Salt and Birds Sakal
सप्तरंग

मीठ आणि पक्षी

पॉईंट कॅलिमर येथील समुद्रकिनाऱ्यानजीक असणाऱ्या जमिनी खासगी मालकीच्या. त्यात शेतीप्रमाणे मिठागरे आहेत.

अवतरण टीम

पॉईंट कॅलिमर येथील समुद्रकिनाऱ्यानजीक असणाऱ्या जमिनी खासगी मालकीच्या. त्यात शेतीप्रमाणे मिठागरे आहेत.

- किशोर रिठे sakal.avtaran@gmail.com

पॉईंट कॅलिमर येथील समुद्रकिनाऱ्यानजीक असणाऱ्या जमिनी खासगी मालकीच्या. त्यात शेतीप्रमाणे मिठागरे आहेत. या मिठागरांमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर पक्ष्यांचे अस्तित्व आणि खाद्य अवलंबून असते. पूर्वी अशी अथांग मिठागरे मुंबईनजीकही पाहायला मिळायची; आता टोलेजंग इमारती.

‘मीठ आणि पक्षी’ या दोन्ही गोष्टी आपल्या रोजच्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत. जेवणात मीठ नसले, तर जेवणाला चवच येणार नाही आणि सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्रीपर्यंत पक्ष्यांचे आवाज कानी पडले नाहीत, तर केवळ माणसाच्या सान्निध्यात जगणारा प्रत्येक माणूस वेडा-पिसा झाल्याशिवाय राहणार नाही; तरीही या पृथ्वीतलावरील प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचे असणारे हे दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून आहेत, हे मात्र बहुतांश लोकांना माहिती नाही.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) ही भारतातील सर्वात प्राचीन संस्था पक्षी अभ्यास व संशोधनाच्या क्षेत्रात गत १३९ वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेने निसर्गातील वन्यप्राणी, वनस्पती, कीटक, पक्षी अशा सर्वांचा बारकाईने अभ्यास केला आहे. या संस्थेच्या पक्षीशास्त्रज्ञांनी आजवर पक्षीशास्त्रातील अनेक गूढ उकलणारे अभ्यास केले आहेत. ब्लॅक टेल्ड गॉडवीट (Black-tailed godwit) या इवल्याशा पक्ष्याने मुंबई ते सायबेरिया असा चक्क ९००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आणि हा पक्षी मुंबईत त्यातही नेमके भांडुप पम्पिंग स्टेशनला पुन्हा परतल्याचा शोध ‘बीएनएचएस’ने लावला. असेच शोध लावण्यासाठी या संस्थेचे पक्षीशास्त्रज्ञ दरवर्षी हजारो पक्ष्यांच्या पायात रिंग घालतात; तसेच काही पक्ष्यांना चिप बसवून त्याच्यावर उपग्रहीय प्रणालीद्वारे पाळत ठेवतात.

या दीर्घकालीन प्रकल्पासाठी ‘बीएनएचएस’तर्फे देशाच्या महत्त्वपूर्ण पक्षीअधिवासानजीक काही अभ्यास केंद्रे उभारण्यात आली आहेत. यातीलच एक पक्षी अभ्यास केंद्र देशाच्या दक्षिण टोकावर तमिळनाडूमध्ये ‘पॉइंट कॅलिमर’ येथे थाटले आहे. मागील आठवड्यात एका अभ्यासक्रमाच्या निमित्ताने या केंद्रावर जाण्याचा योग आला. ‘पॉइंट कॅलिमर’चे महत्त्व अनेक गोष्टींसाठी आहे. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला उभारले गेलेले हे गाव. पुढे पोर्तुगीजांनी या गावाशी व्यापार सुरू केला. त्याही पूर्वी भगवान रामाने बांधलेला सेतू येथेच होता, असे सांगितले जाते. श्रीलंकेला जोडणारा ‘सेतु समुद्रन’ हा विवादित प्रकल्प येथेच येणार होता. येथे आठव्या शतकात कोडईकरई येथे विजायलाचोलान याने विटा आणि चुना वापरून पहिले लाईटहाऊस बांधले होते. नंतर ब्रिटिशांनी १८९० मध्ये १३ मीटर उंचीचे लाईटहाऊस बांधले; तर मार्च १९९८ मध्ये भारत सरकारने अत्याधुनिक लाईटहाऊस सुरू केले.

‘बीएनएचएस’चे प्रख्यात पक्षीशास्त्रज्ञ डॉ. बालाचंद्रन यांच्यासमवेत सकाळी पॉइंट कॅलिमर वन्यप्राणी व पक्षी अभयारण्याच्या परिसरात फेरफटका मारला. १९६७ मध्ये २१.६७ चौरस किमी क्षेत्रावरील हे अभयारण्य काळवीट प्राण्यांसाठी घोषित करण्यात आले. डॉ. बालाचंद्रन यांनी आजवर हजारो पक्ष्यांच्या पायांना रिंग बांधून त्या पक्ष्यांना त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी येथे निसर्गमुक्त केले होते. निवृत्तीनंतरही ते याच अभ्यासात लागले आहेत.

मासेमारीसाठी जाणारे अनेक मासेमार तसेच खेकडे जमविणाऱ्या महिला यांची पाहटेची लगबग पाहण्यासारखी होती. दुसरीकडे समुद्रकिनाऱ्यानजीक पसरलेल्या विस्तीर्ण मिठागरांमध्ये हजारो पक्षी आपले खाद्य बळकावण्यात मग्न होते. त्यासाठीच्या त्यांनी अवलंबिलेल्या विविध क्लृप्त्या पाहण्यासाराख्या होत्या. मोठे अग्निपंख (Flamingo) पक्षी हजारोंच्या संख्येत होते. सोबतीला पेलिकण, आयबिस, पिनटेल बदके आणि गॉडवीट, रेडशांक, युरेशीयन कर्लयू, कसपीयन टर्न (सुरय), पलोवरची तर मोजदादच नव्हती. मला ही भारतातील पक्ष्यांची पंढरी वाटली. यातील बहुतांश पक्षी प्रजाती या मिठागरांमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात येथे जमल्याचे डॉ. बाला यांचे मत होते. तसे पाहिले तर समुद्रकिनाऱ्यानजीक असणाऱ्या या जमिनी खासगी मालकीच्या. त्यात शेतीप्रमाणे मिठागरे थाटली आहेत. या मिठागरांमध्ये खासगी मालकांकडून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर या पक्ष्यांचे अस्तित्व आणि खाद्य अवलंबून असते. पूर्वी अशी अथांग मिठागरे मुंबईनजीकही समुद्रकिनाऱ्यालगत पाहायला मिळायची; पण आता मुंबईत मिठागरांपेक्षा टोलेजंग इमारती अधिक पैसे देणाऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे खासगी मालकांनी बहुतांश मिठागरे बंद केली. त्यामुळे पक्ष्यांनीही इकडे पाठ फिरविली. निदान तशी परिस्थिती पॉइंट कॅलिमरला अद्याप आली नाही.

दुसऱ्या दिवशी अभ्यासक्रमाच्या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमात येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व वेदरण्यम यांची भेट झाली. किंबहुना त्यांनी दिलेल्या भाषणाने मला ‘मीठ आणि पक्षी’ या विषयाच्या अधिक खोलवर नेले. वेदरण्यम हे कस्तुरबा कन्या गुरुकुल आश्रम चालवतात. येथे एक गोशाळा असल्याचेही त्यांनी सांगितले, तर गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहामागील भूमिका व त्यात पॉइंट कॅलिमर भागातील गावांनी अनुभवलेली परिस्थिती त्यांनी सांगितली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांच्या घरी दिलेली भेट, गांधीजींच्या घरासमोर त्यांच्या वडिलांनी केलेला सत्याग्रह या सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्याकाळी स्वस्तात असणारे मीठ ब्रिटिशांनी एक हजारपट कर लावून कसे महाग केले आणि मग ही मिठागरे कशी धोक्यात आली, हजारो लोक कसे बेरोजगार झाले, याचाही इतिहास मला स्तब्ध करून गेला. सरतेशेवटी त्यांनी आज पुन्हा मिठागरांबाबत भारत सरकारने लावलेले निकष व कर कसे जाचक आहेत, हेही सांगितले.

एकूण काय, तर मुंबईसारखीच मिठागरांची परिस्थिती आता तमिळनाडू राज्यातील किनारपट्टीवर येऊ पाहत आहे. सरकारने याला शेतीचा दर्जा दिला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते; परंतु मंत्रालयातील बाबू याला उद्योगाचा दर्जा देऊन कर लावत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यावर लिहिलेली एक पुस्तिकाच त्यांनी माझ्या हाती ठेवली.

मग पक्ष्यांनी फुललेली ही नंदनवने कशी तगू शकतील, यापेक्षा आभाळाला भिडणाऱ्या उत्तुंग इमारती जर जास्त पैसा आणि कमाई देत असतील, तर शेतकरी आणि मजूर मिठागरांवर कशासाठी राबतील. थोडक्यात पॉइंट कॅलिमरसारख्या ‘पक्षी पंढरी’ आता नामशेष होणार असल्याचे दिसते. डॉ. बाला म्हणतात, ३०-४० वर्षांपूर्वी मी इथे आलो तेव्हा लाखोंच्या संख्येत पक्षी दिसायचे. आता तुम्ही हजारोंच्या संख्येत दिसणारे पक्षी पाहूनच खुश होता, कारण तुम्ही या पक्षी अधिवासांची संपन्नता आणि पक्ष्यांची खरी जत्रा अनुभवलेलीच नाही.

(लेखक मागील ३० वर्षांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. तसेच केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ तसेच जैवविविधता मंडळावर त्यांनी काम केले आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT