गाडी करण्यात आली. टोप्रा येथील स्तंभ खोदण्यात आला. तो फुटू नये किंवा त्याला इजा होऊ नये, म्हणून कापसाच्या लादीत गुंडाळण्यात आले. झाडांच्या सालीने तो बांधून ठेवण्यात आला. हजारपेक्षा जास्त माणसे या कामासाठी लावली होती. पायदळ आणि घोडदळातील शेकडो सैनिक या मोहिमेवर नियुक्त केले होते. गंगा ओलांडताना नावांचा पूल तयार करण्यात आला होता. हे वर्णन इतके सविस्तर आहे, की या घटनेचे संपूर्ण चित्रण आपल्या नजरेसमोर सहज उभे राहते. त्याने या स्तंभावरील अशोकाचा लेख वाचण्याचा प्रयत्नही केला होता, असे नोंदवून ठेवले आहे.

जहाँगीरने तुघलकाच्या पावलावर पाऊल टाकत अलाहाबाद इथं कोसंबी या महत्त्वाच्या ठिकाणावरून एक स्तंभ आणून ठेवला. हा स्तंभ आज ‘अलाहाबाद पिलर’ म्हणून जगप्रसिद्ध आहे. सोबतच, लौरिया नंदनगढ इथल्या स्तंभावर जहाँगीरचा वंशज औरंगजेबानं आपलं नाव कोरलं असून त्यामध्ये ‘मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब पादशाह गाजी सन १०७१ (इसवी सन १६६०-६१)’ असा उल्लेख वाचायला मिळतो. सांचीचा स्तंभ सोडला, तर अशोकाचे इतर स्तंभ गंगा आणि यमुनेच्या दोआब प्रदेशात जास्त प्रमाणात आढळून येतात. सारनाथ, लौरीया, अलाहाबाद, फिरोजशाह कोटला, वैशाली आदी ठिकाणांवरील स्तंभ प्रसिद्ध आहेत. पंचवीस ते तीस फूट उंच एकाच दगडात कोरलेला स्तंभ, त्यावर गोलाकृती आडवं चक्र आणि कमळाच्या उलट्या आकाराची रचना, त्यावर हत्ती, वाघ, बैल किंवा घोडा यांसारखे प्राणी आणि त्यांच्या डोक्यावर धम्मचक्र... साधारणपणे एखाद्या स्तंभाची अशी रचना असते. यातील काही स्तंभशीर्ष, ज्याला आपण पिलर कॅपिटल म्हणतो, ते जगप्रसिद्ध आहेत. सारनाथ येथील चार सिंह आणि त्यावर असणारे चक्र हे १९४७ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘राष्ट्रीय चिन्ह’ म्हणून स्वीकारलं.

रामपूर्वा येथील बैल आज राष्ट्रपतीच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. लौरीया नंदनगढ येथील स्तंभ आणि त्यावर असणारे सिंह अतिशय सुंदर आहेत. वैशाली येथेही अशाप्रकारचे सिंह, बैल सापडले आहेत. संकिशा येथे स्तंभावर हत्ती दिसून येतो. हे सर्व एकाच दगडात खोदलेले आहेत. टोप्रा येथे फिरोजशाह तुघलकच्या काळात स्तंभ खोदत असताना पायामध्ये एक आयताकृती तळखडा आढळून आला होता, ज्यावर संपूर्ण स्तंभ उभा होता. वैशाली इथल्या स्तंभाचं उत्खनन केलं असता, जमिनीमधील त्याची खोली ही जवळपास तीन मीटर एवढी असल्याचं नोंदवून ठेवलंय. तसेच, वैशाली येथील स्तंभाचा तळखडा चौकोनी असून, इतर कोणत्याही ठिकाणी आपल्याला चौकोनी रचना खांबाच्या पायामध्ये केल्याचं दिसून येत नाही.

अशोकानं काही स्तंभांवर आपले लेख कोरून ठेवले आहेत, तर काही स्तंभांवर लेख दिसून येत नाहीत. अभ्यासकांच्या मते, काही स्तंभ हे अशोकपूर्व काळातील असावेत. कारण, अशोकाला असे स्तंभ उभा करण्याची कल्पना अचानक कशी सुचली असेल? असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जातो. व्ही. ए. स्मिथ यांनी पहिल्यांदा अशोकाच्या स्तंभाची कालानुक्रमानं मांडणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी असे निरीक्षण नोंदवून ठेवले आहे, की अशोकानं ग्रीक स्थापत्यातून ही प्रेरणा घेतली असावी.

पुढं, जेम्स फर्ग्युसन यांनी अशोकाच्या स्तंभ उभारणीमागं पर्शियन स्थापत्याचा प्रभाव असल्याची मांडणी केली. पण, ए. के. कुमारस्वामी हे पहिले अभ्यासक होते, ज्यांनी अशोकाच्या स्तंभाच्या उभारणीचे पूर्ण श्रेय हे एतद्देशीय स्थापत्यशास्त्राला देऊ केले. आजही अशोकाच्या स्तंभावर वेगवेगळ्या परिक्षेपातून अभ्यासक संशोधन करत आहेत. काही स्तंभाची रचना ही बौद्ध विहारांच्या किंवा स्तूपाच्या परिसरात करण्यात आल्यामुळं इर्विनसारखे अभ्यासक या स्तंभाची पूजाअर्चा होत असल्याचा अंदाज मांडतात. फू हीआनने त्याच्या प्रवासवर्णनात अशाप्रकारचं निरीक्षण नोंदवून ठेवलेले आहेच. मध्ययुगीन कालखंडात ओडिशामध्ये भास्करेश्वर मंदिराची उभारणी करण्यात आली.

भुवनेश्वर शहरातील सर्वांत उंच शिवलिंग म्हणून याला मान्यता आहे. या लिंगाची लांबी जवळपास तीन मीटर आहे. येथून जवळच अशोकाच्या एका स्तंभाचा अवशेष आढळून आहे. याच दगडापासून भास्करेश्वर मंदिरातील शिवलिंगाची निर्मिती केली असल्याचा अंदाज अभ्यासकांचा आहे. अशोकाचे हे स्तंभ आणि त्याच्या शीर्षावर कोरण्यात आलेले प्राणी, हे एवढे सुंदर आणि वास्तवाच्या जवळ जाणारे आहेत, की आपल्याला आजच्या काळात त्याची प्रतिकृती करणंसुद्धा शक्य नाही. या स्तंभाच्या आणि त्यावर कोरलेल्या लेखाच्या माध्यमातून अशोकाची भू-राजकीय व्याप्ती आणि धार्मिक तसेच सामाजिक संरचनेचा अंदाज सहजपणे लागतो.

(लेखक हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती, तसंच प्राचीन-मध्ययुगीन भारतीय इतिहास हेदेखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

SCROLL FOR NEXT