shantibai yadav sakal
सप्तरंग

मक्तेदारी मोडणारी शांताक्का!

हजामत करणे ही केवळ पुरुषांचीच मक्तेदारी असताना १९८० च्या दशकात एका महिलेने पतीच्या निधनानंतर हातात वस्तरा घेतला.

अवतरण टीम

- किशोर बोकडे

हजामत करणे ही केवळ पुरुषांचीच मक्तेदारी असताना १९८० च्या दशकात एका महिलेने पतीच्या निधनानंतर हातात वस्तरा घेतला. परंपरेला छेद देणाऱ्या या महिलेचे नाव आहे शांतीबाई यादव! आज जागतिक न्हावी दिवस, त्यानिमित्त...

कोल्हापूर जिल्‍ह्यामधील गडहिंग्लज तालुक्यातील हसूर सासगिरी येथे राहणाऱ्या शांतीबाई यादव यांनी पुरुषप्रधान व्यवसायात पाय रोवून केवळ स्वत:साठी जगण्याचा मार्ग मोकळा केला नाही, तर सामाजिक अडचणींमुळे हिंमत गमावणाऱ्या लाखो महिलांसाठी प्रेरणा बनल्या आहेत. आज पंच्याहत्तरी ओलांडलेल्या शांताबाईचे घर अनेक पुरस्कारांनी भरून गेले आहे.

महिला पोलिस अधिकारी, पायलट झालेल्या, आयएएस, मिलिटरीमध्ये गेल्याचे कौतुक आजही आहे. खेड्यांत, शहरांत मोटरसायकल, कार चालवणाऱ्या तरुणी सर्रास दिसतात; पण या बायकांकडे पूर्वी जितक्या कुतूहलाने पाहिले जाई, तसे आज पाहिले जात नाही.

पण केवळ पुरुषांचीच मक्तेदारी असणारे हजामतीचे काम १९८० च्या दशकात करणारी बाई म्हणजे मोठे धाडसाचे काम. कारण आजही गावगाड्यात पुरुष समोरून येताना दिसला तर बाईने पदर डोक्यावर घ्यायची रीत आहे. अशा वातावरणात सतत पुरुषांशी संपर्क येणारा व्यवसाय एका निरक्षर शांताबाईंनी ४० वर्षांपूर्वी सुरू केला.

विशेष म्हणजे पुरुषही शांताबाईंकडे केस कापायला, दाढी करायला जाताना कधीही लाजले नाहीत. आजारी पतीच्या अकाली निधनानंतर शांताबाईंना ऐन तारुण्यात वैधव्य आले. पदरी चार मुली. सर्वांत लहान मुलगी सहा महिन्‍यांची.

कोल्हापूर जिल्ह्यामधील गडहिंग्लज तालुका तसा ग्रामीणच. कर्नाटक-महाराष्ट्राचा सीमाभाग. या भागातील हासूर सासगिरी येथे शांताबाई यादव राहतात. शांताबाईंचे मूळ गाव अर्दाळ; तर अरळगुंडी हे माहेर. भावकीच्या वादामुळे व अल्पभूधारक असल्यामुळे त्यांनी ५० वर्षांपूर्वी आपल्या पतीसह ते गाव सोडले.

मजलदरमजल करत पती श्रीपती जेथे संधी मिळेल तेथे पुरुषांचे केस व दाढी करत कुटुंब सांभाळत होते. दरम्यान, हसूर सासगिरी येथे कोणताच न्हावी नसल्यामुळे अनेकांची परवड होत होती. केस कापण्यासाठी वा दाढी करण्यासाठी बाहेरील गावात जावे लागत होते.

त्यामुळे तत्कालीन तालुका सभापती हरिभाऊ कडूकर यांनी श्रीपती यादवला आपल्या हसूर सासगिरी गावात कायमचेच राहण्यासाठी बोलावले. बेघर योजनेतून त्यांना दोन खोल्यांचे घरही बांधून देण्यात आले. बलुतं पद्धतीने त्यांना धान्य मिळत होते. यातून संसार सुरळीत चालला होता. दरम्यानच्या काळात शांताबाईंना दोन मुली झाल्या; परंतु जन्मताच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर एकामागोमाग एक अशा चार मुलींचा जन्म झाला.

श्रीपती, शांताबाई आणि त्यांच्या चार मुली चांगुणा, कोंडुबाई, पुष्पाबाई व संगीता अशा सहा जणांचा संसार. सर्वकाही सुरळीत सुरू असताना पती श्रीपतीला दारूचे व्यसन जडले, त्यानंतर आजारपणाचे निमित्त होऊन त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या अकाली निधनामुळे शांताबाईंवर दुःखाचा डोंगरच कोसळला.

सर्वांत धाकटी मुलगी केवळ सहा महिन्यांची. पतीच्या पश्‍चात चार मुली सांभाळणे म्हणजे मोठे दिव्यच. मध्यंतरी मुलींसह आत्महत्येचाही विचार त्यांच्या मनाला स्पर्शून गेला.

अचानक पतीचे निधन झाल्यामुळे चार मुलींसह शांताबाईंचा संसार उघड्यावर पडला. शेती करावी म्हटली तर भाऊबंदकीच्या वादात त्यांच्या वाट्याला काहीच आले नव्हते. त्यामुळे तो मार्गही बंद झाला. शांताबाईंचे वडीलही पारंपरिक न्हावीच होते. लहानपणापासून त्यांनी अगदी बारकाईने वडील करत असलेली हजामत पाहिली होती. त्यामुळे गावातील मुलांचे केस कापून उदरनिर्वाह करण्याचा त्यांनी मानस केला.

या व्यवसायात दररोज वेगवेगळ्या पुरुषांशी संपर्क येणार हे शांताबाईंना माहीत होते. मात्र शांताबाईंनी प्रत्येकालाच आपला भाऊ व मुलगा मानल्यामुळे त्यांना कधीही कसली समस्या जाणवली नाही. शांताबाईंनी आपल्या चांगल्या स्वभावामुळे सर्वांनाच आपलेसे केले होते. त्यामुळे शांताबाई पंचक्रोशीत ‘शांताक्का’ नावानेच ओळखल्या जाऊ लागल्या. सुरुवातीला शांताक्कांचा केस कापण्याच्या कामात जम बसला नव्हता; तरीही प्रयत्न सुरूच होते.

गावात दुसरा कोणी न्हावी नसल्यामुळे शांताक्कांच्या घरीच अनेकजण केस कापण्यासाठी, दाढी करण्यासाठी जाऊ लागले. पडत्या काळात त्यांना जगण्याची नवी उमेद मिळाली. शांताक्का हे काम चोरून करत होत्या, हे गुपित फक्त ठराविक लोकांनाच माहीत होते.

ही गोष्ट गावचे पुढारी हरिभाऊ कडूकर यांना समजल्यानंतर त्यांनी दवंडी देऊन साऱ्या गावाने शांताबाईंकडे हजामत करून घ्यायचे फर्मान काढले. हरिभाऊंनी त्यांना सलूनचे साहित्य घेऊन दिले. त्या दिवसापासून हसूर सासगिरी गावात स्वत:ला श्रीपती समजून शांताक्का केस व दाढी करण्याचे काम करू लागल्या.

शांताक्कांचा दिनक्रम पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होतो. लवकर उठून जेवण व दैनंदिन कामे आटोपून त्या केस कापणीच्या कामात गुंतून जात. सुरुवातीच्या काळात मुली लहान असल्यामुळे त्यांनी आपल्या घरीच व्यवसाय सुरू केला. त्याकाळी गावकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या सेवेसाठी बलुतेदारी पद्धत होती.

गावातील पुरुष मंडळी, शाळकरी मुले केस किंवा दाढी करवून घेण्यासाठी त्यांच्या घरी जात. मुली मोठ्या झाल्यानंतर शांताक्का पहाटे पाच वाजताच घरातून बाहेर पडत. मुली कर्त्या झाल्यामुळे शांताक्कांचा थोडा भार हलका झाला. पहाटे उठून साहित्यासह दोन-तीन गावांमध्ये कोणाच्यातरी ओट्यावर बसून हजामत सुरू व्हायची.

चहा, जेवण त्याच गावात व्हायचं. दिवसभर १५-२० ग्राहक झाले की सायंकाळी परतीची वेळ व्हायची. घरी आल्यानंतर जेवण करून रॉकेलच्या दिव्याच्या उजेडात पुन्हा गावातील म्हशींचे केस कापण्याचे काम. कधीकधी बाहेरच्या गावातूनसुद्धा म्हशींचे केस कापण्यासाठी बोलावणे असे. एका म्हशीसाठी १० रुपये मिळायचे.

पुरुषांचे केस आणि दाढी करण्यासाठी बलुतं पद्धतीने त्यांना वर्षाअखेर तीन पायली (अंदाजे नऊ किलो) भात मिळायचे. त्यातूनच त्यांनी चार मुलींचे संगोपन केले. काही काळाने बलुतं पद्धतीनंतर दाढीसाठी पाच; तर केस कापण्यासाठी दहा रुपये मिळून लागले. एकटीच्या जीवावर मिळणारे धान्य व तुटपुंज्या पैशांतून पाच जीव जगत होते.

शांताक्का देवी यल्लम्माच्या निस्सीम भक्त. त्यामुळे मंगळवार आणि शुक्रवारी त्यांनी कधीही हजामतीचे काम केले नाही. त्या दिवशी देवीच्या नावाने त्या तालुक्यातील आजूबाजूच्या गावांमध्ये जोगवा मागायला जात. त्यातून त्यांना तांदूळ व चार पैसे मिळायचे. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास बाराव्या दिवशी त्यांच्या वारसांनी पिंडदान करत केस कापण्याची रीत आहे.

गावातील किंवा शेजारच्या गावात असा प्रसंग आल्यास शांताक्का हे कार्य पार पाडत असत. नदीवर किंवा विहिरीवर केस कापून विधी पार पाडला जाई. त्यानंतर सामाजिक प्रथेप्रमाणे गावच्या न्हाव्याला कपडे, नारळ, धान्य व ठराविक रक्कम देण्याची पद्धत आजही ग्रामीण भागात आहे.

शांताक्काने आपल्या आयुष्यात बाराव्याच्या विधीतील हजारो जणांचे केस कापले; परंतु कधीही त्यांनी कोणत्याही वस्तूची वा पैशांची अपेक्षा ठेवली नाही. सामाजिक कार्य म्हणून त्यांनी ते विधी मोफतच केले.

शांताक्कांनी आता पंच्याहत्तरी पार केली आहे. उभे राहून केस व दाढी करण्यातच त्यांचे संपूर्ण आयुष्य गेले. मंगळवार व शुक्रवार अपवाद एकही दिवस सुट्टी न घेता त्यांनी अगदी निष्ठेने आपला व्यवसाय सांभाळला. आज त्यांचे शरीर थकले आहे. जास्त वेळ उभे राहता येत नाही. त्यामुळे बाहेर गावी जाऊन व्यवसाय करणे त्यांना झेपत नाही.

शांताक्कांना निराधार योजनेतून केवळ ७०० रुपये महिन्याला पेन्शन मिळते. या तुटपुंज्या पैशांतून त्या जीवन जगत आहेत. आधुनिक विचारांची, पद्धतीची सुरुवात शहरांतून होते; पण शांताबाईंच्या कार्याने एका खेडेगावात आधुनिकतेची सुरुवात झाली होती. प्रवाहाविरुद्ध चालणाऱ्या शांताबाईंच्या कार्याची अनेकांनी दखल घेतली आहे.

अनेक संस्था, संघटना, शाळांनी त्यांचा सत्कार केला. पतीचे निधन झाल्यानंतर त्यांचा हजामतीचा व्यवसाय करणारी शांताक्का ही एकमेव स्त्री आहे. याच व्यवसायाच्या जोरावर त्यांनी चार मुलींचे केवळ पालनपोषणच नव्हे तर चांगल्या घरात लग्नही लावून दिले.

शांताक्कांचे शरीर थकले तरी मनाने अजूनही खंबीर आहेत. चारही मुली, गडहिंग्लज, गोवा, मुंबई यांसारख्या ठिकाणी संसारात रमल्या आहेत. संपूर्ण घर पुरस्कारांनी भरले आहे; परंतु मला जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो, अशी खंतही त्या बोलून दाखवतात.

kishor.bokade@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT