Dog Wheel Chair sakal
सप्तरंग

श्‍वानांची व्हिलचेअर!

‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे भटके श्‍वान दुर्लक्षित राहिलेला प्राणी आहे. उकिरड्यावरचे खाऊन जगणारा, फेकलेले खाणारा, अंगावर धावून जाणारा म्हणून त्यांच्या नशिबी द्वेषच आला आहे.

अवतरण टीम

- किशोर बोकडे

‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे भटके श्‍वान दुर्लक्षित राहिलेला प्राणी आहे. उकिरड्यावरचे खाऊन जगणारा, फेकलेले खाणारा, अंगावर धावून जाणारा म्हणून त्यांच्या नशिबी द्वेषच आला आहे. भरभरून मिळणारे प्रेम, आजारपणात केली जाणारी शुश्रूषा, पौष्टिक-सात्त्विक आहारापासून हा प्राणी कोसो दूर राहिला आहे.

अशा परिस्थितीत व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारे गुजरातमधील राजकोट येथील भूमित व्यास यांनी खास श्‍वानांसाठी ‘मिंटबॉल डॉग व्हिलचेअर’ नावाची कंपनी सुरू केली आहे, ज्यामुळे आज हजारो दिव्यांग श्‍वानांना स्वतःच्या पायांनी जग फिरण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आज जगभरात ‘श्‍वान दिन’ साजरा केला जात आहे, त्यानिमित्त...

श्‍वानांच्या तुलनेत गाय, बैल, घोडा, हत्ती, शेळ्या-मेंढ्या, उंट यांच्यापासून मानवाला भरभरून उत्पन्न मिळत आले आहे. श्‍वान मात्र वेगळ्या वर्गातला आहे. शहरी जीवनशैलीत तर तो घरचा एक सदस्य झाला आहे. ग्रामीण भागात शेताचे रक्षण आणि हौस म्हणूनच याच्याकडे पाहिले जाते; मात्र त्यांच्या आजारपणात अथवा पायांना इजा झाल्यास त्यांना बेवारसपणे रस्त्यावर अथवा जंगलात सोडून दिले जाते.

ज्या काळात त्यांना प्रेमाची आणि आधाराची गरज असते अशा काळातच त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत अनेक पशूप्रेमी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटनांमुळे अनेक श्‍वानांचे आयुष्य सुकर होत असल्याचे दिसून येते.

श्‍वानांसाठी शेल्टर उभारून त्यांचे पालन करणे, भटक्या श्‍वानांची नसबंदी करणे, दिव्यांग-आजारी श्‍वानांसाठी शिबिरे राबवून त्यांची सेवा करणारे अनेक जण पुढे येत आहेत. त्यातही दोन पायांनी दिव्यांग असणाऱ्या भटक्या तसेच पाळीव श्‍वानांसाठी भूमित व्यास यांनी सुरू केलेले कार्य खरोखरच प्रेरणादायक आणि लाखो श्‍वानांचे जीवन सुखकर करणारे ठरले आहे.

Bhumit Vyas

जग फिरण्याची जशी मानवाची इच्छा असते, तशीच भावना श्‍वानांचीही असते. भटकंती आणि फिरणे हा श्‍वानाचा स्वभाव गुणधर्म. अशा वेळी अपघाताने किंवा आजारपणामुळे पाय गमावलेल्या श्‍वानांना एकाच जागी बसून राहणे जीवघेणे ठरते. त्यांना अधिकच्या आरोग्याच्या समस्या भेडसावतात.

व्यायाम न झाल्यामुळे पोटाचे विकार वाढून शौचाच्या तक्रारी वाढतात. एकाच जागी जास्त बसून राहिल्यामुळे केसगळतीची मोठी समस्या भेडसावते. अंग खाजवण्यासाठी मागचे पायच नसल्यामुळे अंगावर गोचिड, पिसू अशा किटकांची पैदास वाढते. साहजिकच रक्त शोषल्यामुळे विविध आजारांचा सामना त्यांना करावा लागतो. फिरणे कायमचे बंद होत असल्यामुळे शरीराला दुर्गंधी सुटते.

दोन्ही पाय नसल्यामुळे चालताना शरीर जमिनीवर घासल्यामुळे जखमा होतात. शिवाय इतर सुदृढ श्‍वानांकडूनही त्यांच्यावर हल्ले होऊन मृत्यू ओढवतो. अन्नाच्या शोधात असल्यामुळे रस्त्यावर आल्यानंतर अचानक वाहनांखाली सापडून अनेक श्‍वानांना जीवाला मुकावे लागते. त्यामुळे अशा श्‍वानांसाठी व्हिलचेअरचा पर्याय खूपच फायदेशीर ठरतो.

भूमित व्यास हे मूळचे गुजरातमधील राजकोट शहरात राहणारे. २०१७ मध्ये घरासमोर रक्ताने माखलेल्या अपघातग्रस्त श्‍वानाला पाहून व्यास यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. एका वाहनाची धडक बसून पायाला इजा झाल्यामुळे तो घरासमोरील फरशीवर पडला होता. त्याला उठताही येत नव्हते.

वेब डिझायनर म्हणून काम करणाऱ्या भूमित यांनी त्याच वेळी आजारी, दिव्यांग श्‍वानांना कायमस्वरूपी वेदनामुक्त करण्यासाठी पाऊल उचलले. अपघाताने किंवा आजारपणात दोन्ही पाय गेलेल्या श्‍वानांसाठी व्हिलचेअर बनवणारी त्या वेळी भारतात कोणतीही कंपनी वा संस्था नव्हती.

केवळ चीनमध्येच या वस्तू उपलब्ध असल्यामुळे फ्लिपकार्ट, ॲमेझॉन यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्याच्या माध्यमातून त्या मागवाव्या लागत होत्या; परंतु एका व्हिलचेअरची किंमत सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत असल्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारे नव्हते. त्यामुळे भूमित यांनी स्वतःच व्हिलचेअरचे डिझाईन करणे आणि ती बनवण्याचे ठरवून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.

सुरुवातीला भूमित यांनी आपल्या घरातच ॲल्युमिनिअम, स्टिल व फायबरपासून लहान श्‍वानांसाठी व्हिलचेअर बनवल्या. दोन पाय गेलेल्या तसेच चारही पाय गमावलेल्या श्‍वानांसाठी त्यांनी रचना केली आहे. १० किलोपासून ३० ते ४० किलोपर्यंतच्या श्‍वानांसाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हिलचेअर बनवल्या आहेत.

पग, जर्मन शेफर्ड, बुलडॉग आदी जातींच्या शरीरयष्टीनुसारही त्यांची रचना करण्यात आली आहे. उंची कमी असणाऱ्या, खूप उंच असणाऱ्या, जाड, वजनी श्‍वानांच्या व्हिलचेअरसाठी वेगवेगळे धातू वापरले जातात. स्थानिक पातळीवरील भटक्या तसेच पाळीव श्‍वानांसाठी व्हिलचेअर बनवल्यानंतर शहराबाहेरूनही त्यांची मागणी वाढू लागली.

आज भारतातील सर्वच राज्यांसह दुबई, कुवेत या ठिकाणांहून अनेक श्‍वानांचे पालक या व्हिलचेअर खरेदी करतात. लाखो श्‍वानांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले आहे. आज देशभरातील भटक्या श्‍वानांचे दुःख हलके करण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे.

भटक्या श्‍वानांसाठी मोफत सेवा

भूमित व्यास यांनी जामनगर येथे ‘मिंटबॉल डॉग व्हिलचेअर’ कंपनीच्या माध्यमातून पाळीव श्‍वानांसाठी अगदी माफक दरात म्हणजे दोन ते आठ हजारांपर्यंत व्हिलचेअर बनवल्या आहेत. परदेशी कंपन्यांच्या किमती ४० ते ५० हजार असल्यामुळे व्यास यांनी तयार केलेल्या व्हिलचेअरची किमत माफक आहे.

भटक्या जखमी श्‍वानांवर सामाजिक संस्थांच्या मदतीने उपचार करून गरजेनुसार त्यांना मोफत व्हिलचेअर बनवून सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत. व्यास यांनी आतापर्यंत २५०० व्हिलचेअर बनवल्या आहेत. त्यापैकी त्यांनी १५०० पेक्षा जास्त भटक्या श्‍वानांसाठी व्हिलचेअर बनवून दिल्या आहेत.

kishor.bokade@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT